नदी(River)

०१. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. 

०२. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते.

०३. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात.
०४. नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वहात येतयेत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हणजेच साठ्यातूनही येते. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बहुधा अशा प्रकारच्या असतात. उदा. बियास नदी.

उगम

०१. नदीचा उगम विविध प्रकारे होतो. त्यामध्ये जलाशये, झरे, प्रचंड मोठ्या दलदलीच्या जागा आणि बर्फाची पठारे यांचा समावेश होतो. बहुतेक सगळ्या नद्यांना उपनद्या, ओढे, नाले येऊन मिळतात. हेच नद्यांचे पाणी वाहते असण्याचे प्रमुख स्रोत असतात. काही वेळा भूगर्भातील पाणीही झर्यांद्वारे नदीत येऊ शकते.
०२. नदीच्या वाह्त्या पाण्यात नदीपात्रातील खडक , वाळू व सच्छिद्र जमीन यातील पाणीही सामील असते. अनेकदा दरीतील वाहणारी नदी पात्रावरून लहान दिसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात पाणी असू शकते.

०३.नद्या सर्वसाधारणपणे उगमापासून सुरुवात करून, उताराकडे वाहात जा. तात व समुद्रास जाऊन मिळतात. काही प्रसंगी सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन नद्या मध्येच संपू शकतात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंत भूगर्भातील पाणी बनते. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे होणारा नदीच्या पाण्याचा उपसाही नदी आटवू शकतो. धरणे नदी रोखून धरतात, व त्यामुळे धरणाखालील काही भागातले पात्र आटून जाते.

भूसंरचना

०१. नदीचे पाणी बहुधा ठरलेल्या पात्रातूनच वाहते. मोठ्या नद्यांची पूररेषा मात्र नेहमीच्या पात्रापेक्षा अधिक अंतरापर्यंत विस्तारलेली असू शकते. तरीही सर्वसाधारणपणे नदीचे पात्र व पूर आलेल्या नदीचे पात्र हे बहुधा ठरलेले असते.

०२. शहरी भागात, जर नदीपात्राच्या पूररेषेचा विचार केलेला नसेल तर पूर आल्यावर नदीचे पाणी शहरातील काही भागात घुसलेले दिसते. नदीचे वरचे अंग म्हणजे, नदीच्या उगमाजवळील भाग होय. हे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी याला उगम असेच संबोधले जाते. यामुळे नदीच्या मुख्य
अथवा खालच्या भागाच्या वाहण्याच्या प्रवृत्तीनुसार नदीची दिशा ठरवली जाते.

०३. नदीचे पात्र सहसा एकच असते. परंतु काही वेळा नदी एकाच वेळी अनेक पात्रांनीही वाहते. ही पात्रे एकमेकांना जोडलेली अथवा विलगही असू शकतात. अशा नद्या न्यू झीलंडच्या दक्षिण बेटावर आढळतात.

०४. वाहणाऱ्या पाण्याच्या ओढीने नदीच्या पात्राची रुंदी आणि आकार बदलू शकतात. ब्राह्म अथवा आयरच्या नियमानुसार, नदीची वाहून नेण्याची क्षमता ही नदीच्या वेगाच्या साधारण एक षष्ठांश इतकी असते. म्हणजेच जर नदीचा प्रवाह दुप्पट झाला तर तिची वाहून नेण्याची क्षमता चौसष्टपट वाढते.
०५. पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या प्रवाहामुळे कठीण खडकांचीही धूप झालेली आढळून येते. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते.
०६. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि मार्ग छोटा होतो.
०७. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात. हा गाळ प्रवाहाच्या मध्य भागात जमत जातो आणि त्याचे बेट तयार होते. या भूभागांना त्रिभुज प्रदेश अशी संज्ञा आहे. हे त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतात. असे प्रदेश नदीच्या मुखाजवळ तयार होतात. उदा. बांगलादेशमध्ये गंगा नदीत व ब्रह्मपुत्रा नदीत असे अनेक त्रिभुज प्रदेश बनले आहेत.

वर्गीकरण

नदी या एका संकल्पनेत अनेक घटक समाविष्ट होतात. पाण्याचा प्रवाह हा वातावरणातील बदल, भूपृष्ठाची ठेवण आणि तत्कालीन जीवसृष्टी यावरही अवलंबून असते.

०१. अवखळ नदी: पर्वतावरून वेगाने वहात जाणारा प्रवाह असेल त्याला अवखळ नदीचे पात्र असे संबोधले जाते. या नदीचे पात्र रुंद नसून खोल असते. उदा. ब्राझोस नदी तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील कॅलिफोर्निया येथील त्रिनिटी नदी.

०२. संथ नदी: भूपृष्ठाचा उतार कमी झाल्यावर नदीचे पाणी हळू वहायला लागते म्हणून अशा नदीला संथ नदी म्हणतात. तसेच आता अवखळपणा संपून नदीला गंभीरपणा येतो. या पात्रात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. संथ भागात नदीचे पात्र पसरट होत जाते. उदा. मिसिसिपी नदी, डॅन्यूब नदी आणि पठारी प्रदेशातील गंगा नदी

०३. जुनी नदी: ज्या नदीचा उतार अतिशय कमी होतो आणि काठाची झीज करण्याची क्षमताही संपलेली असते अशा नद्या जुन्या नद्या या प्रकारात येतात. उदा. ह्वांग हो नदी, गंगा नदी, तैग्रिस नदी, युफ्रेटिस नदी, सिंधू नदी, नाईल नदी) 
४. पुनरुज्जीवित नदी: अनेक कारणांनी एखादी नदी कोरडी पडते व भूस्तरीय हालचालींमुळे भूपृष्ठ उचलले गेले असता आणि नदी वाहू लागते अशा नदीला पुनरुज्जीवित नदी म्हणतात. नदीच्या एकूण अंतराची लांबी व सरळ रेषेत मोजलेली लांबी यांचे गुणोत्तर साधारण ३ असते. बहुतेक सर्व नद्या भूपृष्ठावरच वाहतात. परंतु काही नद्या भूपृष्ठाखालून गुहांमधून वाहतात. अशा नद्यांमुळे अनेक गुहा मोठ्या झालेल्या असतात. अनेकदा अशा नद्या लवणखडक फोडतात व गुहा बनवत जातात. यामुळे अनेक चमत्कृतिपूर्ण आकार बनलेले दिसून येतात.
काही नद्या तात्पुरत्या असतात. त्या फक्त काही काळ वाहून मग अनेक वर्षांसाठी लुप्त होतात. अशा नद्या अत्यंत कमी अथवा अनियमित पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात. भारतात राजस्थानमधील घग्गर हाक्रा नदी ही अशाच प्रकारची नदी आहे.

उपयोग

०१. नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्रोत तसेच अन्नाचा स्रोत म्हणून होतो. वाहतुकीसाठीही नदीचा उपयोग होतो. नदीचा उपयोग संरक्षणाची ढाल, वीजनिर्मिती , आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठीही करून घेतला जातो. औद्योगिकीकरण व शहरांची घाण वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर सध्या होत आहे. भूभागांची सरहद्द सुनिश्चित करणे, वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे.
०२. नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इ.स. पूर्व ३३०० पासुन सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. नदीपात्रातली वाहतूक ही अतिशय स्वस्त पडते. आज ही जगातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नद्यांमध्ये अशी वाहतूक केली जाते. उदा. अॅमेझॉन नदी , गंगा नदी, नाईल नदी , मिसिसिपी नदी आणि सिंधू नदी . स्कँडेनेव्हिया, कॅनडा , ब्रम्हदेश या देशांतील दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छीत ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातो.
०३. अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीव सॄष्टीचे एक चक्र असते. यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे.
०४. गोड्या पाण्याचा उपलब्धीमुळे जगातील बहुतेक सर्व शहरे नदीकाठीच वसलेली आहेत. नद्यामुळे शहर कसे बनणार याचा आराखडाही आपोआप ठरत जातो असे दिसून येते. या शहरांच्या उभारणीमुळे सांडपाणी नदीत सोडले जाते आणि नदीचे प्रदूषण होते.
०५. जपान येथे बहुतेक नद्यांच्या काठावर मनोरंजनासाठी उपयुक्त असे काठ बनवले गेले आहेत. नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. सुशोभित केलेले नदीचे काठ जास्त पर्यटक आकर्षित करतात, आणि स्थानिक समाजातील लोकांना जलपर्यटनाची सेवा देण्याची संधी देतात.
०६. काही वेळा पर्वतीय प्रदेशात वाहणार्या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणे सहलींचे केंद्र बनतात. काही वेळा खळखळत वाहणार्या पाण्यात कायाकिंग नावाचे वेगवान नौकानयन केले जाते. जोरदार प्रवाह असलेल्या नद्यांपासून वीजनिर्मिती केली जाते.
०७. नद्या हे सुरक्षेचे माध्यम म्हणूनही वापरल्या गेल्या आहेत. तसेच राजकीय सीमा म्हणूनही त्यांचा उपयोग झालेला दिसतो. जसे की डॅन्यूब नदी ही रोमन साम्राज्याची सरहद्द मानली गेली होती. जी आजही तशीच बल्गेरिया आणि रोमेनिया दरम्यानची सरहद्द मानली गेली आहे. तसेच अमेरिकेतील मिसिसिपी नदी आणि युरोपातील र्हाईन नदी या खंडाच्या सरहद्दी ठरवणार्या नद्या आहेत.
०८. पुरातन ग्रीक इतिहासकार मॅगेस्थेनिस याने त्याच्या इंडिका नावाच्या ग्रंथात गंगा नदी विषयी नोंदवून ठेवले होते की, ही भारतातील अनेक नद्यांपैकी ही एक मोठी नदी आहे. या नदीत नौकानयन करता येते आणि हिचा उगम पर्वतातून होतो. या नदीला अनेक नद्या येऊन मिळतात व ही पुढे समुद्रास जाउन मिळते. या नदीमुळे गंगारीदाइ नावाच्या प्रचंड मोठे हत्तींचे कळप असलेल्या एका राज्याला अतिशय पक्की अशी सरहद्द मिळते व त्याची शक्ती वाढते.

जीवसृष्टीचे चक्र

०१. नदीतले जीव नदीतील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या साधनांचा व राहत्या बनलेल्या जागेचाच वापर करतात. यामुळे त्यांचे नदीवर अवलंबून असलेले एक स्वतंत्र जीवसृष्टीचे चक्र अस्तित्त्वात असते. यामधे अनेक प्रकारचे सजीव , परजीवी सजीव व वनस्पती अंतर्भूत होतात.
०२. नदीतील बहुतेक जीव हे गोड्यापाण्यात जगणारेच असतात. परंतु काही मात्र खार्या पाण्यातही जगू शकतात. उदा. सामन नावाचे मासे नदी व समुद्र दोन्हीकडे राहू शकतात. काही मासे समुद्रातून पोहोत नदीत येतात व उगमाकडील बाजूस अंडी घालतात.
०३. पूर येणे ही नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे. नदीकाठची धूप व आसपासच्या मैदानात साठणारी गाळवजा माती ही पुरामुळेच होते. माणसाने आपल्या सोयीनुसार बंधारे घालून, काठ बांधून व प्रवाह वळवून पूर येण्यावर निर्बंध घातले आहेत.तरीही अनेकदा शहराची रचना करतांना जलप्रवाहाची दिशा व वेग विचारात न घेतल्याने पूर येतात व मोठी जीवितहानी व वित्तहानी होते.
०४. मुंबईमध्ये मिठी नावाच्या नदीच्या पूर रेषेचा विचार न करता त्या भागातही बांधकामे केल्यामुळे नदीचे पाणी शहरातील उपनगरात शिरले होते व मोठा हाहाकार उडाला होता.
०५. बांग्लादेश येथेही उन्हाळ्यात हिमालयातले बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून गंगा, ब्रह्मपुत्रा आदि नद्यांना मोठे पूर येतात. अशाने भारतातील व बांग्लादेशातील जनजीवन विस्कटते. 
०६. नदी नेहमी उताराच्या दिशेने वाहते. नदीचा प्रवाह बर्याचदा वळणावळणांचा असतो व असे करताना प्रवाहाची दिशा अष्टदिशांतून बदलते. मात्र त्यात पर्वताची रचना जशी असेल तसा प्रवाह तयार होतो.
०७. पाण्याचा वेग हा त्याच्या वाहणार्या आकारमानानुसार एका सेकंदात किती घनमीटर पाणी वाहिले यावर ठरवला जातो. (1 m³/s = 35.51 ft³/s) तसेच काही वेळा हे गॅलन मध्येही मोजले जाते. नदीचा वेग नियंत्रित करण्यासाठी बांधलेले काठ उपयोगी पडतात. अशा बांधलेल्या रुंद दगडी काठांना घाट असे म्हणतात. भारतात पवित्र समजल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांना घाट आहेत.
०८. वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीजनिर्मिती सारखी कार्ये साधली जातात.

०९. नदीला नदी जोडणे अथवा नदीचे पाणी लांबवर खेळवता येणे यासाठी कालवे काढले जातात. याचा नौकानयनालाही उपयोग होतो.

१०. कधीकधी नौकानयनाची सोय होण्यासाठी किंवा नदीच्या प्रवाहातून जास्त ताकद मि़ळवण्यासाठी नदीच्या मार्गात बदल केला जातो. नदीचे नियोजन ही सातत्याने चालणारी गोष्ठ आहे. कारण नदी तिला घातलेल्या बांध-भिंती नष्ट करते. तसेच बांधांमधले घातूचे भाग गंजतात व बदलावे लागतात.

११. धरणाच्या भिंतींना पाण्याच्या धडकांनी तडे जातात व बाहेर पडलेल्या पाण्याने हाहाकार उडतो. याशिवाय अशा प्रकारच्या पाणी नियोजनाने विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न उभे राहतात

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या

०१. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
०२. अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
०३. मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)
०४. यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
०५. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
०६. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
०७. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
०८. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
०९. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
१०. लेना नदी ( ४,२६० कि.मी.)