०१. जोसेफ फ्रान्सिस डूप्लेचा जन्म १६९७ मध्ये झाला. पित्याच्या प्रभावामुळे डूप्लेची नियुक्ती १७२० मध्ये एका उच्च पदावर पोन्डिचेरी येथे झाली. मात्र काही गैरसमजुतीमुळे कंपनीच्या संचालकांनी १७२६ मध्ये डूप्लेला निलंबित केले. मात्र ह्या निर्णयाविरुद्ध त्याने अपील केले. परिणामी डूप्लेला सन्मानपूर्वक दोषमुक्त करण्यात आले. 

०२. १७३० मध्ये डूप्लेला चंद्रनगरचा गवर्नर नियुक्त करण्यात आले. १७४१ मध्ये तो फ्रेंच वसाहतींचा डायरेक्टर बनला व १७५४ पर्यंत त्या पदावर राहिला. त्याचवर्षी उगल सम्राटने डूप्लेला नवाब पदवीने सम्मानित केले. 


०३. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने डूप्लेने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा उत्तम परिचय दिला. त्याच्या प्रयत्नामुळे उजाडलेले चंद्रनगर लौकरच एक महत्वाचे व्यापारी केंद्र बनले. बंगालमधील युरोपियन वसाहतीपैकी सर्वात प्रगत वसाहत चंद्रनगर बनली. 


०४. याने प्रभावित होऊन कंपनीच्या संचालकांनी डूप्लेची नियुक्ती पोन्डिचेरीचा गवर्नर जनरल म्हणून केली. कंपनीचा आदेश होता कि कमीतकमी खर्च करावा तसेच अनावश्यक संरक्षणव्यवस्था करू नये. पण ह्या आज्ञेचे पालन न करता त्याने पोन्डिचेरीची संरक्षणसिद्धता केली व त्यासाठी स्वतःजवळचा पैसा लावला. लौकरच डूप्लेने पोन्डिचेरीला दक्षिणेची महत्वाची बाजारपेठ बनविली. संचालकांच्या आज्ञेचे उल्लंघन केले तरी डूप्लेची प्रशंसाच झाली. 


०५. कर्नाटकची पहिली दोन युद्धे म्हणजे डूप्लेच्या कुटनीतीची उत्तम उदाहरणे होत. १७५१ मध्ये मुजफ्फरजंगच्या मृत्यूनंतर हैद्राबादच्या गादीवर आलेला सलाबतजंगही डूप्लेने समर्थन दिलेला होता आणि तो पूर्णतः फ्रेन्चावर अवलंबून होता. ०६. वस्तुस्थिती तर अशी होती कि, नर्मदेपासून कृष्णा नदीपर्यंतच्या क्षेत्रावर बुसीचे नियंत्रण होते. हैद्राबादला फ्रेंच सैन्य स्थायी होते. स्वतः डूप्ले कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मुगल प्रदेशाचा नवाब होता. 


०७. कुटनीतीच्या क्षेत्रात यश मिळविल्यानंतर डूप्ले अपयशी का ठरला हे आश्चर्य आहे. त्याची सर्वात मोठी दुर्बलता म्हणजे तो स्वतः सैनिक नव्हता. योजना तयार करून हाताखालील लोकांना तो कार्यपद्धतीबद्दल सूचना देत असे पण रणमैदानावर नेतृत्व करू शकत नसे. 


०८. ह्याबाबत तो लॉरेन्स, क्लाइव्ह व डाल्टन पेक्षा कमी पडत होता. खूप प्रयत्न करूनही डूप्लेला (१७५२-५३) काळात पोन्डिचेरी जिंकता आले नाही. कारण प्रत्यक्ष योजनेची अंमलबजावणी करणारे त्याचे लष्करी अधिकारी त्याबाबतीत असफल झाले. 


०९. डूप्ले जन्मजात नेता होता. त्याला परत बोलविण्याचा आदेश आला तेव्हा डूप्लेच्या अधिकाऱ्यांनी त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला. बुसीनेही त्यागपत्र दिले पण त्याला कार्य करीत राहण्याची डूप्लेने विनंती केली. 


१०. डूप्लेच्या परतण्यात इंग्रजांचा कोणताही हात नव्हता असे इंग्रज इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु पैरिसमधील इंग्रज वकिलाने फ्रेंच विदेशमंत्र्याला असे म्हटले होते कि डूप्लेचे धोरण दोन्ही देशाकरिता हिताचे नाही. मात्र डूप्लेला परत बोलावून घेणे फ्रेंच हिताला घातक सिद्ध झाले. 


११. मलेसन हा इतिहासकार विश्वासपूर्वक सांगतो कि, “भारतावर युरोपियन सत्तेची शक्यता आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग ओळखणारी पहिली व्यक्ती डूप्ले होती. व “जर डूप्ले आणखी दोन वर्षे भारतात राहिला असता तर बंगालचे धन इंग्रजऐवजी फ्रेंचांच्या पदरात पडले असते.”