०१. क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग याचा सामुदायिक परिणाम म्हणून ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत ‘चलेजाव’ ठराव मांडला.



०२. मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी ग्वालीयार टॅंक मैदान (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे कॉंग्रेसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. यावेळी गांधीजींनी ‘करा किंवा मरा’ हा संदेश दिला.


०३. या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना आझाद यांच्याकडे होते. ९ ऑगस्ट रोजी पहाटे इंग्रजाकडून नेत्यांची धरपकड करण्यात आली. गांधीजीना आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान करण्यात आले. व इतर कार्यकारिणीच्या सदस्यांना अहमदनगर तुरूंगात (नगर जिल्ह्यातील अष्टकोनी भुईकोट किल्ला) डांबण्यात आले. 

०४. त्यामुळे ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ ठरली. यानंतर या चळवळीचे नेतृत्व स्थानिक व प्रांत पातळीवरील नेत्यांनी केले. तरीही त्यांचीही ब्रिटिशांनी धरपकड सुरु केली. म्हणून जनतेने भूमिगत चळवळीच्या आंदोलनाला जन्म दिला.

०५. १९४२ च्या या चलेजाव आंदोलनात ‘हिंदू महासभा’ हि एकमेव संघटना सहभागी झाली नाही.

भूमिगत आंदोलन
०१. जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ.राममनोहर लोहिया, अरुण असफ अली, युसूफ मेहेर अली, सुचेता कृपलानी, कामगारनेते एस.एम. जोशी, ना.ग. गोरे हे या आंदोलनातले प्रमुख नेते होते.

०२. या काळात देशभरातील शाळा, महाविद्यालये ओस पाडली. दळणवळण व शासकीय यंत्रणा विस्कळीत केली. इंग्रजांची शस्त्रास्त्रे व खजिना लुटला. 

०३. यावेळी महाराष्ट्रातही काही संघटना स्थापन झाल्या. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांनी ‘आझाद दस्ता’ हि संघटना स्थापन केली.

०४. नागपूरच्या जनरल आवारी यांनी ‘लाल सेना’ ही संघटना स्थापन केली.

०५. भूमिगत चळवळीच्या नेत्यांचे कार्य जनतेला कळावे या उद्देशासाठी उषा मेहता व विठ्ठल झवेरी यांनी मुंबई येथे काँग्रेस रेडियो किंवा सिक्रेट रेडियो याची स्थापना केली.



प्रति सरकार
०१. या काळात देशभरात अनेक ठिकाणी प्रती सरकारे स्थापन करण्यात आली. नाना पाटील यांनी सातारा (महाराष्ट्र) येथे प्रति सरकार स्थापन केले. यासोबतच तालचेर व बालासौर (ओरिसा), बलिया व आजमगड (उत्तर प्रदेश), पूर्णिया व भागलपूर (बिहार), तसेच बंगालमध्ये तामलुक जातीया या नावाने मिदनापूर येथे प्रति सरकारे स्थापन झाली.

०२. या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली. सुरूवातीला याचा शहरी भागात अधिक जोर होता नंतर तो खेडयात पसरला.


०३. सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले तर ओळापूर येथे रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केले.


०४. या काळात भूमिगत चळवळी जोरात उभ्या राहिल्या. जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले व भूमिगत चळवळ सुरू झाली. मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया सुरु झाल्या.  समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेतृत्व केले.


०५. या आंदोलनात भारतीय संस्थानिकांनी इंग्रजांना मदत केली. तसेच सी. राजगोपालाचारी या सारखे मोठे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

०६. निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

०७. मात्र स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले. भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.






महाराष्ट्रातील आंदोलन
१९४२ च्या या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी, चिमूर, यावली, महाड, नगर, पाथर्डी, गारगोटी व नंदुरबार येथील लढेही महत्वपूर्ण ठरले. यावेळी कोल्हापूर व सांगली येथील जनतेनेही या नेत्यांना सहकार्य केले.


या दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी चिमूर हे गाव उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तेथील जनतेच्या आक्रमक विरोधामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.


यावेळी नंदुरबार येथे शाळेवर तिरंगा ध्वज फडकविल्याने शिरीष कुमार या चिमुरड्याला आत्मबलिदान द्यावे लागले. 


यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनीही गुप्त सरकारी बातम्या आंदोलनकर्त्यांना पुरविल्या.


या आंदोलनकर्त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व साने गुरुजी यांच्या गीतांनी प्रोत्साहन दिले. “चलो जवानो करके दिखाओ, अब कहने के दिन बित गए”, “बलसागर भारत होवो”, “पत्थर सारे बम बनेंगे, भक्त बनेगी सेना” हे गीत त्या काळात प्रचंड प्रसिद्ध झाले.


त्यानंतर ब्रिटिशांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अटक केली.





दुसरे महायुद्ध आणि आंदोलन
०१. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या  महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना ‘अहिंसक नैतिक पाठिंबा’ देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले.

०२. दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही. कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते.

०३. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना ‘भारत सोडून जा’ (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता.

०४. पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टीका केली. यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामील होते. काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या अशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींचे मत होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाहीयेत.

०५. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या. अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही.

०६. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की, यावेळेस एखाद दुसऱ्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना ‘करो या मरो’ (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला. 

०७. गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. 

०८. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी  १९४४ ला मरण पावल्या.

०९. ६ आठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती.


१०. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.