०१. भारतीय लष्कर आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्यात लष्करी वेतन खाते उघडण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे त्यामुळे लष्करी खात्यातील लोकांना वैयक्तिक अपघातानंतरदेखील विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. जवान, निवृत्तिवेतनधारक व त्यांच्या कुटूबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

०२. या कराराचे वैशिष्ठ्ये म्हणजे वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची रक्कम दोन लाख आणि पाच लाख करण्यात आली आहे. आधी ही रक्कम ५०००० आणि दोन लाख होती. तसेच लष्करी ऑपरेशनच्या वेळी जवानांना मृत्यू आल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.


०३. पुण्यातील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज जाहीर केले आहे.



०४. आगामी तीन वर्षांसाठी या संस्थेच्या 27 जणांच्या कार्यकारिणीचीही फेररचना करण्यात आली असून, यामध्ये विख्यात निर्माता-दिग्दर्शक राजू हिरानी व अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी, अनघा घैसास आदी मराठी नावांचाही समावेश करण्यात आला आहे.


०५. सरकारने परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथील केले असून अनिवासी भारतीय आणि परदेशातील भारतीय नागरिकांसाठी हे नियम शिथील करण्यात आले आहेत. यासंदर्भातील निर्णय आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या आर्थिक विभागाच्या समितीने घेतला आहे.


०६. गुंतवणुकीसंदर्भातील एफडीआय धोरणात एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय यांना सहज गुंतवणूक करता यावी म्हणून सुधारणा करण्यात आली आहे.परदेशी गुंतवणूक भारतात वाढावी या उद्देशाने ही सुधारणा करण्यात आली आहे. 


०७. बहुप्रतीक्षित दहा वर्षे मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांच्या विक्रीची प्रक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी पूर्ण केली. केंद्र सरकारच्या वतीने दर शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँक रोखे विक्री करून कर्ज उभारणी करीत असते.या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेने या रोख्याद्वारे ९,००० कोटी उभारण्याचे जाहीर केले होते. 


०८. प्रत्यक्षात ३३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांना मागणी नोंदविली गेली. परिणामी या रोख्यांवर देय असलेल्या व्याजाचा दर ७.७२ टक्के जाहीर करण्यात आला.एप्रिल महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने दहा वर्षे मुदतीचे रोखे विकणार असल्याचे जाहीर केल्यापासून या लिलावाबाबत बँका, विमा कंपन्या म्युच्युअल फंडांमध्ये उत्सुकता होती.


०९. या आधी २०२४ मध्ये मुदतपूर्ती असलेला व ८.४० टक्के दराने व्याज देय असलेला रोखा दहा वर्षे मुदतीचा रोखा समजला जात होता. आता नवीन रोखा जारी केल्याने २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेला व ७.७२ टक्के व्याज देय असलेला रोखा दहा वर्षे मुदतीचा समजला जाईल.मागील दोन महिन्यांत जगभरात वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांत वाढ झाली.


१०. केंद्रीय मंत्रिमंडळाने पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल ( पीएसएलव्ही) मोहीम सुरु ठेवण्याला मंजुरी दिली आहे. भविष्यात पीएसएलव्ही-सी-३६ ते पीएसएलव्ही-सी५० असे १५ उपग्रह प्रक्षेपित करणे नियोजित आहेत. ते सुरु ठेवण्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल ३ हजार ९० कोटींचा खर्च येणार आहे.


११. पृथ्वीचे परीक्षण, दूसंचार, अंतराळ विज्ञान आणि इतर व्यावसायीक प्रक्षेपण सेवा करारांसाठी उपग्रह प्रक्षेपण क्षमता समर्थ करण्याचा उद्देश सरकारसमोर आहे. वर्षाला चार ते पाच उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. २०१७-२०२० दरम्यान १५ उड्डाण नियोजित आहेत. पीएसएलव्हीला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. यामुळे भारत उपग्रहांचे प्रक्षेपण स्वतः करु लागला. पीएसएलव्हीने आतापर्यंत २७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.


१२. नासाने २.२५ कोटी डॉलर्सचे अवकाशातील घरकुलाचे डिझायनिंग करणा-याला इनाम जाहीर केले आहे. या आवासाचे थ्री डी प्रिंटेड डिझाईन नासाला सादर करावे लागेल. अवकाशातील संशोधनासाठी योग्य असे हे घर असावे. अवकाशातील परिस्थितीस अनुकूल असे घटक यासाठी वापरावे लागतील हेच यातील मोठे आव्हान आहे. 


१३. नासाने खुल्या पद्धतीने हे आव्हान अवकाश अभ्यासकांसमोर ठेवले आहे. शिवाय बांधणीच्या तंत्रावरही मूलभूत संशोधन करणे गरजेचे आहेयात डिझाइनिंगला महत्त्व असेल. २७ सप्टेंबर रोजी यातील पहिल्या ३० डिझाईनची निवड करण्यात येईल.न्यूयॉर्क येथे होणा-या वल्र्ड मार्केट फेअरमध्ये पहिल्या ३० डिझायनरला प्रत्येकी ५० हजार डॉलर्सचा पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात बांधकाम साहित्यावर लक्ष देण्यात येईल.


१४. चेन्नईजवळ भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान बेपत्ता झाले आहे. 


१५. केंद्रीय दक्षता आयुक्त(सीव्हीसी) पदावर प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष के.व्ही. चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. चौधरी हे भारतीय महसूल सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. काळ्या पैशाच्या तपासासाठी  सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्य समितीत ते सल्लागार म्हणून काम करत आहेत. गेल्या वर्षी प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळआच्या अध्यक्षपदावरुन ते निवृत्त झाले.


१६. मुख्य माहिती आयुक्त(सीआयसी) पदी विजय शर्मा यांची निवड झाली आहे. माजी पर्यावरण सचिव असलेले शर्मा हे २०१२ पासून माहिती आयुक्तपदावर कार्यरत आहेत.


१७. राज्य सरकारांच्या अखत्यारित असलेले रेल्वे लोहमार्ग पोलीस (जीआरपी) खाते  केंद्रीय रेल्वे खात्याकडे हस्तांतरित करावे अशी मागणी  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. जीआरपी सध्या राज्य सरकारांच्या अखत्यारित आहे. सध्या जीआरपींचा ५० टक्के पगार हा रेल्वेकडून दिला जातो.


१८. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने हरियाणातील पानीपत रिफायनरीची क्षमता वाढवण्यासाठी १५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.  यामुळे रिफायनरीची क्षमता २०.२ दशलक्षावरून ३४ दशलक्ष टनावर जाणार आहे. हे काम २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. आयओसीच्या देशात आठ रिफायनरी आहेत. काही दिवसांपूर्वीच ओदिशातील पारादीप येथे नववी रिफायनरी सुरू झाली आहे. कंपनीच्या आठ रिफायनरीची क्षमता ५४.२ दशलक्ष टन आहे.


१९. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील बडी स्वीडिश कंपनी व्होल्वोने कोणत्या आयशर मोटर्सतून आपला हिस्सा विकून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मे २००८ मध्ये व्होल्वो आणि आयशर मोटर्सने संयुक्त उद्यम करार करत व्हीई कमर्शियल व्हेईकल या कंपनीची सहभागीदारीत स्थापना केली होती. 

२०. व्होल्वो ग्रुपकडे भारतीय वाहन उत्पादक आयशर मोटर्सचे १०,०५,६१० शेअर्स होते. ज्याचे मूल्य अंदाजे १६९५ कोटी रुपये एवढे होते. आयशर मोटर्समध्ये असलेला ३.७ टक्के हिस्सा विक्री करून कंपनीने १६९५ कोटी रुपये उभारले.


२१. महिला फुटबॉल विश्वचषक २०१५ कॅनडा येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महिलांच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. मागच्या विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.




२२. वुहान येथे सुरु असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णकामगिरी करणारा गोळाफेकापटू इंदरजीत सिंग आहे.  गोळाफेकमध्ये इंदरजीतने २०.४१ मीटरचे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मंगळूरु येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत इंदरजीतने सुवर्णपदक पटकावत २०१६ मधील रिओ ऑलिपिंकचे तिकीट निश्चित केले होते. तर २०१४ मध्ये दक्षिण कोरियातील इंचेऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत इंदरजीतने कांस्यपदक पटकावले होते.


२३. भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच प्राणी कल्याणासाठी पेटा (People for the Ethical Treatment of Animals)  संस्थेबरोबर काम करणार आहे. सानिया पेटाच्या जाहीरातीतून बेघर श्वान, मांजरींना दत्तक घेण्याचा संदेश देणार आहे. मागच्यावर्षी सानियाला पद्मश्री आणि अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्राने सानियाची दक्षिण आशियाची महिला सदिच्छा दूत म्हणूनही नियुक्ती केली आहे.


२४. घोटाळयाचा आरोप झालेले भारतीय ऑलिंपिक संघटनेचे माजी सचिव ललित भानोत यांची पुढच्या चारवर्षांपासाठी आशियाई अॅथलेटिक्स  संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भानोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. भारतीय ऑलिंपिक संघटनेमध्ये ते सचिव होते तसेच एएफआयचे ते दशकभर सचिव होते.सध्या ते एएफआयच्या नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. 


२५. कतारच्या डाहलान अल हमाद यांची दुस-यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. वुहानमध्ये होणा-या एशियन चॅम्पियनशिपच्या पूर्वसंध्येला भानोत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. भानोत पाच उपाध्यक्षांपैकी एक आहेत. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने त्यांच्या नावाची शिफारस केली होती.