ठळक घडामोडी

०१. १९४६ च्या सुरुवातीस निवडणुका झाल्या, त्या वेळी देशात फक्त १५ टक्के सुशिक्षित व जमीनजुमला धारणा करणाऱ्‍यांनाच मताधिकार होता. त्यामुळे बंगालमध्ये अशरफ मुसलमानांचा राजकारणावरचा प्रभाव टिकून होता. निवडणुकांत मुस्लिम लीगला नेत्रदीपक यश मिळाले. पक्षावर जिनांची पकड अधिकच घट्ट झाली. 


०२. ७ ते ९ एप्रिल १९४६ ला निवडून आलेल्या लीग नेत्यांचे दिल्लीत खास अधिवेशन झाले. या अधिवेशनात जिनांच्या सूचनेवरून सुहरावर्दी या दुसऱ्या एका बंगाली नेत्याने १९४० चा लाहोर ठराव दुरुस्त करून दोन पाकिस्तानांऐवजी एकच पाकिस्तान निर्माण करावे असा ठराव मांडला व तोही एकमताने पसार झाला. 

०३. अखंड पाकिस्तानाच्या ५६ टक्के एवढी विशाल लोकसंख्या पूर्व पाकिस्तानात राहत होती. विद्यमान बांगला देश हा पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जाई. 
०४. पाकिस्तानने उर्दूला अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिल्यापासूनच पूर्व पाकिस्तानातील बहुसंख्य बंगाली भाषिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर सहा वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर व अनेक हुतात्मे बळी गेल्यानंतर १९५४ मध्ये बंगालीला संयुक्त राजभाषेचा दर्जा देण्यात आला. 

०५. पुढे १९५५ मध्ये पूर्व व पश्चिम अशी पाकिस्तानची पुनर्रचना होऊन पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेत दोहोंना समान प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली. तथापि लोकसंख्या दृष्टीने हे अन्याय्यच होते. कारण बंगाली भाषिक पाच कोटी तर पश्चिम पाकिस्तानी चार कोटीच होते. तरीही पूर्व पाकिस्तानातील असंतोष कमी झाला नाही. 

०६. जनरल अयुबखानच्या अध्यक्षीय राजवटीत पूर्व पाकिस्तानींना अगोदरच्या दहा वर्षांत जी सत्ता होती, तीही राहिली नाही. म्हणून शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने स्वायत्ततेची मागणी केली. 

०७. डिसेंबर १९७० मधील निवडणुकांत देशाच्या राष्ट्रीय विधानसभेत अवामी लीगला बहुमत प्राप्त झाले. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान या पक्षाचे अध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांस मिळावयास हवे होते. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्याखान व पश्चिम पाकिस्तानात बहुमत मिळालेले भुट्टो यांचा मुजीबने पंतप्रधान होण्यास विरोध होता. 

०८. पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानात दडपशाही सुरू केली. परिणामतः २६ मार्च १९७१ रोजी स्वतंत्र बांगला देश प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. अवामी लीगने कायदेभंगाची चळवळही सुरू केली. परिणामतः शेख मुजीब व इतर नेत्यांना अटक करण्यात आली. 

०९. मुक्तिवाहिनीने बांगला देशाच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला. त्यामुळे त्या काळात लक्षावधी हिंदु-मुसलमान निर्वासित पू. पाकिस्तानातून भारतात आश्रयाला आले. शेवटी भारताला मुक्तिसंग्रामाला मदत करणे भाग पडले. 

१०. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पतकरली. जानेवारी १९७२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भुट्टो यांनी शेख मुजीब यांची मुक्तता केली. 

११. बांगला देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शेख मुजीब अधिकारारूढ झाले. मार्च १९७३ मधील निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर बहुसंख्य मतदारांनी शिक्कामोर्तब केले. स्वतंत्र बांगला देशाला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली. २२ फेब्रुवारी १९७४ रोजी पाकिस्ताननेही बांगला देशाला अधिकृत मान्यता दिली.



स्वातंत्र्यानंतर बांगलादेशची परिस्थिती
०१. स्वातंत्र्ययुद्ध व अवर्षण यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. दहशतवाद आणि धर्माधिष्ठित पक्ष यांमुळे देशांतील राजकीय स्थैर्यही धोक्यात आले व भारतविरोध प्रचाराला धार आली. अमेरिका, पाकिस्तान व चीन देशांनी बांगला देशांत भारतविरोधी वातावरण तयार करण्यास हातभार लावला. त्यामुळे १९७४ मधील डिसेंबरच्या अखेरीस देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. 

०२. जानेवारी १९७५ मध्ये देशातील संसदीय शासनव्यवस्था रद्द करून त्याऐवजी अध्यक्षीय राजवट सुरू करण्यात आली. शेख मुजीब हे राष्ट्राध्यक्ष बनले व त्यांच्या सर्वंकष सत्ता आली. 

०३. त्यांनी ‘शेतकरी व कामगार अवामी लीग’ हा पक्ष स्थापून देशातील इतर पक्षांवर बंदी घातली. शेख मुजीब यांना अनुयायांवर नियंत्रण ठेवता आले नाही. 

०४. मुक्तिसंग्रामकाळातील फारच थोडी शस्त्रे सरकारला परत करण्यात आली. तसेच माजी मुक्तिसैनिकांनी केलेल्या बेफाम वागणुकीमुळे सरकारबद्दलची आस्था कमी झाली. 

०५. परिणामतः १५ ऑगस्ट १९७५ रोजी शेख मुजीब व त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती यांची एका एका सैनिकी अधिकाऱ्यांच्या गटाने हत्या केली. 

०६. पाकिस्तानधार्जिणे इस्लामपसंद गट, सैन्यातील गट, चीनशी एकनिष्ठ असलेले डावे आतंकवादी गट यांमुळे देशाचे राजकीय स्थैर्य नष्ट झाले. शेख मुजीबनंतर खोंडकर मुश्ताक अहमद यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता हाती घेतली व देशात लष्करी कायदा पुकारून सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. 

०७. त्यानंतर लष्करी कायदा पुकारून सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. त्यानंतर ७ नोव्हेंबर १९७५ मध्ये पुन्हा अवचित सत्तांतर होऊन ब्रिगेडिअर खलिद मुशरफ यांच्या हाती सत्ता गेली. 

०८. यानंतर चारच दिवसांनी म्हणजेच ११ नोव्हेंबर १९७५ रोजी पुन्हा लष्करी उठाव झाला व सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या संयुक्त लष्करी कायदा-प्रशासक म्हणून अधिकारी देण्यात आले. 

०९. अबू सादात महंमद सायेम हे राष्ट्राध्यक्ष बनले आणि तटस्थ अपक्षीय सरकार अस्तित्वात आले. या नव्या व्यवस्थेत मेजर जनरल झिया उर् रहमान यांच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटत गेली. 

१०. देशातील लष्करी कायदा प्रशासन प्रमुख म्हणून झिया यांनी राष्ट्राध्यक्ष सायेमकडून सत्ता आपल्याकडे घेतली. पुढे सायेम यांनी राजीनामा दिल्याने २१ एप्रिल १९७७ पासून झिया यांच्याकडेच राष्ट्राध्यक्षपद आले. 

११. त्यांनी घटनादुरुस्ती करून धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रद्द करून त्याऐवजी बांगला देश इस्लामी राष्ट्र म्हणून घोषित केले. मे १९७७ मध्ये सार्वत्रिक लोकमत घेण्यात आले व त्यात ९९% लोकांनी झिया यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला. 

१२. ऑक्टोबर १९७७ मध्ये झालेला सत्तांतराचा उठाव यशस्वीपणे दडपून टाकण्यात आला; पण हे कारण पुढे करून देशातील तीन प्रमुख राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली. भू व वायुसेनेतील अनेक अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आले व अनेकांना कारावासात डांबण्यात आले. 

१३. लष्करी कायदा जारी असतानाच जून १९७८ मध्ये देशात प्रथमच सार्वत्रिक प्रौढ मतदानानुसार राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यात आली. तिचा कौल जनरल झिया यांच्या बाजूनेच गेला. त्यांनीही ‘बांगला देश राष्ट्रीय पक्ष’ स्थापन केला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी सल्लागार समिती बरखास्त करून मंत्रिमंडळाची स्थापना केली. 

१४. जानेवारी १९७९ मध्ये संसदीय निवडणुका घ्यावयाच्या होत्या; त्यांवर देशातील १२ राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 

१५. तथापि विरोधकांच्या मागणीनुसार १९७४ च्या घटनादुरूस्तीतील सर्व लोकशाहीविरोधी तरतुदी रद्द करण्यात आल्या. राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली व वृत्तपत्रांवरील निर्बंध दूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लष्करी कायदा उठविण्यात आला. परिणामतः राष्ट्रीय अवामी पक्ष व मुस्लीम लीग यांनी निवडणुकीत भाग घेण्याचे ठरविले.

१६. मेजर जनरल मझूर अहमद यांनी चितगाँग येथून केलेल्या लष्करी उठावात ३० मे १९८१ रोजी राष्ट्राध्यक्ष जनरल झिया यांचा चितगाँग येथे खून करण्यात आला. परंतु हा उठाव केवळ ४८ तासांच्या आतच निपटून काढण्यात आला. मंझूर अहमद यांना अटक करण्यात आली (१ जून १९८१). 

१७. राष्ट्राध्यक्ष अब्दुस सत्तार त्याचप्रमाणे पंतप्रधान शाह अझिझ उर् रहमान यांनी यशस्वीपणे देशातील राजकीय स्थैर्य टिकवून ठेवले. मंझूर अहमद यांचा चिडलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी ३ जून १९८१ रोजी खून केला. काहींच्या मते पोलीस व बंडखोर यांच्या संघर्षात मंझूर बळी पडले.

१८. पाकिस्तानबरोबरचे संबंधही १९७६ पासून सुधारू लागले. राजदूतांची अदलाबदल, टपाल-तार इ. दळणवळणांची सुरुवात झाली आणि चहा, ताग यांची प्रथमच पाकिस्तानात आयात करण्यात आली. 



देशाचे प्रशासन
०१. बांगला देशाचे मूळ संविधान राष्ट्रीयता, समाजवाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर अधिष्ठित होते. १९७७ मधील घटनादुरूस्तीवर धर्मनिरपेक्षतेऐवजी इस्लाम धर्मीय राष्ट्र अशी सुधारणा करण्यात आली. समाजवादी आर्थिक व्यवस्था, मूलभूत मानवी हक्क व स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, सार्वत्रिक, मोफत व आवश्यक शिक्षण ही संविधानातील काही महत्त्वाची तत्त्वे होत. इस्लामधर्मीय राष्ट्रांत एकात्मता साधणे अशी तरतूद आहे. देशात घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे.

०२. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानची जी काही रणसामग्री देशात उरली होती, तीमधून भू, नौ व वायुसेना दले उभी करण्यात आली. भारत, ग्रेट ब्रिटन, यूगोस्लाव्हिया, रशिया व काही अरब राष्ट्रे यांच्याकडून काही रणसामग्री मिळविण्यात आली.

०३. बांगला देशाने १९७८ पर्यंत संरक्षणाच्या दृष्टीने इतर देशांशी मैत्रीचे तह किंवा करार केले नाहीत; तथापि १९७७ च्या राज्यघटनेप्रमाणे इतर मुस्लिम राष्ट्रांशी घनिष्ठ संबंध ठेवण्याची तरतूद आहे. देशात संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारे कारखाने नाहीत.

०४. परकीय चलन मिळवून देणारे ताग हे नगदी पीक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील एकूण ताग उत्पादनाच्या सु. ५०% उत्पादन या देशात होते. या पिकाची लागवड देशात एकूण १.०१ द. ल. (९%) हेक्टरांत केली जाते. निम्मे उत्पादन निर्यात केले जाते व उरलेले तागावर देशातच प्रक्रिया करून त्यापासून अनेक वस्तू बनवून त्यांची निर्यात केली जाते. 

०५. १९७१ नंतर काही काळ तागाच्या उत्पन्नात बरीच घट झाली. या सत्तराच्या दशकाच्या अखेरीस नवीन बी-बियाणे व खतांचा वापर करून ते वाढविण्यात आले. स्वातंत्र्य-युद्धकाळात तागाची निर्यात करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आयाती देशांनी तागाऐवजी कृत्रिम धाग्याचा वापर सुरू केला होता. त्यामुळे तागाची आंतरराष्ट्रीय मागणी घटली.  

०६. परंतु १९७९-८० मध्ये खनिज तेलाची दरवाढ झाल्याने कृत्रिम धाग्यांचे उत्पादन घटू लागले व तेव्हापासून तागाची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. 

०७. तागाच्या खालोखाल परकीय चलन चहाच्या निर्यातीपासून मिळते. कापड व सिगारेट हे त्यानंतरचे महत्त्वाचे उद्योग. साखरेचेही उत्पादन देशात थोड्याफार प्रमाणात घेतले जाते.

०८. देशाचे १९७६ पासून ‘टका’ हे अधिकृत चलन आहे. १ टका म्हणजे १०० पैसे असून १, २, ५, १०, २५, ५० पैशांची नाणी व १, ५, १०, ५०, १०० टकांच्या नोटा वापरात आहेत. वि

०९. देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. देशात २,७५६ बँकशाखा असून त्यांपैकी ग्रामीण भागात १,५९४ आहेत (१९७८). ‘बांगला देश बँक’ ही मुख्य बँक असून देशात परदेशी बँकाही आहेत. बँक ऑफ बरोडा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भारतीय बँकाच्या शाखा या देशात आहेत.

१०. देशात ६,२७६.४ किमी. लांबीच्या सडका असून त्यांपैकी ३,८६२.४ किमी. पक्क्या सडका आहेत. त्यांशिवाय २,८१६ किमी. रेल्वे मार्गही आहेत. नद्यांच्या प्रवाहांतून मोठ्या प्रमाणात जलवाहतूक चालते.

११. देशात एकूण पाच महत्त्वाची नदी-बंदरेही आहेत. सागरी बंदरात छलना, चितगाँग महत्त्वाची असून मांगला या नव्या बंदराचाही विकास होत आहे. ‘बांगला देश विमान’ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत हवाई वाहतूक चालते. डाक्का व चितगाँग येथे आँतरराष्ट्रीय विमानतळ असून कुर्मितोला येथे १९७९ च्या अखेरीपासून विमानतळ सुरू करण्यात आला आहे.

१२. इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म होय. देशातील सु. ८०% लोक मुस्लिम असून त्यांपैकी बहुसंख्य सुन्नी पंथाचे आहेत. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक पीराचे भक्त आहेत. १८% लोक हिंदू असून त्यांपैकी बहुतेक कनिष्ठ जातींतील आहेत. 

१३. इंडो-आर्यन भाषासमूहातील बंगाली भाषा देशाची राज्यभाषा असून ती देशातील अल्पसंख्य हिंदूप्रमाणेच बहुसंख्य मुसलमानांचीही मातृभाषा आहे. ही भाषा संस्कृत, प्राकृत व पाली ह्या भाषांपासून विकसित झाली असून अरबी, फार्सी व इंग्रजीच्या प्रभावाने ती समृद्ध झाली आहे.