०१. प्लासीच्या लढाईत कंपनीचे ६५ लोक आणि नवाबाकडील ५००० लोक मारले गेले. के.एम. पन्नीकर म्हणतात त्याप्रमाणे हा एक सौदा होता आणि त्यात मीर जाफर व बंगालच्या धनिकांनी नवाबाला इंग्रजांच्या हातात विकले. इंग्रजांना रकमेचा मिळालेला पहिला हप्ता चांदीच्या शिक्क्यांच्या रुपात ८ लक्ष पौंड एवढा होता. हि रक्कम १०० नावामधून कलकत्त्याला आणली असे लॉर्ड मेकौले म्हणतो. 


०२. प्लासीच्या लढाईपासून कंपनीचे व्यापारी रूप हळूहळू जात गेले आणि ती लष्करी कंपनी बनली. मीर जाफर आपले पद आणि संरक्षण यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून होता. त्याकरिता इंग्रजांचे ६००० सैन्य बंगालमध्ये होते. नवाब इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. इंग्रजांच्या ह्या खेळामुळे मीर जाफर नाराज झाला. या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले. 


०३. नोव्हेंबर १७५९ मध्ये बेदारा येथे डच आणि इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला. डचाना पराभूत करून क्लाइव्हने नवाबाच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. त्याचा परिणाम असा झाली की डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली. यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.


०४. कंपनीचे लष्कर दिवसेंदिवस वाढत गेले. त्यासाठी पैशांची नितांत गरज होती. मीर जाफरने कंपनीला मासिक एक लक्ष रुपये देण्याचे कबुल केले होते. कलकत्त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातून व मीर जाफरने दिलेल्या प्रदेशातून कंपनीला ५-६ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते. 


०५. मीर जाफरकडे थकित असलेली रक्कम वाढत चालली होती. १७६० पर्यंत मीर जाफरकडे २५ लक्ष इतकी रक्कम थकित होती. उलट कंपनीचा लष्कारारील खर्च १८ लक्ष रुपये, मद्रासवरील खर्च १० लक्ष रुपये आणि इतर गोष्टीवरील खर्च असा एकूण ३७.५ लक्ष रुपये अपेक्षित खर्च होता. 


०६. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०). कार्यकारी गवर्नर हॉलवेलने मीर जाफरवर कारस्थानाचा आरोप लावला करण्यात गुंतला आहे. कंपनीकडून नवाबाला असा प्रस्ताव पाठविण्यात आला कि, त्याने ५० लक्ष रुपये वार्षिक उत्पन्न असलेला बरद्वान व नादिया जिल्ह्याचा प्रदेश कंपनीला देऊन टाकावा पण त्याकडे मीर जाफरने लक्ष दिले नाही. 





मीर कासिमशी तह 
०१. मीर जाफरविरुद्ध निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा अचूक फायदा मीर जाफरचा धूर्त जावई मीर कासीम याने घेऊन स्वतःला इंग्रजांचा मित्र व नवाबाचा प्रतिस्पर्धी जाहीर केले. यादृष्टीने इंग्रज व मी कासीम यांच्यात सप्टेंबर १७६० साली तह झाला. 


०२. या तहानुसार मीर कासीमने कंपनीला बरद्वान व मिदनापूर आणि चितगाव जिल्हे द्यावे, सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीची अर्धी भागीदारी राहील, मीर कासीम कंपनीला दक्षिण मोहिमांसाठी पाच लक्ष रुपये देईल, कंपनीचे शत्रूमित्र मीर कासीम आपले शत्रूमित्र मानील, एकमेकांच्या प्रदेशातील लोकांना राहिवासाची संमती देण्यात येणार नाही, कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल. मात्र त्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. 

०३. तहाची अंमलबजावणी करण्यासाठी वैन्सिस्टार्ट व केलौड मुर्शिदाबादला गेले. मीर जाफरने सत्तात्याग केला. त्याला १५००० रुपये मासिक पेन्शन द्यायचे ठरले. मीर जाफरने ह्यानंतर कलकत्त्याला राहणे पसंत केले. 


०४. नवाबपद मिळाल्यानंतर मीर कासीमने कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना मोठमोठी बक्षिसे दिली. वैन्सिस्टार्टला ५ लक्ष रुपये, हॉलवेलला २ लक्ष ७० हजार, केलौडला २ लक्ष व इतरांना ७ लक्ष रुपये असे पैसे वाटले. 


०५. मीर कासीम उत्तम प्रशासक होता. नवाब बनल्यानंतर सर्व प्रथम मीर कासीमने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंघेर येथे नेली. ह्यानंतर मीर कासीमने आपले सैन्य संघटन युरोपियनप्रमाणे करण्यास सुरुवात केली. पाश्चात्य अर्मेनियन प्रशिक्षक नेमून त्याने आपली फौज तयार केली. आधुनिक पद्धतीच्या तोफा व बंदुका बनविण्याची सोय मुंघेरला करण्यात आली. शस्त्रांचे कारखाने उभारले.

०६. नवाबाची आज्ञा न पाळणाऱ्या जमीनदारांचा मीर कासीमला बंदोबस्त करायचा होता. बंडखोरांचा नेता बिहारचा नायब सुभेदार रामनारायण मीर कासीमची सत्ता मानत नव्हता. काही प्रमाणात त्याला इंग्रजांचे समर्थन होते. सर्वप्रथम त्याने रामनारायणला सेवामुक्त केले व त्यानंतर ठार मारले. 


०७. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने मीर कासीमने बरेच प्रयत्न केले. जुन्या करांमध्ये वाढ केली व काही नवीन कर लागु केले. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध मोहीम काढून दोषी आढळणाऱ्यास दंडित केले. त्याचे प्रशासन फार चांगले होते. त्याच्या कारकीर्दीत सर्वाना नियमित वेतन मिळत होते. 


०८. १७६७-६९ ह्या काळात बंगालचा गवर्नर असलेला वेरेल्स्ट मीर कासीम व कंपनीत उद्भवलेल्या बेबनावाची तात्कालिक व वास्तविक अशा दोन कारणामध्ये विभागणी करतो. तात्कालिक कारण अंतर्गत व्यापार हे होते. पण वेरेल्स्ट च्या कथनानुसार वास्तविक कारण मीर कासीमची राजकीय महत्वाकांक्षा हे होय.  पण खरे तर कासिमचा प्रयत्न इंग्रजांची शक्ती वाढू न देणे आणि स्वतःची ताकद कमी न होऊ देणे यासाठी होता. 


०९. १७१७ साली तत्कालीन मुगल सम्राट फ़र्रुखसियारने एक फर्मान काढून कंपनीला आयात व निर्यातीत करावर सूट दिली होती. त्यामुळे नवाबाचे आर्थिक नुकसान होत होते आणि नेमका हाच प्रश्न नवाबाने उचलून धरला. एवढेच नव्हे तर कंपनीचे अधिकारी भारतीय व्यापाऱ्यापासून पैसा घेऊन त्यांना परवानापत्र देत. त्यामुळे नवाबाचे दुहेरी नुकसान होऊ लागले. 

१०. मीर कासीमने इंग्रजांचा मुक्त व्यापाराचा परवाना रद्द केला. स्थानिक व्यापाऱ्यांना संरक्षण दिले. या कारवाईमुळे इंग्रज नाराज झाले. त्यांनी इंग्रज व्यापाऱ्यास पूर्वीप्रमाणे सवलती चालू करण्याची मागणी केली. मीर कासीमने ही मागणी फेटाळली. त्यामुळे इंग्रजांना राग आला. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला.



११. एकदा एका अर्मेनियनाने नवाबाच्या खाजगी कामासाठी सोडा विकत घेतला. सोड्याच्या व्यापारावर कंपनीचा एकाधिकार असल्याने कंपनीचा पटना येथील मुख्य अधिकारी एलिसने त्या अर्मेनियन व्यापाऱ्याला बंदी बनविले. अशाच एका प्रसंगी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यानी मुंघेरच्या किल्ल्यात आश्रय घेतला ह्या केवळ संशयावरून किल्ल्याची तपासणी करण्यासाठी एलिसने आपल्या शिपायांना पाठविले.

१२. शेवटी वेन्सिस्टार्ट, वॉरेन हेस्टिंग्ज व कौन्सिलचा एक सदस्य मुंघेरला गेले व तेथे नवाबाशी एक समझौता करण्यात आला. त्यानुसार इंग्रज व्यापाऱ्यांना अंतर्गत व्यापारात भागीदारी देण्याचे नवाबाने कबुल केले. मात्र त्याऐवजी ह्या व्यापाऱ्यांना खरेदीवर ९% कर द्यावा तसेच दस्तक देण्याचा अधिकार नवाबाचा राहावा. परंतु दुर्दैवाने कलकत्ता कौन्सिलने हा प्रस्ताव बहुमताने फेटाळला. 

१३. परिणामी मीर कासीमने कठोर कारवाईचा निर्णय घेतला व सर्व अंतर्गत कर हटविले. त्यामुळे भारतीय व्यापारीसुद्धा इंग्रज व्यापाऱ्यांच्या समकक्ष बनले. पण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मते करावरील सूट हा कंपनीला मिळालेला खास अधिकार होता. 

१४. अखेर मीर कासीमची हि कृती विस्फोटक ठरली. एलिस ह्याने तर वरील कारवाईच्या विरोधात पटण्यावर आक्रमण केले. अखेर नवाबाने युद्धाचा निर्णय घेतला. 




बक्सारची लढाई – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.