शस्त्रास्त्र खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

०१. आपल्या सशस्त्र बलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेला भारत हा मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानी पोचला आहे. त्याच्या आधी फक्त सौदी अरेबियाचा क्रमांक आहे.

०२. अमेरिकी संसदेचे सभागृह असलेल्या काँग्रेसची संशोधन सेवा सीआरएसने ‘कन्व्हेशनल आर्म्स ट्रान्सफर्स टू डेव्हलपिंग नेशन्स २००८ -२०१५’ हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

०३. भारताने २००८ ते २०१५ पर्यंत ३४ अब्ज डॉलर किमतीचे संरक्षण साहित्य खरेदी केले. तर सौदी अरेबियाने ९३.५ अब्ज डॉलरची खरेदी केली, असे या अहवालात म्हटले आहे.



अम्मांच्या उत्तराधिकारी चिनम्मा
०१. तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला नटराजन (चिनम्मा) यांची निवड करण्यात आली.

०२. पक्षाच्या गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्याच्या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आणि शशिकला यांनीही हा प्रस्ताव तातडीने स्वीकारला.

०३. पक्षाचे खजिनदार आणि मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सांगितले, की पक्षाच्या नियमांनुसार, चिनम्मा यांची अण्णा द्रमुकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात सर्वसाधारण बैठकीत सर्वसहमतीने एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

०४. ६० वर्षे वयाच्या शशिकला यांची लवकरच औपचारिकरीत्या सरचिटणीसपदी निवड केली जाईल, असे ठरावात म्हटले आहे.

०५. अण्णा द्रमुकच्या सर्वसाधारण बैठकीत १४ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये जयललिता यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा या ठरावासह जयललिता यांना मॅगसेसे पुरस्कार आणि जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असेही ठराव मंजूर करण्यात आले.



शिरीष देव हवाई दल उपप्रमुखपदी
०१. एअर मार्शल शिरीष देव यांची हवाई दल उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आलेल्या ऍड. रोहित देव यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. 

०२. शिरीष देव यांची नियुक्ती एअर मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांच्या जागी करण्यात आली. सध्या देव हवाई दलाचे वेस्ट कमांड चीफ म्हणून कार्यरत आहेत. 

०३. देव यांच्या जागी एअर मार्शल सी. हरिकुमार यांची नियुक्ती होणार आहे. शिरीष देव एक जानेवारी २०१७ पासून पदभार स्वीकारतील.

०४. देव हवाई दलात १९७९ मध्ये दाखल झाले. तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले. देव पहिले फाइटर कॉम्बॅट लीडरदेखील राहिले आहेत. त्यांनी डिफेन्स सर्विसेज स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे शिक्षण घेतले. 

०५. गेल्या वर्षी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.



विरल आचार्य रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर
०१. केंद्र सरकारने विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्त होते.

०२. विश्वनाथन, एस.एस.मुंद्रा, आर. गांधी या इतर तीन डेप्युटी गव्हर्नरबरोबर ते काम करतील. यातील मुंद्रा, गांधी यांची माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. तर विश्वनाथन यांची नियुक्ती विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात झाली आहे.


०३. आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे २००८ पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अर्थविषयक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. स्टर्न विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी ते २००१ ते २००८ पर्यंत लंडन बिझनेस स्कूलमध्ये कार्यरत होते.

०४. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकताच त्यांना आर्थिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणून पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग या वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी जीएसटी विधेयक हा एका सकारात्मक निर्णय असल्याचे म्हटले होते. 

०५. आयआयटी मुंबई येथून त्यांनी १९९५ मध्ये कॉम्प्युटर सायन्समधून बी.टेक पदवी मिळवली आहे. वर्ष २००१ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क स्टर्न विद्यापीठातून आर्थिक विषयातून पीएच.डी प्राप्त केली. 



अनिल बैजल दिल्लीचे नवे नायब राज्यपाल
०१. नजीब जंग यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा दिलेला राजीनामा बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मंजूर केला आहे.

०२. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदासाठी आता अनिल बैजल यांची यांचे नाव पाठवले असून आता राष्ट्रपतींनीही त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बैजल यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैजल हे दिल्लीचे २१ वे नायब राज्यपाल असतील. 

०३. ७० वर्षीय बैजल हे १९६९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले असून नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६ मध्ये निवृत्त झाले होते.

०४. अनिल बैजल यांच्यासमोर सत्ताधारी आपसोबत समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे.



मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवांचे निधन
०१. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे आज (बुधवारी) हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. भाजपच्या मध्य प्रदेशमधील पहिल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होता. 

०२. केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुंदरलाल पटवा यांनी मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे. सर्वात प्रथम ते २० जानेवारी १९८० ते १७ फेब्रुवारी १९८० पर्यंत जनता पक्षाच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ५ मार्च १९९० ते १५ डिसेंबर १९९२ पर्यंत भाजपच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले.

३. सुंदरलाल पटवा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२४ मध्ये झाला होता. त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरूवात जनसंघापासून केली होती. १९७७ मध्ये ते जनता पार्टीशी जोडले गेले. 

०४. त्यानंतर जन संघाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्यांनी पक्षापासून वेगळे होत १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना केली. 

०५. पटवा हे १९७७ मध्ये छिंदवाडामधून पोटनिवडणूक लढवून खासदार झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.



तिसरे शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत
०१. २५ आणि २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथे ‘तिसऱ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. 

०२. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

०३. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होईल. आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे हे या संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत.

०४. साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्यावतीने २०१५मध्ये वर्धा येथे पहिले, तर २०१६मध्ये नागपूर येथे दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 



प्रसिद्ध साहित्यिक रमेश सहस्रबुद्धे यांचे निधन
०१. प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. 


०२. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. ‘प्रभात’च्या दिवाळी अंकात आणि ‘प्रभात’ने राबवलेल्या ‘ऑल राउंडर’ या उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. 

०३. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते राज्यातील पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. अनेक वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले असून, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देखील त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे.

०४. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्यपुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इतर दोन पुस्तकांस बालकुमार साहित्य पुरस्कारही मिळाला आहे. 

०५. रोहा येथे १९८७ मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक लेखन कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. ‘विज्ञानयुग’ या पुण्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाचे ते अनेक वर्षे सल्लागार मंडळावर होते. 




रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्संना मानवंदना
०१. रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉशची आज (गुरुवार) २५० वी जयंती. त्यानिमित्त गुगलने त्यांना खास गुगल डुडलद्वारे मानवंदना दिली.

०२. चार्ल्स यांचा जन्म स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. त्यांना  रसायनशास्त्रात रुची होती. 

०३. नाफ्ता नावाचा पदार्थ हा रबरमध्ये सहज विरघळतो. यापासून तयार होणारा पदार्थ जलरोधक असतो. चार्ल्स त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही याचा शोध चार्ल्स यांनी लावला. 

०४. त्यानंतर १८२३ मध्ये त्यांनी जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट मिळाले.



कसोटी क्रिकेटमध्ये अमला १००००वा पायचीत खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये पायचीत होणारा हाशिम अमला हा दहा हजारावा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला आज नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि हा विक्रम नोंदवला गेला.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पोर्ट एलिझाबेथ कसोटीदरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा विक्रम नोंदवला आहे.