स्थापना 
१९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढेमागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा अशा विचाराचे नेते पुढे सरसावले. 


अशा वेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य-संग्रामाच्या साधनांचा पुर्नविचार करण्यासाठी १९३४ मध्ये काँग्रेस अंतर्गत सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली. 

जयप्रकाश नारायण उर्फ लोकनायक, डॉ.राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन हे समाजवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. समाजवादी काँग्रेसमध्ये पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, युसूफ मेहेर अली, ना.ग. गोरे आणि कामगार नेते एस.एम. जोशी यांचा समावेश होता.


मुंबईमध्ये डॉ. संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात (२१ व २२ ऑक्टोबर १९३४) पक्षाने स्पष्ट केले की, संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारताचे विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना होय. 


कार्य व स्वरूप
मीरत येथे भरलेल्या (जानेवारी १९३६) पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे स्वरूप, कार्यक्रम व उद्दिष्टे या संबंधी एक प्रबंध मंजूर करण्यात आला. ‘मीरत प्रबंध’ या नावाने तो प्रसिद्ध आहे. या प्रबंधात पक्षाच्या निर्मितीची मीमांसा, राष्ट्रवादी व समाजवादी परस्पर सबंध, साम्राज्यवादाविरूद्ध लढ्याचे स्वरूप इ. मुद्यांचा परामर्श घेण्यात आला.

लाहोर येथे १९३८ मध्ये भरलेल्या अधिवेशनात पक्षाचा प्रचलित आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. परशियामधील सामाजिक व आर्थिक पद्धतीस पाठिंबा देण्यात आला. कम्युनिस्टांशी एकजुट करण्याचा निर्णय झाला. 


परंतु अल्पावधीतच त्यांच्यात सामंजस्य कमी होऊन तणाव निर्माण झाले.भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या युद्धविषयक नीतीच्या प्रश्नावर दोन पक्षांमधील एकी संपुष्टात आली. 


सुरूवातीस दुसऱ्या महायुद्धास ‘साम्राज्यवाद्यांमधील आपापसांतील संघर्ष’ असे संबोधनाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने, युद्धात रशिया सामील झाल्यावर दोस्त राष्ट्राशी सहकार्य करावे आणि भारताच्या स्वातंत्र्याचा लढा स्थगित ठेवावा, अशी मागणी केली. उलट स्वातंत्र्य लढा आक्रमक करण्याची हीच वेळ आहे अशी समाजवादी पक्षाची भूमिका होंती.


म. गांधीच्या नेतृत्वाखाली १९४२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अंतिम लढा सुरू झाला. समाजवाद्यांनी या लढ्यात स्वतःस पूर्णतः झोकून दिले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस. एम्. जोशी इत्यादींनी भूमिगत राहून आंदोलनाची सूत्रे चालविली. 


१९४६ मध्ये पक्षाचे नेते व कार्यकर्ते तुरूंगातून सुटल्यानंतर १९४२ च्या आंदोलनात ज्यांनी सहकार्य दिले होते त्यांच्या मदतीने काँग्रेस अंतर्गत ‘ऑगस्टवादी गट’ या नावाने काम करावे की काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची पुनर्घटना करावी, यावर विचार झाला. त्यात पार्टीची पुनर्घटना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


१९४७ मध्ये कानपूर येथे भरलेल्या अधिवेशनात पक्षाने पुढील सूत्रांचा पुरस्कार केला :-
०१. लोकशाही पद्धतीने कार्य करणाऱ्यासर्व राजकीय पक्षांना संघटनास्वातंत्र्य आणि प्रचारस्वातंत्र्य
०२. राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण
०३. आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण
०४. लोकशाहीनिस्ट आर्थिक नियोजन.
०५. उद्योगधंद्यांचे सामाजिकीकरण
०६. सहकारी शेती. 


याच अधिवेशनात ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ या नावातील ‘काँग्रेस’ हा शब्द वगळण्यात आला. काँग्रेस बरोबरचे दुरावलेले संबंध त्यावरून स्पष्ट झाले. 


पुढच्याच वर्षी (१९४८) नासिक येथे भरलेल्या पक्षाच्या सहाव्या अधिवेशनात सोशालिस्ट पक्षाने काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा व एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला.


स्वातंत्र्योत्तर काळातील कार्य
पाटणा येथे १९४९ मध्ये भरलेल्या पक्षाच्या अधिवेशनात हिंसात्मक क्रांतीचा मार्ग त्याज्य ठरविण्यात आला आणि लोकशाही समाजवाद हे पक्षाचे ध्येय जाहीर करण्यात आले. याच अधिवेशनात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सोशालिस्ट पक्षाचे सभासदत्व क्रियाशील सभासदांपुरतेच मर्यादित होते. येथून पुढे पक्षाचे दरवाजे पक्षाचे ध्येय धोरण मानणाऱ्या सर्वांना खुले करण्यात आले. 


पक्षाचे व्यापक जनपक्षात रूपांतर करण्यात आले. या प्रश्नावर मतभेद होऊन अरूणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते १९५१ मध्ये पक्षाबाहेर पडले व त्यांनी ‘डावा समाजवादी गट’ स्थापन केला.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ह्या पक्षाचा प्रचंड पराभव झाला. त्यानंतर मे १९५२ मध्ये पंचमढी येथे पक्षाची खास परिषद भरली. अध्यक्षीय भाषणात राम मनोहर लोहिया यांनी समाजवाद आणि साम्यवाद या दोहोंमध्ये समन्वय निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य समाजवादी पक्षाने करावे असे आवाहन केले.

२६ व २७ सप्टेंबर १९५२ रोजी समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांचा किसान मजूर प्रजापक्ष यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संयुक्त बैठक मुंबईमध्ये होऊन ‘प्रजा सोशालिस्ट पार्टी’ ची स्थापना करण्यात आली. या युतीचा हेतू प्रबल विरोधी पक्ष निर्माण करणे हा होता. परंतु पुढे काँग्रेसशी सहकार्याचे संबंध ठेवावयाचे की विरोधाचे ठेवावयाचे या प्रश्नावर पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. या प्रश्नावर जयप्रकाश नारायण आणि अशोक मेहता पहिल्या भूमिकेस अनुकूल तर लोहिया दुसऱ्या भूमिकेचे आग्रही होते. 


त्याच प्रमाणे पक्षाचा तात्त्विक कल मार्क्सवादाकडे झुकणारा असावा की गांधी वादाकडे या प्रश्नावरही पक्षाअंतर्गत तणाव निर्माण झाला. 


१९५४ मध्ये जयप्रकाश नारायण पक्षातून बाहेर पडले व त्यांनी सर्वोदयी कार्य सुरू केले. 


पट्टम थानू पिल्ले यांनी त्रावणकोर-कोचीन राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देण्याच्या प्रश्नावर पक्ष दुभंगला. पक्षाचा मोठा हिस्सा प्रजा समाजवादी पक्ष म्हणून काम करीत राहिला. तर लोहियांच्या पाठीराख्यांनी १९५५ साली ‘सोशालिस्ट पार्टी’ हा वेगळा पक्ष स्थान केला. 


१० वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचा संभव निर्माण झाला. तथापि जानेवारी १९६५ मध्ये वाराणसी येथे विलीनिकरणाच्या पहिल्या अधिवेशनातच,  विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली. कारण याच अधिवेशात पुर्वाश्रमीच्या प्रजा समाजवादी कार्यकर्त्यांनी विलीनीकरण रद्द करून प्रजा समाजवादी पक्षाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. 

१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त सोशालिस्ट पार्टीने बडी आघाडी उभी करण्यात पुढाकार घेतला. त्या सुमारास प्रजा समाजवादी पक्ष मात्र काँग्रेसशी संवाद साधण्यात व्यग्र होता. निवडणुकीत दोन्हीही पक्षांच्या पदरात प्रचंड अपयश पडले. त्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट १९७१ रोजी दोहोंच्या विलीनीकरणातून सोशालिस्ट पक्षाची निर्मिती झाली. या विलीनीकरणापासून काही राज्यातील दोन्ही पक्षांच्या शाखा दूरच राहिल्या.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने बिहारमध्ये सुरू झालेल्या काँग्रेस विरोधी आंदोलनात सोशालिस्ट पक्ष आणि त्याबाहेरील विविध समाजवादी गट आघाडीवर होते. 
आणीबाणीच्या काळात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून आणीबाणी विरोधी वातावरण तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.


पुढे १९७७ च्या मे महिन्यात सोशालिस्ट पक्ष इतर चार पक्षांबरोबर विसर्जित होऊन जनता पक्षाची निर्मिती झाली. १९७९ आणि १९८० मध्ये जनत पक्षाचे विघटन झाले. प्रथम लोकदल आणि नंतर जनसंघ जनता पक्षातून बाहेर पडले. परंतु काँग्रेस (संघटना) या घटक पक्षाबरोबर सोशालिस्ट पक्ष जनता पक्षातच राहिला.