१८५७ चा उठाव – भाग १

१८५७ चा उठाव – भाग १

१८५७ चा उठाव – भाग १

उठावाची पूर्वपीठिका

०१. १७५७ ते १८५६ हा इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. १८५६ पर्यंत संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.

०२. १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा ‘राष्ट्रीय उठाव’ म्हणून प्रसिध्द आहे. हे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला.

०३. हा उठाव एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द जो असंतोष होता. त्याचाच परिपाक या उठावाने झाला.

०४. ब्रिटिशांनी भारत जिंकले व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.

०५. शेती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.

०६. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे. देशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही. शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी १७६३ ते १८६ च्या दरम्यान किमान ४० मोठे लष्करी संघर्ष झाले होते.

०७. त्यात जनतेचा सहभाग मोठा असला तरी त्यांचे स्वरूप व परिणाम स्थानिकच होते आणि हे उठाव एकमेकांपासून अगदी अलग होते.१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.

संथाळांचे बंड (१८५५-१८५६)

०१. मानभूम, बारभूम, हजारीबाग, मिदनापूर, बांकूश, वीरभूम, प्रदेशात राहणारे संथाळ शांतताप्रिय व साधे लोक होते. शतकानूशतके जी जमीन संथाळ कसत होते, ती बंगालच्या १७९३ च्या कायमधारा पध्दतीमुळे जमीनदारांची झाली.

०२. या जमीनदारांनी जास्त करांची मागणी केल्यामुळे हे शांतताप्रिय लोक आपली पितृभूमी सोडून राजमहालच्या तर्वतीय भागात गेले. तेथील जंगले मोठया परिश्रमाने कापून त्यांनी शेतीयोग्य जमीन तयार केली. पण जमीनदारांनी त्यावरही आपला मालकीहक्क सांगितला.

०३. आपले उत्पन्न, पशुधन, स्व:त, परिवार सर्वकाही कर्जापायी सावकारांच्या घशात गेल्यावरही कर्ज शिल्लक राहिल्याचे पाहणे संथाळांच्या नशिबी आले. त्यापेक्षाही तिरस्कारीची गोष्ट अशी होती, की पोलिस जमीन महसूल अधिकारी आणि न्याय अधिकारी सावकारांचीच बाजू घेऊन संथाळांवर अन्याय व अत्याचार करीत होते.

०४. संथाळांचा खरा राग बंगाल व उत्तर भारतातील शहरी लोकांवर होता. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले, की त्यांचे रक्षण करण्याऐवजी अधिकारी शोषण करणाऱ्याची बाजू घेतात. त्यानंतर जुन १८५५ मध्ये संथाळांनी सिदो मुर्मू व कान्हू मुर्मू या दोन भावांच्या नेतृत्वाखाली घोषणा केली की, ते देश आपल्या ताब्यात घेऊन तेथे आपले सरकार बनवतील.

०५. यानंतर संथाळांनी भागलपूर व राजमहाल यांच्यामधील रेल्वे व तारायंत्रे उदध्वस्त केली. तेथे कंपनीची सत्ता संपुष्टांत आल्याची व आपला स्वतंत्र परगणा स्थापन झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे सरकारने त्वरीत लष्करी कारवाई केली. लष्कराला तोंड देता न आल्याने संथाळांनी जंगलाचा आश्रय घेतला व लढा सुरुच ठेवला. त्यामुळे मेजर बरो यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजेला अपमानकारक पराभव पत्कारला लागला.

०६. त्यानंतर मोठया प्रमाणावर लष्करी कारवाई ब्रिटिशांना करावी लागली फेब्रुवारी १८५६ मध्ये संथाळ नेत्यांना पकडण्यात आले आणि बंड अतिशय क्रुरतेने दडपून टाकण्यात आले. परंतु संथाळांचा राग शांत करण्यासाठी सरकारला स्वतंत्र संथाल जिल्हा (परगणा) निर्माण करावा लागला.

१८५७ च्या उठावाची पार्श्वभूमी

०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची व सरंजामदारांची वतने खालसा केल्यामूळे व अनेक सत्ताधीशांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्यामुळे असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले.

०२. मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला. भारतातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी १८२७ मध्ये उठाव केला. ब्रिटिशांनी त्यांची घरे-दारे जाळली व बंड संपविले.

०३. मुंडा आदिवासींनी १८३१ मध्ये रांची, हजारीबाग, पालमाऊ व मानभूम येथे उठाव केला. मोठ्या प्रमाणात लष्करी बलाचा वापर करून १८३७ साली ब्रिटिशांनी तो उठाव संपविला.

०४. १८३२ मध्ये बारभूमचा आदिवासी राजा गंगानारायण यानेही बंड उभारले. त्याचवर्षी ब्रिटिशांनी तो उठाव संपविला.

०५. उत्तर पूर्व भागातील खासी टेकडयांवरील आदिवासींनी १८२९ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. त्यावेळी त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या भागात रस्ता बांधण्यापासून रोखले होते. ब्रिटिशांनी शस्त्राच्या बलाने खासिंना शरण आणले.

०६. कापसाचोर आकसचा प्रमुख तागी राजा याने त्या भागातील आदिवासींना १८३५ मध्ये ब्रिटीशाविरुद्ध बंडास प्रवृत्त केले. १८४२ मध्ये ब्रिटिशांनी ते बंद कसेबसे शमविले.

०७. नागा बंडखोरांनी १८४९ मध्ये ब्रिटीशाविरुद्ध उठाव केला होता.

०८. लुशाई व मणिपूर टिपेरा टेकड्यातील कुफी बंडखोरांनी १८२९ मध्ये उठाव केला. त्यानंतर १८४४ व १८४९ या सालीही त्यांचे ब्रिटीशांवर हल्ले सुरूच होते. पण १८५० साली त्यांना ब्रिटीशांच्या आधुनिक शस्त्रास्त्रापुढे शरणागती पत्करावी लागली.

०९. ओरिसातील खोंडा आदिवासी तसेच बिहारमधील संथाळांचा उठाव ही ब्रिटिशांना हादरा देणारा ठरला. त्यांनी तेथील महाजन जमीनदाराच्या जुल्माविरुद्ध शस्त्रे उचलली होती. महाजनांना ब्रिटीशांचा पाठींबा होता. त्यामुळे त्यांचा ब्रिटीशांवरसुद्धा राग होता. १८५६ मध्ये या आदिवासींची बंडे ब्रिटिशांनी मोडून काढली.

१०. १८०६ साली वेल्लोर येथील इंग्रजांच्या पलटणीतील हिंदू शिपायांनी गंध लावणे, शेंडी राखणे, लुंगी वापरणे यास बंदी घालताच उठवाचे हत्यार उपसले.

११. १८२४ मध्ये ब्रिटिशांनी बराकपूरच्या छावणीतील शिपायांना ब्रह्मदेशच्या युद्धासाठी पाठविण्याचे ठरविले, त्या वेळी समुद्र पर्यटन धर्मविरोधी असल्याच्या कारणावरून त्याला त्या शिपायांनी विरोध केला होता.

१२. १८५७ च्या उठावाची सुरवात १० मे या दिवशी झाली. इस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकाऱ्याना ठार मारले. नंतर ते दिल्लीवर चाल करुन गेले. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला व मोगलांचे प्रतिष्ठेचे नाव लावणार्या दुसऱ्या बहादूरशहाच्या नावे भारताचा सम्राट म्हणून द्वाही फिरविली.

१३. मुळात त्या सर्वामागे ब्रिटिश सत्तेविरुध्दचा असंतोष होता. कारण हे शिपाई झाले तरी भारतीय समाजातलेच होते. ते एकप्रकारे गणवेशातील शेतकरीच होते.

१४. भारतीय अर्थव्यवस्था नष्ट झाली, तिला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविण्यात आले आणि देशाची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात आली हे होय. सर्वात वर म्हणजे जमीनमहसूल वाढविण्याच्या वसाहतवादी धोरणामुळे बऱ्याच शेतकऱ्याना आपल्या जमिनीलाच मुकावे लागले. परंपरागत हस्तव्यवसायही नष्ट झाल्याने लक्षावधी कारागिरांवर बेकारी आणि दारिद्रय ओढवले.

१५. शेतकरी व कारागीरांच्या या आर्थिक दुरवस्थेमुळे १७७० पर्यंत १२ वेळा मोठा व कित्येकदा छोटे दुष्काळ पडले. हजारो जमीनदार व पाळेगारांचे शेतीच्या वसुलीवर आणि स्वत:च्या शेतजमिनीवरच नियंत्रण राहिले नाही. शेकडो वतनदारांची वतने नष्ट झाली.

१८५७ चा उठाव भाग-२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Scroll to Top