शेतकरी व गांधीजींची चळवळ
सन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले. 

हया असंतोषाची मुख्य तीन कारणे आहेत. 
०१. वाढता जमीन सारा
०२. आर्थिक मंदी 
०३. दुष्काळाचे संकट.

शेतकर्‍यांवर खरा अन्यास सुरु झाला तो जमीनदारांच्या जुलूमाने आणि ब्रिटिशांच्या अवाजवी जमीनसारा वसुलीने. हयामुळे शेतकर्‍यास जिणे कठीण होत गेले व शेवटी शेतकर्‍यांनी विरोध दर्शविण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे असे ठरविले. 
त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही.


हया संघटित शेतकर्‍यांचे लढे पुर्ण भारतातून घडू लागले. त्यांतील सर्वात प्रसिध्द लढे म्हणजे
०१. संथालांनी सावकारांविरोधी केलेला लढा
०२. दक्षिणेतील सावकारीविरोधी दंगल
०३. बंगालमध्ये जमीनदारांविरोधी कुळांनी केलेला विरोध
०४. पंजाबमध्ये सावकारांविरुध्द शेतकर्‍यांनी केलेला उठाव


अशा रितीने २० व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत शेतकरी जागृत झालेला आढळतो. त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुध्द लढण्यास तो सिध्द झालेला होता. 


हया परिस्थितीत १९२० साली महात्मा गांधींनी राष्ट्रीय चळवळ सुरु केलेली होती. त्यातही शेतकरी सामील झाले. विशेषत: गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन शेतकरी चळवळी फारच यशस्वी झाल्या. ती ठिकाणे म्हणजे बिहारमधील चंपारण्य, गुजरातमधील खेडा आणि बार्डोली सत्याग्रह. 






चंपारण्य सत्याग्रह
०१. गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण्यास जनक राजाची भूमी म्हणतात. हया भागात आंबा आणि नीळ हयांचे उत्पादन होत असे. चंपारण्य सत्याग्रह हा भारतातील गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. 


०२. मात्र बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, चंपारण येथे स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती.

०३. या सत्याग्रहालाच ‘तीन कथिया’ पद्धत असे म्हणतात. सन १९१७ साली ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे तीन कठीया शेतीत निळीची लागवड करावी असा प्रत्येक शेतकर्‍यावर दंडक होता. तीन कठीया शेती म्हणजे शेतीचा तीन विसांश भाग. 


०४. या परिसरातील अन्यायाची खबर गांधीजींना राजू शुक्ल या शेतकऱ्याने १९१६ च्या लखनौ अधिवेशनात दिली होती.


०५. राजेंद्र प्रसाद व ब्रज किशोर बाबू हे गरीब शेतकर्‍यांच्या वतीने खटले चालवीत. त्यात शेतकर्‍यांना थोडेफार यश मिळे. परंतु हे दोघेही वकील त्या भोळया खेडवळांकडून फी घेत असत. चौकशी अंती गांधीजींना कळले की, वकिलांनी केव्हाही हजाराखाली फी घेतली नाही, तेव्हा गांधीजींनी हे असे खटले ताबडतोब थांबवा असा निर्णय दिला. 


०६. ती कठीया पध्दत घालविण्यासाठी शेतकर्‍यांचा सरकारविषयीचा भित्रेपणा घालविणे हाच एकमेव मार्ग आहे असे ठामपणे सांगितले.हया कृतीनुसार गांधीजींनी हया चळवळीत सर्व वडीलधार्‍या मंडळींनी, कारकून व दुभाषी म्हणून मदत करावी अशी विनंती केली. तसेच त्यांना तुरुंगात जाण्याची शक्यताही बोलून दाखविली. तसेच कारकून व दुभाष्याचे काम हे बिनपैशाने व सेवाभावानेच करावे लागेल हेही ठरविले. 


०७. अशा रितीने सर्वजन एकसंघ झाले व शेतकरी चळवळीचा प्रारंभ झाला व राष्ट्रीय सभेची मुळे रोवली गेली. 



०८. जेव्हा त्यांना कमिशनरने तिरहूत सोडून जायला सांगितले आणि नंतर चंपारण्य सोडून जायला सांगितले तेव्हा त्यांनी ही दोन्ही ठिकाणे सोडून जायची नाहीत असे ठरविले. त्यांनी जेव्हा हा नकार कळविला त्यावेळेस त्यांच्यावर समन्स काढून कोर्टात हजर राहण्याचे हुकूम सोडण्यात आले. 

०९. जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणवून आला. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलिस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली.

१०. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. 



११. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली. निळीच्या लागवडीची सक्ती रद्द होऊन शेतकर्‍यांना त्यांच्या मागणीचा न्याय मिळाला. तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली.

१२. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक “बापू” आणि “महात्मा” म्हणून करू लागले. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली. त्यानंतर गांधीजींनी अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा संप यशस्वी केला.





खेडा सत्याग्रह
चंपारण्यमधील चळवळीपेक्षा खेडा येथिल सत्याग्रह चळवळीस वर्तमानपत्रांद्वारे जास्त प्रसिध्दी मिळाली. मुंबईतून हया सत्याग्रहासाठी एवढी रक्कम जमा झाली की शेवटी ती शिल्लक राहिली. पाटीदार शेतकर्‍यांना हा लढा नवीनच होता. 



ब्रिटिशांचा अंमल बजावणार्‍यांची भीती त्यांच्या मनातून घालवायची होती म्हणून त्यांना गांधीजी सांगत अंमलदार हे प्रजेचे शेठ नाहीत तर नोकर आहेत, प्रजेच्या पैशातून ते पगार खाणारे आहेत”. 


सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये खूप हिंमत आली कारण सरकारचे शिक्षा करण्याचे धोरणही नरम होते. हे सरकारी लोकांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा गुरे विकणे, घरावर जप्ती आणणे, शेतातील उभी पीके जप्त करणे, इत्यादी गोष्टी ते करु लागले. 


हयाचा परिणाम होऊन शंकरलाल परिख हयांच्या जमिनीचा सारा भीतीपोटी त्यांच्या जमिनीत राहणार्‍या कुळाने भरला परंतु हयामुळे लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होऊ नये म्हणून घडलेल्या दोषाचे प्रायश्चित म्हणून शंकरलाल परिखाने ती जमीन सार्वजनिक कार्यासाठी देऊन टाकली.

दुसरी घटना कांदेचोर म्हणून प्रसिध्द आहे. हयांत एका शेतातील उभे पीक थोडयाशा सार्‍यांसाठी जप्त करण्यात आले हे पाहून गांधीनी मोहनलाल पंडयाच्या नेतृत्वाखाली पीक काढून घेण्याचा सल्ला दिला. कारण उभे पीक जप्त करणे हे कायद्याच्या न्यायनीतीला धरुन नव्हते. 




त्यांनी लोकांना तुंरुंगात जाण्याची अथवा दंड होण्याची पूर्वकल्पना दिली होती. पंडयास अशा कामामुळे जर तुरुंगवास झाला तर खेडा सत्याग्रह पूर्ण होईल असे वाटत होते. त्यामुळे त्याने सात आठ लोकांना घेऊन उभे पीक चोरुन नेले. 


त्यांचा खटला झाला तेव्हा कुठलेही अपील न करता त्याने तुरुंगात जाण्याचे ठरविले व लोकांमध्ये सत्याग्रहाची जाणीव जागृती केली. त्यास तुरुंगात पोहचविण्यास मोठी मिरवणूक निघाली होती.

हया सत्याग्रहात जे खंबीर होते त्यांचा विनाश होऊ नये व सत्याग्रहींना कमीपणा येऊ नये हयासाठी गांधींनी एक मार्ग दाखविला. त्याप्रमाणे नाडियाद तालुक्यातील मामलेदाराने श्रीमंत पाटीदारांनी जर आपापला महसूल भरला असेल तर गरिबांची वसुली तहकूब ठेवली.


खेडा सत्याग्रहात अशा रितीने गांधीजींच्या नेतृत्वाखाली दुष्काळाच्या काळात अन्याय्य महसूल आकारणीला विरोध दर्शवून पाटीदार शेतकर्‍यांना सत्याग्रह करण्यास प्रवृत्त केले. 



हया चळवळीचे वैशिष्टय म्हणजे शेतकरी तुरुंगवासाला घाबरले नाहीत, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण झाली.


खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. 





बार्डोली सत्याग्रह
गांधींनी सन १९२२ साली गुजरातमध्ये बार्डोली येथे लोकांच्या मदतीने शांततेने कायदेभंग करुन सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. 



हयासाठी सर्व तयारी झाली असतानाच उत्तर प्रदेशातील चौरीचौरा हया गावी हिंसात्मक दंगल झाली. हयात तीन हजार शेतकर्‍यांच्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यामुळे सुडबुध्दीने प्रक्षुब्ध जमावाने पोलीस चौकीला पेटविले व हया दंगलीत २२ पोलीस ठार झाले. 


हया प्रकाराची गांधीजींनी गांभीर्याने दखल घेतली आणि बार्डोलीचा सत्याग्रह मागे घेतला. गांधींना हयातून जाणवले की लोकांना अजूनही अहिंसात्मक चळवळीची जाण आलेली नाही. 


सहा वर्षानंतर सन १९२८ साली पुन्हा बार्डोलीचा सत्याग्रह झाला. बार्डोलीत सरकारने जमीन महसूलीत ३० टक्के वाढ केली. त्यावेळेस गांधीजींनी वकिलांना ब्रिटिशांच्या कोर्टावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. 


त्यावेळेस तेथील नामांकित वकील म्हणून वल्लभभाई पटेल प्रॅक्टीस करीत होते. त्यांनीही गांधीजींच्या आवाहनास दाद दिली व तात्काळ वकिली सोडून ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. 


वल्लभभाई पटेल हयांनी करबंदी (साराबंदी) लढा सुरु केला व सरकारला त्यांनी एक स्वतंत्र लवाद मंडळ नेमण्यास सांगितले. या शेतकऱ्यांचा विरोध मूळ शेतसाऱ्याला नव्हता तर वाढीव शेतसाऱ्याला होता.


यावेळी ब्रिटिशांनी सत्याग्रहात सहभागी असेलेल्या शेतकऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवले. पटेलांसहित इतर शेतकऱ्यांना अटक केल्यानंतरही शेतकऱ्यांनी लढा कायम ठेवला.त्यावेळी ब्रिटिशांनी त्या शेतकऱ्यांच्या घरांवर जप्ती आणून त्यांची भांडी, कोंडी व जनावरे जप्त केली. 


मुंबईच्या गव्हर्नरने हया लढयास सर्व शक्तीनिशी प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु वल्लभभाई पटेल हयांच्या मोहिमेत ऐंशी हजार शेतकरी सहभागी होते त्यांनी हया दडपशाहीचा प्रतिकार केला. 

या प्रचंड दबावानंतरही शेतकऱ्यांनी हार मानली नाही. त्यामुळे माघार घेण्याशिवाय ब्रिटिशांसमोर पर्यायच उरला नाही. अखेर वाढीव शेतसारा ब्रिटिशांनी मागे घेतला.

हया बार्डोली लढयातून यश संपादन केल्यावर लोक वल्लभभाई पटेल हयांना सरदार पटेल म्हणून ओळखू लागले. जनतेच्या वतीने गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ पदवी बहाल केली.






मुळशी सत्याग्रह
याचे नेतृत्व सेनापती महादेव पांडुरंग बापट यांनी केले.


पुणे जिल्ह्यात मुळशी येथे ब्रिटिशांनी एक धारण बांधण्यास सुरुवात केली.


ही कौतुकास्पद बाब असली तरी या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वापरण्यात आल्या त्या बदल्यात त्यांना कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.


त्यावेळी ब्रिटिशांनी हे काम ‘TATA’ नावाच्या कंपनीवर सोपविले. म्हणून त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित करून सेनापती बापट यांनी नेतृत्व केले.


या प्रकरणासाठी व एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडल्याप्रकरणी बापट यांनी ७ वर्षांची शिक्षा झाली.