‘जीएसएलव्ही एमके-३’ च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज
‘भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट’ असे वर्णन केल्या जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही एमके-३’ या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी सांगितले. 


पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

‘जीएसएलव्ही एमके-३’ हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. 

तसेच याव्दारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास ‘इस्रो’ सिद्ध आहे. या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटव्दारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल.



तुरनोई सॅटेलाइट स्पर्धेत भारताच्या भवानीदेवीला सुवर्णपदक
भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 

२७ मे रोजी झालेल्या अंतिम फेरीत सी.ए. भवानीदेवी हिने ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा १५-१३ असा पराभव केला. 

चेन्नईच्या या महिला खेळाडूने उपांत्य फेरीत ब्रिटनची एक अन्य खेळाडू जेसिका कोरबी हिला १५-११ अशा फरकाने नमवले होते. 

तसेच त्याबरोबर भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ मे पासून जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.
पंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत. 
चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे. 

शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन १९८८ मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.



मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना
राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून सौर कृषी फीडरची योजना सरकारच्या विचाराधीन होती. 

ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले, अशा ठिकाणी कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३० टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागते. 

कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल

तसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.



‘द स्क्वेअर’ ठरला कान्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपट
सत्तराव्या कांन्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपटाचा पाम डि ओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या ‘द स्क्वेअर’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. 

तर या महोत्सवाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.

इतर पुरस्कार

कॅम डिओर पुरस्कार – जेन फेमी.
उत्कृष्ट लघुपट – अ जेन्टल नाइट.
परीक्षकांचा पुरस्कार – लव्हलेस.
उत्कृष्ट अभिनेत्री – डायनी क्रुगर.
उत्कृष्ट अभिनेता – जोआक्विन फिनिक्स.
उत्कृष्ट दिग्दर्शक – सोफिया कोपोला.
ग्रँड प्रिंक्स पुरस्कार – १२० बीट्स पर मिनीट.
वर्धापन दिन पुरस्कार – निकोल कीडमन.
पाम डिओर पुरस्कार – द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड).