राजर्षी शाहू महाराज

जन्म : २६ जून १८७४ (कागल, कोल्हापूर)

राज्यकाल : १८९४ ते १९२२
मृत्यू : ६ मे १९२२ (पन्हाळा लॉज, खेतवाडी, मुंबई) (हृदयविकाराचा झटका)

वैयक्तिक जीवन

०१. शाहू महाराजांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव   (अप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख मंत्री होते.

०२. १७०८ मध्ये स्वतंत्र कोल्हापूर संस्थानाची स्थापना झाली. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

०३. शाहू महाराजांचे शिक्षण त्यांचे शिक्षक कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या देखरेखीखाली राजकुमार कॉलेज, राजकोट (१८८६-१८८९) येथे झाले.  शाहू अल्पवयीन असताना राज्यकारभार सांभाळण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून एक अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी १८८९ ते १८९४ पर्यंत सर स्टूअर्ट फ्रेझर यांच्या हाताखाली शाहुनी प्रशासनाचे धडे गिरविले.

०४. १४ मे १९०२ रोजी राजर्षी शाहू दिल्ली येथे किंग एडवर्ड सातवा आणि राणी अलेक्झांड्रीया यांच्या ध्वजारोहण समारंभाला उपस्थित होते. १९०२ साली केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना मानद एल.एल.डी. (डॉक्टर ऑफ ला) या पदवीने सम्मानित केले. शाहूनी ३ एप्रिल १८९४ रोजी त्याचा प्रजेविषयक जाहीरनामा प्रसिद्ध केला. 

०५. १ एप्रिल १८९१ रोजी शाहूंचा विवाह बडोदा संस्थानातील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्यासोबत झाला. पुढे या दांपत्याला राजाराम दुसरा, राधाबाई (अक्कासाहेब), महाराजकुमार शिवाजी, औबाईसाहेब ही चार अपत्ये झाली.

०६. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी एप्रिल १९१९ साली १३ व्या अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय परिषदेत कानपूर येथे कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. ३० नोव्हेंबर १९११ रोजी दिल्ली येथे राजाने शाहूंना जीसीआय हा किताब दिला. 

०७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू राजांचे वर्णन ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ‘ अशी केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, “शाहुराजा नुसता मराठा नव्हता, नुसता ब्राह्मणेतरही नव्हता, तो नवयुगातील सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरुष होता.”यशवंतराव मोहिते यांनी ‘महाराष्ट्राचे गौतम बुद्ध’ म्हणून तर सयाजीराव गायकवाड यांनी, “माणसातील राजा व राजातील माणूस” असे त्यांचे वर्णन केले आहे. 

०८. २४ सप्टेंबर १९९५ रोजी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी कानपूर विद्यापीठाचे नाव बदलून “छत्रपती श्री शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर” असे केले. २६ जून हा शाहूंचा जन्मदिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी २००१ मध्ये घेतला १७ सप्टेंबर २००९ रोजी शाहूंच्या संसदेच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

सामाजिक कार्य

०१. छत्रपती शाहू गादीवर आले त्या वेळच्या प्रशासनात गोरे, पारशी आणि ब्राह्मण यांचे फार मोठे प्रस्थ होते. १८९४ साली एकूण ७१ दरबारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राह्मण आणि ५२ खाजगी पैकी ४५ ब्राह्मण होते. दिवान बर्वे यांनी न्याय, महसूल आणि पोलिस या महत्वाच्या खात्यात ब्राह्मणी वरचष्मा निर्माण करून ठेवला होता. राजे झाल्यानंतर लगेचंच शाहूंनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला.

०२. छत्रपतीनी या जातिव्यवस्थेविरोधात बंड पुकारले. त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी मागासलेल्या जातींना संस्थानच्या नोकऱ्यात शेकडा ५० जागा राखून ठेवण्यासंबंधीचा जाहीरनामा कोल्हापूर गैझेट मध्ये प्रसिद्ध केला. म्हणूनच ‘नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत’ या शब्दात धनंजय कीर यांनी शाहूंचे वर्णन केले.

०३. शाहूंनी २८ नोव्हेंबर १९०६ रोजी चांभार व महार लोकांसाठी रात्रीची शाळा सुरु करण्याचा आदेश काढला. ४ ऑक्टोबर १९०७ रोजी त्यांनी चांभार, ढोर यांच्यासाठी मुलींच्या शाळेस मंजुरी दिली व त्यासाठी ९६ रुपये खर्चाची तरतूद केली. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती

०४. शाहूंनी खाजगीत अस्पृश्यांच्या नेमणुका केल्या. अस्पृश्यांसाठी १९०८ साली वसतिगृह स्थापन करून त्याचे व्यवस्थापन भास्करराव जाधव आणि निकटवर्ती मंडळीकडे सोपविले. त्या वसतिगृहास १९०९ साली त्यांनी जागा उपलब्ध करून दिली.  १९१० साली शाहूंनी जहागीरदाराचे अधिकार कमी केले.

०५. ११ जानेवारी १९११ रोजी शाहूंनी कोल्हापुरात परशुराम घोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचे प्रमुख म्हणून भास्करराव जाधव काम पाहत असत. जुलै १९१३ मध्ये कोल्हापुरात ‘सत्यशोधक समाज शाळा‘ सुरु करून विसोजी डोणे यांच्याकडे सोपविली. पण पुढे काही काळानंतर शाहूंनी केलेली क्षात्रजगदगुरु पदाची कृती सत्यशोधक समाजाला आवडली नाही. कारण फुलेंनी देव व माणूस यांच्यात मध्यस्थ नाकारला होता.

०६. २४ नोव्हेंबर १९११ रोजी संस्थानातील सर्व अस्पृश्य वर्गास सर्व प्रकारचे शिक्षण मोफत केले. हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या मंजूर केल्या. ७ एप्रिल १९१९ रोजी अस्पृश्य मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. तलाठी वर्गातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना दरमहा आठ रुपयांप्रमाणे खास शिष्यवृत्त्या जाहीर केल्या.

०७. जुलै १९१७ मध्ये शाहूंनी विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदेशीर मान्यता देणारा ‘विधवा पुनर्विवाह’ कायदा संमत केला. शाहूंनी यानंतर ‘देवदासी प्रतिबंधक कायदा’ केला. या कायद्यान्वये देवदासी स्त्रियांना पित्याच्या संपत्तीत कायदेशीर वाटा दिला गेला.

०८. १९१८ साली शाहूंनी कोल्हापूर संस्थानात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. ही शाखा पुढे राजाराम कॉलेज कडे चालविण्यासाठी देण्यात आली. १९१८ साली त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा संमत केला. 

०९. २८ सप्टेंबर १९१९ रोजी काढलेल्या एका आदेशान्वये संस्थानातील अस्पृश्यांच्या शाळा बंद करण्यात आल्या. या आदेशात शाहू महाराज म्हणतात, “येत्या दसऱ्यापासून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळातून इतर लोकांच्या मुलांप्रमाणेच दाखल करून घेत जावे.” याच वर्षी शाहूंनी स्त्री अत्याचाराविरुद्ध कायदा केला.

१०. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी १९१६ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या शाहुनी सर्वांसाठी खुल्या केल्या.

११. १७ जानेवारी १९२० रोजी ‘हिंदू वारशाचा दुरुस्तीचा कायदा’ गैजेट मध्ये प्रसिद्ध केला. कायद्यान्वये सर्व वर्णाच्या अनौरस संततीस पित्याच्या मिळकतीत हिस्सा देण्यात आला. त्याच वर्षी शाहूंनी दुसरा एक ‘घटस्फोट कायदा’ संमत केला.

१२. राजांनी अस्पृश्य मुलांचे उपनयन (मुंज) करून त्यांना वेदांची संथा दिली. न्यायव्यवस्थेत राजांनी काही अस्पृश्य व्यक्तींना जाणीवपूर्वक वकिलीच्या सनदा दिल्या. हे धोरण वरिष्ठ जातींना आवडले नाही. १८ सप्टेंबर १९१८ रोजी राजांनी जमिनीसाठी महार कुटुंबांना वर्षानुवर्षे गुलामगिरीत अडकवून ठेवणारी महार वतनाची अमानुष पद्धत बंद केली.

१३. शाहू महाराजांनी २७ जुलै/३१ ऑगस्ट १९१८ रोजी महार, मांग, गारुडी, रामोशी, बेरड  अशा गुन्हेगार जातींना दररोज चावडीवर जाऊन हजेरी देण्याची पद्धत बंद केली. त्यानंतर २९ सप्टेंबर १९१८ रोजी गट्टेचोर जमातीची हजेरी बंद केली. अस्पृश्यांनी स्वतःला अस्पृश्य न म्हणता ‘सूर्यवंशी’ असे नाव घ्यावे. व आपल्यातील न्यूनगंड टाकून द्यावा, असाही आदेश महाराजांनी १९१७ साली जारी केला.

१४. वेठवरळा किंवा वेठबिगारी पद्धतीत गावचे पाटील – कुलकर्णी अथवा सरकारी अधिकारी महार वतनदाराकडून गावची व सरकारी कामे करून घेत असत. महारांना वतन म्हणून एक छोटासा तुकडा दिलेला असे, त्या मोबदल्यात त्यांना रात्रंदिवस एखाद्या गुलामाप्रमाणे राबावे लागत असे. महाराजांनी २६ जून १९१८ रोजी एक हुकुम काढून वेठवरळा बंद करून टाकला व महार वतने रयतावा करून टाकली.

१५. गंगाराम कांबळे या सरकारी पागेतील एका मोतद्दारास अस्पृश्य असल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार शाहू महाराजांकडे आल्यानंतर त्यांस नोकरीतून मुक्त करून, स्वतंत्र धंदा करण्यास त्यास हॉटेल काढून दिले. स्वतः महाराज आपल्या लवाजम्यासह अस्पृश्याच्या हॉटेलातील चहा घेऊ लागले. अस्पृश्य्ता नष्ट करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयोग होता. हेच ते प्रसिद्ध ‘सत्यसुधारक हॉटेल’ होत.

१६. ज्या त्या जातीचे नेतृत्व त्या त्या जातीतील नेत्यांनीच करावे असा शाहू महाराजांचा आग्रह होता. कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे १९२० मध्ये दलित अस्पृश्यांची परिषद भरली होती. परिषदेमागील प्रेरणा शाहुंचीच होती. डॉ. आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष होते. शाहूंनी या परिषदेस स्वतः उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांचा गौरव केला होता. १९२० सालचीच हुबळी येथील अब्राह्मणेतर परिषदेचे महाराज अध्यक्ष होते.

१७. शाहूंनी डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदतही केली होती. तसेच आंबेडकरांच्या मूकनायक व आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्रांना देखील शाहूंनी आर्थिक मदत केली.

१८. ३० मे ते १ जून १९२० या तीन दिवसीय अखिल भारतीय बहिष्कृत समाजाच्या नागपूर येथील एक्जिबिशन ग्राउंड वर भरलेल्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष शाहू होते. १९२२ साली दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षही शाहू बनले.

१९. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

२०. शाहूंनी सर्व जातीतील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात वसतिगृहे सुरु केली. वास्तविक १८९६ साली कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करवीर संस्थानच्या दरबाराने आपल्या खर्चाने वसतिगृह सुरु केले होते. परंतु तेथे ब्राह्मणेतर मुलांना प्रवेश दिला जात नसे. १८९९ साली पांडुरंग चिमणाजी पाटील या मराठा मुलाची ब्राह्मणाशिवाय इतरांच्या खानावळी नसल्यामुळे शिक्षणाची अत्यंत गैरसोय झाली.

२१. पी.सी. पाटील यांची वस्तीगृहाविना झालेली अवस्था पाहून १८ एप्रिल १९०१ रोजी ‘व्हिकटोरीया मराठा बोर्डिंग’ स्थापन करण्यात आले. यानंतर सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची मालिकाच उभी राहिली. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१), वीरशैव लिंगायत वसतिगृह (१९०६), मुस्लिम बोर्डिंग (१९०६), मिस क्लार्क होस्टेल (१९०८), दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८), नामदेव बोर्डिंग (१९११), पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२), गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५), इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५), रावबहादूर सबनीस प्रभू बोर्डिंग (१९१५), ढोर-चांभार बोर्डिंग (१९१९), आर्य समाज गुरुकुल (१९१८), वैश्य बोर्डिंग (१९१८), शिवाजी वैदिक विद्यालय वस्तीगृह (१९२०), प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस (१९२०), सुतार बोर्डिंग (१९२१), नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१), सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०), देवांग बोर्डिंग (१९२०), मराठा बोर्डिंग नाशिक (१५ एप्रिल १९२०) अशा विविध जातीधर्माची वसतिगृहे शाहूंच्या सहकार्याने उभी राहिली.

शाहूंचे शैक्षणिक कार्य

०१. शिक्षणाशिवाय अधोगती होते हा मुद्दा प्रतिपादन करताना शाहू म्हणतात, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो.” २७ मार्च १८९५ रोजी शाहूंनी फर्ग्युसन कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. १८८७ साली त्यांनी आळते महार स्कूलची स्थापना केली. ९ नोव्हेंबर १९०६ रोजी राजांनी ‘किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली.

०२. १९११ रोजी शाहूंनी कोल्हापूर संस्थानातील विद्यार्थ्यांना १५% नादारी घोषित केली. १९१३ साली कोल्हापूर संस्थानातील प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिर, चावडी, धर्मशाळा येथे प्राथमिक शाळा सुरु केल्या. त्याचवर्षी पाटील शाळेची निर्मिती केली.

०३. ८ सप्टेंबर १९१७ च्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा कृतीत आणण्याच्या दृष्टीने त्यांनी २४ जुलै १९१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलेकी, “येत्या गणेश चतुर्थीपासून (३० सप्टेंबर) करवीर इलाख्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणेचे आहे.” यानंतर कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम ‘पिंपरी पेटा’ या संस्थेने फी माफीची घोषणा केली.

०४. त्यानुसार सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची नियमावली तयार करण्यात आली. त्यानंतर शिक्षण तज्ञाच्या समितीने तयार केलेल्या नियमावलीवर आधारित २१ सप्टेंबर १९१७ रोजी ‘सक्तीच्या शिक्षणाचा कायदा’ प्रसिद्ध करण्यात आला. या कायद्यानुसार मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दरमहा प्रत्येकी एक रुपया दंड करण्याची तरतूद करण्यात आली. कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने १९१८ साली स्वतंत्र शिक्षण खाते स्थापन करून त्यावर ‘डायरेक्टर’ आणि ‘एज्युकेशनल इन्सपेक्टर’  अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली.

०५. १९१७-१८ साली २७ शाळा व १२९६ विद्यार्थी होते. १९२१-२२ सालापर्यंत त्यात वाढ होऊन ४०० शाळा व २२००७ विद्यार्थी झाले. १८९४ साली संस्थानातील सर्व विद्यार्थी संख्या १०८४४ होती, ती १९२२ साली २७८३० झाली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या संख्येतही नऊपट वाढ झाली. १९१८ साली त्यांनी तलाठी स्कूलची निर्मिती केली.

०६. करवीर संस्थानचा स्त्री-शिक्षणाबाबतचा विचार पुरोगामी होता. ‘फिमेल ट्रेनिंग स्कूल’वर नियुक्त केलेल्या रखमाबाई केळवकर या शिक्षिकेने स्त्री-शिक्षणाच्या कामास मोठी गती दिली. जेव्हा मिस लिटल या शिक्षणाधिकारी असणाऱ्या इंग्रज बाई परत मायदेशी गेल्या तेव्हा शाहूंनी रखमाबाई केळवकर यांची शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती केली. शिक्षकासाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना शाहूंनी सुरु केली.

०७. १९१७ साली करवीर शंकराचार्याच्या मार्गदर्शनाखाली शाहू छत्रपतींनी संस्कृत कॉलेज सुरु करण्याचा एक अभिनव प्रयोग केला. शाहूंनी तांत्रिक शिक्षणासाठी ‘जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था’ व  लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फंट्री स्कूल’ सुरु केले. राजाराम कॉलेज हेसुद्धा शाहू महाराजाद्वारे बांधले गेले आहे. पुढे त्यांनी राजाराम कॉलेज आर्य समाजाच्या हवाली केले व त्यासोबतच ५०००० रुपयांची मदत देखील केली.

प्रशासनिक कार्य

०१. १९०१ साली राजांनी गोवध बंदीचा कायदा केला. महाराजांनी १९०२ साली ‘सार्वत्रिक पाटबंधारे धोरण’ जाहीर करून स्वतंत्र ‘पाटबंधारे खाते’ निर्माण केले व त्यावर ‘इरिगेशन ऑफिसर’ची नियुक्ती केली. लहान-मोठे तलाव, पाटबंधारे यांच्या नोंदी करण्यात येउन त्यांची दुरुस्ती करण्याचे काम त्वरेने हाती घेण्यात आले. यातूनच १९०७ साली भोगावती नदीचा जलप्रवाह अडविणाऱ्या धरणाची महत्वाकांक्षी योजना राजांनी राबविली.

०२. शाहू महाराजांनी १९०२ सालच्या युरोपच्या दौऱ्यात तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती किती कल्पकतेने वापरली जाते हे पहिले होते. त्यातूनच त्यांनी राधानगरी प्रकल्प १९०९ साली हाती घेतला आणि १९१८ सालापर्यंत १४ लाख रुपये खर्च होऊन ४० फुटांचे बांधकाम पूर्ण झाले होते. निधीच्या कमतरतेमुळे काही काळ धरणाचे बांधकाम थांबले तरी ६०० दशलक्ष घनफुट पाणी उपलब्ध झाले होते. धरणाचे काम १९५७ साली पूर्णत्वास गेले.

०३. १९०७ मध्ये श्रीमंत अक्कासाहेब यांचा विवाह देवासच्या महाराजांबरोबर झाला. या प्रसंगाची आठवण म्हणून ‘धरणा’शेजारी राजांनी राधानगरी नावाचे गाव वसविले. १९०७ याचवर्षी त्यांनी सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली.

०४. शेतीच्या क्षेत्रात आधुनिकीकरण करण्यासाठी शाहू महाराजांनी १९१२ साली ‘किंग एडवर्ड एग्रीकल्चरल इंस्टीट्युट’ ही संस्था स्थापन करून शेतीची सुधारित अवजारे, रासायनिक खते, आधुनिक मशागत पद्धती याचे ज्ञान व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यांनी संस्थानात शेती प्रदर्शने आयोजित केली.

०५. राजांनी संस्थानात सह्याद्रीच्या उतरणीवर चहा, कॉफी व रबर यांच्या मळ्याची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग अपेक्षेबाहेर यशस्वी झाला. ‘पन्हाळा टी नं. ४’ या नावाने हा चहा भारतातील संस्थानिकात प्रसिद्ध झाला.

०६. राजांनी व्यापारासाठी ‘शाहूपुरी बाजारपेठ’ (१८९५) व  ‘जयसिंगपुरी बाजारपेठ‘ अशा दोन पेठा वसविल्या. संस्थान उद्योगप्रधान व्हावे म्हणून १९०५ सालापर्यंत औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्ठार्क उद्योग, सुती कापड उद्योग सुरु केले. करवीर संस्थान व्यापार उद्योगाने इतर शहरांशी जोडले जावे म्हणून कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्ग सुरु करून राजांनी २० एप्रिल १८९१ रोजी या मार्गाचे उदघाटनही केले.

०७. शिक्षित तरुणांना नोकऱ्यांची संधी देखील राजांनी उपलब्ध करून दिली. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल (२७ सप्टेंबर १९०६)’, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.  (२००३ मध्ये स्पिनिंग व विव्हिंग मिल महाराष्ट्र सरकारने बंद केली.) १८८७ साली शाहूंनी दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्जे दिली.

०८. १९१६ साली संस्थानात शिरोळ, इचलकरंजी, गडहिंग्लज इत्यादी ठिकाणी त्यांनी ‘जिनिंग फैक्टरी‘ सुरु केल्या. याबरोबर त्याचवर्षी बलभीम को-ऑपरेटीव्ह व अर्बन को-ऑपरेटीव्ह या सहकारी सोसायटींची स्थापना केली. १९१६ साली निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

०९. १९१२-१३ च्या सुमारास संस्थानातील पहिली ऑइल मिल, पहिली फाउंड्री, पहिली इलेक्ट्रिक कंपनी, पहिले मोटार ट्रान्सपोर्ट असे अनेक उद्योग महाराजांनी सुरु केले. या उद्योगांसाठी प्रशिक्षित कामगार मिळावेत म्हणून ‘राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल‘ ही स्थापन केले.

१०. १९१२ साली राजांनी ‘सहकार संस्थाविषयक कायदा’ जारी केला व सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी ‘सहकार निबंधक’ या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. १९१३ साली कोल्हापुरातील पहिली संस्था म्हणून ‘द कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड’ ही संस्था भास्करराव जाधवांच्या नेतृत्वाखाली सुरु केली. १९२१ सालापर्यंत ३७ सहकारी संस्था कोल्हापुरात सुरु झाल्या.

सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य
०१. १८८३ साली ‘कोल्हापूर गायन समाज’ ही संस्था स्थापन झाली होती. त्यानंतर १८९२ साली स्थापन झालेल्या ‘देवल क्लब’ या संगीतास वाहिलेल्या संस्थेस शाहू महाराजांनी सर्व प्रकारची मदत केली होती. शाहू महाराजांच्या कलाप्रेमाचे प्रतीक म्हणून खासबागेत १९१५ साली ‘पैलेस थिएटर’ उभे राहिले. त्याच्यामागे २५ हजार प्रेक्षक बसतील असे खुले नाट्यगृह १९१६ साली बांधण्यात आले.

०२. ‘बाबुराव पेंटर’ यांच्यासारख्या अनेक महान कलावंतांना शाहू महाराजांचे उत्तेजन होते. चित्रकलेच्या क्षेत्रातील आबालाल रहिमान यांचा शाहू महाराजांनी ‘दरबारी चित्रकार’ म्हणून गौरव केला होता. राजकोट शाळेत असताना शाहूंनी दत्तोजी शिंदे व पांडू भोसले यांच्याकडून मल्लविद्येचे धडे घेतले होते. त्यांनी १८९५ साली मोतीबाग तालमीची स्थापना केली. १९१२ साली खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केली. शाहुंमुळेच कोल्हापूरची मल्लविद्या संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाली.मल्लविद्येचे पोशिंदे अशी महाराजांची ख्याती होती.

०३. बालगंधर्व, गाण सम्राट अल्लादियाखान साहेब, आनंदराव व बाबुराव पेंटर, चित्रकार दत्तोबा दळवी हे शाहूंच्या दरबारातील इतर कलाकार होते.

०४. शाहूंनी विजयी मराठा, भगवा झेंडा व जागरूक ही वृत्तपत्रे काढली. त्यापैकी विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते. शाहूंनी गोपाळबुवा वलंगकर यांच्या ‘विटाळ विध्वंसक’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.

०५. शाहूंच्या नंतर त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव, केशव विचारे, मुकुंदराव पाटील (दीनमित्रकार) आणि केशवराव जेधे (ठाकरे) यांनी शाहूंचे कार्य पुढे चालविले.

वेदोक्त प्रकरण

०१. १८९९ साली कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीवर महाराज स्नान करत असताना राजघराण्याच्या शाही ब्राह्मण पंडित नारायण भटजीने वैदिक पद्धतीने शाहू महाराजांच्या धार्मिक विधी पार पाडण्यास नकार दिला. वैदिक मंत्राऐवजी तो पुराणोक्त मंत्र म्हणत होता. राजाराम शास्त्रीने महाराजांच्या नजरेस ही बाब आणून दिली. महाराजांनी त्याला जाब विचारले असता त्याने कारण दिले महाराज मराठा म्हणजे त्याच्यानुसार शुद्र होते एक क्षत्रिय नव्हते.

०२. पुढे १९०१ साली महाराजांनी पुरोहित राजोपाध्ये यांना वेदोक्त विधी करण्यासंबंधी कळविले. राजोपाध्ये यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्या सर्व जमिनी व अधिकार काढून घेण्यात आले. राजोपाध्ये यांनी कर्नल फेरीस, मुंबई सरकार व नंतर व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनपर्यंत दाद मागितली. परंतु त्यांस यश आले नाही. या प्रकरणी टिळकांनी पुरोहिताची बाजू घेऊन महाराजांवर अत्यंत कठोर टीका केली. याशिवाय शृंगेरीचे जगदगुरू शंकराचार्य आणि प्रा. गोविंद पारीख यांनीसुद्धा राजांवर टीका केली.

०३. हेच ते वेदोक्त प्रकरण होय. या प्रकरणामुळे शाहू राजना फार मोठा विरोध सहन करावा लागला. पण शाहू महाराज याने दबून मागे फिरले नाहीत. त्यानंतर महाराज आपोआप महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले. त्यांनी मराठ्यांना आपल्या नेतृत्वाखाली एक केले. १९०८ या साली बॉम्बस्फोट घडवून शाहूंची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला गेला.

०४. शाहू महाराजांनी १९१७ मध्ये डॉ. कुर्तकोटि यांना करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून नेमले. १५ सप्टेंबर १९१८ रोजी महाराजांनी कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. त्यातून महाराज व कुर्तकोटी यांच्यात वाद झाला. त्यातूनच कुर्तकोटींनी पदत्याग केला. महात्मा फुले यांनीसुद्धा कुलकर्ण्यांना ग्रामराक्षस असे म्हटले होते.

०५. ब्राह्मणांच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी शाहू महाराजांनी जुलै १९२० मध्ये मराठा पुरोहित तयार करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालय’ सुरु केले. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९२० रोजी क्षात्रजगदगुरूसंबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ११ नोव्हेंबर १९२० रोजी सदाशिवराव लक्ष्मण पाटील या संस्कृत आणि तत्वज्ञान विषयातील बुद्धिमान मराठा व्यक्तीची पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठात क्षात्रजगदगुरू पदावर स्थापना करण्यात आली.

०६. क्षात्रजगदगुरू पिठाच्या अध्यक्षतेसाठी शाहूंनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना आमंत्रण दिले. पण त्यांनी अगोदरच प्रार्थना समाज स्वीकारल्याने यांस सन्मानपूर्वक नकार दिला.