इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) – भाग १

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

जमीनदारांची संघटना

१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन ‘लॅंड होल्डर्स असोसिएशन’ या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.

“इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल’ १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.

ब्रिटिश इंडियन असोसिएशन

०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.

ईस्ट इंंडिया असोसिएशन

१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी ‘लंडन इंडियन सोसायटी’ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.

पुणे सार्वजनिक सभा

०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.

०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.

मद्रास महाजन सभा

मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.

इंडियन असोसिएशन

०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘इंडियन असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.

इंडियन नॅशनल युनियन

१८८४ च्या शेवटी ‘इंडियन नॅशनल युनियनची’ स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.

२६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

भारतातील कामगार चळवळ

०१. १८५० ते १९०० हा भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड आहे . या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.

०२. १९००-१९०५ नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.

०३. १८८१ साली Bombay mill hands Association ची स्थापना करण्यात आली होती. महात्मा फुलेंनी ही संस्था नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने स्थापन केली होती. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ साली ठाणे येथे झाला. ते भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते आहेत. ते महात्मा फुलेचे अनुयायी होते.

०४. १९२० साली All India trade union congress (AITUC)ची स्थापना लाला लजपत राय, जोसेफ बाप्टीस्टा आणि नारायण मल्हार जोशी यांनी इतरांच्या सहकार्याने केली. १९४५ पर्यंत ही भारतातील प्रमुख कामगार संघटना होती. १९४५ नंतर ही संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सहकारी संघटना झाली आहे.

०५. नारायण मल्हार जोशी हे एक कामगार नेते होते. १९२० साली त्यांनी AITUC च्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. ते AITUC चे १९२५-१९२९ या काळात general secretary होते. १९३१ मध्ये जोशींनी AITUC सोडली आणि All India Trade union Federation ची स्थापना केली. AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी AITUC सोडली.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

०२. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

०३. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन मुंबईचे हंगामी गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास भरविण्याचे ठरले होते. याची जबाबदारी पुण्याच्या सार्वजनिक सभेवर टाकण्यात आली होती.

०४. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. या तीन दिवसीय अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी बॉम्बे असोसिएशन या संस्थेवर टाकण्यात आली

०५. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते तर ए.ओ. ह्यूम पहिले सचिव होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

०६. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

०७. कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

* इंडियन नैशनल कॉंग्रेस – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

* इंडियन नैशनल कॉंग्रेस – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

* राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.