सोलापूरच्या विकासासाठी स्पेनकडून सहकार्य 
शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान २४ मे रोजी सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी स्पेनचे शिष्टमंडळ सोलापुरात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महापौर व आयुक्त या कराराव स्वाक्षरी करतील.


युरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकातील शहर आणि भागीदार शहरातील शाश्‍वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टीकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे.

आंतरराष्ट्री शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालांपूरमधील फोरममध्ये सुरवात करण्यात आली आहे. त्याचे समर्थन करण्यासाठी भारत कार्यक्रम महापालिका यांच्यात भागीदारी करार होणार आहे.

एक करार झाल्यावर भारतातील बारा शहरे युरोपियन युनियनमधील १२ शहरांशी जोडण्याची प्रक्रिया सुरु होईल. जी शहरे स्थानिक कृती आराखडाच्या (लोकल ऍक्‍शन प्लॅन) विकासासाठी समान शहरीकरण आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य करेल. ही योजना दोन वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे.



ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 
भारताने २१ मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (डीआरडीओ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून (आयटीआर) मोबाइल लाँचरवरून सकाळी सुमारे १०:४४ वाजता क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी यशस्वी चाचणीनिमित्त ब्राह्मोसचे पथक आणि डीआरडीओचे अभिनंदन केले. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.

तसेच भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास़्त्रे ही ब्लॉक-३ यंत्रणेने सज्ज आहेत.



INSV तारिणीने आपला ऐतिहासिक जगप्रवास पूर्ण केला 
भारतीय नौदलाच्या स्वदेशी INSV तारिणी या जहाजाने २१ मे २०१८ रोजी गोव्यात परतले आणि आपला ऐतिहासिक असा यशस्वी जगप्रवास पूर्ण केला केला आहे.

१० सप्टेंबर २०१७ रोजी गोवा येथे “नाविका सागर परिक्रमा” कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण जगाला जलमार्गे प्रदक्षिणा घालण्यात आली आहे. प्रवासादरम्यान फ्रीमेनटेली (आस्‍ट्रेलिया), लाइटलेटन (न्‍यूजीलँड), पोर्टसिडनी (फॉकलँड्स) आणि केपटाउन (दक्षिण अफ्रीका) या चार ठिकाणी विश्रांती घेतली गेली.


INSV तरिणी हे ५५ फुट लांबीचे महासागरातले गस्त जहाज आहे. INSV तारिणी हे दिवर, गोवा येथे अक्वेरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बांधले गेलेले एक डोलकाठी असलेले छोटे जहाज आहे. 

भारतीय नौदलाच्या INSV तरिणी जहाजावर संपूर्णताः महिला दल कार्यरत आहे. यावरील दल लेफ्टनेंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या हाताखाली आहे.


बिहारमध्ये ३२ मीटर उंचीचे ‘सभ्यता द्वार’ चे उद्घाटन 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते पटनामधील सम्राट अशोक कन्वेंशन केंद्र परिसरात ‘सभ्यता द्वार’ याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

पटनामध्ये गांधी मैदानाच्या उत्तरेकडे बापू सभागृह आणि ज्ञान भवन यांच्या दरम्यान गंगा तटावर ३२ मीटर उंचीचा आणि ८ मीटर रुंद इतका विशाल सभ्यता द्वार तयार करण्यात आला आहे. 

५ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या या द्वारावर भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि सम्राट अशोक यांचे संदेश कोरलेले आहेत.



भारताच्या SPR कार्यक्रमासाठी ADNOC कडून भारतात तेलाची पहिली खेप दाखल 
संयुक्त अरब अमीरात (UAE) येथील अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) कडून पाठवलेली २ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची पहिली खेप २१ मे २०१८ रोजी इंडियन स्ट्रेटीक पेट्रोलियम रिजर्व लिमिटेड (ISPRL) च्या मंगलोरमधील साठ्याकडे पोहचती झाली आहे. ADNOC कडून १३ मे २०१८ रोजी भारताकडे पाठविण्यात आली होती.

कच्च्या तेलाच्या माध्यमाने ADNOC ची गुंतवणूक ही म्हणजे भारतीय धोरणात्मक पेट्रोलियम साठा (SPR) सुविधेमध्ये प्रथमच एखाद्या खाजगी परदेशी कंपनीने केलेली गुंतवणूक होय.

भारत सरकारने SPR कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विशाखापट्टनम, मंगलोर आणि पादूर या तीन ठिकाणी ५.३३ दशलक्ष टन (सुमारे ३९ दशलक्ष बॅरल्स) क्षमतेचा कच्च्या तेलाचा साठा तयार केला आहे. 



भारत रशियाची विशेष व्यूहात्मक भागीदारी 
भारत आणि रशियाचे संबंध आता विशेष व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले आहेत आणि हे मोठे यश आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांच्या मैत्रीचे वर्णन केले.

पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौऱ्यावर गेले असून त्यांनी सोची येथे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले.

सोची येथे दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पुतिन यांनी मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक चर्चा केली. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासाचा वापर करून जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर एकमत तयार करणे हे या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.