१३३ देशांमध्ये भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर 
भारतीय सैन्याचे जगभरात कौतुक होत असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे आता जगभरात अधिकृतपणे निश्चित झाले आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणावरुन नुकतीच एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


त्यानुसार १३३ देशांमध्ये भारताचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. पाकिस्तानचा या यादीत १३ वा क्रमांक आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५ मध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्थान कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.

तसेच फ्रान्स, यूके, जपान, तुर्की आणि जर्मनी हे देशही पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. या सर्वेक्षणासाठी सैन्याशी निगडित विविध ५० निकषांचा अभ्यास करण्यात आला होता. यात भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला.



कोनराड संगमा – मेघालयचे नवे मुख्यमंत्री 
नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे नेते कोनराड संगमा यांची मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी ६ मार्चला होणार आहे.

अलीकडेच पार पडलेल्या मेघालय विधानसभा निवडणुकीनंतर, NPP-भाजपा युतीने राज्यात सरकार बनवण्याचा दावा केला आहे. ७ मार्चला आधीच्या विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे.

भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो. ही निवडणुक दर ५ वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. 

विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुका या देशातील २९ राज्यांमध्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी २ (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.



ओडिशात ‘अमा गांव, अमा विकास’ कार्यक्रमाचा शुभारंभ 
ओडिशा राज्य शासनाने ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये त्यांना सामील करून घेण्यासाठी ‘अमा गांव, अमा विकास’ (आमचा गाव, आमचा विकास) या कार्यक्रमाला सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ३ मार्च २०१८ रोजी कार्यक्रमाचा भाग म्हणून मोबाईल व्हिडिओ गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. या गाड्या राज्यभर प्रवास करून गावात विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहिती देणार.



ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकर हिला सुवर्णपदक 
मॅक्सिकोच्या ग्वादलजारा शहरात ISSF विश्वचषक २०१८ स्पर्धेत भारताच्या मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

या प्रकाराचे रौप्य मॅक्सिकोची अलेजांड्रा जवाला वजाक्वेज हिने तर कांस्यपदक सेलीन गॉबविलने जिंकले.

१९८६ साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. 

दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी १९८८ सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे. १९०७ साली ISSF ची स्थापना करण्यात आली.


ऑस्कर पुरस्कार २०१८ 
डॉल्बी थिएटरमध्ये ९०वा ऑस्कर पुरस्कार मोठ्या थाटात पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्काराचे सुत्रसंचलन अभिनेता जिम्मी किमेल यांनी केले. या सोहळ्यात ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ या चित्रपटाची नायिका फ्रान्सेस मॅकडोर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

याआधी १९९७ मध्ये ‘फार्गो’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी तिने ऑस्कर पटकावला होता. हा मिळालेला पुरस्कार तिच्या सिनेकारकिर्दीतील दुसरा ऑस्कर ठरला.

सन २०१७ मध्ये निर्मित सर्वोत्तम चित्रपटांना बहुमान देण्यासाठी हा सन्मान दिला गेला. गईलर्मो डेल टोरो यांच्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले.

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट : द शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट : ए फँटॅस्टिक वुमन (स्पॅनिश)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : गॅरी ओल्डमन (डार्केस्ट अवर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सिस मॅकडोरमंड (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गईलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सॅम रॉकवेल (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ऍलिसन जेनी (आय, टान्या)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर : इकरस
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म : डिअर बास्केटबॉल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट : कोको
सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गुण) : द शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गीत) : रिमेंबर मी (कोको)
सर्वोत्कृष्ट लिखाण (मूळ पटकथा) : गेट आऊट
सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट : हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) : द सायलेंट चाईल्ड
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) : कॉल मी बाय युवर नेम
सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा : डार्केस्ट अवर चित्रपट
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : फॅन्टम थ्रेड
सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन आणि ध्वनिमिश्रण : डंकर्क
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन : द शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ब्लेड रनर 2049
सर्वोत्कृष्ट संकलन : डंकर्क

रचेल मॉरिसन ही ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नामांकन मिळालेली प्रथम महिला आहे.

जॉर्डन पिले हा मूळ पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिकी वंशाचा अमेरिकेचा निवासी आहे.

गईलर्मो डेल टोरो हा पाच वर्षांमध्ये चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा मॅक्सिकोचा एकमेव दिग्दर्शक आहे.

‘ऑस्कर पुरस्कार’ या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतील चित्रपट उद्योगात चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) द्वारा २४ कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. 

पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.

प्रथम पुरस्कार सोहळा १९२९ साली आयोजित केला गेला होता. १९३० साली पुरस्कार सोहळा पहिल्यांदा रेडिओ वर प्रसारित केला गेला होता आणि १९५३ साली याचे प्रथमच दूरदर्शन (TV) प्रक्षेपण केले गेले होते.

‘ऑस्कर’ ची मूळ रचना MGM कला दिग्दर्शक सेडरीक गिबोन्स यांच्याकडून केली गेली होती. प्रारंभीक चिन्हात एक नाइट (सैनिक) हातात तलवार आणि चित्रपटफिती घेऊन उभा आहे असा पुतळा होता.

नवीन चिन्ह शिकागो मधील पुरस्कार बनवणारी RS ओवेन्स अँड कंपनी कडून १९८२ सालापासून बनवण्यात येत आहे. प्रतिमेची उंची 13½ इंच आहे आणि वजन 8½ पाउंड असते. प्रतिमा ब्रिटानिया धातूपासून बनविली जाते. त्यावर तांबे, निकेल, चांदी आणि शेवटी 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढविण्यात येतो