अण्णा भाऊ साठे

नाव : तुकाराम भाऊराव साठे

जन्म : १ ऑगस्ट १९२० (वाटेगाव, वाळवा, सांगली)

मृत्यू : १८ जुलै १९६९

वैयक्तिक जीवन

०१. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.

०२. तुकारामाच्या आईने बळेबळेच त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत पाठविले. परंतु अस्पृश्य मुलांना शाळेबाहेर सवर्ण मुलांपासून वेगळे बसण्याची सक्ती आणि शिक्षकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक पाहून तुकारामाने शाळेकडे आणि शिक्षणाकडे कायमचीच पाठ फिरविली.

०३. अण्णाभाऊचे बालपण त्यांचे नातेवाईक असलेल्या तळसंदे येथील बापू साठे यांच्या तमाशात हरकाम्या म्हणून पडेल ती कामे करण्यात गेले. अण्णाभाऊंचा हा काळ म्हणजे जीवन शिक्षणाचाच काळ होता.

०४. रेठऱ्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले. दुर्दैवाने याच काळात पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडला. अण्णाभाऊंच्या कुटुंबाला वाटेगाव येथे जिणे मुश्किल झाले.

०५. म्हणून अण्णाभाउंचे वडील सहकुटुंब पायी दरमजल करत दीड-एक महिन्याने मुंबईत भायखळ्याला येउन पोहोचले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. येथेच अण्णाभाऊंना दूरचा नातेवाईक असणाऱ्या ज्ञानुने ‘अक्षर’ ओळख करून दिली. वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली.

०६. अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई होते. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली आहेत.

संघर्ष लढा

०१. अण्णाभाऊंना गिरणीमध्ये बदली कामगार म्हणून काम मिळत होते. कामगार जीवनात अण्णाभाऊंचा प्रवेश ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली. त्यावेळी ते ‘कोहिनूर मिल’मध्ये कामाला होते. मुंबईत गिरणी बंद संपाच्या वेळी अण्णांनी ‘स्टालिनग्राडचा पोवाडा‘ आपल्या पहाडी आवाजात म्हणून दाखविला. त्याचा परिणामात संप यशस्वी झाला परंतु आण्णांची गिरणीतील नोकरी गेली.

०२. त्यामुळे अण्णांचे कुटुंब परत वाटेगावला आले. त्यांचे वडील आजारी पडले आणि त्यातच १९३८ साली त्यांचा अंत झाला. रीतीरिवाजानुसार अण्णाभाऊंचा विवाह १९३९ साली झाला. त्यानंतर अण्णांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

०३. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे ही आपले आद्य कर्तव्य आहे असे अण्णाभाऊंना वाटत होते. १९४२ साली चलेजाव चळवळीच्या काळात वाटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील झाले. इतर क्रांतीकारकासमवेत अण्णाभाऊवर सुद्धा अटक वॉरंट निघाले. त्यामुळे अण्णाभाऊंनी जून १९४२ मध्ये मुंबई गाठली.

०४. मुंबईत आल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच बार्शीचे शाहीर अमर शेख, आजरा भागाचे शाहीर द.ना. गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत आले. अण्णा भाऊंचे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान होते.

०५. १९४४ साली या तिघांनी ‘लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या कलापथकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले. १९४६ साली सादर करण्यात आलेले ‘अकलेची गोष्ट’ हे या कलापथकाचे लोकनाट्य महाराष्ट्रात लोकप्रियतेचा कळस गाठणारे ठरले.

०६. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला ‘लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले.

०७. अण्णा भाऊ साठे हे आयुष्याच्या अखेर पर्यंत अंतर्बाह्य मार्क्सवादी (कम्युनिस्ट) होते. अण्णांचे प्रभावी काम पाहून त्यांच्यावर कम्युनिस्ट पार्टीचे कार्य सोपविले गेले. याच वेळी कामगार चळवळीचे प्रसिद्ध नेते कॉ. एस.ए. डांगे यांच्यांशी त्यांची ओळख झाली.

०८. कम्युनिस्ट रशिया कसा आहे हे साक्षात पाहण्यासाठी ते रशियालाही जाऊन आले. ‘माझा रशियाचा प्रवास’ या प्रवासवर्णनात त्यांनी समतेवर आधारित कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला. रशियासंबंधीचा आदर त्यांनी ‘मी रशियात माणूस पहिला‘ या शब्दांत व्यक्त केला आहे.

साहित्य व लेखन

०१. तमाशा या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. ‘समतावादी महानायक’ अशी बिरुदावली प्राप्त झालेले अण्णाभाऊ ‘माणुसकीचा जागर घडविणारा साहित्य सह्याद्री’ म्हणून मराठी साहित्य विश्वात ओळखले जातात. ‘माणूस वाईट नसतो, वाईट असते ती गरीबी’ हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात प्रभावीपणे लिहिलेले आहे.

०२. अण्णाभाऊंनी १४ लोकनाट्ये, १२ पोवाडे, ५ लावण्या, १८ कथासंग्रह, ३३ कादंबऱ्या, ३ नाटके, १ प्रवासवर्णन याशिवाय बरेचसे स्फुटलेखन केलेले आहे.

०३. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे.

०४. अण्णाभाऊंची लावणी म्हणजे त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा मानबिंदू होता. सुगी, मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली या त्यांच्या लावण्यांनी लोकांची मने जिंकून घेतली होती. ‘माझी मैना’ ही लावणी शृंगारिक नसून ‘मैना म्हणजे महाराष्ट्र’ अशी प्रतीकात्मक होती. त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली‘ या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

०५. चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते.

०६. फकीरा, वैजयंता (१९६१), आवडी (टिळा लावते मी रक्ताचा – १९६९), माकडीचा माळ (डोंगरची मैना – १९६९), चिखलातील कमळ (मुरली मल्हारी रायाची – १९६९), वारणेचा वाघ (१९७०), अलगूज (अशी ही साताऱ्याची तऱ्हा – १९७४), चित्रा – २०१२ हे त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित आठ चित्रपट आहेत. यापैकी तीन चित्रपटांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

०७. वारणेच्या खोऱ्यात ही त्यांची पहिली कादंबरी १९४८ साली तर शेवटची अग्निदिव्य ही कादंबरी १९६९ साली प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या ३३ कादंबऱ्यापैकी १९५९ साली प्रकाशित झालेली ‘फकीरा’ ही कादंबरी सर्वात जास्त गाजली. १९५८ साली भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान अण्णाभाऊ साठे यांनाच मिळाला.१९६१ साली अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.

०८. अलगूज, अहंकार, आग, आघात, आवडी, केवड्याचे कणीस, कुरूप, गुलाम, चंदन , चिखलातील कमळ, चित्रा , जिवंत काडतूस, ठासलेल्या बंदुका, डोळे मोडीत राधा चाले, तास, धुंद रानफुलाचा, पाझर, फकिरा, फुलपाखरू, मंगला, मथुरा, माकडीचा माळ, मास्तर, मूर्ती, रत्ना, रानगंगा, रानबोका,रूपा ,वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, संघर्ष , सैरसोबत या त्यांच्या इतर प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

०९. आबी , कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडी, गजाआड , गुऱ्हाळ, चिरानगरची भुतं , नवती , निखारा, पिसाळलेला माणूस , फरारी , बरबाद्या कंजारी, भानामती, लाडी, ठासलेल्या बंदुका, मरीआईचा गाडा हे अण्णांचे प्रसिद्ध कथासंग्रह आहेत.

१०. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही अण्णांची ३ प्रसिद्ध नाटके आहेत. शाहीर नावाचे शाहिरी हे पुस्तक प्रसिद्ध, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १९८५ साली प्रकाशित झाली. ‘माझा रशियाचा प्रवास’ हे एकमेव अण्णांनी लिहिलेले प्रवासवर्णन आहे.

११. अकलेची गोष्ट , कलंत्री, खापर्‍या चोर, दुष्काळात तेरावा, देशभक्त घोटाळे, निवडणुकीतील घोटाळे, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर , माझी मुंबई, मूक मिरवणूक्, लोकमंत्र्यांचा दोरा,शेटजीचं इलेक्शन इत्यादी अण्णांची प्रसिद्ध लोकनाट्ये (तमाशा) आहेत.

१२. नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा (१९४२), बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, मुंबई कुणाची, महाराष्ट्राची परंपरा , अंमळनेरचे अमर हुतात्मे , मुंबईचा कामगार , काळ्या बाजाराचा पोवाडा, पानिपतचा पोवाडा (१९३०) हे अण्णांनी लिहिलेले प्रसिद्ध पोवाडे आहेत.