भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे
०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले. 


०२. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे. 


०३. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

०४. राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले. त्यातील मजकुराची धाटणी संवाद कौमुदीपेक्षा थोड्या वरच्या दर्जाची असे. परंतु लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले. 


०५. राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या चालीविरुद्ध वृत्तपत्रांतून जोराची मोहिम चालविली. संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

०६. मुनशी वजीद अली खान यांनी जुब्दत-उल्-अखबार हे फार्सी वृत्तपत्र १८३३ साली दिल्ली येथे सुरु केले. त्याशिवाय आग्रा, मीरत इ. ठिकाणी फार्सी व उर्दू भाषांत वृत्तपत्रे सुरु झाली होती. 


०७. फर्दुनजी मर्झबान यांनी मुंबईना समाचार हे गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र १ जुलै १८२२ रोजी सुरु केले व १८३२ मध्ये त्याचे दैनिकात रुपांतर झाले. अद्यापही ते चालू आहे. 


०८. १८३२ च्या सुमारास जाम-ए-जमशेद प्रकाशित होऊ लागले. १८३३ साली मद्रास येथे तमिळ व तेलुगू भाषांत दोन वृत्तपत्रे सुरु झाली, त्यांना सरकारी मदत मिळत असे. १८३२ साली मुंबई येथे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषांत चालू केले.





बंगाली भाषेतील वृत्तपत्रे

०१. श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने प्रथमतः बंगाली भाषेत नियतकालिके काढण्यास प्रारंभ केला. दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले. त्यानंतर २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. 


०२. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो. या पत्राचे देशी (नेटिव्ह) संपादक तारकालंकार जयगोपाल हे होते. 


०३. योगींद्रमोहन ठाकूर यांनी २८ जानेवारी १८३१ रोज़ी ईश्वरचंद्र गुप्त यांना संवाद-प्रभाकर नावाचे वृत्तपत्र सुरु करुन दिले व त्यासाठी छापखाना उभारुन दिला. हे पत्र प्रथम साप्ताहिक व नंतर दैनिक झाले. हे बंगालीतील पहिले दैनिक वृत्तपत्र होय. 


०४. बंगालमधील वृत्तपत्रे नेहमीच आघाडीवर राहिली आहेत. इंग्रजी व बंगाली वृत्तपत्रांप्रमाणेच पहिली उर्दू व हिंदी वृत्तपत्रेही बंगालमध्येच सुरु झाली. त्याशिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली व पंजाब या ठिकाणी वृत्तपत्रे चालू करण्यात बंगाली लोकांचा प्रामुख्याने पुढाकार होता.

०५. १८५७ च्या उठावानंतर बंगाली वृत्तपत्राची वाढ जोमाने होत गेली. १८६१ मध्ये नीलदर्पण या नाटकाने बंगालमध्ये बरीच खळबळ माजवली होती. नीलदर्पणच्या प्रकाशकावर खटला होऊन त्याला शिक्षा झाली. 



०६. या खटल्याचे पडसाद बरेच दिवस बंगाली वृत्तपत्रांत उमटत होते. नीलदर्पणच्या मिहिमेत हिंदू पेट्रिअट आघाडीवर होते. ते १८५३ साली सुरु झाले. १८६१ साली त्याचे चालकत्व पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याकडे आले. त्याचे संपादक म्हणून क्रिस्तदास पॉल यांनी लौकिक मिळविला.

०७. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

०८. याचवेळी देवेंद्रनाथ टागोर यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिकही चालू होटल (१८४३-१९०२). त्याकामी केशवचंद्र सेन हे देवेंद्रनाथांचे सहकारी होते. पुढे त्या दोघांत मतभेद झाले व केशवचंद्रांनी स्वतःचे सुलभ समाचार या नावाने साप्ताहिक सुरु केले (१८७८). 


०९. अमृत बझार पत्रिका हे प्रसिध्द वृत्तपत्र मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले. १८६९ पासून अमृत बझार पत्रिकेत इंग्रजी मजकूर येऊ लागला. १८७१ च्या ऑक्टोबर महिन्यात पत्रिकेचे कलकत्त्याला स्थलांतर करण्यात आले. परंतु छापखान्याच्या अडचणींमुळे काही काळ साप्ताहिक निघू शकले नाही. अडचणींचे निवारण झाल्यावर अमृत बझार पत्रिका १९७२ च्या फेब्रुवारीत द्वैभाषिक साप्ताहिक म्हणून पुन्हा चालू झाले. 

१०. देशी भाषांतील वृत्तपत्रांचे अधिक चांगल्या रीतीने नियंत्रण करण्यासाठी १८७८ साली ‘व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट’ जारी झाला. सर अॅशली ईडन हे त्यावेळी बंगालचे नायब राज्यपाल होते. परंतु शिशिरकुमार व त्यांच्या बंधूंनी अॅशलीसाहेबांवरच कुरघोडी केली. नवा कायदा देशी भाषांतील वृत्तपत्रांसाठी होता. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी घोष बंधूंनी अमृत बझार पत्रिका संपूर्णपणे इंग्रजीत प्रकाशित करण्यास प्रारंभ केला व या संकटातून आपली सुटका करुन घेतली.

११. देशबंधू चित्तरंजन दास यांनी १९२३ साली स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉर्वर्ड हे इंग्रजी दैनिक चालू केले होते. फझलुल हक्क यांनी १९४१ साली नवयुग हे बंगाली दैनिक सुरु केले. त्यापूर्वी मौलाना अक्रमखान यांनी आझाद (१९२६) हे दैनिक चालवले होते. हसन सुऱ्हावर्दी यांनी इतेहाद हे दैनिक सुरु केले (१९४७). ही तीनही दैनिके बंगालमधील मुस्लिमांचा राजकीय दृष्टिकोन प्रभावीपणे मांडीत असत.

१२. बंगाली साप्ताहिकांत नजरुल इस्लाम यांचे बंगाल, प्रफुल्ल चंद्र रे यांचे सचित्र भारत (१९३५), कृष्णेंदू भौमिक यांचे स्वदेश व सुशील बसूंचे वंगदूत ही साप्ताहिके विशेष उल्लेखनीय आहेत.




हिंदी भाषेतील वृत्तपत्रे
०१. उदन्त मार्तण्ड हि पहिले हिंदी साप्ताहिक, पं. युगलकिशोर शुक्ल यांनी सुरु केले (३० मे १८२६) पण वर्षभरातच ते बंद करावे लागले (४ सप्टेंबर १८२७). १८२९ साली राजा राममोहन रॉय यांनी इतर तीन भाषांप्रमाणे वंगदूत हिंदी भाषेतही सुरु केले होते. 


०२. समाचार सुधावर्षण हे पहिले हिंदी दैनिक कलकत्ता येथेच १८५४ साली चालू झाले. राजा शिवप्रसाद (सितारे हिंद) यांच्या प्रेरणेने उत्तर प्रदेशात बनारस अखबार हे पहिले हिंदी साप्ताहिक १८४५ च्या जानेवारीत प्रकाशित झाले. त्याचे संपादक गोविंद रघुनाथ थत्ते होते. या हिंदी पत्रात उर्दू शब्दांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे १८५० मध्ये बनारस येथून निघालेले सुधाकर हे खऱ्या अर्थाने पहिले हिंदी साप्ताहिक म्हणता येईल. त्याचे संपादक तारामोहन मित्र हे बंगाली गृहस्थ होते. 


०३. १८६७ च्या सुमारास जम्मू, सिकंदराबाद व बनारस येथे तीन नवी हिंदी वृत्तपत्रे सुरु झाली. त्यांपैकी कवि वचनसुधा या भारतेंदु हरिश्चंद्र यांच्या वृत्तपत्राचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. ते १५ ऑगस्ट १८७४ रोजी सुरु झाले. ते प्रारंभी मासिक होते; पुढे त्याची पाक्षिक, साप्ताहिक अशी स्थित्यंतरे झाली. १८८५ मध्ये ते बंद पडले. भारतेंदूंना हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे राममोहन रॉय मानतात. त्यांच्यामुळे तिला स्थिरता व लौकिक प्राप्त झाला.
०४. भारतीय राष्ट्रीय आंदोलनातून दैनिक वृत्तपत्रांचा जन्म झाला. हिंदूस्थान हे पहिले हिंदी दैनिक लंडनमध्ये सुरु झाले. पुढे त्याचे उत्तर प्रदेशात कालाकांकर येथे स्थलांतर झाले. राजा रामपाल सिंग यांनी ते संपादित व प्रकाशित केले. पंडित मदनमोहन मालवीय हे काही काळ त्याचे संपादक होते. या काळात त्याची लोकप्रियता खूपच वाढली व त्याचे दैनिकात रुपांतर झाले. १९१० पर्यंत हे दैनिक चालू होते.

०५. विसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांत हिंदी वृत्तपत्रे साहित्य आणि सामाजिक व धार्मिक प्रश्न यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष पुरवीत. शिक्षण, शेती व व्यापार यांना वाहिलेलीही काही वृत्तपत्रे होती. 


०६. हिंदी प्रदीप, मराठी केसरीचे रुपांतर असलेले हिंदी केसरी (१९०७), कर्मयोगी (१९१०), आग्रा येथील सैनिक, पं. मदमोहन मालवीय यांचे अलाहाबाद येथील अभ्युदय (१९०७), देशदूत, कानपूरचे प्रताप (१९१३) अशी काही मोजकीच वृत्तपत्रे राजकारणावर चर्चा करण्यात आघाडीवर होती, तसेच स्वातंत्र्य आंदोलनाला चालना देण्यातही अग्रेसर होती. 


०७. आपल्या राजकीय विचारसणीचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी गांधीजींनी ‘सत्याग्रही’ ह्या संपादकीय नावाखाली ‘सत्याग्रह’ हे साप्ताहिक  ७ एप्रिल १९१९ पासून सरकारी परवान्याशिवाय प्रसिध्द करण्यास सुरुवात केली.


०८. यंग इंडिया (इंग्रजी) व नवजीवन (गुजराती) ही नियतकालिके १९१९ पासून त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिध्द होऊ लागली.


०९. ११ फेब्रुवारी १९३३ रोजी हरिजन (इंग्रजी) साप्ताहिक गांधीजींनी सुरु केले.हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. त्यात स्वतः गांधीजींच्या व्यतिरिक्त महादेव देसाई, किशोरलाल मशरुवाला, काका कालेलकर व नरहरी पारेख यांच्यासारखे नामवंत लेखक लेखन करीर असत.



१०. १९४० पासून सहा वर्षे गांधीजींनी आपली वृत्तपत्रे प्रकाशनपूर्व नियंत्रणाच्या निषेधार्थ बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरु झाली.






उर्दू भाषेतील वृत्तपत्रे
०१. पहिले उर्दू वृत्तपत्र म्हणून जाम-ए-जहान्नुमा या साप्ताहिकाचा उल्लेख केला जातो. त्याचा पहिला अंक दि. २७ मार्च १८२२ रोजी प्रसिध्द झाला, असे एक मत आहे. तथापि अतिक सिद्दिकीच्या मते एप्रिल १८२२ हा प्रकाशनकाल असावा. 


०२. दिल्लीमधील पहिले उर्दू वृत्तपत्र दिल्ली उर्दू अखबार (१८३६) हे होते व मौलवी मुहमद्द बाकर हे त्याचे मालक- संपादक होते. त्यानंतर लगोलग सैय्यिद-उल-अखबार हे वृत्तपत्र निघाले, त्याचे संपादक सैय्यिद मुहमद्द होते. १८५२ च्या सुमारास दिल्लीमध्ये आठ उर्दू वृत्तपत्रे होती. 


०३. मद्रास येथे जामे-उल-अखबार हे साप्ताहिक वृत्तपत्र १८४० मध्ये रहमतुल्ला यांच्या संपादकत्वाखाली चालू झाले. लाहोर येथून मुनशी हरसुखराय यांनी कोहिनूर हे उर्दू साप्ताहिक १४ जानेवारी १८५० रोजी सुरु केले. 


०४. लखनौहून नियमितपणे प्रसिध्द होणारे अवध अखबार हे पहिले उर्दू वृत्तपत्र नवल किशोर यांनी १८५८ मध्ये प्रसिध्द केले. प्रारंभी ते साप्ताहिक होते. त्याकाळी भरघोस पृष्ठे व उच्च दर्जाची निर्मिती मूल्ये असलेले हे सर्वोकृष्ट वृत्तपत्र अतिशय लोकप्रिय होते. पंडित रतननाथ सरशार हे १८७८ मध्ये या पत्राचे संपादक झाले. त्यांची फिसान-ए आजाद ही उर्दूतील सर्वोकृष्ट कादंबरी ह्याच पत्रातून क्रमशः प्रसिद्ध होत होती. 


०५. १८५७ नंतरच्या पंचवीस वर्षांत उर्दू वृत्तपत्रांच्या संख्येत बरीच भर पडली. ह्या काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिक म्हणजे लखनौ येथून १८७७ पासून प्रसिध्द होत असलेले अवध पंच होय. विनोद व व्यंगचित्रे यांवर भर देणाऱ्या ह्या पत्राचे संपादक सय्यद सज्जाद हुसेन हे स्वतः उत्कृष्ट विनोदी लेखक, तसेच प्रखर राष्ट्रीय बाण्याचे, प्रसंगी सरकारला धारेवर धरणारे निर्भीड टीकाकार होते. हे पत्र ३५ वर्षे सलगपणे चालले. 


०६. सर सय्यद अहमद यांच्या संपादकत्वाखाली अलीगढ येथून निघणारे तहझीब-उल-अखलाख हे उर्दूतील दर्जेदार व प्रतिष्ठित साप्ताहिक होते. ते १८७० ते १८७६, १८७९ ते १८८१ व १८९४ ते १८९७ अशा खंडित कालावधीत प्रकाशित होत असे. सर सय्यद हेच त्याचे प्रमुख लेखक होते. आपल्या लिखाणातून त्यांनी पाश्चात्य शिक्षण व संस्कृती, तसेच विवेकनिष्ठ धार्मिक विचारसरणी यांचा प्रसार केला. 


०७. अब्दुल हलीम ‘शरर’ (१८६०-१९२६) यांनी दिलगुदाज हे वृत्तपत्र १८८७ मध्ये काढले. ते लखनौ व हैदराबाद येथून १९०१ पर्यंत, अधूनमधून खंडित होत चालू राहिले.

०८. विसाव्या शतकाच्या प्रारंभी उर्दू वृत्तपत्रांची संख्या सुमारे होती. त्यांपैकी अवध अखबार, पैसा अखबार व सुल ए कुल ही दैनिके विशेष उल्लेखनीय होती. 



०९. पंजाबचे मुनशी महबूब आलम यांनी पैसा अखबार (१८८८) या आपल्या दैनिकाने उर्दू पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध मार्गांनी क्रांती घडवून आणली. ह्या दैनिकाच्या अंकाची किंमत फक्त एक पैसा होती. पैसा अखबारचा संपादक मौलवी महबूब आलम हा स्वतंत्र व कल्पक दृष्टी असलेला धडाडीचा पत्रकार होता. त्या काळी वृत्तपत्रविद्येचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाणारा तो पहिलाच उर्दू पत्रकार असावा. 


१०. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या स्थापनेनंतर उर्दू वृत्तपत्रसृष्टी नवे वळण लागले. १९०७ साली अलाहाबाद येथून उर्दू स्वराज्य हे पत्र सुरु झाले. थोर देशभक्त, प्रभावी वक्ते व पत्रकार मौलाना अबुलकलाम आझाद यांनी लोकजागृतीच्या उद्देशाने आपले अल्‌ हिलाल हे साप्ताहिक वृत्तपत्र कलकत्ता येथून एक जून १९१२ रोजी सुरु केले. अल्‌ हिलाल राजकीय प्रश्नांत काँग्रेसचा पाठपुरावा करी. 


११. सामाजिक व धार्मिक समस्यांविषयीही त्याचे धोरण पुरोगामी असे ‘मुसलमानांचा गोवधाचा हट्ट जातीय शांततेला विघातक आहे’ असे अल्‌ हिलालने १९१३ साली बजावले होते. बातम्यांसोबत छायाचित्रे छापणारे ते पहिलेच उर्दू वृत्तपत्र होते. दोन वर्षांतच त्याचा खप दर आठवडयाला २६,००० प्रती इतका झाला. उर्दू वृत्तपत्रांबाबत हा खपाचा एक उच्चांकच होता. 


१२. अल्‌ हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश शासनकर्त्यांचा रोष झाल्याने हे वृत्तपत्र बंद करावे लागले. त्यानंतर आझाद यांनी काही काळ अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र चालवले. 


१३. राष्ट्रीय बाण्याचा प्रसार करणाऱ्या वृत्तपत्रांत अल्‌ हिलालबरोबरच, कानपूर येथील हसरत मोहानीचे उर्दू-ए-मोअल्ला (१९०३), दिल्ली येथील मौलाना मुहम्मद अलीचे हमदर्द व लाहोर येथील मौलाना जफर अली खानचे जमीनदार (१९१०) ही उल्लेखनीय होत. यांव्यतिरिक्त हमीदुल अन्सारी (मदिना), मौलाना अब्दूल बारी (हमदम) प्रभृती मुस्लिम नेत्यांनीही स्वतःची उर्दू वृत्तपत्रे चालविली होती.

१४. पहिल्या महायुद्धकाळातील निर्बंधांमुळे उर्दू वृत्तपत्रांच्या संख्येत काही वर्षे फारशी वाढ झाली नाही. १९१९ साली कृष्ण यांचे प्रताप हे उर्दू दैनिक सुरु झाले. त्याला वेळोवेळी सरकारी अवकृपेचे तडाखेही सहन करावे लागले. १९२३ साली खुशालचंद यांनी मिलाप हे उर्दू दैनिक सुरु केले. प्रताप व मिलाप ही दोन पत्रे आर्यसमाजाच्या भूमिकेचा पाठपुरावा करीत. फाळणीनंतर ती जलंदर व दिल्ली येथून प्रकाशित होऊ लागली. 


१५. १९२० साली लाला लजपतराय यांनी वंदेमातरम्‌ हे दैनिक सुरु केले. स्वामी श्रध्दानंदांनी दिल्लीत १९२३ साली तेज हे दैनिक सुरु केले. सनातनी हिंदूंचा दृष्टिकोन पुढे मांडण्यासाठी गोस्वामी गणेश दत्त यांचे वीर भारत १९२८ पासून प्रसिध्द होऊ लागले. 


१६. १९३० नंतर अनेक उर्दू वृत्तपत्रे नव्याने चालू झाली. ती देशाच्या निरनिराळ्या भागांत प्रकाशित होत असत. त्यांच्यापैकी बहुतेक मुस्लिम लीगच्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा करीत, काही थोडी राष्ट्रीय मुसलमानांची भूमिका मांडीत. 


१७. १९४२ साली कम्युनिस्ट पक्षाने नया जमाना हे साप्ताहिक मुंबईत चालू केले. १८५२ साली त्याचे जलंदरला स्थलांतर झाले. पंडित जवाहरलाल नेहरुंच्या मार्गदर्शनाखाली १९४५ पासून लखनौ येथून कौमी आवाझ प्रसिध्द होऊ लागले. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुखपत्र असून, देशाच्या अनेक भागांतून प्रसिध्द होते. 


१८. त्याच वर्षी (१८४५) चौधरी खलिक उझ झमान यांनी तनवीर सुरु केले. पाकिस्ताननिर्मितीच्या चळवळीतील बॅ. महंमद अली जिनांचे एक निकटचे सहकारी व पत्रकार हमीद निझामी यांच्या संपादकत्वाखाली नवा-ई-वक्त हे राजकीय दैनिक सुरु झाले. ते अद्यापही चालू आहे. 



१९. १९४७ च्या फाळणीनंतर अनेक उर्दू वृत्तपत्रांचे संसार विसकटले व त्यांना लाहोरहून दिल्लीला स्थलांतर करावे लागले.






* मराठी भाषेतील वृत्तपत्रे पाहण्यासाठी स्वतंत्र लेख ‘महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास’ पाहावा.