देशातील पहिली १०० टक्के बायोडिझेल लक्झरी बस कर्नाटकातून धावणार
कर्नाटक परिवहन अर्थात केएसआरटीसीने (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या २५ लक्झरी खरेदी केल्या असून बंगळुरू ते तिरूपती, चेन्नई, बिदर आणि कुडानपुरा येथे या बस धावणार आहेत.


बायोडिझेलवर धावणाऱ्या या प्रत्येक मल्टिअॅक्सल बसची किंमत ९१.१० लाख ऐवढी आहे.

या बस डिझेल व बायोडिझेलवर धावू शकतील.या सर्व बसला बायोडिझेल किट बसवण्यात आलेले आहे. या बसमुळे हवेत होणारे प्रदूषण टळणार आहे



खांदेरी पाणबुडीचे जलावतरण!
फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीत सहा स्कॉर्पियन पाणबुड्या बांधणीचे काम सुरू आहे. स्कॉर्पियन वर्गातील या पाणबुड्यांमध्ये उच्च दर्जाची स्टिल्थ प्रणाली वापरली गेली आहे. त्यामुळे शत्रुपक्षाला चकवा देत सागरी मोहिमा फत्ते करण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे.

यातील खांदेरी या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. जलदुर्ग खांदेरी आणि उंदेरी यांच्यापैकी खांदेरी दुर्गावरून या पाणबुडीस नाव देण्यात आले आहे.

खोल समुद्रातून तसेच समुद्रावरुन टॉरपॅडो, क्षेपणास्त्रे, युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे. समुद्रात सुरुंग पेरणे, माहिती गोळा करणे, टेहळणीपासून युद्धनौका व पाणबुडीविरोधी मोहिमा हाताळण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे.



झाकीर हुसेन यांना एस. डी. बर्मन पुरस्कार प्रदान
‘मला फक्त तबल्याच्या बोलांचीच भाषा येते’, असे म्हणत प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी “चित्रपटगृहात या, सिनेमा पहा, खा-प्या आणि घरी जा”, हे सारे केवळ तबल्याच्या बोलांवर सादर करून दाखवले आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (पिफ)
झाकीर हुसेन यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कारा/ने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना हुसेन बोलत होते. 

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि विख्यात अभिनेत्री-दिग्दर्शक अपर्णा सेन यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अपर्णा सेन यांनी आपला पुरस्कार दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना अर्पण केला.



हॉकीपटूंच्या समितीत श्रीजेशची निवड
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) खेळाडूंच्या समितीत भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याची निवड केली आहे. आठ आजी-माजी खेळाडूंचा यात समावेश आहे. महासंघाने अनेक ठिकाणी राष्ट्रीय संघांसह बैठकांचे आयोजन केले आहे. 

या समितीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा क्रीडापटू आयोग आणि इतर संघटनांशी संवाद साधून माहिती आणि संशोधनाची देवाणघेवाण करावी लागेल. 

आरोग्य, कल्याण, कारकिर्दीची तयारी आणि व्यवस्थापन, डोपिंग-सट्टेबाजी-मॅच-फिक्‍सिंगला विरोध अशा अनुषंगाने समितीला काम करावे लागेल.



‘एमसीए’च्या अध्यक्षपदी आशिष शेलार
गुरुवारी एमसीएच्या झालेल्या बैठकीत शेलार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करतानाच उपाध्यक्षपदाच्या दोन्ही रिक्त जागेवर अनुक्रमे विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची निवड करण्यात आली. 

हे सर्व पद पुढील निवडणूकांपर्यंत कायम राहतील. एमसीए नियमांमध्ये सुधारणा करण्याऱ्या समितीचे काम संपल्यानंतर लगेच विशेष सर्वसाधरण सभा बोलविण्यात येईल. त्यावेळी लोढा समितीच्या शिफारसीनुसार नियम बदलण्यात येतील.



एन. चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष
वर्षाला १०३ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्स या मातृकंपनीच्या अध्यक्षपदी ५३ वर्षांचे एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. चंद्रशेखरन २१ फेब्रुवारी रोजी टाटा समूहाची धुरा हाती घेतील.

गेल्या २४ आॅक्टोबर रोजी सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यानंतर, टाटा सन्सने नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी रतन टाटांसह पाच सदस्यांची ‘सर्च कमिटी’ नेमली होती. 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) चंद्रशेखरन गेली सात वर्षे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘टीसीएस’चे अध्यक्षपद आता कंपनीचे ४५ वर्षांचे ‘सीएफओ’ राजेश गोपीनाथन यांच्याकडे जाईल.

टीसीएस फायनान्शियल सर्व्हिसेसचे विद्यमान अध्यक्ष एन. गणपती सुब्रमणियम यांची नेमणूक आता टीसीएसचे मुख्य कामकाज अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.



वाकायामा प्रांतासोबत एमटीडीसीचा करार
राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज जपानमध्ये वाकायामा प्रांताचे राज्यपाल योशीनोबू निसीका यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र इअर’ म्हणून साजरे करीत आहे. 

महाराष्ट्र राज्य हे वाकायामा प्रांतासाठी भारत देशाचे प्रवेशद्वार आहे. सामंजस्य करारातून दोन्ही राज्यांच्या पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. पर्यटनाशिवाय उद्योग, आयटी, नगरविकास, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये ही महाराष्ट्राबरोबर देवाण-घेवाण करण्यास वाकायामा प्रांत उत्सूक आहे.



दुसऱ्या महायुद्धाची बातम्या देणाऱ्या पत्रकाराचे निधन
दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी जगाला देणाऱ्या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झाले आहे.

ऑगस्ट १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले, तेव्हा क्लेअर या ‘दि टेलिग्राफ’ या ब्रिटीश वृत्तापत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करत होत्या. त्यांनीच ती बातमी जगापर्यंत पोचवली होती. 

जागतिक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या या घटनेच्या वेळेस क्लेअर यांना कामावर रुजू होऊन केवळ एक आठवडा झाला होता.

विशेष म्हणजे अन्य देशांसहित क्लेअर यांनी भारतातही वार्तांकन केले होते. जर्मनी, व्हिएतनाम आणि चीनमधील बहुतेक युद्धांमध्ये त्यांनी आघाडीवर जाऊन बातमीदारी केली होती. 

युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडमधील कॅटोवाईस शहरातून ब्रिटनमध्ये जाण्यासाठी त्यांनी ३५०० ज्यू नागरिकांना मदत केली होती.



रशियात सिगारेटवर बंदी
रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे. तसा निर्णय आरोग्य मंत्रालय घेणार आहे. 

म्हणजेच २०१५ नंतर जन्मलेली व्यक्ती १८ वर्षांची झाल्यानंतरही त्याला रशियात सिगारेट मिळू शकणार नाही. या निर्णयाला अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही समर्थन आहे.रशियाला पूर्ण तंबाखूमुक्त करण्यासाठी हे प्रयत्न आहेत.

२०३३ मध्ये या निर्णयाचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. कारण सध्याची लहान मुले त्या वेळी १८ वर्षांची होतील.  

पूर्ण विचारांती हा निर्णय घेण्यात येत आहे, पण अशा प्रकारे बंदी आणणे योग्य आहे का? याबाबत मात्र अनिश्चितता आहे. यासाठी अन्य मंत्रालयांशी चर्चा करावी लागेल, असाही एक मतप्रवाह आहे. 

याबाबतचे कागदपत्रे अर्थमंत्रालयासह अन्य मंत्रालयांना पाठविण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. २०१६ मध्ये रशियात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत दहा टक्के घट झाली आहे.