महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग २

राज्य पुनर्रचना समिती १९५३

०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन बोलावले. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने २९ मे १९५४ रोजी फाजल अली आयोगाला आपले निवदेन सादर केले. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवण्यात यावे असे निवेदन दिले. पश्चिम खान्देश, महाविदर्भ, मराठवाडा या भागातील नेत्यांनीही आपली निवेदने आयोगाला सादर केली होती.

०२. भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांनी गांधीजींच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. स्वामी सीताराम आणि त्यांच्या अनुयायांनी १६ ऑगस्ट १९५१ रोजी प्राणांतिक उपोषणाला प्रारंभ केला. पण विनोबांच्या विनंतीला मान देऊन ते उपोषण मागे घेण्यात आले.

०३. सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेने भाऊसाहेब हिरे यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त निवेदन २४ ऑक्टोबर १९५४ रोजी राज्य पुनर्रचना समितीला सादर केले. यात मराठी भाषिक एक राज्याचा आग्रह धरला.

०४. मात्र या समितीने ‘संयुक्त महाराष्ट्र’ व ‘महागुजरात’ दोन्ही मागण्या फेटाळून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व उरलेल्या मराठी भाषिकांचे व गुजरातीचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे असे सुचविले.

०५. समितीच्या शिफारसींचा महाराष्ट्र व गुजरात मध्ये तीव्र विरोध सुरु झाला. तो कमी करण्यासाठी ९ नोव्हेंबर १९५५ रोजी कॉंग्रेसने विदर्भासह सर्व मराठी भाषिकांचा समावेश असलेला महाराष्ट्र प्रदेश, गुजरात आणि मुंबई महानगर अशी तीन राज्ये स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र शंकरराव देवांनी यास विरोध केला. महाराष्ट्र कॉंग्रेसने हि योजना फेटाळून लावली.

०६. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने जाहीर केल्याप्रमाणे लाक्षणिक संप करून प्रचंड निदर्शने केली. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी ही चळवळ अक्षरशः चिरडली. त्यात १५ निदर्शकांचा मृत्यू झाला तर ३०० जखमी झाले. 

०७. १६ जानेवारी १९५६ रोजी मुंबई महानगर केंद्रशासित करण्याचा निर्णय पंडित नेहरू यांनी घेतला. यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया व आंदोलने झाली. विद्यार्थी व कामगार या आंदोलनात आघाडीवर होते. १६ जानेवारी १९५६ रोजी रात्री ठाकुरद्वार येथे पोलिसांनी गोळीबार केला त्यात १०५ लोकांचे बलिदान झाले.

०८. त्यावेळी मुंबईचे मुख्यमंत्री ‘मोरारजी देसाई’ होते. या घटनेचा निषेध म्हणून तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ तत्कालीन अध्यक्ष शंकरराव देव यांनी विसर्जित केली.

संयुक्त महाराष्ट्र समिती

०१. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एम. जोशी यांच्या निमंत्रणामुळे एक सभा भरली. त्यानुसार ८ फेब्रुवारी १९५६ रोजी डाव्या पक्षांच्या पुढाकाराने ‘संयुक्त महाराष्ट्र समिती‘ ची स्थापना करण्यात आली. यात बिगरकाँग्रेसी पक्षांचा सहभाग होता.

०२. बिगर कॉंग्रेस पक्षांच्या संयुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्षपदी जन कॉंग्रेसचे ज. रा. नरवणे आणि सरचिटणीस पदी प्रजासमाजवादी पक्षाचे एस.एम. जोशी यांची निवड झाली. आचार्य अत्रे समितीचे मुख्य प्रवक्ते बनले.

०३. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले.आचार्य अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला व विरोधकावर बोचरी टीका केली.

०४. भारतीय संसदेने विशाल द्वैभाषिक राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या विधेयकाला संमती दिली. या द्वैभाषिक राज्यात सर्व मराठी भाषिक प्रदेश आणि गुजराती भाषिक प्रदेश यांचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने द्वैभाषिक राज्याचा तोडगा मान्य केला. अशा प्रकारे १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. यशवंतराव चव्हाण या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.

०५. या द्वैभाषिक मुंबई राज्यात कच्छ, सौराष्ट्र या गुजराती भाषिक प्रदेशांबरोबरच हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग तसेच मध्य प्रदेशातील विदर्भ किंवा वऱ्हाड हा भाग अंतर्भूत करण्यात आला. त्याच वेळी बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड जिल्ह्य़ातील कन्नड भाषिक प्रदेश मुंबई राज्यातून काढण्यात येऊन तत्कालीन म्हैसूर राज्यात अंतर्भूत करण्यात आला.

०६. विशाल द्वैभाषिक राज्याच्या योजनेला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने मुंबई येथे २९ व ३० सप्टेंबर १९५६ रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद बोलविण्यात आली.

०७. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला लोकसभेत ४४ पैकी २१ व विधानसभेत २६४ पैकी १३५ जागा मिळाल्या. याउलट संयुक्त महाराष्ट्र समितीला लोकसभेत २३ आणि विधानसभेत १२९ जागा मिळाल्या.

कॉंग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहरात काँग्रेसला अपयश आले होते. या उलट संयुक्त महाराष्ट्र समितीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले.

०८. ३ नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता पंडित नेहरू आले असता त्यांच्या मार्गावर आणि प्रतापगड येथील जनतेने प्रचंड निदर्शने केली.

०९. ६ सप्टेंबर १९५९ रोजी ऑल इंडिया काँग्रेस वर्किंग कमिटीने द्विभाषिकाच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांचे मत आजमावून अहवाल देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी यांना सर्वाधिकार दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उग्र निदर्शनामुळे काँग्रेस नेते व राज्यकर्ते यांना कळून चुकले कि द्विभाषिकाचा प्रयोग चालविण्यात अर्थ नाही.

१०. लोकशाही मुल्यांवर निष्ठा असलेल्या पंडित नेहरू यांना मराठी लोकांच्या तीव्र भावनेची दखल घेणे भाग पडले. द्विभाषिकाचा प्रयोग यशस्वी होणे शक्य नाही हे कटू सत्य केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यात यशवंतराव चव्हाण यांना यश आले. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कॉंग्रेस ढासळत असल्याचा पुरावा त्यांच्याकडे होता.

११. संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक स. का. पाटील यांनीही पंडित नेहरूंना याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण व डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरूवर याबाबत नैतिक दबाव आणला. तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी यांनी याबाबत फेरविचार झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका धरली.

१२. १९५९ च्या काँग्रेसच्या चंदीगड अधिवेशनात इंदिरा गांधींच्या अहवालावर चर्चा झाली. महाराष्ट्राचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नऊ सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली.

या समितीने मराठी लोकमत आजमावून महाराष्ट्र व गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करावीत अशी शिफारस केली.

१३. ४ डिसेंबर १९५९ रोजी द्विभाषिक राज्याचे विभाजन करण्याचा ठराव केला. संसदेत ‘मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक’ १९६० ला संमत करण्यात आले. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व्हिडियो डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Please Share This Article for More Upadtes……