इंग्रज मराठा युद्धे – भाग ३

तिसरे इंग्रज मराठा युध्द (१८०४-१८०६)

०१. होळकर १८०४ साली इंग्रजांचे जयपूर घेऊन त्यांच्याशी संघर्ष करीतच होता. त्यामुळे इंग्रजांनी कर्नल मॉन्सन याच्या नेतृत्वाखाली होळकरावर फौज पाठविली. परंतु होळकरांनी त्याचा पराभव केला. या यशाने स्फुरण चढून होळकराने दिल्लीलाच वेढा दिला. परंतु इंग्रजांच्या कर्नल एक्टरलोनी व कर्नल बर्न यांनी होळकरांचा वेढा मोडून काढला.

०२. त्यानंतर इंग्रजांनी होळकरांचा मित्र असलेल्या भरतपुरच्या राजावर चढाई केली. भरतपुरच्या राजाला १० एप्रिल १८०४ रोजी इंग्रजांशी भरतपूर तह करणे भाग पडले. यानुसार भरतपुरच्या राजाने २० लाख रुपये खंडणी देण्याचे कबुल करून इंग्रजांचे शत्रू व मित्र असलेल्यांना आपलेही शत्रू व मित्र मानण्याचे मान्य केले.

०३. यानंतर वेलस्ली जाऊन लॉर्ड कॉर्नवलिस त्याच्या जागी आला होता. इंग्रजांनी ७ जानेवारी १८०६ रोजी होळकरासोबत राजघाटचा तह केला. या तहानुसार होळकराने चंबळ नदीच्या उत्तरेकडील प्रदेश, पुणे व बुंदेलखंड या प्रदेशावरील आपला हक्क सोडून दिला.

०४. इंग्रजांनी होळकरांच्या चंबळेच्या दक्षिणेकडील प्रदेशात हस्तक्षेप करण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे इंग्रजांनी टोंक, रामपूर व बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश होळकरास परत केला आणि चंबळेच्या उत्तरेकडील प्रदेश व जयपुरातील आपली फौज मागे घेतली.

चौथे इंग्रज मराठा युध्द (१८१७-१८१८)

०१. वसईच्या तहानंतर इंग्रजांच्या संरक्षणाखली पेशवे पद मिळाल्यानंतर बाजीरावास फार बरे वाटू लागले पागोटेवाल्या मराठयांपेक्षा टोपीवाले इंग्रज हेच खरे आपले मित्र आहेत. असे त्याचा समज झाला होता. त्या वेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट कर्नल क्लोज बाजीरावाशी अत्यंत प्रेमाने वागत असे.

०२. पुढे १८११ मध्ये कर्नल क्लोजच्या जागी आलेल्या एल्फिन्स्टनने बाजीरावाच्या जहागीरदारांविरुध्द असलेल्या भूमिकेला विरोध केला. एवढेच नव्हे, तर दक्षिणेतील जहागीरदारांना संरक्षण देण्याचे ठरविले त्यामूळे बाजीराव व एल्फिन्स्टन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.

०३. बाजीराव आणि इंग्रजाचे संबंध बिघडण्यास १८१४ सालची आणखी एक घटना कारणीभूत झाली बडोद्याच्या गायकवाडाकडे पेशव्याच्या खंडणीची जवळजवळ तीन कोटी रुपयांची बाकी थकलेली होती. त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी फत्तेसिंग गायकवाडने इंग्रजांच्या संरक्षणाखाली गंगाधरशास्त्री पटवर्धन नावाच्या वकिलास पुण्यात पाठवले.
०४. खंडणीबाबत बोलणी करणे हा बाजीरावाचा दुय्यम हेतु होता. बडोद्याच्या गायकवाडावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी या निमित्ताने बाजीरावाने साधली होती. ही गोष्ट एल्फिन्स्टनच्या लक्षात येताच त्याने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

०५. बाजीरावाने आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी त्रिंबकजी डेंगळे यांची नेमणूक केली होती. ही बोलणी असफल होण्याची चिन्हे दिसत असतानाच २० जूलै १८१५ रोजी गंगाधरशास्त्री पटवर्धनाचा पंढरपुर येथे भजनदास चौकात खून झाला.

०६. एल्फिन्स्टनने या खुनाबाबत त्रिंबकजीस कैद करुन इंग्रजांच्या ताब्यात दिले. इंग्रजांनी त्रिबंकजीस ठाण्याच्या तुरुंगात टाकले. या घटनेमुळे इंग्रजांचा राग येऊन बाजीरावाने अंतस्थपणे इंग्रजाविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली.

०७. इंग्रजांनी त्रिंबकजीस ठाण्याच्या तुरुंगात ठेवले होते. १२ सप्टेंबर १८१६ रोजी तो चलाखीने तुरुंगातून निसटला व खानदेशात जाऊन त्याने इंग्रजांविरुद्ध कारवाया सुरु केल्या. इंग्रजांनी त्रिंबकजीला पकडून आपल्या स्वाधीन करावे असा तगादा पेशव्यांकडे लावला. त्रिंबकजीला स्वाधीन न केल्यास संबंध बिघडतील अशी धमकीही दिली.
०८. पण दुसरा बाजीराव बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे त्याचाच हात त्रिंबकजीच्या कारस्थानामागे असावा असा एल्फिन्स्टनला संशय आला. त्याने गव्हर्नर जनरलच्या परवानगीने बाजीरावावर अधिक नियंत्रण प्रस्थापित करण्याचे ठरविले. ७ में १८१७ आणि त्यानंतर १३ जून १८१७ रोजी बाजीरावाकडून सक्तीने तह करुन घेतला. हाच पुण्याचा तह होय.
०९. या तहानुसार बाजीरावने पेशवेपद सोडावे. अहमदनगरचा किल्ला, नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेश, बुंदेलखंड, माळवा हे प्रदेश व उत्तर भारतातील आपले अधिकार पेशव्यांनी सोडून द्यावेत. त्रिंबकजीस गंगाधरशास्त्रीचा खुनी म्हणून जाहीर करावे आणि त्याला पकडून इंग्रजांच्या हवाली करावे.
१०. परराजांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय संबंध ठेऊ नये. परराज्यातील आपले वकील परत बोलावून घ्यावेत. ३४ लाख रु देऊन पेशव्यांच्या पदरी असलेली तैनाती फौजेची संख्या वाढवावी. गायकवाडावरील थकबाकी रद्द करावी. सिंहगड, रायगड व पुरंदर किल्ले इंग्रजांना द्यावे. अशा अपमानकारक अटी बाजीराव समोर ठेवल्या गेल्या.
११. यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चौथे इंग्रज मराठा युद्ध झाले. दुसऱ्या बाजीरावने होळकर, शिंदे व अन्य मराठा सरदारांच्या मदतीने परत एकदा इंग्रजाविरुद्ध उचल खाल्ली. मराठा सरदारासोबत त्याने एक संयुक्त फळी तयार केली. त्यासाठी पेंढारी व पठाण यांच्यासोबतही त्याने वाटाघाटी केल्या. पण एक भक्कम फळी उभारण्यात त्याला यश आले नाही.
१२. यावेळी पेशव्याचा सेनापती बापू गोखले होता. पेशव्याबरोबर युध्द चालू असताना र्लॉड हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलने शिंद्यांवर नवा तह लादला. होळकरांचा महीदपूरच्या लढाईत आणि भोसल्यांचा सिताबर्डीच्या लढाईत पराभव करुन हेस्टिग्जाने बाजीरावाला एकाकी पाडले.
१३. बाजीरावने युद्ध करण्याचा बेत ठरवून, दुसऱ्या दिवशी जाणून बुजून इंग्रज रेसिडेंटचा अपमान केला. बापू गोखले याने ५ नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रज रेसिडेन्सीवर हल्ला करुन इंग्रजाविरुध्द युध्द पुकारले. गवर्नरला ही गोष्ट कळताच त्याने हल्ल्याची परवानगी दिली. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी एल्फिन्सटन व स्मिथ याने खडकी व येरवडा येथे मराठा फौजेचा पराभव केला.
१४. बाळाजी पंत नातूसारखे अनेक लोक इंग्रजांना सामील झाले. पुणे शहर इंग्रजांनी ताब्यात घेतल्यावर याच बाळाजीपंताने १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाडयावर इंग्रजाचे युनियन जॅक हे निशाण लावले. स्वत: बाजीराव यात जीव वाचविण्यासाठी पुरंदर सिंहगड माहूली अशा किल्ल्यांवरून पळत होता. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्यावर युनियन जैक फडकला.
१५. बाजीराव पुरंदरहून पंढरपूर येथे गेला. तेथे सेनापती बापू गोखले, छत्रपती प्रतापसिंह भोसले त्यास येउन मिळाले. स्वतः बाजीराव १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव येथे व १९ फेब्रुवारी १८१८ रोजी आष्टी या ठिकाणी लढाई हरला. १९ फेब्रुवारी १८१८ रोजी जनरल स्मिथ आणि बापू गोखले यांच्यात पंढरपुरजवळ आष्टी येथे घनघोर लढाई होऊन त्यात बापू गोखले मारला गेला.

१६. शिंदे , होळकर, भोसले यांची मदत मिळेल म्हणून बाजीराव उत्तरेकडे गेला होता. पण त्यापूर्वीच इंग्रजांनी त्या सर्वांचा पराभव केला होता.१८११ मध्ये यशवंतराव होळकर मरण पावला. त्यानंतर त्याची बायको तुळसाबाई ही संस्थानचा कारभार पाहत असे. बाजीरावाचा पाठलाग करीत इंग्रजांचे सैन्य उत्तरेकडे गेले होते.

१७. बाजीरावाच्या साहाय्यासाठी तुळसाबाईने सैन्य धाडले. परंतु तिच्या राज्यातील गोंधळामुळे तिच्याच सैनिकांनी तिला ठार मारले. इंग्रजांनी महिदपूरच्या लढाईत होळकरांचा पराभव केला. त्यानंतर दुसरा मल्हारराव होळकर याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला.

१८. १८१६ मध्ये रघुजी भोसले वारल्यावर त्याचा मुलगा परसोजी गादीवर आला. तो मेल्यावर त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब याने वारसाहक्कासाठी इंग्रजांशी तह केला. १८१८ मध्ये इंग्रजांनी त्यास नामधारी राजा केले.

१९. उत्तरेकडे पळून जात असताना नर्मदेच्या परिसरात धुळकोट जवळ इंग्रजानी बाजीरावला घेरले. अखेर ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशवा सर जॉन माल्कमला शरण गेला.बाजीरावची कानपूर जवळ बह्मवर्त उर्फ बिटूर येथे वार्षिक ८ लाख रुपये पेन्शनवर रवानगी झाली. २८ जानेवारी १८५१ रोजी त्याचा मृत्यू झाला.

२०. छत्रपती इंग्रजांच्या स्वाधीन झाले. छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना साताऱ्यालगत काही भाग देऊन एक लहानसे राज्य त्यांना बहाल केले. पश्चिम भारताचा प्रचंड मोठा भूप्रदेश इंग्रजांच्या प्रत्यक्ष सत्तेखाली आला. मराठी साम्राज्य इंग्रजी राज्यात विलीन झाले. चौथ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी विजय मिळवून मराठी सत्ता मुळापासून उखडून काढली.

२१. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर इंग्रजांनी भारतातील मराठ्यांची प्रबळ सत्ता नामशेष केली. १८१५ मध्ये पेशव्यांच्या राज्याचे एकूण उत्पन्न ९७ लक्ष होते, त्यांतील २३ लाखांचा मुलूख सातारच्या छत्रपतींकडे होता. बाजीरावाला आठ लाखांची पेन्शन दिल्यानंतर इंग्रजांना बाकी उत्पन्नाचा प्रदेश मिळाला.

२२. अनेक वर्षे शत्रुत्व करणारी एक सत्ता नामशेष केल्यानंतर इंग्रजांना इतर ठिकाणी राज्यविस्तार करण्यास सोपे गेले. मिरजेचे पटवर्धन, भोरचे पंतसचिव, औंधचे पंतप्रतिनिधी, फलटणचे निंबाळकर, जतचे पवार व अक्कलकोटचे भोसले हे सातारच्या छत्रपतींच्या सत्तेखाली ती गादी खालसा होईपर्यंत राहिले.

मराठेशाही नंतरचा काळ

०१. मुंबई बेटापुरती मर्यादित असलेली इंग्रजी सत्ता आकस्मित एका मोठ्या इलाक्याच्या स्वरुपात बदलली. या विस्तीर्ण प्रदेशाची व्यवस्था लावण्याचे काम माउंट स्टूअर्ट एलफिन्सटन याने नमुनेदार पद्धतीने केले.

०२. उदारमतवादी धोरण ठेऊन त्याने न्याय, शिक्षण व प्रशासन या विषयांत रस घेतला आणि सुरवातीच्या काळात तरी इंग्रजी राजवटीबद्दल लोकमानसात प्रीती उत्पन्न झाली.

इंग्रज मराठा युद्धे – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंग्रज मराठा युद्धे – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.