पूर्वपीठिका

०१. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेची पूर्तता केली. नंतर १७१४ साली पेशवा बालाजी विश्वनाथ याने मुगल दरबारच्या हुसेन अली सय्यद्शी नवा  करार करण्यात यश मिळविले. बालाजी विश्वनाथ नंतर (१७२०) बाजीराव पेशवे यांची कारकीर्द मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी प्रसिद्ध आहे.
०२. अहमदशाह अब्दालीने १७५९ मध्ये पंजाब जिंकून घेतला व दिल्लीवर चाल केली. अब्दाली व मराठे यांच्यात पानिपतची निर्णायक लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी झाली. यात मराठ्यांचा अत्यंत शोचनीय असा पराभव झाला. त्यानंतर १६ व्या वर्षी पेशवेपद ग्रहण केलेल्या माधव रावने अवघ्या ११ वर्षात (१७६१-१७७२) मराठी सत्तेची विस्कटलेली घडी नीट बसवली. हैदर विरुद्ध इंग्रजांशी मैत्री माधव रावला मुळीच मान्य नव्हती.

०३. पानिपतच्या लढाईत पराभूत होऊनसुद्धा मराठ्यांचे उत्तर भारतातील स्थान अबाधितच राहिले. मात्र या पराभवामुळे मराठ्यांना पूर्व भारत विशेषतः बंगालकडे आपला जम बसवता आला नाही. त्याचा फायदा क्‍लाइव्ह व हेस्टिंग्ज अशा धूर्त इंग्रज अधिकाऱ्यांनी बरोबर उठवला.

०४. ज्याच्या ताब्यात दिल्ली त्याच्या हातात भारताच्या सत्तेची किल्ली, हे सूत्र मराठे आणि इंग्रज या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी बरोबर ओळखले होते व त्याला धरूनच ते राजकारण करीत होते. अर्थात इंग्रज परकीय असल्यामुळे त्यांचा या बाबतीतील दृष्टिकोन केवळ नफानुकसानीच्या हिशेबाचा होता. त्याचा फायदा त्यांना मिळाला. उलट मराठे हे एतद्देशीय जबाबदार राज्यकर्ते असल्यामुळे त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागे व त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागला.

०५. प्लासी आणि बक्सार येथील लढाया जिंकून आणि बंगाल व अयोध्या येथील नवाबांना नामोहरम करून इंग्रजांनी दिल्लीला शह देण्याची तयारी केली. पण प्रत्यक्ष दिल्लीवर कब्जा करण्याइतपत आपले सामर्थ्य नसल्याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी मोगल बादशहा शहाआलम यास ताब्यात घेऊन पटणा, अयोध्या करीत शेवटी अलाहाबादेत स्थानापन्न केला.

०६. या वेळी राजधानी दिल्लीचा ताबा नजीबखानाचा मुलगा झाबेतखान याच्याकडे होता. मराठ्यांनी रोहिल्यांचा प्रदेश जिंकून झाबेतला शह दिला व ७ फेब्रुवारी १७७१ या दिवशी दिल्ली शहरात मुगल बादशाह शहाआलमच्या सत्तेची द्वाही फिरवली. झाबेत दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ताबा द्यायला तयार नव्हता. तेव्हा महादजीने तोफांचा भडिमार करून त्याला नमवले व १० फेब्रुवारीला किल्ल्यावर कब्जा केला.

०७. मराठ्यांचे झेंडे शहरात व किल्ल्यावर फडकले. आता मराठ्यांशी करार करण्याखेरीज बादशहाला गत्यंतर नव्हते. या करारामुळे बादशहालाही इंग्रजांकडून मोकळे होऊन दिल्लीला परतणे शक्य झाले. २५ डिसेंबर १७७१ रोजी बादशहा राजधानीत प्रवेशला व पुन्हा एकदा आपल्या तख्तावर बसला.

०८. वस्तुतः आपल्याला आपल्या राजधानीत घेऊन चला, असा लकडा बादशहाने जवळपास दशकभर इंग्रजांकडे लावला होता. पण इंग्रजांना ते जमले नव्हते. मराठ्यांनी ते करून दाखविल्यामुळे त्यांचा दरारा आपसूकच प्रस्थापित झाला.

०९. माधवराव पेशव्याने याबाबत मराठा सरदारांचे अभिनंदन करताना म्हटले, “इंग्रजांस जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळवला.’ “इंग्रजांचा प्रवेश दिल्लीत होऊ नये. प्रवेश जालिया उखलणार नाही,’ असा इशारा द्यायलाही पेशवा विसरला नाही.

१०. इंग्रजांना भारतात खरे आव्हान म्हैसूर, निजाम आणि मराठे यांच्या रूपाने दक्षिण भारतातच होते. म्हैसूर व हैद्राबाद यांनी तैनाती फौज स्वीकारल्याने आता इंग्रजांना खरा धोका मराठ्यांपासूनच होता. इंग्रजांना मराठी सत्ता कमकुवत करण्याची संधी माधवराव पेशव्यांच्या मृत्यूमुळे १७७२ साली मिळाली.

११. १७७२ साली माधवराव पेशव्यांच्या क्षयरोगाने झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे लहान भाऊ नारायण राव पेशवा बनले. परंतु ३० ऑगस्ट १७७३ रोजी नारायणराव पेशव्यांचा कारस्थानाने खून करण्यात आला. नारायण राव पेशव्यांच्या वधास कारणीभूत असलेला राघोबा १७७३ साली पेशवा बनला. त्याला तत्काळ निजाम आणि हैदर अली यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिमेवर निघावे लागले. त्याच्या पश्चात पुण्यामध्ये त्याला झुगारून देण्याचा कट सुरु झाला. नाना फडणीस हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता.

१२. मृत नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई त्या समयी गरोदर होती. म्हणून तिचे रक्षण करण्यासाठी नाना फडणीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण बारा जणांचा एक गट कार्यान्वित झाला. हेच ते इतिहासप्रसिद्ध बारभाई होय. गंगाबाईना पुरंदर किल्ल्यावर हलवले गेले. गंगाबाईला झालेल्या मुलाला सवाई माधवरावला पेशवाईची वस्त्रे देऊन त्याच्या नावाने बारभाईनीच तात्पुरता राज्य कारभार पहावा असे ठरले. तर पेशव्यांच्या वधामुळे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

१३. अखेर रघुनाथ रावांनी  इंग्रजांकडून मदत मिळवण्यासाठी पुण्यातील वकील माष्टीनशी बोलणी केली. पण रघुनाथरावांच्या पैशांच्या मागणीवरून आणि इंग्रजांच्या मुलुखाच्या आणि महसुलाच्या मागण्यांवरून करार पूर्ण होण्यात अडचणी येत होत्या.

१४. अखेर रघुनाथरावांनी गुजराथेतून आपल्या मित्रफौजेसोबत नर्मदा ओलांडून मराठ्यांवर चढाई केली. पण हरिपंत तात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांचा पराभव केला. कसेबसे तुटपुंज्या सैन्यासह रघुनाथराव सुरतेच्या इंग्रजांकडे पोहोचले.

१५. या गोंधळात इंग्रजांनी ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला. उत्तर म्हणून बारभाईनि मुंबईला बाहेरून होणारा मालाचा पुरवठा बंद पाडला. दुसरीकडे बारभाईच्या सेनेशी लढाई होऊन राघोबा पराभूत झाला. तो सुरतला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. तेथे ६ मार्च १७७५ रोजी त्याने इंग्रजाशी ‘सुरत तह’ केला.

१६. त्या  तहानुसार दरमहा १० लाख रुपयांच्या मोबदल्यात इंग्रजांनी राघोबाला संरक्षणासाठी २५०० सैनिकांची इंग्रज फौज दिली. त्याबदल्यात राघोबाने इंग्रजांना सालसेत, ठाणे, साष्टी, वसई, जम्बुसार आणि ओलपाड हे प्रदेश देण्याचे मान्य केले. सुरत व भडोचच्या करवसुलीपैकी काही उत्पन्न इंग्रजांना मिळावा. राघोबाने यापुढे कोणाशीही करार करताना इंग्रजांना सोबत घ्यावे असे बंधन घालण्यात आले.

पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७५-१७८२)

०१. बारभाईनि इंग्रजांना विरोध केला व यातूनच पहिला इंग्रज मराठा युध्दाचा प्रारंभ झाला. सुरतेच्या तहानुसार इंग्रज फौजेने २८ सप्टेंबर १७७५ रोजी आक्रमण केले व आरासच्या मैदानात मराठी फौजेचा पराभव केला.

०२. नाना फडणीसांनी याविरुद्ध कलकत्याच्या कंपनीला तक्रार केली. कलकत्त्याने सुरतेच्या कराराला नामंजूर करत आपला स्वतःचा वकील आप्टन पुणे दरबारी/पुरंदर वर पाठवला. नाना फडणीसांनी त्याचे खास जंगी स्वागत केले. दरम्यान या कारवाईसाठी गवर्नर जनरलची परवानगी न घेतल्याने इंग्रज सेनानी कीटिंग यास युद्ध बंद करण्याचे कळविण्यात आले. शेवटी १ मार्च १७७६ रोजी दोन्ही पक्षात पुरंदर येथे तह झाला.

०३. पुरंदर तहानुसार दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी कारवाया थांबवाव्यात, इंग्रजांनी रघुनाथास पेशवेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू नये. रघुनाथराववर केलेल्या खर्चापोटी मराठ्यांनी इंग्रजांना १२ लाख रुपये द्यावेत, रघुनाथरावास वार्षिक ३ लाख रुपये पेन्शन देऊन त्याने राजकारणात भाग न घेता गंगातीरी विश्रांती घ्यावी. यापूर्वीचा सुरतचा तह रद्द समजण्यात यावा. पण साष्टी, ठाणे व गुजरातमधील मराठ्यांचा इंग्रजांनी जिंकलेला प्रदेश इंग्रजाकडेच राहावा असे ठरले.

०४. मुंबईच्या गवर्नरला पुरंदरचा तह मान्य नव्हता. म्हणून तो तह न स्वीकारण्याची त्याने गवर्नर जनरलला विनंती केली. शिवाय रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयास होता. मुंबई विभागाने साहजिकच हा करार मानायला नकार देत रघुनाथराव व पेशव्यांच्या खुनाचा आरोप असलेल्यांना हवाली केले नाही आणि प्रदेश परत देण्यासही टाळाटाळ केली. कलकत्ता कंपनीनेही प्रतिसादात टाळाटाळ केली

०५. अखेर नाना फडणीसानी कलकत्ताला जरब म्हणून नाना फडणीसाने फ्रेंच अधिकारी सेंट लूबिन याचे साहाय्य घेण्यासाठी फ्रेंचांना पश्चिम किनाऱ्यावर एक बंदर द्यावयाचे कबूल केले. फ्रेंचाना सुरतेत जागा दिली आणि त्यांचे पुण्यात जंगी स्वागत केले. यावर कलकत्ता कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट, उत्तर भारतातून आपले सैन्य मदतीसाठी पाठवले. यात अयोध्येच्या नबाबाकडून मिळालेली कंदाहारी फौजही होती.

०६. १७७८ मध्ये रघुनाथरावाला घेऊन कर्नल इगर्टन पुण्यावर चालून आला. मुंबईकरांच्या मदतीसाठी वॉरन हेस्टिंग्जने बंगालमधून सहा पलटणी धाडल्या कर्नल इगर्टनची प्रकृती बिघडल्यामुळे कर्नल कॉकबर्नकडे १७७९ मध्ये सैन्याचे नेतृत्व आले या फौजेवर भीमराव पानसे चालून गेला आणि महादजी शिंदे व हरिपंत फडके त्याला सैन्यासह मिळाले

०७. इंग्रज फौजांनी पुण्यावर हल्ला केला. १७७९ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध अधिकृत युद्ध पुकारले. पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते.

०८. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले.

०९. का‍र्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले.

१०. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.

११. यादरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत.

१२. ३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. कर्नल की देखील ठार झाला. मराठ्यांकडे भिवराव पानशे यांचा तोफखाना होता.

१३. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी ९ जानेवारी १७७९ रोजी तळेगावाकडे वळली , पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला.

१४. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला.

१५. इंग्रजांच्या वतीने फार्मर महादजींशी बोलणी करायला आला. १६ जानेवारी १७७९ रोजी इंग्रजांना नामुष्की आणणाऱ्या वडगावचा तह स्वीकारावा लागला. या तहात रघुनाथराव याला पेशव्यांच्या हवाली करावे. इंग्रजांनी घेतलेले ठाणे, साष्टी व गुजरातमधील प्रदेश मराठ्यांना परत द्यावा.  बंगालहून चालून येणाऱ्या इंग्लिश तुकडीला परत पाठवावे. करार पूर्ण होईपर्यंत इंग्रजांची दोन माणसे मराठ्यांकडे ओलिस ठेवावी लागतील. अशा अटी होत्या.

१६. राघोबाचा विश्वासघात करून इंग्रजांनी त्याला महादजीच्या स्वाधीन केले. त्याने झाशी येथे स्नानसंध्या करून राहावे असे ठरले. त्याप्रमाणे व्यवस्थाही झाली. परंतु पुन्हा एकदा सगळ्यांना चकवा देऊन त्याने पळ काढून पूर्वीचे उद्योग सुरू केलेच.

१७. हेस्टिंग्जने मुंबईकरांना मदत करण्यासाठी पाठविलेला सेनानी गॉडर्ड वेळेवर पोचला नव्हता. तो आता सुरतेस होता. राघोबाने त्याचा आश्रय घेऊन कारस्थाने सुरू केली.
१८. इकडे हेस्टिंग्जनेही वडगावला झालेला तह आम्हाला न विचारता केला गेल्यामुळे बंधनकारक नसल्याचा पवित्रा घेतला, तेव्हा इंग्रज मराठा युद्ध संपुष्टात आले नसल्याचेच जाहीर झाले. गॉडर्डमुळे हे युद्ध गुजरात, मध्य प्रांत या भागातही पसरले.
१९. दरम्यान, नाना फडणविसाने मराठे, निजाम, हैदर आणि नागपूरकर भोसले यांना एकत्र करून इंग्रजांना शह देण्यासाठी चौकडीचे कारस्थान रचले होते. पण भोसल्यांनी कच खाल्ल्यामुळे ते फसले. गवर्नर जनरल वॉरेन हेस्टींग्ज ने या चौघांत फुट पाडली.

२०. उत्तर भारतात सेनापती पॉपमच्या फौजेने शिंद्यांच्या मुलखात शिरुन ग्वाल्हेर घेतले. माळव्यावर इंग्रजांचा हल्ला होताच महादजीने त्यांना मागे रेटले. सर्व बाजूंनी इंग्रजांवर हल्ला करण्याच्या योजनेत निजाम मात्र स्वस्थ बसला.वॉरन हेस्टिंग्जने फत्तेसिंग भोसल्यास सोळा लाख रुपये देऊन आपल्याकडे वळवून घेतले.

२१. यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे फक्त हैदर अली व महादजी यांनी चढाई केली. मद्रासच्या बाजूस हैदरने इंग्रजांचा पराभव केला महादजीने सीप्री येथे कर्नल मूटचा पराभव केला शेवटी इंग्रजांनी मराठ्यांशी मिळते घेण्याचे ठरविले.
२२. वडगावच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी गॉडर्ड मुंबईहून बोरघाटात उतरला. फेब्रुवारी ते एप्रिलच्या मध्यापर्यंत (१७८१) तो खंडाळ्यास होता. त्याची रसद तोडून त्याला जेरीस आणण्याचे काम परशुरामभाऊ पटवर्धनांसारख्या धुरंधर सेनानीने पार पाडले. “हे शिवशाही राज्य आहे’ अशी ग्वाही भाऊने दिली.
२३. हरिपंत फडक्‍यांचे हल्ले सुरू झाले व तिकडून कोकणातून तुकोजी होळकरांनी चालून घेतले. तिन्ही बाजूंनी घेरलेल्या गॉडर्डला परत फिरायची इच्छा झाली. या लढाईत इंग्रजांचे भारी नुकसान होऊन त्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईची बातमी नाना फडणविसाने सातारकर छत्रपतीस सविस्तर लिहून पाठवली आहे.
२४. महादजीने मुत्सद्दीपणा स्वीकारून इंग्रजांशी मिळते जुळते धोरण अवलंबिले. वॉरेन हेस्टींग्ज यालाही महादजीशी युध्द चालू ठेवण्याची इच्छा नव्हती. याच सुमारास हैदर अली मरण पावल्यामुळे नाना फडणीसाने शिंद्यांच्या विचारास संमती दिली . शेवटी १७ मे १७८२ रोजी सालबाई (ग्वाल्हेर च्या दक्षिणेस २२० मैल) येथे वॉरेन हेस्टींग्ज व मराठे यांच्यात तह घडून आला.

२५. सालबाईच्या तहानुसार असे ठरले कि,१७७६ च्या पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले साष्टी, भडोच सर्व प्रांत पेशव्यांना परत करण्यात यावेत. सवाई माधवराव यास पेशवा म्हणून इंग्रजांनी मान्यता द्यावी. बडोद्याच्या फत्तेसिंह गायकवाडाचे स्वातंत्र्य इंग्रजांनी मान्य करावे. इंग्रजांनी भडोच घेण्याचा मोबदला म्हणून ३ लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. इंग्रजांना पूर्वीप्रमाणे व्यापारी सवलती चालू राहतील. दोन्ही पक्ष तह पाळतील याची हमी महादजी शिंदे घेतील.

२६. मराठ्यांनी इंग्रजांखेरीज इतर पाश्चात्त्यांना आश्रय देऊ नये,शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावेराघोबाला इंग्रजांनी कोणत्याही प्रकारची मदत देऊ नये. त्याने पेशवे देतील ते मासिक २५००० रुपयांचे पेन्शन घेऊन कोपरगाव येथे स्वस्थ बसावे. तरीही शेवटी तर राघोबाने थेट इंग्लंडमध्ये आपले दोन वकील पाठवून इंग्लंडच्या राजाकडे मदतीची याचना केली. प्रसिद्ध संसदपटू एडमंड बर्क याने या वकिलांची चांगली बडदास्त ठेवली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

इंग्रज मराठा युद्धे – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंग्रज मराठा युद्धे – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.