डोनाल्ड ट्रम्प ठरले टाइम्स पर्सन ऑफ द इअर
१. टाइम पर्सन ऑफ द इयर २०१६च्या शर्यतीमध्ये अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. तर टाईम्स पर्सन ऑफ द इयर रीडर्स पोल मध्ये नरेंद्र मोदी विजयी ठरले आहेत.

०२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शर्यतीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील उमेदवार हिलरी क्लिन्टन, फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले होते. 

०३. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

०४. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिन्टन या पर्सन ऑफ द इयर स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत. तर ऑनलाइन हॅकर्सनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.



भारतात प्रथमच होणार टेबलटेनिस वर्ल्ड टूर इव्हेंट
०१. भारतात प्रथमच आयटीटीएफ म्हणजे टेबल टेनिसचा वर्ल्ड टूर इव्हेंट फेब्रुवारीत आयोजित केला जात असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.


०२. या स्पर्धेसाठी १ लाख२० हजार डॉलर्सचे बक्षीस ठेवले गेले आहे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू यात सहभागी होत आहेत. १२ देशांत ही स्पर्धा होणार आहे.



रिसोर्स सॅट-२ ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
०१. बुधवारी सकाळी रिसोर्ससॅट २ ए या उपग्रहाचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून ( इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 

०२. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-३६ या प्रक्षेपकाद्वारे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी सॅट २ ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला. 

०३. या उपग्रहाचे वजन १,२३५ किलो असून तो पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे. अंतराळ मोहिमांमधील भारताची ही मोठी कामगिरी आहे.

०४. जागतिक वापरकर्त्यांना रिसोर्स सॅट-२ ए या उपग्रहाद्वारे रिमोट सेन्सिंग डेटा सुविधा पुरविली जाईल. 

०५. रिसोर्ससॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह असून यापूर्वी २००३ मध्ये रिसोर्ससॅट -१ आणि २०११ मध्ये रिसोर्ससॅट-२ हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.  आता या दोन्ही उपग्रहांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने रिसोर्ससॅट २ ए त्यांची जागा घेणार आहे. 

०६. रिसोर्ससॅट- २ ए हा उपग्रह मुख्यत्तेकरून पृथ्वीवरील वनसंपदा, जलसंसाधने आणि खनिजे या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्त्रोतांची माहिती गोळा करण्याचे काम करतो.

०७. इस्त्रोच्या पीएसएललव्ही-३६ या प्रक्षेपकाद्वारे हा सॅट-२ ए अवकाशात सोडण्यात आला. इस्त्रोच्या पीएसएललव्ही-३६ या प्रक्षेपकाची अवकाशात यशस्वीपणे उपग्रह सोडण्याची ही ३८ वी वेळ आहे. 

०८. १९९४ पासून २०१६ पर्यंत १८ वर्षांत पीएसएलव्हीच्या माध्यमातून ३६ यशस्वी प्रक्षेपणांतून १२१ उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे. यापैकी ७९ उपग्रह परदेशी होते.



ज्येष्ठ पत्रकार चो रामास्वामी कालवश
०१. ज्येष्ठ पत्रकार, अभिनेते, राज्यसभेचे माजी सदस्य आणि राजकीय टीकाकार चो रामास्वामी (८२) यांचे आजारपणामुळे बुधवारी येथे निधन झाले.

०२. रामास्वामी ‘तुगलक’ या तामिळ नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. उपहासात्मक लेख लिहिणारे म्हणून ते ओळखले जात.



राज्यात मागासवर्गीय आयोग स्थापन करणार०१. राज्यातील मागासलेल्या समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. 

०२. राज्यात सध्या हा आयोगच अस्तित्वात नसल्याने राज्य मागासवर्गीय आयोगाची घोषणा राज्य सरकार लवकरच करेल, असे समजते.

०३. राज्यातील एखाद्या समाज घटकाला आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या आरक्षण हवे असेल तर याबाबतची मागणी राज्य मागासवर्गींय आयोगाकडे करावी लागते. 

०४. हा आयोग संबंधित समाज घटकांच्या मागण्यांचा, त्यांनी दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करतो, त्यानंतर या समाजाला आरक्षण द्यावे की नाही, याबाबतची शिफारस राज्य सरकारला करते.त्या शिफारशीची अंमलबजावणी करणे राज्य सरकारवर बंधनकारक असते.



‘एशियन ऑफ द ईयर’ फ्लिपकार्टच्या संस्थापकांना जाहीर
०१. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांचा सिंगापूरमधील स्टेइट्स टाइम्सने प्रतिष्ठित ‘एशियन्स ऑफ द ईयर २०१६’ साठी त्यांची निवड केली आहे. 

०२. जगप्रसिद्ध टाइम नियतकालिकाने विश्वातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केल्यानंतर त्यांना अजून एक मानाचे स्थान मिळाले आहे.

०३. २०१४ मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.



न्या. जगदिश सिंह केहर होणार नवे सरन्यायाधीश
०१. न्यायमूर्ती जगदिश सिंग केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केहर हे भारताचे ४४ वे सरन्यायाधीश असतील.

०२. विद्यमान सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी केहर यांनी मंगळवारी नाव सुचवलं होतं. ४ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.

०३. यासोबतंच भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत. 

०४. २८ ऑगस्ट १९५२ रोजी केहर यांचा जन्म झाला. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट, उत्तराखंड हायकोर्ट तसेच कर्नाटक हायकोर्टात त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केहर यांची नियुक्ती झाली होती.



आरोग्य विद्यापीठ अधिसभेवर डॉ. नीलम गोऱ्हेंची नियुक्ती
०१. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानमंडळातर्फे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार विधान परिषदेच्या सभापतींनी ही नियुक्ती केली आहे. 

०२. डॉ. गोऱ्हे यांची नियुक्तीची मुदत २४ एप्रिल २०२० पर्यंत राहणार आहे.



‘संजय गांधी पार्क’ इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर
०१. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केला आहे. 

०२. आदेशान्वये ५९.४६ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी १९.२५ चौरस किलोमीटर क्षेत्र वनजमिनीत येते. ४०.२१ चौरस किलोमीटर क्षेत्र बिगर वनजमीन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

०३. ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून किमान १०० मीटर आणि कमाल ४ किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे.

०४. वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन करणे हे आदेश जारी करण्यामागील उद्देश असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. उद्यानातील बिबट्यांची घटती संख्या, बिबट्यांचा लोकवस्तीमध्ये वाढलेला वावर, लगतची वस्ती आणि वनसंपदेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

०५. सामाजिक संस्था, मुंबई पालिका, मेट्रो रेल कॉर्पोरेशनसह उर्वरित प्राधिकरणांकडून ‘इको सेन्सिटिव्ह झोन’बाबत सूचना आल्या होत्या. 

०६. तर मेट्रो कारशेडसाठी येथील १.६५ चौ. कि. परिसराचा समावेश आहे. यासह काही मंदिरांचा परिसरही ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मधून वगळला आहे.