ताडोबात ‘बटरफ्लाय ट्रेल’ १३ प्रजातींची फुलपाखरे

भारतात प्रथमच ५ मार्चला राष्ट्रीय फुलपाखरू संस्था व वर्धा जिल्ह्य़ातील सेलू येथील विद्याभारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच ‘बटरफलाय ट्रेल’ उपक्रम राबविण्यात आला. 

या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्य़ात हा उपक्रम करण्याची जबाबदारी येथील ग्रीन प्लॅनेट सोसायटी व सार्ड संस्था (सोशल अ‍ॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट)वर होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थांनी पद्मापूर गेट ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली गेट रस्त्यावर बटरफलाय ट्रेल आयोजित केले होते. 
सव्‍‌र्हे करीत असताना १३ प्रजातींची फुलपाखरे मिळाली. त्यात कॉमन रोज, टायगर फलेन, कॉमन सेलर, कॉमन ग्रॉस येलो, ग्रेट एग्जफलाय, ब्ल्यू टायगर, लाइम बटरफलाय, कॉमन मॉरमन, कॉमन पिक्चर व्ह्य़ुविंग, कॉमन लेपर्ड, ऑरेंज टिप, ब्ल्यू फॅन्सी, कॉमन जाजबेल, हेलन ग्रेट एग्जफलाय फिमेल इत्यादी प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद घेऊन ती राष्ट्रीय फुलपाखरू संस्थेला पाठविली जातील.

संपूर्ण भारतात सुमारे १५०० फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात ही संख्या सुमारे ३०० असून विदर्भात सुमारे १७७ आहे. उत्तर दक्षिण भागांमध्ये सर्वाधिक सुमारे ५००, तर पश्चिम घाटात ३५० प्रजाती आहेत. विदर्भात आढळणाऱ्या प्रजातींपैकी सुमारे १४ प्रजाती या अनुसूचित आहेत. ही संख्या फार मोठी आहे. 



ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन
ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणजेच विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ते ७८ वर्षांचे होते. 

डॉ. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात योगदान देत राहिले. डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळपास १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाड्मयात मोलाची भर टाकली होती. 

त्यांची जवळपास ५० पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. 

उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.



लहान बेडकांच्या सात नवीन प्रजाती पश्चिम घाटात सापडल्या
मुलाच्या अंगठय़ावर बसू शकतील इतक्या लहान आकाराच्या निशाचर बेडकांच्या सात नवीन प्रजाती पश्चिम घाट भागात शोधण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांच्या संशोधनाचे हे फलित आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या दोन वैज्ञानिकांनी पश्चिम घाट परिसरात हे बेडूक शोधले असून ते आतापर्यंत सापडले नव्हते. या बेडकांचा अधिवास माहिती नव्हता. त्यांचे संदेशवहन हे कीटकांसारखे असते. संशोधनाचे नेतृत्व करणारे एस.डी.बिजू यांनी सांगितले की, अतिशय लहान भौगोलिक क्षेत्रात हे बेडूक सापडले आहेत.

बेडकाच्या सात प्रजातींपैकी चार १२.२ ते १५.४ मि.मी या आकाराच्या आहेत. आतापर्यंत या गटातील फार थोडय़ा प्रजाती माहिती होत्या. बेडकाच्या या प्रजाती प्राचीन काळातील असून त्या पश्चिम घाटात आढळतात.नवीन प्रजाती या ओलसर पानांमध्ये आढळणाऱ्या आहेत. 

आतापर्यंत निशाचर बेडकात २८ प्रजाती माहिती होत्या. त्यात तीन १८ मि.मी आकाराच्या होत्या. आता ही संख्या ३५ झाली असून त्यातील २० टक्के लहान आकाराच्या प्रजाती आहेत. ७०-८० दशलक्ष वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या प्रजातींचे प्रतिनिधित्व या प्रजाती करतात.



दहा रुपयांची नवी नोट लवकरच
रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. मात्र दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणताना दहा रुपयांच्या जुन्या नोटादेखील चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नोटा महात्मा गांधी मालिकेतील-२००५ मधील असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर ‘एल’ अक्षर असेल. यावर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.



महिला कर्मचाऱ्यांना मिळणार २६ आठवड्यांची प्रसूती रजा
महिला कर्मचाऱ्यांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. प्रसूती रजा विधेयकाला आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही रजा भरपगारी असणार आहे. देशभरातील जवळपास १८ लाख महिला कर्मचाऱ्यांना या विधेयकामुळे लाभ मिळणार आहे.

मॅटरनिटी लिव्ह बिल म्हणजेच प्रसुती रजा सुधारित विधेयक याआधी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. 

प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली होती. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. 

सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा याआधी होतीच. परंतु, आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनादेखील याचा फायदा होणार आहे. कॅनडा आणि नॉर्वेनंतर महिला कर्मचाऱ्यांना इतकी मोठी प्रसूती रजा देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.



बेकायदा खाण उत्खननावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहांचा वापर
देशातील बेकायदा खाण उत्खननावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहांचा वापर केला जात असून त्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडे तातडीने त्याची माहिती पाठविली जात असल्याचे गुरुवारी सरकारने लोकसभेत सांगितले.

भारतीय खाण ब्युरोच्या माध्यमातून खाण मंत्रालयाने खाण पाहणी यंत्रणा विकसित केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि भास्कराचार्य इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स अ‍ॅण्ड जिओ-इनफॉर्मेटिक्स (बिसाग) यांच्या सहकार्याने बेकायदा खाण उत्खननाला आळा घालण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

खाण पाहणी यंत्रणा सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करीत आहे, खाण पाहणी यंत्रणा पारदर्शक आणि जलद प्रतिसाद देणारी यंत्रणा आहे. खाण पाहणी यंत्रणेसाठी सहज वापरता येणारे मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून अहवाल सादर करण्यासाठी त्याचा वापर राज्य सरकारचे तपासणी अधिकारी करीत आहेत.

सदर मोबाइल अ‍ॅपचा वापर करून नागरिकांनाही बेकायदेशीर खाण उत्खननाला आळा घालण्याच्या कामात सक्रिय सहभागी होता येणार आहे. सदर यंत्रणा १५ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत त्याद्वारे मिळालेली माहिती संबंधित राज्यांकडे पाठपुराव्यासाठी पाठविण्यात आली आहे.



दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गेन-हुई यांची हकालपट्टी
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गेन-हुई यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या संसदीय न्यायालयाने पार्क गेन-हुई यांच्याविरोधात निकाल दिला आहे. दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची घटना घडली आहे. 

पार्क यांचे अधिकार डिसेंबरमध्येच काढून घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमधील सहभाग सिद्ध झाल्याने पार्क गेन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे

पार्क गेन या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. मात्र आता त्यांना पदावरुन दूर करण्यात आले आहे. 

दक्षिण कोरियात आता पुढील ६० दिवसांमध्ये नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. 

या प्रकरणाचा प्रभाव फक्त राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ब्लू हाऊसपर्यंतच मर्यादित नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सॅमसंग कंपनीचे प्रमुख, ज्येष्ठ वकील यांच्यासह देशाच्या निवृत्ती वेतन विभागाचे प्रमुख यांच्यापर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे.