सामाजिक जीवन
०१. गांधीजींनी आपल्या सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याचा आरंभ महाराष्ट्रातच केला. त्यांचा पहिला आश्रम अहमदाबादनजीक कोचरब येथे सुरु झाला. परंतु त्या नंतरच्या काळात त्यांचे शिष्योत्तम विनोबाजी भावे यांचा पवनार आश्रम – परंधाम आश्रम वर्ध्यातच होता.

०२. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात.

०३. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती २ ऑक्टोबर भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

०४. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

०५. ब्रिटनमधील विन्सटन चर्चिल याने १९३० साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

०६. १९३२ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील (भूतपूर्व क्रिकेट खेळाडू) पी. बाळू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या.


०७. याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या करारास पुणे करार असे म्हटले जाते. येथून पुढे गांधीजींनी दलितांच्या उद्धारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन (देवाची माणसे) म्हणत. ८ मे १९३३ ला गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. 

०८. जातीभेद निर्मुलन करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अंतरजातीय आणि अंतरधर्मीय बेटीव्यवहार गांधींनी पुरस्कारला होता. व तसे विवाहदेखील त्यांनी घडवून आणले होते. प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबातील मुलांचे नातवंडांचे विवाह आंतरजातीय होते. 

०९. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. त्यांच्या मते दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे आणि ते संबोधन, उच्च जातीं दलितांच्या पालक आहेत, असे प्रतीत करते. 

१०. गांधीजी हे दलितांचे राजनैतिक हक्क हिरावून घेत आहेत असेपण आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना वाटत असे. आंबेडकरांसारखे दलित समाजातील नेते असतांनासुद्धा आणि स्वतः वैश्य असूनही, आपण दलितांची बाजू मांडू शकतो असा गांधीजींना विश्वास होता. 

११. बाळकोबा भावे यांनी सुरु केलेले धुळे येथील निसर्गोपचार केंद्र, पनवेल येथील अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी सुरु केलेले कुष्ठरोग सेवा केंद्र, उरळीकांचन येथील मणीबेन देसाई यांनी सुरु केलेला निसर्गोपचार आश्रम इत्यादी महाराष्ट्रातील निसर्गोपचारावर आधारलेली केंद्रे गांधींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली चालू झाली होती. 

१२. स्त्रियांना निरक्षर ठेवणे म्हणजे निसर्गातील एक समर्थ शक्ती वाया घालविण्यासारखे आहे, असे त्यांना वाटत होते. ‘स्त्रियांना शिकवा’ ही त्यांनी भारतीय समाजाला दिलेली हाक होती. त्यांनी कस्तुरबांना तर शिकविलेच शिवाय स्त्रीशिक्षण मोहिमेचे नेतृत्व कस्तूरबाच्या हाती सोपविले. 

१३. गांधीजींनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणासाठी शाळा सुरु करण्याची मोहीम हाती घेतली होती. देशातील अन्य प्रांतांच्या तुलनेत मुंबई प्रांताची शिक्षणाची टक्केवारी थोडीशी बरी होती. गांधीजींनी आपल्या राजकीय स्वातंत्र्य चळवळीच्या कामाच्या धबडग्यात शिक्षणासाठी काही वेळ दिला होता.
गांधीजींची तत्वे
०१. गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते. 
प्रसिद्ध वाक्ये
०१. “जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच.”

०२. “विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?”

०३. “डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला अंधळे करून सोडेल.”

०४. “अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन.”

०५. “मी भंगी आहे, सुत कातणारा आहे, विणकर आहे आणि मजूर आहे. मानवजातीला जे जे धंदे करावे लागतात त्यातील भंगीकाम हा एक अत्यंत सन्माननीय धंदा आहे असे मी मानतो”

०६. “ज्यासाठी मी जगात आहे आणि ज्यासाठी मरण्यात मला आनंद वाटेल, असे माझे इप्सित जर कोणते असेल तर ते म्हणजे अस्पृश्यतेचे समूळ निर्मुलन”

०७. “अस्पृश्यता जिवंत राहिली तर हिंदू धर्म मृत्य पावेल आणि हिंदू धर्म जिवंत राहावयास असेल तर अस्पृश्यता मृत्यू पावली पाहिजे”

०८. “प्रत्येक आई आपल्या भंग्याचे काम करते आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी मानवी शवांचे विच्छेदन करून कातडी सोलत असल्यामुळे चांभाराचे काम करतो. पण आपण त्यांचे हे व्यवसाय पवित्र किंवा डॉक्टर यांच्यापेक्षा भंगी व चांभार यांचे धंदे कमी पवित्र किंवा कमी उपयुक्त मुळीच नाहीत.

०९. “बहुजन समाजाच्या जीवनात मंदिरे अत्यंत महत्वाचे कार्य करीत असतात. हिंदू समाजातील बहिष्कृत लोकांना सर्व देवळे खुली झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. मंदिरातील अस्पृश्यता नष्ट झाली नाही तर मंदिरे नष्ट करावी लागतील.”
लेखन साहित्य

०१. गांधीजींनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती व हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले.या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.

०२. गांधीजींनी अनेक पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी “Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)” हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी “हिंद स्वराज” किंवा “Indian Home” ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या “Unto This Last” चे गुजराती भाषांतर केले आहे.

०३. गांधीजींचे पूर्ण लेखन भारत सरकारने “संकलित महात्मा गांधी” (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व ५०,००० पाने आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. 

०४. अनेक चरित्रकारांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. अमेरिकेच्या सैन्यदलातील कर्नल जी.बी. सिंग यांनी गांधीजींवर टीका करणारे पुस्तक Gandhi: Behind the Mask of Divinity प्रकाशित केले आहे. डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी “Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi” उल्लेखनीय आहे.

०५. अज्ञात गांधी नावाचे पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी “महात्मा गांधी”.

०६. राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’ हे गांधींचे चरित्र लिहिले आहे, मुक्ता शिरीष देशपांडे यांनी ते मराठीत आणले आहे. गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे) गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर) The Death & Afterlife of Mahatma Gandhi (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
गांधीजींवरील चित्रपट/नाटके
०१. ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटनबरो यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका बेन किंग्जले या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट इ.स. १९८१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ ऑस्कर पुरस्कार जिंकून त्या वेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले.

०२. ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ (१९९६), दिग्दर्शक : श्याम बेनेगल

०३. अॅन्ड गांधी गोज मिसिंग (मराठी लघुपट), दिग्दर्शक : देवेंद्र जाधव. सर्व भारतीय भाषांत अनुवाद

०४. गांधी आडवा येतो (मराठी नाटक), लेखक : शफाअतखान

०५. गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी, या नाटकाचे कानडीतही प्रयोग झाले आहेत.

०६. गांधी व्हर्सेस गांधी (मराठी नाटक), लेखक : अजित दळवी, या नाटकाचा डी.एस. चौधरी यांनी कानडी भाषेत अनुवाद केला आहे.

०७. मी नथूराम गोडसे बोलतोय (मराठी नाटक), लेखक : प्रदीप दळवी