इतिहास काळातील भारतातील व्यापारी कंपन्या

०१. भारत व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी व्यापारी कंपन्याना अधिकृत परवानगी दिली. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदरलैंड), फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इत्यादी राष्ट्रांत व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. या देशांनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया कंपन्यांपैकी ब्रिटिश, डच व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांनी अतिपूर्वेकडील राष्ट्रांमध्ये व्यापाराबरोबर साम्राज्य स्थापन करण्यातही यश मिळविले. म्हणूनच ह्या कंपन्यांना महत्त्व आहे.

०२. सोळाव्या व सतराव्या शतकांत अनेक ख्रिस्ती धर्मप्रसारक व व्यापाऱ्यांनी पूर्वेकडील देशांचा प्रवास केला होता. तथापि वास्को-द-गामाने १४९८ मध्ये आफ्रिकेला वळसा घालून पूर्वेकडील राष्ट्रांकडे येण्यासाठी शोधलेला नवीन मार्ग जागतिक इतिहासाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला. विविध देशांतील धाडसी जलप्रवाशांनी पूर्वेकडील देशांना भेटी देऊन, पौर्वात्य देशांची यूरोपीय लोकांना आपल्या प्रवासवृत्तांताद्वारे ओळख करून दिली.
०३. ह्या माहितीमुळे पूर्वेकडील अप्रगत देशांमधून नैसर्गिक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्यासाठी यूरोपीय राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली. दळणवळणांच्या साधनांतील सुधारणा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही कारणेही यूरोपीय राष्ट्रांना अतिपूर्वेकडील देशांकडे आकर्षित करण्यास प्रेरक ठरली.
०४. त्या त्या देशांतील कंपन्यांच्या भागधारकांनी जमविलेले भांडवल व काही कंपन्यांना शासन संस्थेकडून मिळालेले आर्थिक साहाय्य यामुळे ह्या कंपन्यांना आर्थिक स्थिरता लाभली.

डच ईस्ट इंडिया कंपनी

०१. डच लोक अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी १५९५ पासूनच प्रवास करीत होते. अखेर १५९७ मध्ये जावाच्या सुलतानाबरोबर तह करण्यात डचांना यश मिळाले. अतिपूर्वेकडील व्यापारात वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्रित संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे, या जाणिवेने नेदरलैंडच्या स्टेट जनरलने एक व्यापारी कंपनी स्थापन केली.

०२. वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी (Vereenigde Oost-Indische Compagnie अर्थ: संयुक्त पूर्व भारतीय कंपनी) ही इ.स. १६०२ साली स्थापन झालेली नेदरलँड्सस्थित व्यापारी कंपनी होती. त्या देशातील विविध भागधारकांकडून कंपनीसाठी भांडवल गोळा करण्यात आले. भागधारकांच्या हितांची काळजी घेणारे एक मंडळ ह्या कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आले.

०३. २० मार्च १६०२ ला नेदरलैंड सरकारने कंपनीला २१ वर्षांच्या कराराने सनद दिली. त्याचप्रमाणे कंपनीला आयात करात माफी देऊन, ज्या ठिकाणी व्यापार करावयाचा त्या भागावर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यास परवानगी देण्यात आली. दहा वर्षांच्या अवधीतच डचांनी मोल्यूकस, टिडोर, बांदा व अँबोइना ह्या भागांवर राजकीय व व्यापारी सत्ता प्रस्थापित केली.

०४. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टांकसाळी उघडून नाणी पाडणे यांसारखे एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते.

०५. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी अति पूर्वेकडील व्यापारात व राजकारणात प्रवेश केला होता. डच व इंग्रज ह्यांच्यामध्ये १६१९ मध्ये जावामधील जकार्ता येथे प्रथम स्पर्धा सुरू झाली, पण इंग्रजांना माघार घ्यावी लागली. डच कंपनीचा गव्हर्नर यान पिटर्सन कोएन याने कंपनीसाठी जकार्ता येथे प्रमुख कार्यालय बांधले.

०६. जकार्ताला “बटाव्हिया” असे नाव देण्यात आले. पुढील काळातील डचांच्या अतिपूर्वेकडील व्यापाराचे बटाव्हिया हे प्रमुख केंद्र बनले. अतिपूर्वेकडील मलायापासून बोर्निओपर्यंतचा प्रदेश डचांच्या ताब्यात आला.

०७. आकडेवारीच्या दृष्टीने पाहता, आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले होते. १६०२ ते १७९६ या काळात कंपनीने जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियातल्या व्यापारासाठी ४, ७८५ जहाजांमध्ये धाडले आणि २५ लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यवहार त्यांच्यामार्फत झाला.  त्या तुलनेत पाहता, उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ ८८२, ४१२ लोक १५०० ते १७९५ यादरम्यान व्यापारासाठी पाठवले.

०८. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ् २६९० जहाजे होती आणि एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या एक पंचमांश होता.

०९. डचांनी १६०० मध्ये जपानमध्ये प्रवेश केला व पुढे पाच वर्षांनी डच ईस्ट इंडिया कंपनीला जपानशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. १६३७-३८ च्या जपानमधील क्रांतीनंतर सर्व ख्रिस्ती धर्मीयांना जपानमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. डचांना मात्र नागासाकी विभागातील देशिया ह्या बेटावर राहण्याची परवानगी मिळाली. १६५२ मध्ये डचांनी दक्षिण आफ्रिकेतील पोर्तुगीजांचा पराभव करून केप ऑफ गुड होप येथे आपली सत्ता स्थापन केली.

१०. सतराव्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकार शाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमावला. बटाव्हिया प्रांतातील एका बंदरात (आजचे जकार्ता) कंपनीने १६१९ साली मालुकु बेटांवरील मसाल्याच्या व्यापारातून फायदा मिळवण्यासाठी राजधानी स्थापन केली. 

१. पुढील दोन शतकांत कंपनीने आणखी बंदरे व्यापारी तळ म्हणून ताब्यात घेतली व त्या बंदरांच्या आसपासचा भूभाग स्वत:च्या आधिपत्याखाली आणून स्वतःचे स्थान बळकट केले. हा व्यापारातला महत्त्वाचा भाग होता आणि दरवर्षी १८ टक्के दराने लाभांश कंपनीला यातून जवळपास २०० वर्षे मिळत होता.

१२. तथापि यापुढील काळात मात्र डचांना इंग्रजांना तोंड द्यावे लागल्याने, त्यांची पूर्वेकडील सत्ता हळूहळू कमी होत गेली. १७९५ मध्ये इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेतील डचांची सत्ता नष्ट केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जावा व आसपासची काही बेटे एवढाच प्रदेश राहिला.

१३. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, भ्रष्टाचारामुळे पोखरल्याने कंपनीचे दिवाळे निघाले आणि १८०० साली कंपनी विसर्जित झाली. तिचे कर्ज आणि मालकीहक्क डच बटाव्हियन रिपब्लिकाच्या सरकारकडे गेले. १८१५ मध्ये डच कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेश डच वसाहती म्हणून डच सरकारने आपल्या ताब्यात घेतला. १७३२ मध्ये स्थापन झालेली डॅनिश एशियाटिक कंपनी १८४५ पर्यंत व्यापार करीत होती. या कंपनीला राजकीय दृष्टीने महत्त्व नाही.

१४. इंडोनेशिया १९४५ पर्यंत डच साम्राज्यांतर्गत एक वसाहत होती. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भूभाग पुढे डच ईस्ट इंडीज म्हणून ओळखला जाऊ लागला. १९ व्या शतकात इंडोनेशिया द्वीपसमूहाला सामावून घेत हा भाग विस्तारला आणि २० व्या शतकात यातूनच इंडोनेशिया निर्माण झाला.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी

०१. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमविले.

०२. ३१ डिसेंबर १६०० रोजी या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या कंपनीचे १२५ भागधारक होते आणि कंपनीचे भांडवल £७२००० होते. ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.

०३. १६०८ च्या सुमारास त्यांनी मलाया द्वीपसमूहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण डचांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर १६०८ मध्ये  इंग्रजांचे सुरतेस आगमन झाले. १६११ साली मछलीपट्ट्न वखार, १६१२ साली सुरतेची वखार स्थापन करण्यात आली. १६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय करून कंपनीने मुघल बादशाह जहांगिराची मर्जी प्राप्त केली. यावेळी जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड आणि अफगाणिस्तान मुगलांच्या ताब्यात होता.
०४. सुरत येथील वखारीच्या स्थापनेनंतर कंपनीने, पेटापोली, अहमदाबाद, बर्‍हाणपूर, अजमीर, मच्छलीपटनम्, मद्रास इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. १६६८ मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच, त्यास पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले.

०५. इंग्रजांनी १६३९ मध्ये मद्रास येथे तर १६६८ मध्ये मुंबई येथे वखार स्थापन केली. १६४७ पर्यंत २३ वखारी इंग्रजांनी स्थापन केल्या ज्यात ९० कर्मचारी होते. १६७० सैन्य बाळगण्याचे,युद्धाचे ब्रिटीश अधिकार कंपनीला भेटले. १६९० मध्ये ब्रिटिशांनी कलकत्ता येथे वखार स्थापन केली.
०६. ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राजचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.
०७. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

पोर्तुगीज कंपनी

०१. भारत व अतिपूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करणारे पोर्तुगीज हे पहिले यूरोपीय होत. १४९८ मध्ये भारतात आलेल्या पेद्रू द कूव्हील्याऊं ह्या पोर्तुगीज व्यापाऱ्याने गोवा, मलबार व कालिकत या ठिकाणांना भेटी दिल्या. त्याने तेथील नैसर्गिक साधनसामग्रीची व व्यापारी दृष्टीने महत्त्वाची ठरणारी माहिती आपल्या कैरो येथील प्रतिनिधीला कळविली.
०२. त्याच वर्षी ‘वास्को-द-गामा’ कालिकतला आला. त्याने सामुरी (झामोरीन) राजाकडून कालिकत येथे वखार काढण्याची संमती मिळविली. सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीजांनी दीव, दमण, मुंबई, वसई, गोवा, चौल, मंगळूर, कोचीन इ. ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली.
०३. पोर्तुगीजांनी मलाया द्वीपसमूहातील बेटांवर राजकीय सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तथापि सतराव्या शतकात डचांबरोबर झालेल्या युद्धानंतर त्यांच्या अतिपूर्वेकडील सत्तेला उतरती कळा लागली.
०४. पोर्तुगीज भारत (पोर्तुगीज: Índia Portuguesa किंवा Estado da Índia;) या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या. वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला.
०५. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत अशा हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ
०६. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोर व तिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली.
०७. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर डिसेंबर १९६१ मध्ये गोवा, दीव व दमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता १९७५ साली मिळाली.

फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी

०१. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी (फ्रेंच:कंपनी फ्रांसेस पूर ल कॉमर्स देस इंडेस ओरियेंतालेस) ही १६६४ मध्ये स्थापन झालेली फ्रेंच कंपनी होती. लुई चौदाव्याकडून परवानगी मिळाल्यावर या कंपनीची स्थापना झाली. याआधीच्या तीन कंपन्या कंपनी दे मादागास्कर, कंपनी दोरियेंट आणि कंपनी दे चाइन या तीन कंपन्यांचे एकत्रीकरण करून या कंपनीची स्थापना झाली.

०२. याचा मुख्य उद्देश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व डच ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा करून भारतातील तसेच भारताशी होणाऱ्या व्यापाराचा भाग मिळवण्याचा होता. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीस दोन कंपन्यांइतके यश मिळाले नाही. १७९४मध्ये ही कंपनी बरखास्त करण्यात आली.

०३. भारत व अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी फ्रेंचांनी चौदाव्या लुईच्या कारकीर्दीतच सुरुवात केली. १६६४ मध्ये चौदाव्या लुईचा मंत्री कॉलबेअर ह्याने परदेशांशी व्यापार करणाऱ्या विविध कंपन्यांची पुनर्रचना करून, पौर्वात्य व पाश्चात्त्य व्यापार यांकरिता दोन स्वतंत्र कंपन्यांची स्थापना केली.

०४. प्रथमपासूनच कंपनीला फ्रेंच सरकारचा पूर्ण पाठिंबा होता आणि व्यापारी, राजकीय व लष्करी हालचालींच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. फ्रेंचांनी भारतातील पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कालिकत तसेच इंडोचायना, मॉरिशस ह्या अतिपूर्वेकडील भागांवर व्यापाराबरोबरच आपली राजकीय सत्ताही स्थापन केली.

०५. तत्पूर्वी भारतात इंग्रजांबरोबरच्या युद्धांत १७६० साली फ्रेंचाचा वाँदीवाश येथे पराभव झाला व त्यांच्याकडे  केवळ वर दर्शविलेले प्रदेश राहिले. शिवाय जिनीव्हा परिषदेनंतर फ्रेंच-इंडोचायनाचे उत्तर व दक्षिण असे दोन विभाग होऊन उत्तर व्हिएतनाम कम्युनिस्टांच्या हाती गेला व फ्रेंचाची अतिपूर्वेकडील प्रदेशातील सत्ता संपली आणि पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी फ्रेंचांची भारतातील सत्ताही संपुष्टात आली.

या प्रकरणावर व्हिडीओ लेक्चर पाहण्यासाठी क्लिक करा