जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी,  बागलकोट, कर्नाटक)

मृत्यू : २ जानेवारी १९४४ (मधुमेहाच्या आजारात निधन)
०१. विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठा कुटूंबात झाला. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते. त्यांच्या बालमनावर कुटुंबातील उदारमतांचा प्रभाव पडला.त्यांच्यावर जॉन स्टूअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर आणि मैक्स म्युलर या लेखकांच्या लेखनाचा प्रभाव होता. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्याच रुक्मिणी या आतेबहिणीबरोबर झाला.

०२. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखंडी येथेच झाले. १८९१ साली ते मैट्रीक उत्तीर्ण झाले. मैट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जमखिंडीच्याच हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी धरली. त्यानंतर १८९३ साली त्यांनी फर्ग्यूसन कॉलेज, पुणे येथे बी.ए. साठी प्रवेश घेतला १८९८ साली उत्तीर्ण होऊन पदवी मिळवली. या काळात त्यांना मराठा एज्युकेशन सोसायटी व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे सहाय्य मिळाले. 

०३. त्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर एल्.एल्.बी. परिक्षेकरता मुंबईला स्थलांतर केले. पण काही कारणामुळे त्यांनी हे शिक्षण अर्धवटच सोडले. 

०४. पुण्यात अमेरिकन ‘युनिटिरीयन मिशनरी’ रेव्ह. सदरलैंड यांच्या संपर्कात त्यांचा एकेश्वरवादी मताशी परिचय झाला. त्यानंतर याचवर्षी ते एकेश्वरवादी प्रार्थना समाजात सामील झाले. येथे त्यांच्यावर जी.बी. कोटकर, शिवरामपंत गोखले, न्यायमूर्ती रानडे, सर रामकृष्ण गोपाल भांडारकर आणि के.बी. मराठे यांचा प्रभाव पडला. व ते प्रार्थना समाजाचे पूर्णवेळ स्वंयसेवक बनले. 

०५. प्रार्थना समाज व ब्राह्मो समाजाच्या शिफारसीवरून ब्रिटीश आणि फॉरेन असोसिएशन ने १९०१ साली त्यांना मैंचेस्टर कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ), इंग्लंड येथे धर्मशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी पाठवले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी या कामात त्यांना आर्थिक मदत केली. १९०३ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी आपले कार्य प्रार्थना समाजाचे धर्मप्रसारक म्हणून पूर्ववत सुरु केले. १९०३ सालापासून त्यांनी प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे मासिक चालविले.

०६. सप्टेंबर १९०३ मध्ये एमस्टरडैम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदारधर्मवादी परिषदेत त्यांनी ‘भारतातील उदारधर्म’ या विषयावर निबंध सादर केला. त्यांनी जगातील सर्व उद्धार व सहिष्णू धर्मसुधारक चळवळीची माहिती सांगणारा इतिहास इंग्रजीत ‘थाईस्टिक डिक्शनरी’ या नावाने संग्रहित केला. १९०४ साली ‘मुंबई धर्म परिषद’ तर १९०५ साली त्यांनी मुंबई येथेच तरुण आस्तिकांचा संघ स्थापन केला.

०७. १९०५ मध्ये प्रार्थना समाजाच्या अहमदनगर येथील एका कार्यक्रमावेळी भिंगार नावाच्या छोट्या खेड्यातून भेटायला आलेल्या अस्पृश्यांनी आपली कर्मकहाणी त्यांना निवेदन केली. हे ऐकून त्यांच्या उद्धारासाठी एक मिशन सथापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यातूनच १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी ‘डीप्रेस्ड क्लास मिशन’ संस्थेची स्थापना केली. त्याचे पहिले अध्यक्ष न्या. चंदावरकर बनले.  १९२२ साली या संस्थेची ‘अहल्याश्रम’ ही इमारत पुणे येथे बांधण्यात आली. 

०८. अस्पृश्यता प्रथेपासून मुक्तता प्राप्त करणे, अस्पृश्यांना शिक्षणाच्या सुविधा प्रदान करणे, अस्पृश्यांसाठी शाळा तसेच महाविद्यालये व वस्तीगृहांची स्थापना करणे, त्यांचे सामाजिक प्रश्न सोडविणे ही या समाजाची उद्दिष्टे होती. यानंतर मात्र त्यांची जहाल राजकीय मते प्रार्थना समाजातील धुरिणांना पसंत पडली नाहीत. म्हणून १९१० साली त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध संपुष्टात आला. 

०९. तरीही १९०५ साली त्यांनी पुण्यात अस्पृश्य जातीच्या मुलांसाठी रात्रशाळेची स्थापना, १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य, १९२८ मध्ये पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना, १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाचे धर्मकार्य अशा कार्यक्रमात ते निष्ठेने धर्मकार्य करीत होते.

१०. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी, इंग्लंडमधील डोमेस्टिक मिशनच्या धर्तीवर दयाराम गिड्डमल यांच्या सहकार्याने  ‘निराश्रित सेवासदन’ जुलै १९०७ मध्ये सुरु केले. या सेवासदनाच्या कार्यात शिंदे यांची बहीण जनाक्का व इतर महिलांनी पुढाकार घेतला. या कामासाठी शिंदे यांचे आई वडील, बहीण ही सगळी मंडळी अस्पृश्य वस्तीत जाऊन राहिली.

११. अस्पृश्य निराधार पुरुषांची ‘सोमवंशीय मित्र समाज’ ही संस्था २४ मार्च १९०७ रोजी स्थापन करण्यात आली. उपासना व उपदेश यांसाठी ‘भजन समाज’ सुरु करण्यात आला. जर्मन तज्ज्ञाच्या मदतीने चामड्याचे बूट तयार करण्याचा एक कारखानाही सुरु करण्यात आला. मिशनच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणून ‘प्युरीटी सर्व्हंट’ हे मासिक सुरु करण्यात आले. १९१० साली त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरु केली. १९११ साली त्यांनी मुंबईत ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ आयोजित केली होती. रावजी भोसले यांच्या सहाय्याने पुण्यात अनाथाश्रम काढला.


१२. १९०९ मध्ये मिशनच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एक जाहीर सभा त्यांनी बोलविली. त्याचवेळी त्यांनी ‘अस्पृश्यता निवारण परिषद’ बोलावून मिशनची ‘महाराष्ट्र परिषद’ आयोजित करण्याची पूर्वतयारी केली. मिशनच्या कार्यास अर्धे ताप पूर्ण झाल्याने ही परिषद पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ‘एम्पी थियेटर’ मध्ये ५ ऑक्टोबर १९१२ रोजी डॉ. रा.गो. भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली.


१३. महाराष्ट्र परिषदेसाठी आलेले मातंग समाजाचे पुढारी श्रीपतराव नांदणे यांनी सरसकट गुन्हेगार मानलेल्या जमातीसाठी इंग्रज सरकारने जमीन कसण्यासाठी द्यावी व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी उद्योग उभारावेत अशी कल्पना परिषदेत मांडली होती. त्यासाठी जून १९१४ मध्ये गवर्नर हेरॉल्ड मैन यांच्याकडून सातारा व पुणे जिल्ह्यात सुमारे ४०० एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न महर्षी शिंदे यांनी चालविला. 

१४. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना जागा मिळाली पण ‘शेतकी खेडे’ उभे राहणार इतक्यातच पहिले महायुद्ध सुरु झाले आणि शेतकी खेड्यासाठी ठरविलेली जागा सैनिकांच्या कुटुंबासाठी राखून ठेवण्याचे सरकारने ठरविले. परिणामी शेतकी खेड्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सोडून द्यावा लागला. 

१५. १९१७ साली त्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे अस्पृश्यतेच्या निषेधासंबंधित ठराव पारित करून घेण्यात यश आले. १९१८ ते १९२० या काळात त्यांनी अस्पृश्यता निर्मुलन परिषदा आयोजित केल्या. यातील काही परिषदा महात्मा गांधी व सयाजीराव गायकवाड (१९१८) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. २३ मार्च १९१८ रोजी त्यांनी अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला. त्याच वर्षी मराठा समाजात जागृति निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली.

१६. १९१९ साली त्यांनी ‘दक्षिण मतदारसंघ आयोगा’समोर साक्ष दिली व अस्पृश्यांसाठी विशेष प्रतिनिधित्वाची मागणी केली. १९२० साली पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था केली.


१७. १९२३ साली त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कार्यकारी प्रमुख पदाचा राजीनामा दिला. कारण मिशनच्या अस्पृश्य सदस्यांना असे वाटत होते कि संस्थेचा कार्यभार स्वतः अस्पृश्य असलेल्या व्यक्तीने पाहावा. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांना विरोध केला व निराश केले तरी मिशनचे कार्य करणे सोडले नाही. १९२१ साली त्रावणकोर राज्यातील अस्पृश्यांच्या वैकोम सत्यागृहात सहभाग घेतला. 

१८. मुंबईच्या प्रांतिक कौन्सिलने शेतीसंबंधी सारावाढ आणि तुकडेबंदी बिल १९२८ मध्ये कायदेमंडळात आणले होते. त्यास विरोध करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मनापासून प्रयत्न केले. २५ जुलै १९२८ रोजी महर्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे शेतकरी परिषद अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

१९. १९३० साली त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना १८ मे १९३० रोजी अटक झाली व येरवडा तुरुंगात ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 

२०. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. Indian Social reformer (1905), बहिष्कृत भारत (१९०८), अस्पृश्यता निवारणाचा इतिहास (१९२२), ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग (१९२७) ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. याशिवाय त्यांचे वृत्तपत्रीय लेखसंग्रह विठ्ठल रामजी शिंदे यांचा लेख, व्याख्याने, उपदेश (१९१२), शिंदे लेखसंग्रह (१९६३), धर्मजीवन व तत्वज्ञान (१९७९), येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी (१९७९), माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र (१९४३ व १९५८) Untouchable India, History of Partha, Thiestic Directory हे प्रसिद्ध आहेत. 

२१. १९३३ प्रकाशित झालेल्या ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या पुस्तकात त्यांनी जातिव्यवस्थेचा, मूर्तीपूजेचा, भेदभावाचा धिक्कार केला. त्यात त्यांनी भक्ताच्या आणि देवाच्या मध्ये पंडिताची गरज नाही असे प्रतिपादन केले. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला. १९३५ सालच्या बडोदा मराठी साहित्य संमेलनात ते तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष होते.


२२. १९३७ साली त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली. स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ तर वृद्धांसाठी संगत सभा या संस्थांची शिंदे यांनी स्थापना केली. शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम राबविली. अस्पृश्यांसाठी रूपी फंड हा प्रकार सुरु केला.


२२. १९३२ साली त्यांना बडोदा संस्थांचे सयाजीराव गायकवाड पारितोषिक प्रदान करण्यात आले. ग.बा. सरदार यांनी त्यांचा ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ असा तर भाई माधवराव बागल यांनी ‘निष्काम कर्मयोगी’ अशा उपाधींनी गौरव केला आहे. जनतेकडून त्यांचा ‘कर्मवीर’, ‘महर्षी’ अशा नामाने गौरव केला जातो.