महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग २

महायुद्धातील भूमिका

०१. एप्रिल १९१८ ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय ने गांधीना दिल्लीत एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. १९०६ मधील झुलू युद्ध आणि १९१४ मधील प्रथम जागतिक युद्धामधील भरतीच्या विरुद्ध या वेळी जेव्हा त्यानी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले, तेंव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्न केला

चंपारण आणि खेडा सत्याग्रह

०१. गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, चंपारण येथे स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत.  चंपारण्य सत्याग्रह हा भारतातील गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता.
०२. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली.

०३. गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला.खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली

०४. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक “बापू” आणि “महात्मा” म्हणून करू लागले.

०५. त्यानंतर गांधीजींनी अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा संप यशस्वी केला.

यानंतर जलियांवाला बाग़ हत्याकांड घडल. त्यावेळी गांधींनी ब्रिटिश सरकारचा तीव्र निषेध केला. गांधींनी त्यावेळी ‘कैसर ए हिंद’ हा पुरस्कार परत केला.

असहकार

०१. डिसेंबर १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश स्वराज्य हा होता.
०२. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी, विशेषत: ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.
०३. पण असहकार चळवळ जोमात असतानाच अकस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले, उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलिस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात ३ जण मरण पावले तर पोलिस ठाण्यात २३ पोलिस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली.
०४. १० मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.
०५. गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता.
०६. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपासुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.

स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह

गांधीजींनी मार्च १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली. त्याची परिणिती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी. (२५० मैल) चा प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,००० हून अधिक लोकांना तुरूंगात डांबले.

दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन

०१. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या  महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना ‘अहिंसक नैतिक पाठिंबा‘ देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले.

०२. दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही. कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते.
०३. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना ‘भारत सोडून जा’ (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता.

०४. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या.

०५. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.

स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी

०१. १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला केली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते. त्यांच्या मते ही फाळणीची नांदी होती. पण जरी पक्ष गांधीजींचा सल्ला खचितच मानत असे, तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही.
०२. पंडित नेहरू आणि पटेलांना माहित होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीग कडे जाईल. १९४६ आणि १९४८ च्या दरम्यान ५,००० हून जास्त व्यक्ती दंगलींमध्ये मारले गेले.
०३. गांधीजींनी अशा प्रत्येक योजनेचा जोरदार विरोध केला जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकुल होते. अजून म्हणजे, मुस्लिम लीगचे नेते, मोहम्मद अली जिना यांना, पश्चिम पंजाब, सिंध, उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत आणि पूर्व बंगालमध्ये बराच पाठिंबा होता.
०४. हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांना माहित होते की, गांधीजी फाळणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही.
०५. गांधीजींच्या निकटच्या सहकाऱ्यांनी फाळणीचा त्या परिस्थितीतील सर्वोत्तम पर्याय म्हणून स्विकार केला होता. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे. शेवटी उध्वस्त गांधीजींनी आपली अनुमती दिली.
०६. त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. १९४७च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही.
०७. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल. सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवीत होते. या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते.
०८. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढवेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल.
०९. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत. शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले.

१०. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय हिंदू महासभा यांचे नेते यांचे तसेच अन्य हिंदू नेते, मुस्लिम नेते व शीख नेते यांनी हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडून शांतता राखण्याची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.

महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महात्मा मोहनदास करमचंद गांधी – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.