पहिले अफगाण युद्ध (१८३८-१८४२) 

०१. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले.

०२. याच सुमारास रणजितसिंगाने अफगाणचा पेशावर प्रांत जिंकून घेतला होता. तो परत मिळविण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला. 
०३. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले. 

०४. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली. शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली. इंग्रजांनी १८३९ च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल जिंकून घेतले.

०५. दोस्त महंमद बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले. इंग्रजांनी शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण चिडले. 


०६. दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करुन १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून केले. त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. 

०७. बाहेरुनही मदत मिळण्यास इंग्रजांना अडचण पडू लागली. गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करुन इंग्रजांनी माघार घेतली. 

०८. या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून केला. ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले. आणि इंग्रजांचा पराभव झाला. 
दुसरे अफगाण युद्ध (१८७५-१८७९). 

०१. वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अफगाणिस्तानचा अमीर झाला. रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली. परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली. 

०२. रशियाचा वकील काबलला जाताच गव्हर्नर जनरल लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला. शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले. 

०३. जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले. इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला. 

०४. या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात आली. अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा मैवंद येथे पराभव केला. 

०५. शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले. इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंदमकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला. या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला.

तिसरे अफगाण युद्ध (१९१९) 
०१. पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अमीर अमानुल्ला याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले. 

०२. हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते. अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले. 

०३. १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला .अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.


इंग्रज-रोहिला युद्ध(१७७२-१७७४)
०१. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली. 


०२. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराभवानंतर मराठ्यांनी १७६९-७० पासून उत्तर भारतात परत स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यामुळे १७७२ मध्ये रोहिल्यांनी अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला याच्याशी तह केला. या तहानुसार मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केल्यास नबाबाने रोहिल्यांना लष्करी मदत करावी व त्याबद्दल रोहिल्यांनी नबाबाला चाळीस लक्ष रूपये द्यावे,असे ठरले. 


०३. १७७२ मध्ये मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली, तथापि माधवराव पेशव्याचा मृत्यु व नारायणराव पेशव्याचा खून ह्या पुण्यातील घटनांमुळे त्यांना त्वरीत दक्षिणेस परतावे लागले. या युद्धात लष्करी मदतीची गरज न पडताही नबाबाने रोहिल्यांकडून चाळीस लक्ष रूपयांची मागणी केली. ही मागणी रोहिल्यांनी नाकारताच नबाबाने इंग्रजांबरोबर रोहिलखंड जिंकण्यासाठी तह केला. 


०४. या तहानुसार इंग्रजांनी नबाबाला रोहिलखंड घेण्यासाठी लष्करी मदत करावी व त्याबद्दल त्याने इंग्रजांना युद्धाचा खर्च व चाळीस लक्ष रूपये द्यावे असे ठरले. या तहान्वये अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास वॉरन हेस्टिंग्जला संधी मिळाली. 


०५. शुजाउद्दौलाने इंग्रजी सैन्याच्या मदतीने कत्रा व मीरानपूर येथे रोहिल्यांचा पराभव केला. रोहिल्यांचा प्रमुख हाफिज रहमत खान हा या युद्धात मारला गेला व वीस हजार रोहिल्यांना हद्दपार करण्यात आले. रोहिलखंडाचा प्रदेश अयोध्येला जोडून घेण्यात आला. पुढे १८५६ मध्ये अयोध्येच्या संस्थानाबरोबरच रोहिलखंडाचा प्रदेशही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात आला.


०६. मराठ्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यापासून बंगाल प्रांताचे संरक्षण करण्यासाठी हेस्टिंग्जने रोहिलखंड अयोध्येला जोडून ते बलवान मध्यवर्ती राज्य बनविले. या युद्धामुळे बंगालमधील ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली. तथापि इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर हेस्टिंग्जवर शुजाउद्दौल्याला इंग्रजी सैन्याची मदत देऊन रोहिल्यांशी युद्ध ओढवून घेतले व केवळ पैशाच्या अपेक्षेने इंग्रजी सैन्य भाड्याने दिले,असे आरोप करण्यात आले.