गौंड जमातीतील उठाव

०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला. ·

हटकरांचा उठाव

०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. 

०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.

धर्माजी प्रतापरावाचा उठाव

०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.

कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव

०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.

०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.

०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.

०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले

पेठ मधील कोळी राजा भगवंतरावचा उठाव

०१. नाशिक जिल्ह्यातील पेठ संस्थानचा संस्थानिक कोळी राजा भगवंतराव हा होता. १८४८ च्या करारानुसार सर्व अधिकारांचा त्यांनी त्याग केला होता. संस्थांनची सत्ता हातात आल्यावर ब्रिटिशांनी संस्थानातील काही कर रद्द केले होते. मे १८५७ मध्ये भगवंतरावांनी ते कर पुन्हा लावले. ते कर लावण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे ब्रिटिशांनी त्यांना कळविले. पण भगवंतरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

०२. ब्रिटीश अधिकारी ‘चापमान’ याने अहमदनगरच्या कलेक्टरला भगवंतरावला ५० रुपये दंड करावा व तो त्याने न भरल्यास त्याच्यावर हल्ला करण्याची शिफारस केली. त्यामुळे इंग्रज व भगवंतराव यांच्यात तणाव निर्माण झाला. भगवंतरावांच्या पाठींब्याने पेठमध्ये कोळ्यांनी इंग्रजांना त्रास द्यायला सुरुवात केली.

०३. ६ डिसेंबर १८५७ रोजी कोळी लोकांनी पेठमधील ‘हर्सूल’च्या बाजारावर अचानक लुटमार केली. सावकाराची हत्या केली. सैनिकांना मारहाण केली. चौकशीसाठी आलेल्या मामलेदाराला पकडून पेठेला आणले. उठावाची माहिती मिळताच लेफ्टनंट ग्लासपोल हा ३३ सैनिकांसह दिंडोरीहून पेठला आला. कोळी जंगलात पळाले पण काहींना ग्लासपोलने पकडले.

०४. त्यांना सोडविण्यासाठी कोळी पुन्हा आले. नगरचा भिल्ल नेता भागोजी नाईक हा सुद्धा मदत करण्यासाठी आला. त्यांनी नगरला वेढा देऊन ग्लासपोलवर गोळीबार केला. ग्लासपोलला सोडविण्यासाठी कॅप्टन नट्टल ने कोळी व भिल्लांवर हल्ले केले.

०५. २२ डिसेंबर १८५७ रोजी नाशिकपासून ४४ किमी दूर ‘बासीवखेडा’ येथे भिल्ल व कोळ्यांचा पराभव झाला. या लढाईत भिल्लांचा नेता गणपत नाईक मारला गेला. यानंतर चकमकीत भागोजीचा भाच्चा महीपत नाईक मारला गेला. पेठच्या उठावातील प्रमुख सूत्रधार ‘फतेह मुहम्मद नाईक’ होता. त्याच्या अटकेसाठी ब्रिटिशांनी ५००० रुपये बक्षीस ठेवले.

०६. भगवंतरावाविरुद्ध पुरावा नसल्याने ब्रिटिशांनी सारुष्टे गावचा पाटील भाऊ मालेकर यांच्या घराला वेढा दिला. मालेकर शरण आला व त्याने या सर्व कारस्थानामागे भगवंतराव असल्याची कबुली दिली. २८ डिसेंबर १८५७ रोजी भगवंतराववर खटला चालवून त्याला पेठच्या कचेरीसमोर फाशी दिली गेली.

खानदेशचा उठाव

०१. खर्जासिंग व काजीसिंग हा १८३१-५७ काळात कंपनीच्या सेवेत होता. एका कैद्याला त्याने केलेल्या मारहाणीत कैद्याचा मृत्यू झाला. त्यामुळे काजीसिंगला १० वर्षांची शिक्षा झाली. १८५५ मध्ये तो बाहेर आल्यावर इंग्रजांनी पुन्हा त्याला नोकरीत घेतले. कॅप्टन बर्च व कॅप्टन रिसालदार यांनी काजीसिंगला शिवीगाळ केल्याने त्याने नोकरी सोडली.

०२. १८५७ मध्ये १५०० पेक्षा जास्त भिल्लांनी खर्जासिंग व भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. सप्टेंबर १८५७ मध्ये भिल्लांनी भीमा नाईकच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कॅनेडीच्या पार्टीवर हल्ला केला. सरकारने भीमा नाईक यास पकडण्यासाठी १००० रुपये बक्षीस ठेवले.

०३. २९ ऑक्टोबर १८५७ रोजी भीमाने सिरपूर व १ नोव्हेंबर १८५७ रोजी भीमा व खर्जासिंगने दोन खेड्यांवर हल्ला करून ती लुटली. खर्जासिंगने ३०० भिल्लांसह सिंध्वा घाटात होळकर हद्दीत बैलगाड्यातील ७ लाखांचा खजिना व ६० अफूच्या गाड्या लुटल्या. सरकारी पोस्त व टेलीग्राफ तारा मोडल्या. नंतर त्यांना धारच्या सेनेतून मोकळे झालेले मक्राणी विलायती (पठाण) येउन मिळाले.

०४. ११ एप्रिल १८५८ रोजी मेजर इव्हान्सन, कॅप्टन बर्च, लेफ्टनंट वासवी यांनी अंबापाणी येथे काजीसिंग, दौलतसिंग व काळूबाबा यांच्यावर हल्ले केले. या लढाईत भिल्ल स्त्रियांनीही सहभाग घेतला. तिन्ही इंग्रज अधिकारी जखमी झाले पण सुमारे ४०० भिल्ल स्त्रिया पकडल्या गेल्या.

०५. भागोजी, भीमासिंग व खर्जासिंग मिळेपर्यंत त्यांच्या बायकांना ओलीस ठेवण्याचा मुंबई सरकारचा आदेश होता. अंबापाणी लढाईत ड्रम ट्रायलने खटले होऊन ६२ पैकी ५७ आरोपींना गोळ्या घालण्याचा निर्णय देण्यात आला. बदला म्हणून अहमदनगरचे ४०० भिल्ल नांदगावजवळ जमले. लेफ्टनंट स्टुअर्ट ३०० सैनिकांसह निघाला. २० एप्रिल १८५८ रोजी नांदगाव जवळील लढाईत स्टुअर्ट मारला गेला.

कोल्हापूरचा उठाव

०१. ‘वर्तमानदीपिका’ व ‘वृत्तसार’ या मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांनी उत्तरेकडील उठावाच्या बातम्या दक्षिणेत देण्याचे कार्य केले. त्यामुळे दक्षिणेतील सैनिक चीथविले गेले. कोल्हापूर येथे २७ व्या रेजिमेंट मधील २०० शिपायांनी ३१ जुलै १८५७ च्या रात्री रामजी शिरसाटच्या नेतृत्वाखाली उठाव केला.

०२. ३ ऑगस्ट १८५७ रोजी लेफ्टनंट कर हा साताऱ्याहून सैन्यासह कोल्हापूरला आला. त्याने बंडखोरांचा पराभव केला. नंतर ग्रांट जेकबची स्पेशल कमिश्नर म्हणून नियुक्ती झाली. कोल्हापुरातील उठावाची सर्व माहिती २८ व्या पलटणीतील गोविंद दळवी या प्रायव्हेटने कर्नल ग्रांट जेकब यांस दिली. म्हणून जेकबला उठाव मोडण्यास मदत झाली. १९ ऑगस्ट १८५७ पासून जेकबने उठाव करणाऱ्या सैनिकांना शिक्षा देण्यास सुरुवात केली.

०३. ४ डिसेंबर १८५७ रोजी ५०० सैनिकांनी कोल्हापूरचे बाहेरून रक्षण करणाऱ्या कॅप्टन ग्रांट एबट याला चकवून तटावरून प्रवेश करून राजवाडा ताब्यात घेतला. एबटला हे समजताच त्याने हल्ला सुरु केला. त्याच्यासोबत लेफ्टनंट होलबर्टन, कॅप्टन थॉमसन, कॅप्टन शेनीडर होता. क्रांतिकारकांच्या पुढाऱ्याला त्यात गोळी लागली तरी त्यांनी इंग्रजांना प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवले.

०४. यावेळी युक्ती करून कॅप्टन शेनीडर शरणागतीचा ध्वज घेऊन राजवाड्यात आला. ५ डिसेंबर १८५७ रोजी त्याने राजाची भेट घेतली.  भेटीनंतर राजाने  इंग्रजांऐवजी क्रांतीकारकांनाच शरण येण्यास सांगितले. त्याच दिवशी एबटने राजवाड्यात कोर्ट बसविले व ३६ क्रांतीकारकांना फाशी दिली. बाकीच्यांचा दोन दिवसात बंदोबस्त करून उठाव मोडला.

०५. या उठावामागे बाबासाहेबाचा भाऊ चिमासाहेब होता पण याचा पुरावा नव्हता. पण त्यानंतर चिमासाहेब बाहेर आल्यानंतर लोकांनी त्यांचा जयजयकार केला. त्यामुळे एबटला विश्वास झाला. चिमासाहेबांना त्यांच्या १६ नोकरांसह वाघोटन येथे आणले. तेथून बात्नीस बोटेतून कराची येथे नेले. १२ मे १८५८ पासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. १५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांचा मृत्यू झाला. वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकब याने सहाय्य केले.

१८५७ चे महाराष्ट्रातील उठाव – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

१८५७ चे महाराष्ट्रातील उठाव – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.