व्याघ्र गणना

पार्श्वभूमी 
“वाघ” हा जंगलातील वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील प्रमुख स्थानी आहे. वाघ आहे म्हणून जंगल आहे. जंगल आहे म्हणून वाघ आहे. त्यातील वन्यजीव आहेत. 

तसंच जंगल आहे म्हणून शुद्ध ऑक्सीजन आहे. पाणी आहे. पाणी आहे म्हणून मानवासहीत संपूर्ण सजीवसृष्टी आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून आहे. “वाघ” हा समृध्द पर्यावरणाचा आधार मानला जातो.

इ.सन.पूर्व ३०० मध्ये वन्यजीव रक्षणाची पहिली संकल्पना सम्राट चंद्रगुप्त मोर्य याने अंगिकारली. अभयारण्य निर्मितीचा तो पायाच म्हटला पाहिजे. अरण्याचे रक्षण आणि संवर्धन करण्यावर त्या काळात भर देण्यात आला. जंगल देखभालीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे काम चंद्रगुप्ताने केले. 

परंतु त्यानंतरच्या काळात माणूस कधी स्वार्थापोटी म्हणजेच निवाऱ्यासाठी तर कधी शिकारीचा शौक भागविण्यासाठी जंगलतोड करतच राहिला. 

स्वातंत्र्य मिळविण्याच्या काही काळ अगोदर वन आणि वन्यजीवाबाबत जाणीव तयार होऊ लागली होती. स्वातंत्र्यानंतर या जाणिवेने चळवळीचे रुप घेतले. त्यासंबंधी कायदा तयार झाला. त्यातून जंगल आणि त्यातील वन्यजीवांना अभय मिळाले. 

आज भारतात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १७ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे. जंगलतोड किंवा शिकारीवर कायद्याने निर्बंध आणले असले तरी त्यात छूपे व्यवहार मात्र तेजीत आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. 'शिकार' हा काही लोकांसाठी छंद बनला, वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. त्यामुळे विष प्रयोग करुन वाघांच्या शिकारी करण्यात आल्या. 

१९७० च्या सुरुवातीस केवळ १७०० वाघ उरले. म्हणून भारत सरकार खळबळून जागे झाले आणि १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला. वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातीच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेस चालना मिळाली. 

भारतीय वाघांचे संरक्षण, त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वाघांच्या संख्येत वाढ करणे या उद्येशाने भारतात व्याघ्र प्रकल्पांची स्थापना १९७३-७४ साली करण्यात आली. यामुळे वाघांची संख्या वाढली. परंतु चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व १९९० च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. 

सर्वात महत्वाचे म्हणजे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी वाढली. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही वाघांच्या शिकारींमध्ये चीनच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. १९ व्या शतकातील १ लाख वाघांची संख्या २० व्या शतकात ४० हजारावर आली. 

चालू २१ व्या शतकाच्या प्रारंभी पृथ्वीतलावर अवघे ३५०० ते ४००० वाघ शिल्लक आहेत. भारतासाठी आशेचा एकमेव किरण म्हणजे आज जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी निम्मे वाघ आपल्या देशात आहेत. 

गेल्या शंभर वर्षापासून कमी-कमी होत चाललेली वाघांची संख्या अत्यंत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शंभर वर्षात जगात ९४ टक्के वाघांची शिकार करण्यात आली. भारतात १९९९ ते २०११ या अवघ्या बारा वर्षात ४४७ वाघांचा मृत्यू झाला तर त्यातील १९७ वाघांची शिकार करुन त्यांना ठार मारण्यात आले. 

काही वर्षापूर्वी जगातील ३५ देशांमध्ये असलेले वाघांचे वास्तव्य आता केवळ अवघ्या १३ देशांमध्येच राहिले आहे. हे भीषण वास्तव लक्षात आल्यामुळे वाघांच्या संख्येवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आणि त्यासाठी देशव्यापी व्याघ्र गणना हा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षापासून दर चार वर्षाने घेतला जातो. 

१९२६ ते १९४७ या काळात देशात पंजाब आणि उत्तर प्रदेशात जंगल रक्षणाबाबतची जागरुक वाढली. १९५२ साली राखीव जंगलाबाबत कायदा अस्तित्वात आला आणि भारतातील एक तृतीयांश भागात पसरलेल्या जंगल संरक्षणाचे ध्येय ठेवल्या गेले. त्यानंतरच्या ५० वर्षात राखीव जंगलाबाबतची जागरुकता मोठ्या प्रमाणावर वाढली.वन्यप्राणी प्रगणनेच्या पद्धती
वन्यप्राणी प्रगणनेच्या एकूण चार पद्धती आहेत. पाणवठ्यावरील प्रगणना, भूखंड पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना, प्लॅस्टर कास्ट व ट्रेसिंग पद्धत आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने प्रगणना.

वाघाच्या गणनेसाठी अंदाजे चाळीस वर्षापासून त्याच्या मागील डाव्या पायाच्या पंजाचे प्लॅस्टर कास्ट काढण्यात येत होते. 

वाघाचा वावर त्याच्या निर्धारित क्षेत्रातच असतो. रानवाटेवरुन किंवा पाणवठ्यांकडे जाणाऱ्या वाटेवरुन चालतांना आपले पदचिन्ह तो मागे सोडतो. 

सात दिवसाच्या व्याघ्र प्रगणनेत रोज सकाळी व सांजवेळेपूर्वी अरण्याच्या विविध क्षेत्रात फिरुन प्रथम पगमार्कचे “ट्रेसिंग” घेतल्या जायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या द्रावणातून वाघाच्या पाऊल ठशांचे प्लॅस्टर कास्ट काढले जायचे. तयार पाऊल ठशाचे व घेतलेल्या ट्रेसिंगचे विश्लेषण करण्यात येऊन त्यात बोटामधील अंतर, पंजाची गादी, बोटाचा आकार, त्याच्या गादीचा आकार व संपूर्ण पंजाचा आकार याचा विचार करण्यात येतो.

तयार केलेल्या प्लॅस्टर कास्टवर दिनांक, वेळ, ठिकाण, जंगल परिक्षेत्राचे नाव इ.चा उल्लेख असतो. या सर्व काढलेल्या प्लॅस्टर कास्टच्या आणि ट्रेसिंगच्या विश्लेषणातून वाघांची एकूण संख्या काढली जाते.

कॅमेरा ट्रॅप पद्धत

जंगलांमध्ये वाघाच्या किंवा वन्यजीवांच्या अनेक संचार मार्गावर किंवा अरण्यातील पाणवठ्यावर आधुनिक पद्धतीचे सेंसेटिव्ह कॅमेरे बसविण्यात येतात. कॅमेरामध्ये येणाऱ्या वाघाच्या दोन्हीही बाजूने छायाचित्र येईल अशा अँगलने ते बसविण्यात येतात. हे कॅमेरे दिवस-रात्र सुरु असतात. 

त्यानंतर कॅमेरात ट्रॅप झालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करुन त्यात वाघाचा आकार, शरीरावरील पट्टे, दोन पट्ट्यातील अंतर, त्याचा आकार इ.चा अभ्यास केल्या जातो. 

या सर्व बाबींचा तपशील गोळा करुन त्याचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करुन प्रत्येक वनक्षेत्रातील वाघांची संख्या काढली जाते. देशातील अशा सर्वच व्याघ्र प्रकल्पात एकाचवेळी ही 'कॅमेरा ट्रॅप पद्धती' अवलंबिण्यात येत असून संबंध देशात किती वाघ शिल्लक आहेत याची एकूण संख्या काढली जाते. 
महाराष्ट्र
महाराष्ट्रात ४ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१३ चौरस किलोमीटर असून ६१,९३९ चौरस किलोमीटर क्षेत्र वनाच्छादित आहे. 

जवळपास २० टक्के क्षेत्र हे जंगलव्याप्त आहेत. त्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ३६ अभयारण्य १५,७३२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरले आहे. 

राज्यात ४ टायगर रिझर्व्ह असून मेळघाट जि.अमरावती, पेंच जिल्हा.नागपूर, ताडोबा-अंधारी जिल्हा चंद्रपूर आणि राधानगरी-कोयना कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. वाघांबद्दल
जगात वाघाचे एकूण ९ प्रकार आहेत. त्यामध्ये बेंगाल टायगर, सायबेरियन, सुमात्रा, इंडो-चायना, मालायन, साऊथ चायना, जावा, बाली आणि कॅस्पीयन टायगर अशी त्यांची नावे आहेत. पैकी ऑस्कफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कॅस्पीयन वाघ व सायबेरियन वाघाचे डीएनए सारखेच असल्याचा शोध लावला आहे. 

भारतात असलेला वाघ हा 'रॉयल बेंगाल टायगर' म्हणून ओळखला जातो.

वाघाचे आयुष्य १४ ते १६ वर्षे असते. नर वाघाचे वजन १९० ते २०० किलो, लांबी (शेपटीसह) ९ ते १० फुट असून वाघाच्या जबड्यात एकूण ३० दात असतात. कोणत्याही दोन वाघांचे पायाचे पंजे एकसारखे नसतात. वाघाच्या अधिवासाचे क्षेत्र २० ते ३५ चौरस किलोमीटर एवढे असते. मात्र वाघिणीचे अधिवास क्षेत्र १५ ते २० चौरस किलोमीटर एवढे असते.

वाईल्ड लाईफ कॉन्झल्हेटिव्हा सोसायटीच्या अहवालानुसार आशियातील ४२ अधिवासांपैकी १८ अधिवास भारतात आहेत. उर्वरित अधिवास सुमात्रा बेटावर ८, पूर्व रशिया ६, थायलंड, बांगलादेश, लाओस येथे अधिवास आहेत. चीन, कंबोडिया, व्हिएतनाम येथे वाघाचा एकही अधिवास शिल्लक नाही.व्याघ्र गणना २०१८
जागतिक व्याघ्र दिन : २९ जुलै
देशातील वाघांची संख्या : २९६७
तामिळनाडूतील 'सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प' सर्वोत्कृष्ट
जगातील ३/४ वाघ भारतात
२००६ साली देशात १४११ वाघ, २०१० मध्ये १७०६, २०१४ मध्ये २२२६ तर २०१८ मध्ये २९६७ वाघ आहेत
सर्वात जास्त वाघ अनुक्रमे मध्य प्रदेश (५२६), कर्नाटक (५२४), उत्तराखंड (४४२) राज्यात आहेत
व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या २०१४ च्या ६९३ वरून २०१८ साली ८६० झाली आहे. तर कम्युनिटी रिजर्व संख्या ४३ वरून १०० झाली आहे.
महाराष्ट्रात २०१८ साली ३१२ वाघ आहेत. २००६ मध्ये १०३, २०१० मध्ये १६९ तर २०१४ साली १९० वाघ होते.
ताडोबा प्रकल्पात ८६ ते ९० वाघ आहेत.
देशातील १८ राज्यात व्याघ्र गणना झाली
डेहराडूनच्या भारतीय वन्य जीव संस्थेने विकसित केलेल्या ट्रान्झिट मेथडने ही गणना करण्यात आली.