वॉरेन हेस्टिंग्ज

०१. १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यात लाचखोरी वाढली होती. बंगालमध्ये अराजकता वाढली होती. ८ फेब्रुवारी १७८५ पर्यंत तो गवर्नर जनरल होता.

०२. या काळात मुगल बादशहा शाह आलमने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सत्ता या काळात प्रबळ होत्या. हेस्टिंग्जने अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. त्याने अयोध्येच्या बेगम प्रकरणात कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.
०३. वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. हैदरशी दुसरे युध्द हेस्टिंग्जच्या काळातच १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.

हेस्टिंग्जच्या प्रशासकीय सुधारणा

०१. १७७२ मध्ये कंपनीच्या संचालकांनी दुहेरी शासनव्यवस्था समाप्त करण्याचा निर्णय घेतला आणि कलकत्ता कौन्सिलला असा आदेश दिला कि, बंगाल प्रांताची संपूर्ण व्यवस्था त्यांनी आपल्याकडे घ्यावी. त्यानुसार वॉंरेन हेस्टिंग्जने नायब दिवाणांना पदच्युत केले.
०२. त्याने कौन्सिलचे सदस्य आणि प्रमुख ह्यांचा समावेश असलेले राजस्व मंडळ (Revenue Board) स्थापन करून कर व्यवस्थेसाठी कर संग्राहक नियुक्त केले. राजकोष मुर्शिदाबाद्वारून कलकत्त्याला आणण्यात आला. त्यामुळे नबाबाला कोणताही अधिकार राहिला नाही. याने बंगालची संपूर्ण सत्ता कंपनीकडे आली. नबाबाच्या खर्चासाठी भत्ता ३२ लक्ष रुपयाहून कमी करून १६ लक्ष रुपये करण्यात आला. मोगल सम्राटाला १७६५ पासून दिले जाणारे २६ लक्ष रुपये बंद करण्यात आले.

हेस्टिंग्जच्या भूमी कर सुधारणा

०१. १७७२ मध्ये हेस्टिंग्जने कर गोळा करण्याचे अधिकार सर्वात जास्त बोली लावणाऱ्यास पाच वर्षांकरिता दिले. त्यामुळे जमीनदार वर्ग मागे पडला. ही पंचवर्षीय बोलीपद्धती यशस्वी ठरली नाही. शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. बहुतांश ठेकेदारांना कृषीविषयी माहिती आणि रुची नव्हती. त्यांना फक्त शेतकऱ्यांपासून जास्तीत जास्त कर वसूल करायचा होता.

०२. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा ह्या बोलीत आपल्या नोकरांच्या व दलालांच्या सहाय्याने भाग घेतला. स्वतः हेस्टिंग्जसुद्धा मोह आवरु शकला नाही. ह्या पद्धतीच दोष म्हणजे कराची जास्त रक्कम ठरवली जाई. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम गोळा होत नसे. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी बोलीची रक्कम भरणा केली नाही. कर संग्रहाच्या बाबतीत १७७७ मध्ये बोली पंचवर्षीय समाप्त करून एकवर्षीय करण्यात आली. ह्यावेळी जमीनदारांना संधी मिळाली.

०३. हेस्टिंग्जने १७७३ मध्ये काही बदल केले. भ्रष्ट व खाजगी व्यापारात गुंतलेल्या कलेक्टरांना हटवून त्यांच्या जागी जिल्ह्यांमध्ये भारतीय दिवाण नियुक्त केले. त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ प्रांतीय मंडळे स्थापन करण्यात आली. हि मंडळे कलकत्त्याच्या राजस्व मंडळाच्या नियंत्रणाखाली होती.
०४. १७८१ मध्ये ह्या व्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार प्रांतीय मंडळे समाप्त करण्यात आली. जिल्ह्यांमध्ये पुन्हा कलेक्टर नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांना करनिर्धारणाचे अधिकार नव्हते. संपूर्ण कर व्यवस्थेवर केंद्रीय (कलकत्तास्थित ) राजस्व मंडळाचे नियंत्रण पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले. कोणतीही निश्चित करप्रणाली लागू करण्यात हेस्टिंग्जला यश आले नाही. त्याचे मुख्य कारण त्याची केंद्रीकरणाची नीती होती

हेस्टिंग्जच्या न्यायालयीन सुधारणा

०१. न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वॉरन हेस्टिंग्ज याने दहा विद्वान पंडितांची एक समिती स्थापन करून हिंदू कायद्याचे संहितीकरण केले. जिल्हा कोर्टाची कागदपत्रे सदर दिवाणी अदालतकडे पाठविण्याची पध्दत सुरु केली. न्यायाधीशांना नियमितपणे पगाराची व्यवस्था केली. शांतता व व्यवस्था राखण्यासाठी प्रत्यके जिल्हयात एक फौजदार नियुक्त केला. त्याच्याकडे गुन्हयाचा शोध व गुन्हेगाराला पकडणे हे कार्य त्याच्याकडे सोपविले.
०२. हेस्टिंग्जने अमलात आणलेली न्यायव्यवस्था मुगलांचीच होती. त्याने १७७२ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक दिवाणी व एक फौजदारी न्यायालय स्थापन करण्यात आले.
०३. दिवाणी न्यायालयाचा मुख्य कलेक्टर होता. तेथे तो स्थानिक दिवाणच्या मदतीने न्यायदानाचे कार्य करीत असे. हिंदूंसाठी हिंदू कायदे आणि मुस्लिमांसाठी मुस्लीम कायदे वापरले जात. ह्या जिल्हा न्यायालयात ५०० रुपयापर्यंतचे खटले चालत असत. त्याच्यावर सदर न्यायालयात अपील करता येत असे. ह्या न्यायालयात गव्हर्नर आणि त्याच्या कौन्सिलचे दोन सदस्य राहत. त्यांच्या मदतीसाठी भारतीय अधिकारी राहत.
०४. फौजदारी न्यायालय भारतीयांकडे सोपविण्यात आले. तेथे काझी हा न्यायाधीशांचे कार्य करीत असे. तो मुफ्ती व दोन मौलवी यांच्या मदतीने कार्य करत असे. त्यांच्या कार्यावर कलेक्टरचे नियंत्रण असे.  न्यायालयाचे कामकाज खुल्या जागेत चालत असे आणि तेथे मुस्लिम कायदा लागू होता. जिल्हा फौजदारी न्यायालयाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला तसेच संपत्तीच्या जप्तीला सदर फौजदारी न्यायालयाची समती आवश्यक होती.
०५. जिल्हा फौजदारी न्यायालयाच्यावर सदर फौजदारी न्यायालय होते. त्यात सदर काजी, सदर मुफ्ती आणि तीन मौलवी असा अधिकारी वर्ग होता. ह्या न्यायालयाच्या कामकाजावर गव्हर्नर व त्याच्या कौन्सिलचे निरीक्षण होते.
०६. दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कार्यक्षेत्र ठरवून दिले होते. दिवाणी न्यायालयात चोरी, दरोडे, फसवाफसवी, खून, यासारखे खटले असत. न्यायालय यंत्रणेत सुव्यवस्था आणण्यासाठी जिल्हयातील सर्व कोर्टानी व वरिष्ठ कोर्टानी खटल्याची सर्व माहिती ठेवावी अशी तरतूद हेस्टिंग्जने केली.
०७. १७७३ च्या नियमनाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले. त्याच्या अधिकारक्षेत्रात कलकत्त्याला राहणारे सर्व भारतीय व इंग्रज होते. सुप्रीम कोर्ट आणि सदर न्यायालये यांचे कार्यक्षेत्रे अस्पष्ट असल्याने परस्पर संघर्ष होता.

हेस्टिंग्जच्याआर्थिक सुधारणा

०१. अंतर्गत व्यापारातील अनेक अडथळे हेस्टिंग्जने दूर केले. ठिकठिकाणचे जकात नाके बंद करून कलकत्ता, हुगळी, ढाका, मुर्शिदाबाद व पटना ह्या महत्वाच्या ठिकाणी जकात नाके ठेवले. व्यापारावरील कर अडीच टक्के ठेवला गेला. व्यापारात अनेक सवलती देणारी परवाना पत्रके त्याने रद्द केली.
०२. त्याने कंपनीच्या गुमास्ताद्वारे विणकरांचे होत असलेले शोषण थांबविले. इजिप्त, भूतान व तिबेट ह्या देशांशी व्यापार वाढवण्यासाठी तेथे शिष्टमंडळे पाठविली.

पेंढाऱ्यांचा बंदोबस्त

०१. पेंढाऱ्यांचा पहिला उल्लेख मुगलांच्या १६८९ मधील महाराष्ट्रावरील आक्रमणासमयीचा आहे. पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळापासून पेंढारी मराठ्याच्या बाजूने लढत असत. पानिपतच्या पराभवानंतर पेंढारी माळव्यात राहू लागले. ते शिंदे, होळकर आणि निजामाकडे सहाय्यक सैनिक म्हणून कार्य करू लागले. मल्हारराव होळकराने पेंढाऱ्यांना सोनेरी ध्वज दिला होता. शिंद्यांनी १७९४ मध्ये त्यांना नर्मदेच्या खोऱ्यात जहागीर दिली.

०२. माल्कम पेंढाऱ्यांचा उल्लेख ‘मराठा शिकाऱ्यासोबतचे शिकारी कुत्रे’ असे करत असे. मराठा सत्ता क्षीण झाल्यानंतर पेंढाऱ्यांचा उपद्रव वाढला. त्यांनी त्यानंतर मराठा प्रदेशातच लुट करायला सुरुवात केली. या काळात त्यांची संख्यासुद्धा वाढली.

०३. वेलस्लीच्या काळात अनेक संस्थाने खालसा झाली. त्यामुळे बेरोजगार झालेले संस्थानिकांचे सैनिक पेंढाऱ्यांना सामील झाले. सर्व ठिकाणचे सैनिक असल्याने पेंढाऱ्यांचा कोणता विशिष्ट धर्म किंवा जात नव्हती. त्यांचा एकाच उद्योग होता तो म्हणजे लुटमार करणे.

०४. १९ व्या शतकाच्या प्रारंभी पेंढाऱ्यांचे चीतु, वासिल मोहम्मद व करीम खान असे तीन पुढारी होते. १८१२ मध्ये त्यांनी इंग्रजांच्या मिर्जापूर व शहाबाद जिल्ह्यांवर आक्रमण केले. १८१५ मध्ये निजामाचा प्रदेश लुटला. १८१६ मध्ये उत्तर सरकार प्रदेश लुटला. त्यामुळे पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे लॉर्ड हेस्टिंग्जने ठरविले.

०५. इंग्रजांच्या गृहीतानुसार मराठे, अफगाण व पेंढारी यांचा एक संघ होता. दौलतराव शिंदे त्यांचा मुख्य होता. त्यामुळे मराठ्यांना रोखणे हा हेस्टिंग्जसमोरचा दुसरा भाग होता. हेस्टिंग्जची पेंढाऱ्यांच्या विरोधातील मोहीम तृतीय इंग्रज-मराठा युद्धात परावर्तीत झाली.

०६. हेस्टिंग्जने १,१३,०००सैनिक व ३०० तोफा असे सैन्य एकत्र केले. त्याचे दोन भाग करून उत्तरेकडील जबाबदारी स्वतःकडे घेतली व दक्षिण सेनेचे नेतृत्व थॉमस हिस्लॉपकडे सोपविले. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांना चंबळ नदीच्या पलीकडे रेटण्यात आले. जानेवारी १८१८ पर्यंत त्यांचे संघटन मोडण्यात आले.

०७. त्यामुळे पेंढाऱ्यांचा पुढारी करीम खानने माल्कम समोर शरणागती पत्करली. वसिल मुहम्मदने शिंद्याकडे आश्रय घेतला. पण त्याला इंग्रजांकडे सोपविण्यात आले. इंग्रजांनी त्याला गाझीपूर येथील तुरुंगात ठेवले. तेथेच त्याने आत्महत्या केली. चीतू जंगलात निघून गेला. पण तेथे त्याला वाघाने ठार केले. १८२४ पर्यंत पेंढारी पूर्णतः नष्ट झाले.