लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग १

जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र)
मृत्यू : १ ऑगस्ट १९२० (मुंबई, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन

०१. केशव उर्फ बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्‍नागिरीमधील एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.
०२. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.
०३. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते शिक्षण खात्यात डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८६६ साली गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. टिळकांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. 
०४. पुण्याला आल्यावर लवकरच १८६६ साली त्यांच्या आई मरण पावल्या आणि लोकमान्य टिळकांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी १९७२ साली त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी १८७१ साली त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला. लग्नानंतर टिळकांनी तापीबाईचे नाव ‘सत्यभामाबाई’ असे ठेवले.

०५. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले.एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली

शैक्षणिक प्रवास

०१. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले.
०२. त्यानंतर १८७६ साली गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. १८७९ साली पुणे विद्यापीठाच्या गवर्नमेंट विधी महाविद्यालयातून टिळकांनी एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. मात्र दोनदा प्रयत्न करूनही टिळकांना एम.ए. परीक्षेत अपयश आले. 
०३. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचन प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेंसर, मिल, बेंथम, व्हॉल्तेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले.
०४. पदवीनंतर टिळकांनी एका खाजगी शाळेत गणिताच्या अध्यापनाचेही कार्य केले. पण सहकाऱ्यासोबत वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी नौकरी सोडली व पत्रकारितेकडे वळाले.

सामाजिक कार्य

०१. १८८४ साली मुंबईचे मलबारी शेठ यांनी सरकारने एक कायदा करून बालविवाहास प्रतिबंध करावा अशी मागणी केली. त्याबरोबरच बारा वर्षापर्यंत लग्न झालेल्या मुलीशीही शरीरसंबंध झाला तर नवऱ्याला कायद्याने शिक्षा व्हावी, असे कलम असलेला कायदा व्हावा अशी मागणी केली. या कलमामुळे मोठा वाद निर्माण झाला. टिळकांनी या वादावर कायदा न करण्याचा, त्याचबरोबर ज्यांना हा कायदा हवा आहे त्यांनी स्वतःहून सुधारणांना बांधून घ्यावे व तसे सरकारला कळवावे असे सांगितले.
०२. या विरोधाला न जुमानता ९ जानेवारी १८९१ रोजी कलकत्त्याच्या वरिष्ठ कायदेमंडळात सर एंड्र्यू स्कोबल यांनी संमती वयाचे बिल दाखल केले. या बिलाविरुद्ध भारतात जोरदार विरोध झाला. प्रत्यक्षात हा विरोध लक्षात घेऊन सरकारने हे बिल स्थगित केले. मात्र टिळक व आगरकर यांच्यातील मतभेद विकोपाला गेले.
०३. डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी पुण्यातील वेताळ पेठेतील पंचहौद मिशनचे प्रमुख रेव्हरंड रिव्हिंगटन यांच्याकरवी पुण्यातील विद्वान आणि समाजकार्याची आवड असणाऱ्या ५०-६० लोकांस व्याख्यानास बोलाविले. व्याख्यानानंतर उपस्थितांसाठी चहापान देण्यात आले. दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन मिशन हाउस मधील कार्यक्रमानंतर चहापान करणारे म्हणून सर्व मंडळींची नावे ‘पुणे-वैभव’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. 
०४. या वृत्ताने पुण्यात खळबळ उडाली. सनातनी पक्षाचे पुढारी सरदार नातू यांनी , ‘साऱ्या मंडळींनी धर्म बुडविला‘ म्हणून शंकराचार्याकडे फिर्याद केली. शंकराचार्यांनी ‘ग्रामण्य कमिशन’ नेमून चौकशी सुरु केली. या प्रकरणात टिळक व रानडे गुंतल्याने त्यास बरेच महत्व आले. कमिशनने त्यांना प्रायश्चित्त घेण्याचा आदेश दिला. दरम्यान टिळकांनी श्रीक्षेत्र कशी येथे जाऊन ‘सर्व प्रायश्चित्त’ घेतल्याचा दाखला मिळविला होता.
०५. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या दीनबंधू पत्रकाने विधवांच्या केशवपनाविरुद्ध मोहीम उघडली होती. आगरकरांनी या मोहिमेचे स्वागत केले. परंतु टिळकांनी आपल्या सामाजिक सुधारणासंबंधीच्या ‘आस्ते कदम’ धोरणाचा पुनरुच्चार करून या मोहिमेला विरोध केला.
०६. १८९० च्या दरम्यान टिळकांचा केसरी व आगरकरांचा सुधारक यांच्यात शारदा सदन प्रकरणावरून परस्परांवर टीकेचा भडीमार सुरु होता.रमाबाई अमेरिकेत गेल्या आणि अमेरिकन मिशनमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेथून परत मुंबईमध्ये अमेरिकन मिशनच्या मदतीने ‘शारदा सदन’ ही संस्था निराश्रित विधवा व इतर स्त्रियांना सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण देण्यासाठी स्थापन केली. या संस्थेत स्त्रियांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे असा एक प्रवाद होता.
०७. ११ ऑगस्ट १८९३ रोजी अचानकपणे मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगा उसळला. या दंग्याचे मूळ सौराष्ट्रात प्रभासपट्टण येथे ताबूत मिरवणुकीत गडबड हा होता. या घटनेवर १५ ऑगस्ट १८९३ रोजी ‘हिंदू मुसलमानांचा दंगा’ या शीर्षकाखाली टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला. आणि या दंग्यात हिंदू आणि मुस्लीम असे दोनच पक्ष नसून सरकार हा तिसरा पक्ष आहे हे स्पष्ट केले.
०८. सरकारी अधिकारी मुस्लिमाचे पक्षपाती असून तेच मुस्लिमांना दंगा करण्यास प्रवृत्त करतात व पाठीशी घालतात. या विषयावर चर्चा करण्यासाठी टिळक, नामजोशी वगैरे मंडळी पुण्यातील एके ठिकाणी जमली. याच बैठकीत मुस्लिमांच्या ताबुतावर बहिष्कार घालण्याची आणि हिंदूंच्या उत्सवाला कोठेतरी वाट काढून देण्यासाठी ‘गणपती उत्सवास सार्वजनिक रूप देण्याची’ कल्पना टिळकांनी सुचविली. १८९४ साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली.
०९. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची दैन्यावस्था झाल्याबद्द्ल १८८३ मध्ये जेम्स डग्लस याने एक लेख लिहून लोकांचे लक्ष वेधले. १८८५ मध्ये गोविंद बाबाजी जोशी यांनी रायगडला प्रत्यक्ष भेट देऊन समाधीवर सविस्तर पुस्तकच लिहिले. १८८६ मध्ये न्या. रानडे यांनी पुण्यात एक जाहीर सभा घेऊन समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला. १८९४ मध्ये करकरिया या पारशी संशोधकाचा अफझलखान वधाविषयी एक निबंध प्रसिद्ध झाला.
१०. यानंतर टिळकांनी शिवजयंती उत्सवाची चळवळ हाती घेतली व ती अगदी वेगाने चालविली.१ ८९५ साली टिळकांनी ‘श्री शिवाजी फंड कमिटी’ ची स्थापना केली. रायगडावरील शिवाजी समाधीची दुरुस्ती करणे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा करणे हि याची कार्ये होती.
११. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून १६ हजार रुपये वर्गणी जमली. २९ डिसेंबर १८९५ रोजी राष्ट्रीय सभेच्या पुण्यातील वार्षिक अधिवेशनात शिवजयंती उत्सवाचे स्वागत नेत्यांनी केले. कुलाबा जिल्ह्याच्या कलेक्टरांनी या उत्सवास परवानगी नाकारली तरी टिळकांनी गवर्नरांना भेटून परवानगी मिळविली. १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर उत्सव धूमधडाक्यात साजरा झाला.
१२. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले.
१३. टिळकांनी केसरीमधून ब्रिटीशांच्या या भूमिकेला विरोध केला. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात, “रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरासगट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.”
१४. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. ब्रिटिश सरकार ‘दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे टिळकांनी सरकारला ठणकावून सांगितले.
१५. टिळक असे पहिले स्वातंत्र्यसेनानी होते ज्यांनी ‘हिंदी‘ राष्ट्रीय भाषा व देवनागरीला राष्ट्रीय लिपी घोषित करावे असे सुचविले होते. टिळकांनी कलकत्ता येथे असे सांगितले होते कि “मला अशी लोकतांत्रिक व्यवस्था हवी आहे कि ज्यात सर्व धर्माचे, जातीचे, वंशाचे लोक समान भागीदार असतील”
१६. टिळकांनी सेनापती खंडेराव दाभाडे दुसरे यांच्यासोबत मिळून “श्री रायगड शिवाजी स्मारक मंडळा”ची स्थापना केली. दाभाडे या मंडळाचे अध्यक्ष बनले.

शैक्षणिक कार्य

०१. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली.
०२. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न,महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्‍ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता.
०३. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
०४. २ जानेवारी १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. टिळकांनी येथे गणित व संस्कृतचे अध्यापन केले. वामन शिवराज आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.
०५. पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले. २५ ऑक्टोबर १८८७ च्या केसरी च्या अंकापासून टिळक केसरीचे संपादक झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा.