भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

०१. पाश्चात्य शिक्षणातून भारतात एका सुशिक्षित वर्गाचा उदय झाला. विविध प्रांतात राहणारे विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत. ही राष्ट्रवादी भावना तयार झाली. त्यातून पूढे १८८५ साली राष्ट्रसभा (कॉग्रेस) ही राजकीय संघटना स्थापन झाली.

०२. धर्मसुधारणेचा परिणाम एकोणिसाव्या शतकात ब्राम्हो समाज, आर्य समाज, इ. अनेक धर्मसंघटना भारतात तयार झाल्या. त्याद्वारे महान सुधारकांनी जी धार्मिक जागृती घडवून आणली त्यातून पुढे राजकीय जागृती घडून आली.

०३. समाजसुधारकांनी केलेली जागृती समाजसुधारकांनी समाजात धर्म जागृतीबरोबरच समाज जागृतीही घडवून आणली. त्यांनी अनिष्ट रुढींवर हल्ले चढवले, त्याचबरोबर पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार केला त्यामुळे हळूहळू हिंदी समाजात जागृती घडून आली.

०४. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव इंग्रजांची संस्कृती कला, विज्ञान, याचे हिंदी लोकांना ज्ञान होऊ लागले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटलीेचे व जर्मनीचे एकिकरण, या निमित्ताने तेथील जनतेत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना, त्यातून त्यांना मिळालेले स्वातंत्र्य या गोष्टीमुंळे आपल्या देशातसुध्दा अशी राष्ट्रनिर्मिती का होऊ नये. अशी भावना हिंदी जनतेत निर्माण झाली. त्यामुळे पुढे राष्ट्रसभा स्थापन झाली.

०५. वृत्तपत्रांचे योगदान भारतात प्रथम इंग्रजांनी वृत्तपत्रे सुरु केली. त्यात सरकारच्या धोरणाची फक्त स्तुती केलेली असे. पण या इंग्रजांचे धोरण अन्यायकारक कसे आहे हे दाखवून देण्यासाठी पूढे हिंदी वृत्तपत्रे निघाली. सरकारविरुध्द असंतोष निर्माण करुन राष्ट्रवादाचा प्रसार करण्याचे महान कार्य हिंदी वृत्तपत्रानी केले.

०६. साहित्यातून राष्ट्रीयत्व बंगालमध्ये बकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्रात लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेक लेखकांनी मातृभाषा समृध्द केली. मातृभाषेविषयीचा त्यांचा अभिमान समाजात राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत झाला. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बकिमचंद्राचे वंदे मातरम हे गीत होय. पुढे नुसते वंदे मातरम हा शब्द उच्चारणेही गुन्हा ठरू लागला.

०७. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व इंग्रजांनी भारतात साम्राज्य स्थापन केल्यांनतर पाश्चात्य संशोधकांनी येथील प्राचीन साहित्य व इतिहास यावर संशोधन केले. या संशोधकांमध्ये कोलब्रुक विल्सन, म्यूलर, मोनिअर, विल्यम्स, यांसारख्या लोकांचा समावेश होता. भारतातील राजा राममोहन रॉय, डॉ. भांडारकर यांसारख्या लोकांनी हिंदी संस्कृतीचे श्रेष्ठत्व जनतेसमोर मांडले. त्यामूळे सुशिक्षित हिंदी जनतेला आपल्या प्राचीन ठेव्यांचा अभिमान वाटू लागला.

०८. इंग्रजी भाषेद्वारे राष्ट्रीय एकात्मता इग्रजांनी जवळजवळ संपूर्ण भारतात इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात केली. काश्मिरी, पंजाबी, गुजराती, बंगाली, मराठी, कानडी, मद्रासी, या सर्वानी भाषा भिन्न भिन्न होती ती एकमेकांस समजत नव्हती. पण इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे हे लोक एकत्र येत तेव्हा ते इंग्रजीतून विचारविनिमय करीत. त्यामुळे राष्ट्रवादाची झपाटयाने वाढ होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढतच गेली. त्यातून राष्ट्रसभेची स्थापना होऊ शकली.

०९. रेल्वे, तारायंत्रे व पोस्ट या सुधारणांचा परिणाम या भौतिक सुधारणांमुळे भारतातील प्रमुख शहरे एकत्र जोडली गेली. एका प्रांतातील लोक दुसऱ्या प्रांतात सहज जाऊ लागल्यामुळे त्यांच्यातील विचारविनिमय वाढला. रेल्वेने समाजातील सर्व जातिपंथाचे लोक एकत्र बसून प्रवास करु लागले त्यामुळे जातिपंथाची बंधने शिथिल होण्यास मदत झाली.त्यातून राष्ट्रीय जागृती घडून आली.

१०. इंग्रजांचा केंद्रीय राज्यकारभार १८५७ पर्यत इंग्रजांनी जवळजवळ संपूर्ण भारत जिंकून घेतला. १८५७ च्या उठावानंतर भारतातील संस्थाने अप्रत्यक्ष इंग्रजांच्याच वर्चस्वाखाली होती. भारतात ही जी एकछत्री राजवट इंग्रजांनी स्थापन केली. त्याविषयी पं. नेहरू म्हणतात, “इंग्रजांनी स्थापन केलेल्या राजकीय ऐक्याने हिंदुस्थानात राजकीय जागृती व राष्ट्रीय ऐक्य यांचा उदय घडवून आणला.” सरकार एक, त्याचे लष्कर एक या गोष्टीमुळे भारत झपाटयाने एक होऊ लागला.

११. इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणाचे परिणाम इंग्रजाचे साम्राज्य हे व्यापारी साम्राज्य होते. त्यामूळेच त्यांनी इंग्लडंमधून भारतात येणाऱ्या मालावरील जकात माफ केली. इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार होणारे कापड स्वस्तात विकूनही त्यांना विक्रमी नफा होत असे. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे हळूहळू बंद पडून कारागीर बेकार झाले. खेडे पूर्वी स्वयंपूर्ण होते, पण उद्योगधंदे बुडाल्यामुळे ही स्वयंपूर्णता नष्ट झाली.

१२. या अर्थिक शोषणाची जाणीव सुशिक्षित वर्गास होऊ लागली. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरुघ्द दादाभाई नौरोजींसारख्या नेत्यांनी आवाज उठवला. देशातून संपत्ती चा ओघ इंग्लंकडे वाहू लागला. हिंदी लोकांचे आर्थिक शोषण चालले होते. हिंदी जनतेची ही दु:खे सरकारच्या कानावर घालण्यासाठी एखाद्या राष्ट्रीय व्यासपीठाची आवश्यकता होती.

१३. लॉर्ड लिटनची दडपशाही १८७६ ते १८८० या काळात भारतात आलेला व्हाईसरॉय लॉर्ड लिटन याने दडपशाहीच्या धोरणाचा अवलंब केल्यामूळे हिंदी सुशिक्षित वर्गात असंतोष निर्माण झाला. ब्रिटिश पार्लमेंटने खास कायदा करुन इंग्लंडच्या राणीस हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून जाहीर केले. तेव्हा लिटनने दिल्लीस खास दरबार भरवला. त्या निमित्ताने त्यांने हिंदी राजे, महाराजे व नबाब यांना दरबारात पाचारण करण्यात केले होते.

१४. दक्षिण भारतात या वेळी प्रचंड दुष्काळ पडून लाखो लोक अन्नाअभावी मेले होते. तरी लिटनने दिल्लीला वैभवशाली दरबार भरवून लाखो रुपयांची उधळपट्टी केली होती. वृत्तपत्रातून त्यांच्या या धोरणावर प्रखर टीका करण्यात आली. त्यामूळे लिटनने १८७८ मध्ये ‘व्हार्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट’ पास करून देशी भाषेतील वृत्तपत्रांची गळचेपी केली. तसेच याच सुमारास त्याने ‘आर्म्स अ‍ॅक्ट’ पास करून हिंदी लोकांनी हत्यारे बाळगू नयेत असा निर्बंध घातला.

१५. आपला वंश श्रेष्ठ असा इंग्रजांना गर्व बरेच इंग्रज अधिकारी हिंदी जनतेशी फटकून वागत असत. हिंदी लोक म्हणजे दगड धोंडयाची व जनावरांची पूजा करणारे रानटी लोक आहेत. अर्धे निग्रो व अर्धे गोरिला असे प्राणी आहेत. अशी हेटाळणी करीत हिंदी लोकांना शिव्या इंग्रज मळेवाले अधिकारी देत. आपला वंश श्रेष्ठ व हिंदी लोकांचा वंश कनिष्ठ असे इंग्रज मानीत असत. त्यांचे खरे स्थान दाखवणे आवश्य होते.

१६. हिंदी लोकांवर होणारे अत्याचार इंग्रज हिंदी जनतेवर काही ना काही निमित्ताने जूलुम जबरदस्ती करीत असत. हे अत्याचार बऱ्याच वेळा सहन केले जात असत. त्यांना हिंदी जनतेच्या जीविताची किंमतच नव्हती. पण ते स्वत:चे जीवन यात मौल्यवान समजत असत. रेल्वेच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणे ही युरोपियनांची मक्तेदारी समजली जात असे. इंग्रजांच्या या वागण्यामुळे सुशिक्षित हिंदी लोकांच्या हृदयात आपल्या गुलामगिरीच्या वेदना असह्य होत असत. त्यामुळे राष्ट्रीय संघटनेची आवश्यकता भासू लागली.

१७. इलर्बट बिलाद्वारे मार्गदर्शन लॉर्ड रिपनच्या काळात सर सी.पी. इलर्बट हा कायदामंत्री होता. त्याच्या काळापर्यत हिंदी न्यायाधिशांना युरोपियन लोकांचे खटले चालविण्याची परवानगी नव्हती. हा अन्याय आहे असे इलर्बटला वाटत होते. कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असाव्यात असे त्याचे मत होते. त्यामूळे त्याने या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी एक विधेयक मांडले. इंग्रजांनी या बिलास फार मोठा विरोध केला. खूद्द त्यांनी व्हाइसरॉयविरुध्द आंदोलन केले. त्यामुळे त्या बिलात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.

१८. या निमित्ताने हिंदी जनतेत जागृती निर्माण झाली. आपणही आपले हक्क संघटित होऊन सरकापासून हिसकावून घेतले पाहिजेत. हा धडा हिंदी विचारवंतांनी या प्रकरणापासून घेतला. आपल्यावर होणारा अत्याचार सहन न करता आपणही राष्ट्रीय स्वरुपाची संघटना अन्यायास वाचा फोडली पाहिजे अशी हिंदी जनतेत मानसिकता निर्माण झाली.

१९. हिंदी सुशिक्षितांना पात्रतेनुसार नोकऱ्या देत नसत हिंदी जनतेस कारभारातील अधिकाराच्या जागा नाकारल्या जाणार नाहीत असे आश्वासन राणीच्या जाहिरनाम्यात दिले होते. पण ते आश्वासन सरकारने पाळले नाही. हिंदी तरुणांना बढती दिली जात नव्हती. प्रसंगी उच्च जागा देण्यात आली तर अल्पकाळातच काही तरी क्षुल्लक कारण दाखवून संबंधित हिंदी अधिकाऱ्यास नोकरीवरुन कमी केले जात असे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना क्षुल्लक कारणावरून नोकरीवरून काढून टाकले होते. हा अन्याय सहन न करता सर्व हिंदी नेत्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे अनेक नेत्यांना वाटत होते.

संपत्ती निःसारणाचा सिद्धांत

०१. प्लासीच्या युध्दापूर्वीच्या ५० वर्षात भारतातील आयात -निर्यात व्यापारात संतुलन राहावे म्हणून कंपनीने जवळजवळ २ कोटी पौंड किमतीचे सोने चांदी भारतात आयात केले. पण इंग्लंडच्या वाणिज्य तज्ञांनी कंपनीच्या या व्यापारविषयक धोरणावर टिका केली. त्याच्या परिणामस्वरूप इंग्लंडने अनेक कायदे करुन भारतीय माल मोठया प्रमाणावर इंग्लंडमध्ये येणार नाही याची काळजी घेतली.

०२. एवढेच नव्हे तर १७२० मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने कायदा करुन इंग्लंडमध्ये भारतीय रेशमी व सुती कापड वापरणाऱ्यावर दंड लावला. प्लासीच्या युध्दानंतर परिस्थिती बदलली भारताच्या अर्थव्यवस्थेवर इंग्लंडचा एक अधिकार प्रस्थापित होऊन भारतातील संपत्ती चा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला ब्रिटिशांनी भारतात केलेल्या साम्राज्यविस्तारामुळे कंपनीकडे आता वेगवेगळया मार्गानी प्रचंड पैसा येऊ लागला.

०३. जमीन महसूल पध्दतीतून मिळणारा नफा, भारतीय बाजारपेठेवर एकाधिकार असल्याने व्यापारातून मिळणारा नफा, कंपनीचे अधिकारी भारतात भेटीच्या स्वरुपात मिळविल असलेला पैसा, कंपनीचे लष्कारी व मुलकी अधिकार्‍यांना व इंग्रज सेवकांना मिळणारे प्रचंड वेतन. यातून इंग्लंडला मोठ्या प्रमाणात भारतीय पैसा मिळू लागला.

०४. हा सर्व जास्तीचा पैसा कंपनी भांडवलाच्या रुपाने भारतात गुंतवीत असे.  त्यावर मिळणारे व्याजही इंग्रजांनाच मिळत होते. हा सर्व पैसा इंग्लंडमध्ये जात असे. ही व्यवस्था १८१३ च्या सनदी कायद्यानुसार समाप्त करण्यात आली. असे असले तरी इंग्रजांनी पुढे ज्या धोरणाचा स्वीकार केला. त्यानुसारही संपत्ती चा प्रवाह सातत्याने इंग्लंडकडे वाहत होता व भारत यात दिवसेंदिवस अधिकाधिक गरीब होत होता. अशा मार्गानी भारताचे शोषण होते होते.

०५. संपत्ती चे नि:सारण हा सिध्दान्त सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी मे १८६७ मध्ये मांडला. भारतीयांचे आर्थिक शोषण होत होते आणि पैशांचा ओघ इंग्लंडकडे वाहत होता. वास्तविक पाहता या आधी परकीय राज्यकर्त्यानी केलेले शोषण आणि ब्रिटिशांनी केलेले शोषण यात एक मुलभूत फरक होता.

०६. तो म्हणजे पूर्वी आलेले परकीय भारतात आले व ते भारतीय बनले त्यांचे आपल्या मायभूमीशी असलेले संबंध तुटले. त्यामुळे  पैसा भारतात राहिला. उलट त्यांनी दुसरीकडून पैसा भारतात आणला. परिणामी भारत समृद्ध बनला. सोन्याची चिमणी बनला.

०७. याउलट ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन केल्यांनतरही त्यांची मातृभूमी इंग्लंड हीच राहिली. त्यामूळे त्यांनी शोषण केलेला पैसा भारतात न राहता इंग्लंडमध्ये गेला. त्यावरुनच राष्ट्रवादी आर्थिक विचारांची पध्दतशीर मांडणी सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केले

महाराष्ट्रातील राष्ट्रवाद

०१. समान महसुली पद्धती, रयतवारी पद्धत, पाश्चिमात्य शिक्षण, समाजसुधारकांचे कार्य (फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर) त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण झाले, राष्ट्रीय भावना वाढीस आली. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांच्या धर्म सुधारणा चळवळीचा प्रभाव वाढला.

०२. वृत्तपत्रामुळे (दर्पण, प्रभाकर, केसरी, मराठा) राजकीय व सामाजिक तसेच धार्मिक जागृती निर्माण झाली. दळणवळणाच्या साधनामुळे (रस्ते, रेल्वे, तारायंत्र, पोस्टखाते) प्रांतातील दुरावा कमी होऊन लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले.

०३. दादाभाई नौरोजी, गोखले, रानडे यांनी ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण लोकांसमोर मांडल्याने लोकांच्या मनात चीड उत्पन्न झाली. लोकांना रामोशी, कोळी, भिल्ल, यांचे उठाव यातून प्रेरणा मिळाली. शिक्षक, वकील, कारकून, पत्रकार, सरकारी अधिकारी या लोकांमुळे मध्यमवर्गाचा उदय झाला.

०४. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी भावना वाढीस आली.

राष्ट्रीय चळवळ

भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन कालखंड मानले जातात.
१८८५ ते १९०५ : मवाळ युग
१९०५ ते १९२० : जहाल युग
१९२० ते १९४७ : गांधी युग

दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्या.के.टी. तेलंग, आनंदमोहन बोस, बद्रुद्दीन तय्यबजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा हे मवाळयुगातील नेते मानले जातात.

लाला लजपतराय (लाल), लोकमान्य टिळक (बाल), बिपिनचंद्र पाल (पाल) आणि अरविंद घोष हे जहाल युगातील नेते मानले जातात.

तसेच गांधी युगातील प्रमुख नेते महात्मा गांधी हेच होते.