ग्लोबल मराठी एंटरप्रेन्युअर अॅवॉर्ड
लंडन मराठी संमेलन २०१७ हे सर्व दूर पसरलेल्या महाराष्ट्रीयांना एकत्र आणण्याचा एक मोठा प्रयत्नआहे. 


महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन वर्षाच्या निमित्ताने साजरा होणारा लंडन मराठी संमेलन हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि मराठी बाण्याचा एक अद्भुत आविष्कार असणार आहे.

पहिले जागतिक मराठी उद्योजकांचे अधिवेशन हे ३ जून ला होणार आहे. दुबई, अमेरिका, युके, भारत आणि इतर देशातून अधिवेशनासाठी उद्योजक येतील. 

३ आणि ४ जूनला एक मोठा सांस्कृतिक सोहळा आयोजित केला आहे, ज्यामध्ये युके, यूरोप आणि इतर देशातून जवळ जवळ १३०० नागरिक अपेक्षित आहेत.

विश्वस्तरावरील वेग वेगळ्या उद्योगात जम बसविलेल्या महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. 

युके मधील उद्योजकांना वाव मिळावा, मदत व्हावी, प्रोत्साहन मिळावे, उद्योग वाढविण्यासाठी संधी मिळाव्यात म्हणून १० एप्रिल २०१६ ला Overseas Maharashtrians Professionals and Entrepreneurs Group (OMPEG) नावाच्या संस्थेची मुहूर्तमेढ झाली. हि स्पर्धा OMPEG आणि LMS या संस्था मिळून घेत आहेत.

तसेच यानिमित्त ‘ग्लोबल मराठी आंत्रप्रेन्युअर अॅवॉर्ड’चे वितरण करण्यात येणार आहे.



शाहरूख खानला चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान 
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांना चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी राज्यपाल म्हणाले की, शाहरूख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. 

शाहरूख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते. यश चोप्रा यांनी शाहरूख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते. 

सर्वोच्च स्थानावर फार काळ टिकून राहणे अवघड गोष्ट असते, मात्र शाहरूख खान यांचा बॉलीवूडवर २५ वर्षांहून अधिक काळ दबदबा राहिलेला आहे.



भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघातर्फे दोन नव्या राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा
गेल्या काही वर्षांत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि भालाफेक क्रीडा प्रकारात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार प्रगती केली आहे. याच कामगिरीकडे पाहून भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय) या दोन खेळांच्या नव्या राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा केली. 

महासंघाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. ‘सध्या अशा क्रीडा प्रकारांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये भारतीयांची प्रगती चमकदार आहे,’ असे मत एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केले.

सुमारिवाला पुढे म्हणाले, की भारतीय धावपटू सातत्याने ४०० मी. आणि ४०० मी. रिले स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या भालाफेकपटूंनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे.



विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत हरिकाला कास्यपदक
भारतीय ग्रॅण्डमास्टर डी हरिका हिला २६ फेब्रुवारी रोजी विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झ्योंगी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य पदक आहे.

भारताची स्टार खेळाडू असलेल्या द्रोणवली हरिका हिने टायब्रेकमध्ये अनेक संधी गमावल्या. त्याचा परिणाम हा तिला पराभवाच्या रूपाने पाहावा लागला. अंतिम फेरीत आता झ्योंगीचा सामना युक्रेनच्या अन्ना मुजिचुक हिच्याशी होईल.

हरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त १७ व्या चालीतच विजय नोंदवला. तिच्या या धडाक्याने झ्योंगी मागे पडली. 

मात्र, दुसऱ्या डावात हरिकाने झ्योंगी हिला पुनरामन करण्याची संधी दिली. काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने दुसरा डाव ड्रॉ होण्याची स्थिती असताना चूक केली. त्यामुळे तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसरा डाव जिंकल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी साधली. 

तसेच त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला ५-४ ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने २०१२ आणि २०१५ मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.



राज्याचे नवे मुख्य सचिव सुमित मलिक
सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ते ३१ जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. 

सुमित मलिक हे १९८२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभाग (राज शिष्टचार)चे अति. मुख्य सचिव आहेत. 

ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ही नवी संधी दिल्याचे म्हटले जाते. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे २ वर्षांचा असेल.



वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध
कोचीमधील इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. 

मनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे. 

विभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै २०१५ मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.

इम्पॅटिअन श्रेणीतील ही वनस्पती नवी असल्याचे त्या वेळी नागराज यांनी सांगितले होते, या कामात त्यांना संशोधक के.एम. प्रभुकुमार यांची मदत लाभली होती. 

२०१६ च्या सप्टेंबरमध्ये कन्नडिपारा येथे ही वनस्पती पुन्हा आढळली, जगासाठी मात्र ती अनोळखी वनस्पतीच होती. 

आता आंतरराष्ट्रीय जनरल फायटोटाक्‍सामध्ये याबाबतचे शोधपत्र छापून आले असून, या वनस्पतीची १०० ते १५० झाडेच सापडली असल्याने तिला अतिशय चिंताजनक श्रेणीत दाखल करण्यात आले आहे.

तसेच ही वनस्पती दगडांमध्ये असलेल्या ओलाव्यात वाढते, तिला जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान फुले येतात आणि ती पांढरी असून, त्यांच्यावर गुलाबी रंगाची हलकी छटा असते, अशी माहिती या शोधपत्रात देण्यात आली आहे.