महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग १

जन्म : २ ऑक्टोबर १८६९ (पोरबंदर, गुजरात)
मृत्यू : ३० जानेवारी १९४८

वैयक्तिक जीवन

०१. गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या.

०२. गांधीजीचे शिक्षण पोरबंदर व राजकोट येथील प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळेत झाले. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. कस्तुरबा यांना प्रेमाने बा असे म्हटले जाई. या प्रक्रियेत गांधींना शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले.
०३.  १८८५ मध्ये गांधीजींचे वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला. त्याचवर्षी नंतर गांधीजींना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्यावेळेस गांधीजी १५ वर्षाचे होते. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- १८८८ मध्ये हरीलाल, १८९२ मध्ये मणिलाल, १८९७ मध्ये रामदास आणि १९०० मध्ये देवदास.
०४. १८८७ साली ते मैट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सप्टेंबर १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, येथे वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी ‘इनर टेंपल’ या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.
०५. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर बनले आणि १८९१ मध्ये भारतात परत येऊन वकिली करू लागले. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही. त्यानंतर खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले.
०६. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील ‘दादा अब्दुल्ला एंड कंपनी’ नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला. कंपनीची दक्षिण आफ्रिकेतील कोर्टात चालू असलेली केस तिथल्या वकिलाला समजावून देण्यासाठी गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले. आफ्रिकेतील गांधीजींचे पहिले जाहीर व्याख्यान ‘ब्रिटोरिया’ या शहरात झाल. आफ्रिकेत गांधीजींना ‘कुलींचे बॅरिस्टर’ म्हणून ओळखले जात असे.
०७. ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळी मारून हत्या केली. गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली.
०८. गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते.
०९. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे.

दक्षिण आफ्रिका

०१. दक्षिण आफ्रिकेत गांधीना पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा पिटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली.
०२. दक्षिण आफ्रिका येथे भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांघीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली.
०३. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्यांचे सरकार काळ्या व आशियायी लोकांवर अत्याचार करत होते. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी अर्ज विनंत्याद्वारे सनदशीर मार्गाचा अवलंब केला. त्यांना संघटीत करून ‘नाताळ इंडियन कॉंग्रेस’ ही संघटना स्थापन केली. तेथेच त्यांनी ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र सुरु केले.
०४. १८९७ मध्ये डरबन येथे काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.
०५. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक ८ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला ‘एशियाटिक रजीस्ट्रेशन ऍक्ट’ असे म्हटले जात असे. त्या व्यक्तीस स्वतःजवळ ओळखपत्र बाळगणे बंधनकारक होते.

०६. याला विरोध करण्यासाठी त्या वर्षीच्या ११ सप्टेंबरला बोलवलेल्या जोहान्सबर्ग येथील सभेमध्ये, गांधीजींनी पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यावेळी या तंत्राला लोक ‘पैसिव्ह रेजीस्टंस’ असेही म्हणू लागले.

०७. या दरम्यानच्या काळात गांधींना आफ्रिकन सरकारने अटक केली. तेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले आफ्रिकेला गेले.

०८. दरम्यानच्या काळात गांधी भारतात परतल्यानंतर आफ्रिकेत केलेल्या कामाचा आढावा म्हणून त्यांनी एक पुस्तिका तयार केली. त्या पुस्तिकेच्या १०००० प्रति काढून गोखलेंच्या हस्ते त्या वाटण्यात आल्या.

०९. आफ्रिकन सरकारला ही बातमी कळताच तेथील जनतेने गांधी आफ्रिकेला परतताच समुद्र किनाऱ्यावर ‘गांधी गो बॅक’ या घोषणेबरोबरच दगडांचा वर्षाव केला.

१०. १९०६ मध्ये इंग्रजांनी नातालमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. युद्धात इंग्रजांच्या बाजूने भारतीयांना लढण्यासाठी भरती करवून घ्यावे यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहीत केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांना पाठींबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला.
११. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचर वरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले.
१२. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटीशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या लष्करी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे. त्यानी ठरवून टाकले कि याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अशा अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेंव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेंव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले.
१३. २० जुलै १९१४ रोजी दक्षिण आफ्रिकेचा कायमचा निरोप घेऊन गांधीजी इंग्लंडमार्गे भारताकडे यायला निघाले. दरम्यान पहिले महायुद्ध सुरु झाले होते. त्यामुळे गांधीजींना इंग्लंडमध्येच काही काळ वास्तव्य करावे लागले. त्यानंतर ९ जानेवारी १९१५ रोजी गांधी मुंबईत पर्यायाने भारतात येउन पोहोचले.

स्वातंत्र्य चळवळ

०१. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९१५ साली त्यांनी भारतात परत वकिली सुरु केली आणि साबरमती येथे एक आश्रम उभारला.

०२. गांधी भारतात परतल्यावर त्यांच्या बोअर युद्धातील भूमिकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर एक हिंद’ हा हिताब देऊन गौरवले.

०३. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टीकोन अनुसरला.

०४. १९२० मध्ये लो. टिळकांचा मृत्यू झाल्यावर गांधी राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. त्यानंतर २६ जानेवारी १९३० काँग्रेस ने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले.

०५. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.
०६. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले.
०७. १९३९ च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि काँग्रेसने ब्रिटीश सरकारचा पाठींबा काढून घेतला. दरम्यान मुस्लीम लीगने ब्रिटनला सहकार्य केले.
०८. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्धभारत छोडो आंदोलन चालू केले.

०९. मुस्लिम लीगने गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले.