श्री संत तुकाराम महाराज संतपीठ अध्यक्षपदी विजय भटकर 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिली आहे.


तसेच ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना, वर्गपध्दती व इतर अनुषंगीक कामांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

पंढरपूर मंदिरे अधिनियमा मध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्या विषयीची तरतूद आहे. तथापी अनेक मंदिर समित्या होऊन गेल्या परंतु संतपीठ अस्तित्वात आले नव्हते.

मागील वर्षी डॉ.भोसले यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी पंढरपूर मंदिर अधिनियमातील तरतूदी नुसार आपण संतपीठाची निर्मिती करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते.


त्यानुसारच ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत ‘संत तुकाराम महाराज संतपीठ’ या नावाने परिसंस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.



भारत सशस्त्र दलासाठी AI चा वापर करणार 
एका महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्पांतर्गत भारत सरकारने सशस्त्र दलांच्या क्षमतेला वृद्धींगत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) या प्रकल्पात एक प्रमुख भागीदार असेल.

सशस्त्र दलांना मानवरहित रणगाडे, जहाज, हवाई यान आणि रोबोटिक शस्त्रांनी सुसज्जीत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सशस्त्र दल आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.



एकूण $8,230 अब्ज संपत्तीसह भारत हा जगातला सहावा सर्वाधिक श्रीमंत देश 
भारत हा जगातला सहावा सर्वाधिक श्रीमंत देश आहे आणि देशाकडे एकूण $8,230 अब्ज एवढी संपत्ती आहे.

अफ्रेशिया बँकेच्या ‘अफ्रेशिया बँक ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू’ या अहवालानुसार $62,584 अब्ज एवढी संपत्ती असलेला अमेरिका या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर $24,803 अब्जसह चीन आणि $ 19,522 अब्जसह जपान यांचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत पहिल्या १० स्थानी असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन, जर्मनी, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि इटली यांचा समावेश आहे. २०२७ पर्यंत भारत ब्रिटन आणि जर्मनीला मागे टाकून जगातला चौथा श्रीमंत देश होईल, असा अंदाज आहे.

जगभरातली एकूण खाजगी संपत्ती $215 लक्ष कोटी इतकी आहे आणि जगभरात उच्च संपत्ती असलेले सुमारे १५.२ दशलक्ष व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे $ 1 दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिकची निव्वळ मालमत्ता आहे. 

जगभरात सुमारे ५८४००० बहू-लक्षाधीश ($ 1 दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिक) आहेत आणि २२५२ अब्जाधीश ($ 1 अब्ज किंवा त्यापेक्षा अधिक) आहेत.



मुख्यत: अमेरिकेकडून आयात होणार्‍या उत्पादनांवर भारत अतिरिक्त शुल्क आकारणार 
मुख्यत: अमेरिकेकडून आयात होणार्‍या उत्पादनांना लक्ष करून भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने काही उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेकडून पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्‍पादनांवर अतिरिक्‍त शुल्क लादल्यामुळे झालेल्या तोट्याला भरून काढण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे. 

भारत २० उत्‍पादनांवर १००% पर्यंत शुल्क लादू शकतो, त्यामध्ये ताजे सफरचंद, मटार, अक्रोड, सोयाबीन तेल, शुद्ध पामोलिन, कोको भुकटी, चॉकलेट उत्पादने, गोल्फ कार, ८०० सीसी इंजिन क्षमता असलेले मोटारसायकल आणि इतर वाहनांचा समावेश आहे.


प्रिन्स हॅरी मेगन यांचा शाई विवाह थाटात 
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय ३३) हे १९ मे ओझी हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय ३६) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते.

कॅंटरबरीच्या आर्चबिशपनी या दोघांनाही पती-पत्नी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत नवदांपत्याचे अभिनंदन केले. 

महाराणी ऐलिझाबेथ द्वितीय यांच्यासह प्रिन्स फिलीप आणि राजपरिवारातील अन्य सदस्यदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.

सामान्य लंडनवासीयांना हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहता यावा म्हणून मुख्य रस्त्यांवर स्क्रिन्स लावण्यात आले होते. 

या समारंभाला मेगनची जवळची मैत्रिण अभिनेत्री प्रियांका चोप्रासह जॉर्ज आणि अमल क्‍लुने, डेव्हिड आणि व्हिक्‍टोरिया बेकहॅम आणि सर एल्टॉन जॉन देखील उपस्थित होते.



चीनने भारतातील बौद्ध भिक्षूंवर बंदी लादली 
भारतात दीक्षा घेणाऱ्या तिबेटच्या बौद्ध भिक्षूंच्या प्रवेशावर चीनच्या एका प्रांताने बंदी घातली आहे. हे भिक्षू फुटीरतावादी असून चीनमध्ये फुटीरतावादी विचार पसरवित असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे.

शिचुआन प्रांतातील लिटयांग काऊंटीमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने त्याबाबतची माहिती दिली आहे.

तिबेटमधून भारतात आलेल्या तरुणांना भारतात बौद्ध भिक्षू बनवले जाते. त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षित केले जाते. त्यामुळेच या भिक्षुंना लिटयांग काऊंटीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

दरवर्षी काऊंटीमध्ये देशभक्तीचा क्लास घेतला जातो. त्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. या क्लासमधील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जाते. फुटीरतावादी विचारांच्या विद्यार्थ्यांवर खास करून लक्ष ठेवले जाते, असे सूत्रांनी सांगितले.

काही गुरुंना परदेशात १४ व्या दलाई लामांकडून बौद्ध धम्माची दीक्षा मिळालेली आहे. आम्ही दलाई लामांना फुटीरतावादी नेते म्हणून पाहतो. त्यामुळेच त्यांनी दीक्षा दिलेल्या प्रत्येक बौद्ध भिक्षूंवर आमची करडी नजर आहे, असे येथील धार्मिक नेते झू वाईकुआन यांनी सांगितले.



MITच्या शास्त्रज्ञांनी ‘रोबोटिक ग्लायडर’ विकसित केले 
अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) येथील शास्त्रज्ञांनी एक ‘रोबोटिक ग्लायडर’ तयार केले आहे, जे अगदी पाण्याच्या पृष्ठभागावरती समांतर उडू शकते आणि पक्ष्याप्रमाणे अगदी अलगद उडू शकते. 

ग्लायडरची संरचना अल्बाट्रॉस पक्ष्याच्या पद्धतीवरून तयार करण्यात आलेली आहे आणि याचे वजन केवळ ६ पाउंड एवढे आहे.

वार्‍याचा उच्च प्रवाह असलेल्या क्षेत्रांमध्ये रोबोट एखाद्या पक्ष्याप्रमाणे स्थिर राहावे यासाठी हा नवा ‘रोबोटिक ग्लायडर’ तयार करण्यात आला आहे. 

हा रोबोट अल्बाट्रॉस पक्ष्याप्रमाणे एक तृतीयांश हवा वापरुन दिलेल्या दिशेने उडू शकतो व एक विशिष्ट सेलबोटपेक्षा १० पटीने जलद प्रवास करू शकतो.