विनियोजन विधेयक मंजूर
राज्याचा २०१७-१८ च्या अर्थसंकल्पाशी संबंधित विनियोजन विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेच्या संमतीसाठी पाठविण्यात आले. त्याबाबत फारशी चर्चा न होता, विधेयक मंजूर करण्यात आले. 




अन्न प्रक्रिया उद्योगाला मिहानमध्ये जागा 
विदर्भातील शेतकरी आणि आदिवासींच्या शेतकी तसेच वन उत्पादनांवर प्रक्रिया करून अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प क्षेत्रात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही जागा नवीन अन्न प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध करून दिली जाईल.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची ५८ वी बैठक झाली. 

मिहान प्रकल्प क्षेत्रात पतंजली उद्योग समूहाला अन्न प्रक्रिया उद्योगासाठी जागा देण्यात आली आहे. त्यानंतर इतर अन्न प्रक्रिया उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली मागणी लक्षात घेता त्यांना मिहान प्रकल्प क्षेत्रात नियमानुसार अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली जाईल. 



गुजरातमध्ये गोहत्याबंदी कायदा अधिक कठोर
गुजरात सरकारने गोहत्याबंदी कायदा अधिक कठोर केला असून गायींची हत्या आता अजामीनपात्र गुन्हा समजला जाणार असून, तसे कृत्य करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईल. 

गोमांस बाळगणे अथवा त्याची वाहतूक करणाऱ्यासही दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो, तसेच दोषींना पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल. राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी ‘गो संरक्षण दुरुस्ती’ विधेयक मंजूर करण्यात आले.

‘गुजरात प्राणी संरक्षण कायदा- १९५४’ अन्वये आता गायींची कत्तलीसाठी वाहतूक करणेदेखील गुन्हा समजला जाणार असून, त्यासाठी दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. 

याच कायद्यामध्ये २०११ मध्येही दुरुस्ती करण्यात आली होती. याआधी गोहत्या केल्यास केवळ सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होत असे. 



खेळाडू आयोगाच्या प्रमुखपदी राजू भावसार
राजस्थान येथे भारतीय हौशी कबड्डी महासंघाने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंच्या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षा मृदुला भदौरिया यांनी खेळाडू आयोगाची स्थापना केली असून, या आयोगाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांची एकमताने निवड करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला भारताच्या विविध राज्यांतून ८० आजीमाजी पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

समितीचे अन्य सदस्य म्हणून बी. सी. रमेश (कर्नाटक), संजीव कुमार (भारतीय रेल्वे), नवनीत गौतम (राजस्थान), राम मेहेर सिंग (सेनादल), तेजस्विनी बाई (भारतीय रेल्वे), प्रियंका (हरयाणा) यांची निवड करण्यात आली. 

कबड्डीच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंच्या हिताचा विचार करून अशा प्रकारे खेळाडूंच्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. खेळाडूंच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी हे आयोग काम करेल.

 कबड्डीपटूंसाठी काही महत्त्वपूर्ण योजना तयार करून त्या कार्यान्वित करण्यासाठी ही संघटना प्रयत्न करेल. खेळाडू आणि महासंघ यामधील दुवा म्हणून हा आयोग महत्त्वाची भूमिका पार पाडेल.



आयओसी परिषद आयोजनाची संधी भारताने गमावली
२०१९ मध्ये होणारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची परिषद आयोजित करण्याची संधी भारताने गमावली आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी ही माहिती दिली.

आयओसीची ही परिषद आयोजित करण्यासाठी नवी दिल्लीप्रमाणेच मिलान, बुडापेस्ट, क्राकोव, ब्रुसेल्स व इस्तंबूल या शहरांनी तयारी दर्शवली होती, मात्र मिलान या शहरात ही परिषद आयोजित करण्याबाबत आयओसीने झुकते माप दिले आहे. याची अधिकृत घोषणा लिमा (पेरू) येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयओसीच्या वार्षिक परिषदेत केली जाणार आहे.

भारताने यापूर्वी १९८३ मध्ये आयओसीची परिषद आयोजित केली होती. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयओसीच्या वार्षिक परिषदेत २०२६च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा व २०२५च्या हिवाळी युवा ऑलिम्पिक स्पर्धाची ठिकाणेही निश्चित केली जाणार आहेत.

आयओसीची परिषद ही अतिशय प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. या परिषदेत २०६ देशांच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघांचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. ऑलिम्पिक चळवळीबाबत काही सुधारणा किंवा काही नियमावलीमधील दुरुस्तींबाबत तेथे निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे या परिषदेत आयओसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसह कार्यकारिणीची निवडही केली जात असते.



पेगी व्हिटसन यांचा आठव्यांदा ‘स्पेस वॉक’
सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी महिला अवकाशवीर असलेल्या पेगी व्हिटसन (वय५७) यांनी आज आठव्यांदा अवकाशातून चालत जात (स्पेस वॉक) नवा विक्रम प्रस्थापित केला. इतक्‍या वेळा ‘स्पेस वॉक’ करणाऱ्या त्या पहिल्याच महिला अवकाशवीर ठरल्या आहेत.


व्हिटसन आणि त्यांचे सहकारी शेन किमबरो यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बाहेर पडत येथे येणाऱ्या अवकाशयानांसाठी पार्किंगसाठी जागा (डॉकिंग पोर्ट) तयार करण्याच्या कामास सुरवात केली.

अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत ५० तास चाळीस मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.

या ‘स्पेस वॉक’ दरम्यान व्हिटसन या हा विक्रमही मोडतील. व्हिटसन या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात असून त्या तिसऱ्यांदा अवकाशस्थानकात आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक दिवस अवकाशात व्यतित केले असून असे करणाऱ्याही त्या पहिल्या महिला आहेत.