विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे)

जन्म : ११ सप्टेंबर १८९५ (गागोडे, पेण, कुलाबा {रायगड}, महाराष्ट्र)
मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२ (पवनार, वर्धा, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन

०१. हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी असे म्हटले जाते. ‘जय जगत’ अशी घोषणा भावे यांनीच दिली होती.
०२. विनोबा भावे यांचा जन्म एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. १९०३ मध्ये त्यांचे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे तिसरी पर्यंतचे शिक्षण घरीच काका गोपाळराव यांच्याकडून झाले. बडोद्यात इंग्रजी शाळेत चौथीमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
०३. त्यांचे आजोबा शंभूदास भावे, वडील नरहरी भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात “माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसर्‍या कशाचीही भूमिका नाही.”

०४. वयाच्या १०व्या वर्षी विनोबांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. आणि त्यांनी आजन्म या प्रतिज्ञेचे पालन केले. यानंतर २५ मार्च १९१६ रोजी विनोबांनी गृहत्यागाचा संकल्प केला व तो अमलात आणला. ब्रह्म जाणून घेण्याच्या उद्देशाने विनोबांनी घर सोडले ते थेट काशीला येउन पोहोचले.
०५. अहिंसा आणि करुणा ही दोन विनोबाच्या आयुष्यातील सर्वात मोठी दोन तत्वे होती. म्हणूनच त्यांनी गोहत्येच्या विरोधात चळवळ चालविली होती. पुरेसा प्रकाश नसताना केलेल्या सततच्या वाचनामुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले होते.
०६. ३० जानेवारी १९४८ रोजी विनोबाजींना मोठा धक्का सहन करावा लागला तो पूज्य वंदनीय गुरूस्थळी असलेल्या महात्मा गांधीजींच्या हत्येचा! राष्ट्राच्या आणि त्यांच्या जीवनातील प्रकाशच लोपला.
०७. १५ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून समाधी मरण स्वीकारले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचा रशिया दौरा अर्धवट सोडून विनोबांच्या अंत्यविधीसाठी परतल्या.

स्वातंत्र्य लढा

०१. १९१० साली मैट्रिक झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. बाबू अरविंद घोष हे विनोबांच्या कॉलेजचे प्राचार्य होते. तय्तच विनोबांनी १९१४ मध्ये ‘विद्यार्थी मंडळ’ स्थापन केले. हे विद्यार्थी मंडळ आणि प्राचार्य अरविंद घोष यांच्यामुळे इंग्रज सरकारचे घडामोडींवर लक्ष होते.
०२. नवीन स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठ येथे ४ फेब्रुवारी १९१६ रोजी महात्मा गांधीनी भाषण दिले होते ते भाषण वृत्तपत्रात छापून आले. ते वाचल्यानंतर विनोबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९१६ साली विनोबा परीक्षा देण्यासाठी मुंबई येथे जाणार होते पण महात्मा गांधींचे भाषण वाचल्यानंतर त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र जाळून टाकले.
०३. विनोबांनी गांधीना पत्रे लिहिली. त्यानंतर गांधीनी विनोबांना कोचरब  आश्रम, अहमदाबाद येथे येउन वैयक्तिक भेट घेण्याचा सल्ला दिला. ७ जून १९१६ रोजी विनोबांची गांधींशी पहिली भेट कोचरब येथेच झाली व तेथेच त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला. व त्यांनी गांधींच्या आश्रमात चालणाऱ्या कार्यक्रमात रस घेण्यास सुरुवात केली. गांधीजींच्या आज्ञेवरून विनोबा शरीराच्या शुद्धीसाठी १४ जानेवारी १९१७ रोजी वाई मुक्कामी आले व वर्षभरात त्यांनी शरीरप्रकृती स्वस्थ केली.
०४. गांधीजी साबरमती आश्रमात वास्तव्यास असताना जमनालाल बजाज यांनी वर्धा येथे आश्रम काढण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला. त्या आग्रहाखातर वर्धा येथे ‘सत्यागृहाश्रम’ काढण्यास गांधींनी परवानगी दिली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा गांधीजींच्या इच्छेनुसार वर्धा येथील आश्रम सांभाळण्यास गेले.
०५. १९२१ मध्ये त्यांनी अधिकृतपणे कॉंग्रेसचे सभासदत्व स्वीकारले. परंतु एक कोटी रुपयांचा ‘टिळक फंड’ उभा करण्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी १९२५ मध्ये कॉंग्रेसचे सभासदत्व सोडले.
०६. सरकारने घातलेली बंदी मोडून जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय झेंडा घेऊन ११ एप्रिल १९२१ रोजी नागपुरात निघालेल्या एका मिरवणुकीतील सर्व सत्यागृहींना अटक झाली. झेंडा सत्यागृहाच्या मिरवणुकीचे देशभरातून आलेल्या सत्यागृहींचे हे सत्र चालूच होते.
०७. विनोबाही झेंडा सत्यागृहात सामील झाले. १८ जून १९२३ रोजी त्यांना अटक होऊन एक वर्षभराची सक्तमजुरीची शिक्षा झाली. विनोबाजींचा देशासाठी हा पहिला तुरुंगवास होता. पुढे आंदोलनाचा वाढता जोर पाहून सत्यागृहींची तुरुंगातून मुक्तता झाली व विनोबांनाही शिक्षेचे तीन महिने पूर्ण होण्याच्या आत ३ सप्टेंबर १९२३ रोजी सोडून देण्यात आले.
०८. जानेवारी १९२३ साली त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ या नवीन मासिकाची सुरवात केली. या मासिकात त्यांनी आपले उपनिषदावरील निबंध प्रसिद्ध केले. पुढे या मासिकाचे रुपांतर साप्ताहिकात झाले. ते तीन वर्षापर्यंत चालले. १८ जून १९२४ ते ११ एप्रिल १९२७ या काळात ‘महाराष्ट्र धर्म’चे १४० अंक प्रसिद्ध झाले. त्यात एकूण २२२ लेख प्रकाशित करण्यात आले.
०९. वैकोम, केरळ येथे दलितांच्या मंदिर प्रवेशावर रोख लावण्यात आली होती. या प्रकरणाचे पर्यवेक्षण करून त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी गांधीनी १९२५ साली विनोबांना वैकोम येथे पाठवले.
१०. तुरुंगात त्यांनी ‘इशावास्यवृत्ती’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ या ग्रंथांचे लेखन केले. वेल्लोर येथील तुरुंगात असताना त्यांनी अनेक दक्षिण भारतीय भाषा शिकल्या व त्यांचा अभ्यास केला. त्यावरून त्यांनी ‘लोक नगरी’ हे हस्तलिखित लिहिले. तुरुंगात ते आपल्या सोबती कैद्यांना ‘भगवतगीते’वर प्रवचन देत. पुढे याचा संग्रह म्हणून ‘गीता-प्रवचन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
११. कॉंग्रेसने अधिवेशन शहरापासून दूर खेड्यात भरवावे या गांधीजींच्या सूचनेनुसार १९३६ चे अधिवेशन फैजपूर (जळगाव) येथे भरविण्याचे ठरविले. आणि त्याची सर्व जबाबदारी विनोबांवर सोपविण्यात आली. विनोबाजींनी हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडले.
१२. महात्मा गांधीसोबत त्यांनी ‘सविनय कायदेभंग’ चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. १० ऑक्टोबर १९४० रोजी विनोबांनी पवनार येथे युद्धविरोधी भाषण करून, भाषणस्वातंत्र्याचा हक्क बजावत पाहिला वैयक्तिक सत्यागृह केला. त्यांना अटक झाली व तीन महिन्यांची शिक्षा झाली.
१३. तुरुंगातून सुटून आल्यानंतर विनोबांनी पुन्हा १७ जानेवारी १९४१ रोजी सेवाग्राममधून सत्यागृह केला. त्यांना अटक होऊन एक वर्षाची साध्या कैदेची शिक्षा झाली. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘चले जाव’चा सरकारला इशारा दिला. सरकारने तत्काळ राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली. विनोबानांही अटक झाली व सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगात राहावे लागले.
१४. जुलै १९४५ मध्ये तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी हरिजनविषयक कामाला वाहून घेतले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींशी चर्चा करून ते १९४६ मध्ये पवनार आश्रमाजवळ सुर्गाव येथे रोज भंगीकाम करण्यासाठी जाऊ लागले.

धार्मिक व सामाजिक कार्य

०१. नशापानापासून लोकांना मुक्त करण्यासाठी विनोबांनी १९३० मध्ये शिंदीची झाडे तोडण्याची वृक्षतोड मोहीम सुरु केली. ही मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्यामुळे सरकारला भीती वाटू लागली आणि काही तरी कारण काढून वृक्षतोड करणाऱ्या मालगुजार, विद्यार्थी व अन्य सामील झालेल्यांना सरकारने शंभर रुपये दंड ठोठावला याचवेळी जंगल सत्यागृह सुरु करण्यात आल्यामुळे वृक्षतोड मोहीम स्थगित करण्यात आली.
०२. मध्य प्रांतात जंगलात गाईंना चरण्यासाठी मोकळीक नव्हती, म्हणून लोकनायक माधवराव अणे यांच्या नेतृत्वाखाली गाईंसाठी जंगलातून गवत कापून आणण्याचा जंगल सत्यागृह सप्टेंबर १९३० मध्ये सुरु करण्यात आला. त्यास पाठींबा देण्यासाठी विनोबांनी मिरवणूक काढली. त्याचप्रमाणे वर्धा तालुक्यातील केळझर जंगलातील गवत कापण्यासाठी सत्यागृहिंच्या तुकड्या पाठविल्या. त्यांना प्रत्यक्ष सत्यागृह होण्यापूर्वीच पकडण्यात आले व त्यांना ६ ते ९ महिने तुरुंगात टाकले.
०३. विनोबांनी ६ मे १९३४ रोजी ‘ग्राम सेवा मंडळा’ची स्थापना केली. याच्या स्थापनेची तीन उद्दिष्टे होती. ग्रामसेवेच्या कार्याचा नमुना उपलब्ध करून देणे, पारंपारिक खेड्यात सुधारणा करून आदर्श खेडे उभारणे, ग्रामसेवेच्या साधनांची मागणी पूर्ण करणे.
०४. १९३६ मध्ये त्यांनी ‘महारोगी सेवा मंडळ’ ही संस्था स्थापन केली व त्यांचेच एक निष्ठावान कार्यकर्ते मनोहर बळवंत दिवान यांच्या हाती सोपविली. त्यांनी २ ऑक्टोबर १९४१ रोजी पवनारनजीक असलेल्या दत्तपूर या गावी, महारोगी सेवा मंडळाचे स्थलांतर केले व मंडळाचे महारोगी रुग्णालय व कुष्ठनिवासात रुपांतर केले.
०५. विनोबांनी खेड्यातील भारतीय जनतेच्या सामान्य आयुष्यमानाचे निरीक्षण केले आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले. यामुळेच ‘सर्वोदय चळवळी’ची सुरुवात झाली. ‘सर्वोदय समाज’ हा त्यांच्या या काळातील अंगीकृत कार्याचाच भाग होता. विनोबांनी पैशापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘कांचनमुक्ती प्रयोग’ करण्याचे ठरविले. त्यांनी ‘ऋषी शेती’ हा प्रयोग केला आणि पवनार आश्रमातून सुरु केलेला हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.
०६. १८ एप्रिल १९५१ रोजी त्यांनी पोचमपल्ली येथे ८० दलित कुटुंबियांशी संवाद साधला. पोचमपल्लीतील एक सधन शेतकरी रामचंद्र रेड्डी यांनी शंभर एकर जमीन दान करण्याचे जाहीर केले. आणि येथूनच ‘भूदान चळवळी’ची सुरुवात झाली. प्रसिद्ध गांधीवादी नेते लावनम यांनी त्यांना या कामात आंध्र प्रदेश व ओरिसा येथे सहाय्य केले. त्यांचे भाषांतरकार म्हणून काम केले.
०७. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. आणि लोकांना त्यांच्या जमिनीचा १/६ वाटा भूमिहीन शेतकऱ्यांना देण्यास प्रवृत्त केले. भूदान चळवळीसाठी निघालेल्या पदयात्रेचा झंझावात १० एप्रिल १९६४ रोजी थांबला. १३ वर्ष ३ महिने ३ दिवस चाललेल्या या पदयात्रेने ८० हजार किलोमीटरचे अंतर कापले, आणि शेकडो एकर जमीन मिळविली.
०८. यानंतर त्यांनी १९५४ साली ‘ग्रामदान’ चळवळ सुरु केली. यात ते लोकांना संपूर्ण गावच दान देण्याचे आवाहन करत असत. यात त्यांना जवळपास १००० गावे दानात मिळाली त्यातील १७५ गावे एकट्या तमिळनाडू इथून मिळाली होती. १५ ऑगस्ट १९५८ रोजी पूर्व खानदेशातील अक्खा अक्राणी तालुका ग्रामदानी तालुका म्हणून जाहीर झाला होता. भूदान व ग्रामदान चळवळीचे काम शेवटी १९७४ मध्ये थांबविण्यात आले.
०९. बिहारमधील बोधगया येथील १९५४ सालच्या सर्वोदय संमेलनात जयप्रकाश नारायण उपस्थित होते. विनोबांच्या भूदान, संपत्तीदान, समयदान करण्याच्या आवाहनामुळे जयप्रकाशजी इतके भारावून गेले कि त्यांनी संमेलनात ‘मी जीवनदान करतो’ अशी जाहीर घोषणा केली.
१०. १९५० नंतरच्या दोन दशकांत त्यांनी चंबळ खोऱ्यातील डाकुंना आपला मार्ग सोडण्याचे आवाहन केले. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक डाकुंनी शरणागती पत्करली. विनोबांच्या अहिंसेचे हे प्रखर दर्शन आगळे वेगळे होते. विनोबाजींनी त्याचे सर्व श्रेय त्या डाकुंनाच देऊन टाकले.
११. विनोबाजींनी समाजकार्याला चिरंतन स्फूर्ती मिळावी म्हणून, समन्वय आश्रम (बोधगया), ब्रह्मविद्या मंदीर (पवनार), प्रस्थान आश्रम (पठाणकोट), विसर्जन आश्रम (इंदूर-१९६०), मैत्री आश्रम (आसाम-१९६२), आणि वल्लभ निकेतन (बंगलोर-१९६५) असे सहा गांधी आश्रम स्थापन केले होते. विनोबा म्हणत असत, “१३ वर्षात मी संपूर्ण भारतभ्रमण केले आहे. यात चिरकाल टिकणारी कोणती गोष्ट मी केलेली असेल तर ते म्हणजे मी स्थापन केलेले ६ गांधी आश्रम होय.”
१२. भावेंनी १९५९ साली गांधींच्या तत्वावर आधारित खास स्त्रियांसाठी पवनार येथे ‘ब्रह्मा विद्या मंदिर’ या आश्रमाची स्थापना केली. महिलांना स्वावलंबी बनवणे हे याचे उद्दिष्ट आहे. यांच्यावर भगवतगीता आणि गांधी तत्वज्ञानाचा प्रभाव आहे.

सन्मान व पुरस्कार

०१. १९५८ साली समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे विनोबा पहिले मानकरी होत.
०२. १९८३ साली त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
०३. झारखंड राज्यातील हजारीबाग या जिल्ह्यातील विद्यापिठाला विनोबा भावे यांचे नाव देण्यात आले आहे.
०४. “शस्त्रांनी जो परिणाम झाला नव्हता तो विनोबाजींचे शब्द आणि कृती यातील विलक्षण सामर्थ्याने घडून आला.” अशा शब्दात पंडित नेहरू यांनी गौरव केला.
०५. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी विनोबांचा व त्यांच्या भूदान चळवळीचा गौरव करताना असे म्हटले कि, “हे काही भाकड जमिनीचे दान नव्हे. गांधीजींनी ज्या नव्या समाजाचे चित्र पहिले त्याचाच हा नमुना आहे.”
०६. न्यूयॉर्क टाइम्स च्या रॉबर्ट ट्रम्बल ने “प्रेमाने लुटणारा आणि जमीन वाटणारा प्रतिपरमेश्वर” तर टाइम मैगझीनने “गांधीजींचा समर्थ चेला” अशा शब्दांत विनोबांचा सम्मान केला.

साहित्य

०१. विनोबांचे मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचे लोकांना वाचता येईल अशा सध्या भाषेत अनुवाद केले. विनोबा भावे कन्नड लिपीला जगातील लिपींची राणी (विश्व लीपीगला राणी) असे म्हणत असत.
०२. विनोबांनी भगवतगीता, आदि शंकराचार्य, बायबल, कुरआन यांचे समीक्षण केले. त्यांनी ज्ञानेश्वर आणि इतर संताच्या साहित्याचे केलेले समीक्षण विशेष गाजले. त्यांनी भगवतगीतेचे मराठीत भाषांतर केले. ते म्हणत असत, “गीता माझ्या जीवनाचा श्वास आहे.”
०३. त्यांनी कुराणाचा सार, ख्रिस्ती शिकवणीचा सार, शिक्षणाचा विचार, स्वराज्य शास्त्र या समीक्षणात्मक पुस्तकांचे लेखन केले. विनोबांनी आपले विचार ‘मधुकर’ या नियतकालिकातून प्रसिद्ध केले होते. हिंदीमध्ये त्यांनी भूदान गंगा, भागवत धर्म मीमांसा व यांसारखी सहा पुस्तके लिहिली.
०४. अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई, गीताई-चिंतनिका, गीता प्रवचने, गुरुबोध सार(सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, मधुकर, मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती – मराठी), लोकनीती, विचार पोथी, साम्यसूत्र वृत्ति, साम्यसूत्रे, स्थितप्रज्ञ-दर्शन ही त्यांची लिखित पुस्तके आहेत.
०५. विनोबांनी गीताई लेखनास प्रारंभ ७ ऑक्टोबर १९३० रोजी केला आणि ६ फेब्रुवारी १९३१ रोजी अखेरचा चरण लिहिला. त्यांनी गिताईचे ७०० श्लोक लिहिले. गीताईची हस्तलिखित प्रत त्यांचे शिष्य वल्लभस्वामी यांच्याकडे २८ जानेवारी १९३२ रोजी आली. त्यांनी काकासाहेब बर्वे यांच्याकडे मुद्रणासाठी सोपविली. गीताईच्या २००५ या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत २४४ आवृत्त्या निघाल्या व ३८ लाख प्रती खपल्या आहेत. इतक्या प्रचंड खपाचे मराठी भाषेत अन्य पुस्तक नाही.
०६. विनोबांच्या प्रेरणेने राधाकृष्ण बजाज यांनी १९७४ मध्ये ‘गीता प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली. गीताईच्या निर्मितीला ५० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने जमनालाल बजाज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या गीताई मंदिराचा उद्घाटन समारंभ ७ ऑक्टोबर १९८० रोजी विनोबांच्या हस्तेच साजरा झाला. १९२८ ते १९३५ या काळात त्यांनी गीताई प्रवचनाबरोबरच अस्पृश्यता निवारण, सर्वांसाठी मंदिरे खुली करणे असे कार्यक्रम राबविले.

टीका

०१. व्ही.एस. नेपौल यांनी विनोबांवर तर्कशक्तीचा अभाव असणारा आणि गांधींचे अंधानुकरण करणारा म्हणून टीका केली. त्यांच्या काही प्रशंसकानी सुद्धा त्यांच्या गांधीवर असणाऱ्या प्रचंड भक्तीवर टीका केली.
०२. विनोबांनी इंदिरा गांधीनी समर्थन दिलेले होते. आणि त्या काळी इंदिरा गांधीनी आणलेल्या आणीबाणीला त्यांनी ‘अनुशासन पर्व’ असे संबोधले. त्यामुळेही विनोबांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. त्याकाळी कॉंग्रेस विरोधी पक्षांनी त्यांना ‘सरकारी संत’ असे म्हटले. तर पु.ल. देशपांडे यांनी त्यांची ‘वानरोबा’ म्हणून हेटाळणी केली.
०३. परंतु आयुष्याच्या उतारवयात ते इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात गेले. गोहत्या विरोधात संत समाजाने संसदेला घेराव घालून आंदोलन केले होते. त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश तत्कालीन सरकारने दिला. याच्या विरोधात विनोबांनी सरकारवर आगपाखड केली.