१ जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक 
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे. 


केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२ अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.
 यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल. 



महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक व्यक्तीला कलम १३९-एएच्या उपकलम (२) च्या तरतुदींनुसार पॅन कार्ड आधार क्रमांकाची जोडणे आवश्यक आहे.



NITI आयोगाने ‘राष्ट्रीय ऊर्जा धोरण’ याचा मसुदा जाहीर केला
NITI आयोगाने ‘राष्ट्रीय ऊर्जा धोरण’ याचा मसुदा जाहीर केला आहे. हवेच्या गुणवत्तेला वाढविण्यासाठीच्या दृष्टीने हे धोरण आखले गेले आहे.

कोल इंडिया लिमिटेडच्या सात उपकंपन्यांना स्वतंत्र कंपन्यांमध्ये बदलणे.

खासगी कंपन्यांना कोळशाच्या खनिकर्मात वाढा करणे, त्यासाठी व्यावसायिकरित्या कोळसा खाणीचे वाटप करण्याच्या प्रक्रियेत सर्वसमावेशक सुधारणा करणे. याचा यात समावेश आहे.

२०४० सालापर्यंत वीज निर्मितीमध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा वाटा अनुक्रमे १४-१८% आणि ९-११% असण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे २०४० सालापर्यंत देशात छतावरील सौरऊर्जा निर्मितीबाबत नियम बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

ऊर्जा क्षेत्रातली भांडवली गरज ही देशासमोर असलेले मोठे आव्हान आहे, जी विकसित देशांच्या तुलनेत उच्च व्याजदरात वाढत आहे. स्पर्धात्मक बाजारास परिणामकारक स्वातंत्र्यबाबत दुर्लक्ष न करता साध्य करता येत नाही. वीज प्रमाणेच कोळसा, तेल आणि वायू (अपस्ट्रीम) यांच्यासाठी वैधानिक नियामकांना स्थान देण्यामधून नियामकांबाबत असलेली तफावत भरून काढण्याचा प्रस्ताव आहे.



लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी
श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीला सामोरे जावे लागले. 

श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. मलिंगावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 

मलिंगावर एक वर्षांची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे.



जगातील पहिल्या एटीएमचे पन्नासावे वर्ष
नागरिकांच्या पैसे काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या ‘ऑटोमेटेड टेलर मशिन’चा (एटीएम) पन्नासावा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला.


स्कॉटिश संशोधक शेफर्ड बॅरॉन यांनी एटीएमचा शोध लावला. बार्कलेज्‌ बॅंकेने प्रथम हे एटीएम सुरू केले. 
उत्तर लंडनमध्ये एनफिल्ड येथे पहिले एटीएम २७ जून १९६७ रोजी सुरू झाले. त्याचवेळी बॅंकेने आणखी सहा एटीएम सुरू केली. 

पहिल्या एटीएममधून पहिल्यांदा पैसे काढण्याचा मान ब्रिटिश विनोदी अभिनेते रेग वर्नी यांना मिळाला होता. त्या वेळी त्यांचा ‘ऑन द बसेस’ हा कॉमेडी शो प्रसिद्धीच्या शिखरावर होता.

बार्कलेज्‌ बॅंकेकडून पहिल्यांदा सुरू झालेल्या एटीएमला सुवर्ण महोत्सवानिमित्त सोनेरी झळाळी देण्यात आली होती. 

जगभरात आजघडीला सुमारे तीन कोटी एटीएम आहेत. यातील ७० हजार एटीएम ब्रिटनमध्ये असून, त्यातून १७५ अब्ज पौंड २०१६ मध्ये काढण्यात आले.



‘जीसॅट १७’चे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण
‘जीसॅट १७’ या भारताच्या उपग्रहाचे ‘एरियन स्पेस’ या फ्रान्सच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आज (गुरुवार) फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

या उपग्रहाचे वजन तब्बल ३४७७ किलो असून एरियनच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला हा २१ वा भारतीय उपग्रह आहे. जीसॅट १७ हा ‘कम्युनिकेशन सॅटेलाईट’ असून याचा वापर प्रामुख्याने हवामान क्षेत्रासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी केला जाणार आहे. 

या उपग्रहाची आयुर्मर्यादा १५ वर्षांची आहे. कर्नाटकमधील हसन येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विभागाने (मास्टर कंट्रोल फॅसिलिटी) आता या उपग्रहावर नियंत्रण मिळविले आहे.

इस्रोने गेल्या काही वर्षांत केलेल्या असामान्य प्रगतीमुळे अवकाश संशोधन व उपग्रह सेवा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून इस्रोचे हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे



अमेरिका भारताला मालवाहू सी-१७ विमान विकणार
ट्रम्प प्रशासनाने भारताला सी-१७ मालवाहू विमान विकण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या सध्याच्या आणि भविष्यातील हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत वाढ होईल, अशी आशा पेंटागॉनने केली आहे.

बोइंग कंपनीच्या सी-१७ मालवाहू विमानाची अंदाजित रक्कम ३६.६२ कोटी डॉलर आहे. त्यात क्षेपणास्त्र सूचना यंत्रणा, काऊंटर मेजर डिस्पेसिंग सिस्टिम, आयडेंटिफिकेशन फ्रेंड किंवा फोई (आयएफएफ) ट्रान्सपॉंडर तसेच दिशादर्शक उपकरणाचा समावेश आहे.

सी-१७ च्या खरेदीमुळे भारताला हवाईदलाची आणि लढाऊ हवाई परिवहन क्षमतेत वाढ करू शकतो. सध्या भारत सी-१७ विमानाचा वापर करत असून आपल्या लष्करात या विमानांना सहभागी करून घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

सी-१७ विमानाची कमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असून एअर लिफ्ट आणि एअर ड्रॉप या अभियानात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो. याशिवाय सामानाची आणि रुग्णांची ने-आण करू शकतो. सी-१७ विमान हे १७०९०० पौंडाचे वजनी सामान (जवान आणि उपकरणासह) नेआण करू शकतो.



जलसंधारणावरील राष्ट्रीय मोहिमेसाठी भारत-इस्राइल यांच्या करारास मंजूरी 
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात जलसंधारण क्षेत्रात राष्ट्रीय मोहीम राबविण्यासाठी भारत आणि इस्राइल यांच्यात सामंजस्य करार करण्यास मंजूरी दिली आहे.

करारांतर्गत भारतात एक राष्ट्रीय जलसंधारण मोहिमेची संरचना, अंमलबजावणी आणि देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही देश राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढविण्यासाठी कार्य करतील.