महात्मा ज्योतीराव फुले

जन्म : ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा, महाराष्ट्र)

मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र)

* वैयक्तिक जीवन

०१. जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. ते जातीने क्षत्रिय माळी होते. ते कटगुणचे चौगुले होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले एक असत. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली. आधुनिक विचारवंतानी त्यांना ‘महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर’ म्हणून गौरविले आहे.

०२. ज्योतीबांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन ३५ एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी त्यांना दिली. ज्योतीबांच्या वडिलांनी व दोन काकांनी शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी काम केले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. आजोबाच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने (राणोजी) हडपली. म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला.

०३. ज्योतिबा ९ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईंचे निधन झाले. १८३४ ते १८३८ या काळात पंतोजींच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्योतिबा त्यांच्या वडिलांना शेतकामात मदत करू लागले. वयाच्या १२ व्या वर्षी १८४० साली ज्योतीबांचे लग्न धनकवडीच्या झगडे-पाटील घराण्यातील सावित्रीबाईसोबत झाले.

०४. गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मि. लेजंट यांच्या सांगण्यावरून १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच १८४७ मध्ये त्यांनी इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण केला.

०५. १८४७ साली लहूजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा चालविण्याचे व इतर शारीरिक शिक्षण घेतले. याचवेळी १८४७ मध्ये वाचण्यात आलेल्या थोमस पेन यांच्या ‘राईट ऑफ द मैन’ या ग्रंथातील विचारांचा प्रभाव पडून फुलेंनी महराष्ट्रातील समाजात परिवर्तन घडविण्याचे ठरविले.

०६. १८४८ मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा लग्नातील उच्चवर्णीय मंडळीकडून अपमान झाला. हेच त्यांच्या जीवनातील महत्वाचे वळण ठरले. येथे त्यांना भारतातील जातीव्यवस्थेची जाणीव झाली.

०७. “शिवाजी महाराजांचे चरित्र”, “राईटस् ऑफ मॅन”,”जस्टीस एंड ह्युमेनिटी” आणि “एज ऑफ रिजन” या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ते म्हणत, “भारतातील जातीभेदशी लढा द्यायचा असेल तर त्यात महिला व अस्पृश्यांचे शिक्षण हि महत्वाची प्राथमिकता आहे.”

०८. १८५४ साली फुलेंनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी धरली. १८५८ साली जोतिबांनी शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

०९. समाजसेवक असले तरी फुले एक व्यापारी सुद्धा होते. १८८२ मध्ये त्यांनी स्वतःला एक व्यापारी, एक शेतकरी व शासकीय कंत्राटदार से म्हटले. १८७० च्या दशकात भारतातील पहिले दगडी बांधकाम असलेले खडकवासला धारण बांधत असताना त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम कंत्राटदार या नात्याने फुलेंनी केले. १८६३ साली त्यांनी पोलादी वस्तूचा पुरवठा करण्याचा व्यापार सुरु केला होता.

१०. १८८८ साली फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांची उजवी बाजू लुळी पडली. त्यांनी १ एप्रिल १८८९ रोजी “सार्वजनिक सत्यधर्म” हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर यशवंत फुलेंनी केले.

* स्त्री उद्धार

०१. जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. ऑगस्ट १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. पण ही शाळा बंद पडली. गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. त्यानंतर ते गंजपेठेत राहू लागले.

०२. ३ जुलै १८५१ रोजी फुलेंनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. या कामी त्यांना सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव मवाळकर यांनी सहकार्य केले. त्यानंतर फुल्यांनी ७ सप्टेंबर१८५१ साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली. १८५२ मध्ये वेताळ पेठेत मुलींची शाळा स्थापण्यात आली.

०३. शाळेची प्रथम महिला शिक्षिका व प्रथम महिला मुख्याध्यापिका बनणारी भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. पण याच कारणामुळे त्यांना आपले वडीलोपोर्जीत घर सोडावे लागले.

०४. मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा फुलेंनी अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मुलींसाठी शिक्षिका मिळत नव्हती म्हणून फुलेंनी सावित्रीबाईंनाच ‘मिस ट्रेंड’ डिप्लोमा प्रशिक्षण देऊन शाळेत नियुक्त केले.

०५. त्यांनी नेहमीच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच उच्च वर्णीय विधवांसाठी १८५४ साली एक विधवा घर सुरु केले. १८६० साली त्यांनी विधवाविवाहास साहाय्य केले.

०६. चुकीचे पाऊल पडलेल्या विधवांना समाजाच्या जाचापासून वाचविण्यासाठी फुलेंनी १८६३ साली आपल्या घरशेजारी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली. म्हणूनच फुलेना ‘समाजाच्या पापाचे प्रायश्चित्त फेडणारा समाजसुधारक’ असे म्हणतात. याच उपक्रमाचे अनुकरण म्हणून लोकहितवादी, लालशंकर, उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनी पंढरपूर येथे एक बालहत्या प्रतिबंधक स्थापन केले.

०७. ८ मार्च १८६४ रोजी फुलेंनी पुण्यात गोखल्यांच्या वाड्यात एका शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुराशी लावला.

०८. पुत्रप्राप्तीसाठी फुलेंनी दुसरे लग्न करावे (गांधर्व विवाह) असे सर्वांनी सांगितले. पण फुलेंनी बहुपत्नीत्वास विरोध केला. त्यांनी बालविवाहास विरोध केला. त्यांनी सती प्रथेलाही विरोध केला. बाल-जरठ विवाहाने विधवांची संख्या वाढत होती त्यामुळे फुलेंनी या विवाहासही विरोध केला

०९. वयाच्या नवव्या वर्षी फुलेंच्या गुरुकन्येस वैधव्य आले. त्यानंतर तिचा विद्रूप चेहरा पाहून फुलेंच्या मनात चीड उत्पन्न झाली. त्यामुळे १८६५ साली फुले यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१०. काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री गरोदर झाली त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिला तसे करण्यापासून थांबवून फुलेंनी तिला मुल प्रसूत करण्यास लावले. १८६५ साली ते मुल जन्माला आले व १८७३ साली फुलेंनी त्या मुलाला दत्तक घेतले. हा मुलगा म्हणजेच यशवंतराव फुले होय.
११. खंडोबा हा मूलतः कर्नाटकातला लोकदेव असून त्या ‘मैलार’ म्हणतात. खंडोबाकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला जात असे. मुल जन्माला आल्यास ते खंडोबाला वाहिले जाई जर मुलगा असेल तर वाघ्या व मुलगी असेल तर मुरळी म्हणून. फुलेंनी म्हणून या वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केला.

* दलित उद्धार

०१. पेशव्यांच्या काळात दलितांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. दुसऱ्या बाजीरावच्या काळात तर दलितांवर प्रचंड अत्याचार झाले. महात्मा फुलेंच्या शाळेतील मुक्ता साळवे नावाच्या ११ वर्षाच्या मुलीने दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर ‘कोणता तो धर्म’ नावाचा निबंध लिहिला. तो पुढे प्रचंड प्रसिद्ध झाला.

०२. १८४८ साली फुलेंनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्यानंतर १८५१ मध्ये फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली पण सनातनी मंडळीनी ती शाळा बंद पाडली. पण त्यानंतर फुलेंनी पुण्याच्या वेताळपेठेत सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात १५ मार्च १८५२ रोजी दुसरी शाळा स्थापन केली.

०३. १६ नोहेंबर १८५२ रोजी महात्मा फुलेंचा मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार करण्यात आला. १८५३ साली त्यांनी ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.

०४. १८५३ साली त्यांनी महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्यासाठी ‘मंडळी’ ही संस्था युरोपियन व स्थानिक शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने सुरु केली. १८५८ पर्यंत संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये तीन शाळा सुरु केल्या. त्यासाठी दक्षिणा प्राइज फंडातून दर महिन्याला २५ रुपयाची आर्थिक मदतही मिळाली.

०५. समाजाला काळिमा फासणाऱ्या अस्पृश्यता सारख्या प्रथा संपविण्याचा महात्मा फुलेंनी प्रयत्न केला. त्यासाठी अस्पृश्य समाजातील लोकांसाठी फुलेंनी स्वतःच्या घरची दारे व १८६८ साली दुष्काळ काळात अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी स्वतःची घरातील हौद खुला करून दिला.

०६. सनातन्यांनी फुलेंना मारण्यासाठी धोंडीराम नामदेव कुंभार व सज्जन रोडे मांग यांना १००० रुपये दिले. परंतु फुलेंनी त्यांच्याच समोर मान झुकविली असता ते खजील झाले व नंतर फुलेंशी एकनिष्ठ राहिले.

०७. अस्पृश्यतेला विरोध करताना फुलेंनी सर्वप्रथम वेदांवर प्रहार केला. वेद म्हणजे एक निष्क्रिय काल्पनिक गोष्ट तसेच उघडउघड एक प्रख्यात हास्यास्पद आख्यायिका आहे असे ते म्हणत. वेद हे चुकीच्या गोष्टी पसरवितात असेही त्यांचे म्हणणे होते. महात्मा फुलेंनी अवतार या कल्पनेवरही टीका केली.

०८. अस्पृश्य समाजातील व्यक्तींसाठी त्यांनी ‘दलित’ हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली. या शब्दाचा अर्थ दाबण्यात आलेला व तुटून पडलेला समाज असा होतो. पुढे हाच शब्द प्रचलित झाला.

* सत्यशोधक समाज

०१. २३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी त्याचे १४ सदस्य होते त्यापैकी २ स्त्रिया होत्या. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना व शेतकऱ्याना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

०२. समाजाच्या तत्वानुसार यात राजकारणावर बोलण्यास बंदी होती. अंबालहरी हे या समाजाचे मुखपत्र होते. या समाजाचे कार्य ‘दीनबंधू’ या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असे. सत्यशोधक समाजाची पहिली लोकशाळा भिल्लार मंडळीनी भिल्लार येथे स्थापन केली.

०३. महात्मा फुलेपासूनच प्रेरणा घेऊन हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘मिल हैन्ड असोसिएशन’ची भारतातील पहिली मजूर संघटनेची स्थापना केली. यासोबतच मेघाजीनी ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र नंतर काढले होते.

०४. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ”

०५. सत्यशोधक समाजाबाबत फुले म्हणतात, “ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शुद्र लोकांना मुक्त करण्यासाठी व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शुद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटत आहेत. यास्तव सदुपदेश व विद्येद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता हा समाज आहे.

०६. ईश्वर एक असून तो सत्यस्वरूप आहे, ईश्वरभक्ती करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे, ईश्वरभक्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही, मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो, कोणताही ग्रंथ ईश्वरप्रणीत नाही, पुनर्जन्म व कर्मकांड इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत.

०७. फुलेंचा सत्यशोधक समाज मानवता, बुद्धीप्रामाण्य, व्यक्तीस्वातंत्र्य या तत्वांवर आधारित होता. धार्मिक परिवर्तनाच्या बाबतीत फुले पहिले क्रांतिवीर ठरतात.

०८. ‘सत्यशोधक समाज’ ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत व परमेश्वर त्यांचा आई बाप आहे, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते त्याप्रमाणे परमेश्वराला प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते, वरील तत्व कबूल असल्यास कोणालाही या समाजाचे सदस्य होता येईल. ही या समाजाची तत्वे होती.

०९. सत्यशोधक समाजाने मूर्तीपूजेचा विरोध केला व जाहीरपणे जातीव्यवस्था अमान्य केली. सावित्रीबाई फुले महिला शाखेच्या प्रमुख बनल्या. त्यावेळी त्यात ९० महिला सदस्यांचा समावेश होता.

१०. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. १८८७ साली सत्यशोधक समाजातर्फे पारंपारिक पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. नवा पुरोहित वर्ग निर्माण करून “ओतूर’ या गावी या पद्धतीने लग्न लावून दिले. मराठीत मंगलाष्टके रचली.

११. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती.

२. महात्मा फुले एकेश्वरवादी होते, त्या ईश्वराला त्यांनी निर्मिक असे म्हटले आहे. सत्यधर्म स्पष्ट करताना ते म्हणतात, “सत्य सर्वांचे आदीधर. सर्व धर्मांचे माहेर.”

१३. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू‘ हे साप्ताहिक चालविले जात असे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

* सामाजिक कार्य

०१. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा फुलेंना मार्टिन ल्युथर किंग, शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्याकडून मिळाली होती.

०२. १८५५ साली त्यांनी प्रौढ स्त्री पुरुषांच्या शिक्षणासाठी रात्रशाळेची सुरुवात केली. १८५२ साली त्यांनी पुना लायब्ररीची स्थापना केली. फुलेंनी एकूण १७ शाळा काढल्या. या सर्व शाळांना मोफत पुस्तके मेजर कॅन्डीने पुरविली.

०३. १८७५ साली त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). तसेच १८७७ च्या दुष्काळावेळी पुण्यातील दुष्काळ व पिडीत मुलांसाठी धनकवडी येथे कॅम्प उभारला.

०४. १८७५ साली न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी ज्योतीबांचे सहकार्य घेतले होते.

०५. १८८० साली त्यांनी दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. १८८० याच वर्षी नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

०६. ‘नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही’ हे आंदोलन फुलेंनी २ वर्षे चालविले. तसेच भारतीय शेतकऱ्यांना बंदुकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारा पहिला समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले होय.

०७. ब्रिटीश शासनाने भारतात शिक्षण प्रसाराची दिशा निश्चित करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या समितीसमोर साक्ष देणारे पहिले भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणजे महात्मा फुले होय. याच समितीसमोर पंडिता रमाबाई या पहिल्या साक्ष देणाऱ्या महिला होत्या.

०८. या हंटर कमिशनसमोर १८८२ साली साक्ष नोंदताना फुले म्हणाले, “गरीब जनतेकडून वसूल केला जाणारा सारा उच्च वर्णीयांच्या शिक्षणावरच खर्च होतो. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडेही या साऱ्याचा उपयोग केला गेला पाहिजे. बारा वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.”

०९. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८८२ रोजी ‘स्त्री शिक्षणाचे आद्यजनक’ म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांचा गौरव केला.

१०. १८८२ सालीच टिळक व आगरकर डोंगरीच्या तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर फुलेंनी त्यांचा जाहीर सत्कार केला.

११. ब्रिटीश सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मांडलेल्या झिरपता सिद्धांताला सर्वप्रथम फुलेंनी विरोध केला. फुलेंनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटलेले आहे.  महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण दैनंदिन जीवनातील व्यवहारास उपयोगी पडणारे नसून केवळ कारकून आणि शिक्षण तयार करणारे आहे, अशी फुलेंनी महाविद्यालयीन शिक्षणावर टीका केली. फुले म्हणतात, “शीलसंवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, व्यव्हारज्ञान यांवर शिक्षणात भर दिला पाहिजे.”

१२. १८३२, १८५२, १८७५ या साली शेतकऱ्यांची बंडे झाली. ब्रिटिशानी ही बंडे चिरडून टाकली. १८७९ मध्ये ‘एग्रिकल्चरल रिलीफ ऐक्ट’ सारखे कायदे करून शेतकऱ्याना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण तरीही शेतकरी दैन्यावस्थेपासून फार दूर राहिला नाही. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा मौलिक ग्रंथ फुले यांनी लिहिला.

१३. पुणे जिल्ह्यात जुन्नर भागात सावकार शेतकऱ्यांवर भयंकर जुलूम करत असत. त्यामुळे शेतकरी चिडले. त्यांनी जमिनी पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. जोतिबांनी या लढ्यात भाग घेतला. त्यामुळे सरकारने मध्यस्थी केली व हा संप यशस्वी झाला.

१४. ज्योतीबांनी सरकारने शिवाजीच्या समाधीची व्यवस्था स्वतःकडे घ्यावी असा अर्ज केला होता.

१५. १८८८ साली इंग्लंडच्या राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभाला फुले यांनी शेतकऱ्यांच्या पारंपारिक वेशात हजेरी लावली. ब्रिटिशाना भारतीय शेतकऱ्याची अवस्था दाखविण्याचा उद्देश यामागे होता.

१६. ब्रिटीश ख्रिश्चन मिशनऱ्यानी केलेल्या मानवतावादी कार्यांमुळे महात्मा फुले यांना ब्रिटीश राजवटीबद्दल सहानुभूती वाटत होती. परंतु ब्रिटीश सत्तेने दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी शेतकरी आणि शुद्रांवर अन्याय केला त्यावेळी फुलेंनी ब्रिटीशांवर टीका केली.

१७. १८८९ साली मुंबईत भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात महात्मा फुले यांनी “राष्ट्रीय कॉंग्रेस फक्त वरिष्ठांची असून त्यांचेच हितसंबंध सांभाळते, ही कॉंग्रेस शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला सामावून घेत नाही आणि त्यांच्या हितसंबंधांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत कॉंग्रेसला ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार पोचत नाही”, असे मत जाहीरपने व्यक्त केले होते. यावेळी फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दयनीय स्थिती दर्शविणारे पुतळा व गवताची पेंढी सभागृहाबाहेर ठेवली.

१८. पुणे नगरपालिकेवर १८७६ साली फुलेंची नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर १८८२ पर्यंत राहिले. सदस्य असताना त्यांनी व्यसन मुक्तीसाठी प्रयत्न केले. दारूच्या गुत्त्यावर कर बसविण्याचे सुचविले. पुण्यात मार्केटची इमारत बांधण्यासाठी आणि रिपनला मानपत्र देण्याच्या समारंभास त्यांनी उघड विरोध केला.

१९. काही सूत्रानुसार फुलेना महात्मा हि पदवी महात्मा गांधीनी दिली. तर काही सूत्रानुसार ११ मे १८८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे एक समाजसुधारक रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने फुलेना महात्मा हि पदवी बहाल केली. महात्मा फुले यांना कर्ते समाजसुधारक असे म्हटले जाते. तर त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य ‘युगप्रवर्तक’ होते असे म्हटले जाते.

* साहित्य

०१. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.

०२. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न (१८५५) हे नाटक आणि ‘राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा (१८६९)हा पोवाडा तसेच ‘अखंडादि काव्यरचना’ आणि ब्राह्मणांचे कसब (१८६९) हे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे.

०३. त्यांचे काही लेखसंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी , विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९), मानव मुहम्मद – इस्लाम धर्मावर, गुलामगिरी (१८७३), शेतकऱ्यांचा असूड (१८८३), इशारा (१८८५), सार्वजनिक सत्यधर्म (एप्रिल १८८९), अस्पृश्यांची कैफियत प्रसिद्ध आहेत.

०४. तसेच सत्सार अंक १ व २ – नियतकालिक (जुन व ऑक्टोबर १८८५), ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर (१८८६) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी (१८८७) ह्या त्यांच्या इतर साहित्यरचना आहेत.

* फुलेनंतरच्या चळवळी

०१. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

०२. पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपटपुरस्कार मिळाला होता. जोतीबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.

०३. जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.