नासाचे मानवी जखमा भरणारे नवीन तंत्रज्ञान

०१. मानवाला होणाऱ्या जखमा लवकर भरून येण्यासाठी नासाने विद्युतवाहक अशा उच्च तंत्रज्ञानाधिष्ठित पदार्थाचा वापर करण्याचे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. पृथ्वीबाहेर गुरुत्व नसताना मानवी रक्ताचे गुणधर्म वेगळे असतात. त्यामुळे तेथे जखमा लवकर भरून येत नाहीत त्यामुळे धोका जास्त असतो.

०२. अवकाश मोहिमांचा खर्च त्यामुळे जास्त होतो. नवीन पदार्थात कमी प्रमाणात वीज मानवी त्वचेच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेली जाते त्यामुळे जखमा लवकर भरतात. वीजवाहक पदार्थाचे नाव पॉलिव्हिनिलीडीन फ्लोराईड असे आहे व त्याचा उपयोग जखमा लवकर भरण्यासाठी करता येतो. 


०३. जखमेच्या आजूबाजूच्या उतींना कमी वीज प्रवाह दिला तर जखमा लवकर भरून येतात पण तरी गॉझ पद्धत आवश्यक असते. पीव्हीडीएफचे धागे समांतर जुळवून ते जखमेच्या ठिकाणी स्कॅफोल्डसारखे लावतात व त्यामुळे जखमा लवकर भरतात असे नासाच्या लँगले रीसर्च सेंटरच्या एमिली सिओची यांनी सांगितले. 


०४. यात पदार्थाचे धागे गॉझबरोबर जुळवावे लागतात व त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी आणखी एक थर तयार होतो असे स्पुटनिक न्यूजने म्हटले आहे. हा शोध साधा व स्वस्त आहे त्यामुळे त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होणार आहे. लष्करी जवानांसाठी व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी जखमा भरून येण्याकरिता त्याचा वापर करता येणार आहे.





अपंग शासकीय कर्मचाऱ्याला पदावनती नाही
०१. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला शासनाच्या सेवेत असताना अपंगत्व आल्यास त्याला पदमुक्त किंवा त्याची पदनावती करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून १९७२ सालच्या केंद्रीय नागरी सेवा कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.



०२. सरकारी सेवेत असताना अपंगत्व आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या १९९५ सालच्या कायद्याचे नियम लागू होतील. या कलमातील कलम ४७ नुसार कोणतेही आस्थापन अपंगत्वामुळे कर्मचाऱ्याला पदमुक्त किंवा त्याची पदनावती करू शकत नाही. तसेच केवळ अपंगत्त्वामुळे संबंधित व्यक्तीला पदोन्नती नाकारता येत नाही. 


०३. सरकारी नोकरी कायद्यातील कलम ४७ लागू नसलेल्या कर्मचाऱ्याला सेवेत रुजू असताना कायमस्वरुपी शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आल्यामुळे सेवेतून निवृत्त व्हावे लागले तर त्याला नव्या तरतुदीप्रमाणे निवृत्तीवेतन आणि इतर भत्ते मिळतील. यासाठी त्याने निवृत्तीच्या दिवसापर्यंत किती वर्षांची सेवा केली आहे, तो कालावधी गृहीत धरण्यात येईल. मात्र, यासाठी त्याला अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.






समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे निधन

०१. गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज यांच्या पत्नी आणि समाजसेविका परमेश्वर गोदरेज यांचे १० ऑक्टोबर रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. परमेश्वर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून त्या फुफ्फुसांच्या आजारावर उपचार घेत होत्या. 

०२. परमेश्वर गोदरेज यांनी एचआयव्ही एड्स असलेल्या रुग्णांसाठी विशेष कार्य केले होते. त्यांनी २००४ साली या रुग्णांसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेअर यांच्यासोबत ‘हिरोज प्रोजेक्ट‘ सादर केला होता.
तसेच या प्रकल्पाला बिल गेट्स आणि क्लिंटन यांच्या स्वयंसेवी संस्थांचा हातभार लागला होता.






न्यूझीलंड विरुद्ध भारताचा कसोटी मालिका विजय
०१. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून मालिकेवर ३-०असा मोठा विजय मिळविला. तसेच त्याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये नंबर १ स्थानही मिळविले. 


०२. तिसऱ्या कसोटीत अश्‍विनने दुसऱ्या डावात सात फलंदाज बाद करण्याचा पराक्रम केला.
आश्विन हा ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’ ठरला. भारताने हा सामना ३२१ धावांनी जिंकला. 
आर. अश्‍विनने दोन्ही डावांत मिळून 13 फलंदाज बाद केले


०३. हुकमी गोलंदाज आर. अश्‍विनही गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिला झाला आहे. अश्‍विनने दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला मागे टाकून हा गौरव मिळवला. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही तो पहिल्या क्रमांकावर आहे. 

०४. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने २७ विकेट, अशी कामगिरी बजावली. आतापर्यंतच्या ३९ कसोटीत त्याने २२० विकेट मिळवल्या आहेत. इतक्‍या कमी कसोटीत २२० विकेट मिळवणारा तो पहिला गोलंदाजही ठरला आहे. 


०५. इंदूर येथील हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी अश्‍विन क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होता. या कसोटीतील १३ बळी मिळवल्यामुळे त्याने सर्वाधिक ९०० रेटिंग गुण मिळवले. २००० नंतर ९०० रेटिंग गुण मिळवणारे मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, व्हर्नान फिलॅंडर, डेल स्टेन आणि शॉन पोलॉक हे गोलंदाज आहेत.







राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक
०१. ६२ व्या एसजीएफआय आंतरशालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक जिंकले. केरळ संघाने रौप्य व तामिळनाडू संघाने कांस्यपदक मिळविले.


०२. महाराष्ट्र संघातील समीर इनामदार हा पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एसएनबीपी महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. 
तसेच यापूर्वी २०१४ मध्ये तामिळनाडूमध्ये रौप्य, २०१५ मध्ये हैदराबाद येथील नालगौडामध्ये सुवर्णपदक व आता तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.