१८५७ चा उठाव – भाग ४

१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे

०१. १८५७ चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, अवध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. उठावाचे क्षेत्र मर्यादित होते.

०२. मध्य व पूर्व बंगाल शांत राहिला. अफगाणिस्तानचा राजा दोस्त महम्मद याने इंग्रजांवर आलेल्या संकटाच्या संधीचा फायदा उठविला नाही. पंजाबी शीख व गुरखे यांनी इंग्रजांना पाठींबा दिला. शिंदे, होळकर तसेच हैद्राबाद, पतियाला, जिंद, कपुरथला इत्यादी भागांचे संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. देशाचा फक्त १/६ प्रदेश यात गुंतला होता. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकला.

०३. उठावात योग्य नेतृत्वाचा अभाव होता. अन्यथा उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. हिंदी सैनिकांत अनेकांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. मात्र यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.

०४. या उठावात एकाच ध्येयाचा अभाव होता. १८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता. उठावात समन्वय राखून मार्गदर्शन करणारे एकमुखी नेतृत्व उठाववाल्यांकडे नव्हते. त्यामुळे उठावात विस्कळीतपणा आला.

०५. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झाशीसाठी रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.

०६. ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला. उठाववाल्यात शिस्तीचा अभाव व शस्त्रांची कमतरता होती.

०७. १८५७ च्या उठावात सामान्य जनता काहीप्रमाणात सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा मिळावयास होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले. उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली. यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.

०८. उठाववाल्यांत वेळेचे नियोजन नव्हते. मोकळ्या वेळेत पुढील आक्रमणाची तयारी व आवश्यक रसद मिळविण्यात ते कमी पडले. हा उठाव फक्त शहरी भागांपुरताच मर्यादित होता. हा उठाव ग्रामीण भागात पोहोचला असता तर इंग्रजांची खैर नव्हती. उठावातील बंगाली फौजेच्या दुर्वर्तनामुळे त्यांना बंगाली जनतेचा पाठींबा मिळू शकला नाही. जनतेत त्यांच्याविरुद्ध इतकी द्वेषभावना होती कि, त्यांच्याविरुद्ध जनतेने इंग्रजांनाच मदत केली.

०९. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली, त्यांचे डावपेच, सैन्य याबाबतची माहिती पुरविणाऱ्याला बक्षिसे, जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानीही ब्रिटिशांच्या हाती लागले. उठाव दडपून टाकण्याकरिता इंग्रजांनी कोणताही विधीनिषेध न बाळगता भयंकर अत्याचार केले.

१०. लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. ब्रिटिशांना शस्त्रे दारुगोळा यांचा पुरवठा कायम राहिला. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयुरोजने केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा पराभव केला. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो, “मला गोऱ्या इंग्रजांची भीती वाटत नाही. पण त्यांच्या हाती असणाऱ्या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.

११. लॉर्ड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे तारायंत्र पोस्ट, रस्ते, यांच्या सोयी उपलब्ध केल्या. १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला. तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली. तर रेल्वेच्याद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्कारी कुमक पाठविणे ब्रिटिशांना शक्य झाले.

१२. उठावाचे नेतृत्व करणारे भारतीय पराक्रमी साहसी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी अत्यंत पराक्रमी, अनुभवी व मुत्सदी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबध्द होत्या. त्यामुळे त्यांचा विजय झाला.

१३. १८५७ चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल र्लॉड कॅनिनंने इंग्लंडमधून १ लक्ष १२ हजाराची फौज आणली. ही मदत रोखण्याची कोणतीच यंत्रणा उठाववाल्यांकडे नव्हती. मदत मिळविण्यासाठी भारतातील बंदरे ब्रिटीशांसाठी सुरक्षित होती. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकुल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती. त्यामुळे १८५७ च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकता आला.

१४. उठावात भाग घेतलेल्या संस्थानिकांत फार मोठ्या प्रमाणात द्वेषभावना होती. मराठे राजपुतांच्या विरोधात होते. मराठ्यांना पेशव्यांचे राज्य येण्याची भीती वाटत होती. मुघलांनी शिखांना पूर्वी फार छळले होते. त्यामुळे शीख मुगलांच्या विरोधात होते. त्यामुळे सलग असा देशव्यापी उठाव झालाच नाही.

१५. गवर्नर जनरल कॅन्निंगहम म्हणतो कि, “शिंदे बंडवाल्यांना मिळाले असते तर आम्हाला गाशा गुंडाळावा लागला असता.”

१६. मौलाना अबुल कलाम आझाद उठावाच्या अपयशाचे विश्लेषण करताना प्रतिपादन करतात, “The Leaders of Revolt were mutually jealous and continually intriguing against one another. In Fact, the personal jealousies were largely responsible for the Indian defeat.”

नीळ उत्पादकांचे बंड (१८६०)

०१. १८५७ च्या उठावानंतर इतर कोणते असे मोठे बंड झाले नाही. पण १९६० साली नीळ उत्पादकांनी बंड केले होते. त्याची नोंद येथे घ्यावे लागेल. आपल्या मालकीच्या जमिनीवर एखाद्या सरंजामदाराप्रमाणे वागणाऱ्या  इंग्रज जमीनदारांविरुध्द हे बंड झाले. त्यात बंडखोरांना ग्रामीण भागातील जमीनदार सावकार, श्रीमंत, शेतकरी आणि नीळ उत्पादक कर्मचारी अशा सर्वाचीच सहानुभूती मिळाली.

०२. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला निवृत युरोपियन अधिकाऱ्यानी व श्रीमंत ब्रिटिशांनी बंगाल व बिहारच्या जमीनदारांगडून जमिनी घेऊन तेथे मोठया प्रमाणावर नीळ लागवड सुरु केली. या जमीनमालकांना अमेरिकन निग्रो गुलामांकडून काम करवून घेण्याचा अनूभव होता. त्यामुळे हे लोक शेतकऱ्यावर प्रचंड अत्याचार करीत आणि त्यांना जबरदस्तीने निळीचे उत्पादन करावयास लावीत.

०३. एप्रिल १८६० मध्ये पावना व नडिया जिल्हयातील सर्व शेतकऱ्यानी इतिहासात प्रथमच हरताळ केला. त्यांनी नीळ उत्पादनास विरोध केला. पुढे हा हरताळ जेस्सोर, खुलना, राजशाही, ढाका, माल्दा, दिनाजपूर व बंगालच्या इतर भागात पसरला. या निमित्ताने शेतकऱ्यानी जी एकी दाखवली त्यास इतिहासात तोड नाही.

०४. हा सार्वत्रिक उठाव होऊ नये म्हणून सरकारने पोलिसांना सूचना दिल्या कि जनतेच्या भूमीचे रक्षण करावे, जमीन मालकाला जमिनीत वाटेल ते उत्पन्न काढण्याची परवानगी असावी, त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नये. १८६० मध्ये नीळ आयोग नेमण्यात आले. त्याच्या शिफारशी १८६२ च्या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या.  शेवटी बंगालमधील नीळ उत्पादकांनी पराभव मान्य केला व ते बिहार व उत्तर प्रदेशात निघून गेले.

१८५७ चा उठाव भाग-१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.