‘मसाप’चे पहिले बालकुमार साहित्य संमेलन लोणावळ्याला
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे.

२० सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत. 




आता राज्यात दुधाळ जनावरांना युनिक कोड 
दुधाळ जनावरांनाही पशुसंजीवनी योजनेत आधार प्रमाणेच बारा अंकी युनिट कोड देण्यात येत आहे. पाळीव जनावरांना स्वताची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र शासनाच्या नॅशनल मिशन ऑफ बोव्हाईन प्राडक्टिव्हीटी या योजनेतंर्गत हे काम केले जात आहे. 

जिल्ह्यात ८९०४४ दुधाळ जनावरांतील ५४७१९ गाई व ३४३२५ म्हशींना टॅग (बिल्ला) लावला जात आहे. 
यातून शासनाला जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. 



आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार
सरकारी कर्मचारी असूनही आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार १५ टक्के कापला जाणार आहे. आसाम विधानसभेने या संदर्भातले विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. मुलाच्या खात्यातून कापलेला पगार हा आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 

‘प्रणाम’ (पॅरेन्ट रिस्पॉन्सबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटबिलिटी अँड मॉनिटरींग) असे या विधेयकाचे नाव आहे.

सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे ही तक्रार पीडित आई-वडिलांनी करायची आहे. त्यानंतर ९० दिवसात आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन आसाम सरकारतर्फे देण्यात आले आहे.



लोकतंत्र के उत्सव की अनकही कहानी’ पुस्तक: लेखक डॉ. एस. वाई. कुरैशी
‘लोकतंत्र के उत्सव की अनकही कहानी’ पुस्तकाचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हे पुस्तक माजी मुख्य निवडणूक आयुक्त असलेले डॉ. एस. वाई. कुरैशी लिखित “अॅन अनडॉक्यूमेंटेड वंडर: द मेकिंग ऑफ ग्रेट इंडियन इलेक्शन” पुस्तकाची हिंदी आवृत्ती आहे.



भारताच्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राचे परिक्षण यशस्वी
भारतीय ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राचे ओडिशाच्या चांदीपूर प्रदेशातील बंगालच्या उपसागरात यशस्वीरित्या परिक्षण घेण्यात आले आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) द्वारा विकसित केले जाणारे स्वदेशी ‘अस्त्र’ हे दृष्टिक्षेपापलीकडील लक्ष्य भेदण्याकरिता असलेले हवेतून-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (BVRAAM) आहे. 

हे मध्यम श्रेणीच्या अंतरावरील हवेतील लक्ष्य भेदू शकण्यास सक्षम आहे. यामध्ये स्वदेशी RF सीकर उपकरण बसविण्यात आले आहे. याच्या आतापर्यंत सात उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या आहेत



१० वर्षानंतर डाळींच्या निर्यातीवर निर्बंध सरकारने हटवले
शेतकर्‍यांना नफा मिळवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने तूर, मूंग आणि उडद डाळींची निर्यात करण्यावरील बंदी भारत सरकारने १५ सप्टेंबर २०१७ पासून हटवलेली आहे.

निर्णयानुसार कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न-उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कडून परवानगी घेतल्यानंतर या डाळींची निर्यात केली जाऊ शकते. 

यापूर्वी केवळ सेंद्रीय डाळी आणि काबुली चना मर्यादित प्रमाणातच पाठवण्याची परवानगी होती. देशात २०१६-१७ (जुलै ते जून) या पीक वर्षात २२.४ दशलक्ष टन डाळींचे विक्रमी उत्पादन घेतले गेले.

वायुदलाचे मार्शल अर्जुन सिंह यांचे निधन
भारतीय वायुदलाचे एकमात्र मार्शल अर्जुन सिंह यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर उडवण्यात आलेल्या भारतीय वायुसेनेच्या शंभरहून अधिक विमानांच्या तुकडीचे अर्जुन सिंह यांनी नेतृत्व केले होते. 

१९३८ साली नव्याने स्थापित करण्यात आलेल्या भारतीय वायुसेनेत प्रवेश घेतला. त्यांची कराची येथे नियुक्ती करण्यात आली होती.

ऑगस्ट १९६४ मध्ये एअर मार्शल म्हणून पद स्वीकारण्याआधी अर्जुन सिंह यांनी भारतीय वायुदलात अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. १९६५ सालच्या भारत-पाक युद्धादरम्यान उत्कृष्ट सेवांसाठी त्यांना पद्मविभूषण देण्यात आले. १५ जानेवारी १९६६ रोजी एअर चीफ मार्शलची रॅंक बढती म्हणून प्राप्त करणारे ते प्रथम अधिकारी बनले.



सरदार सरोवर धरण राष्ट्राला समर्पित 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमधील सरदार सरोवर धरण राष्ट्राला समर्पित केले.

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाची उंची १३८.६८ मीटर इतकी करण्यात आली आहे. या धरणाचा गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या प्रदेशांना होणार आहे.

सरदार सरोवर धरण हे गुजरातमध्ये नवागाम गावाजवळ नर्मदा नदीवरचे धरण आहे. हा नर्मदा व्हॅली प्रोजेक्टचा एक भाग आहे. १९७९ साली या प्रकल्पाला सुरुवात झाली होती मात्र नर्मदा बचाव आंदोलनानंतर याचे काम बंद ठेवण्यात आले होते.



वॉशिंग्टन येथे भारत-अमेरिका ‘युध्द अभ्यास २०१७’ सरावाला सुरुवात
१६ सप्टेंबर २०१७ रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील संयुक्त तळ लुईस मॅककॉर्द येथे भारत-अमेरिका ‘युध्द अभ्यास २०१७’ सरावाला सुरुवात झाली.

‘युध्द अभ्यास’ हा भारतीय आणि अमेरिकेच्या लष्करांमध्ये आयोजित केला जाणारा संयुक्त उपक्रम आहे. हा सराव दोन आठवडे चालणार आहे. सरावादरम्यान विद्रोह आणि दहशतवादी कृत्यांला प्रतिबंध करण्यासाठी एकमेकांचे कौशल्य, अनुभव, कारवाई याविषयी माहितीचे आदानप्रदान केले जाईल.



सलमान खानला ‘ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार’ मिळाला
लंडनमधील ब्रिटिश पार्लिमेंट सभागृहात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला २०१७ सालच्या ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

सलमान खानला एक अभिनेता, निर्माता, एक व्यक्तिमत्व, गायक आणि समाजसेवक म्हणून भारतीय चित्रपट उद्योगात दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे. 



सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद
ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. सिंधूने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.

कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी या दोघींमध्ये आज लढत झाला. सिंधूने ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 असा तीन गेममध्ये पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 

तीन आठवड्यांपूर्वी या दोघींमध्ये ग्लास्गोत जागतिक स्पर्धेत अंतिम लढत झाली होती. एका तासापेक्षा जास्त रंगलेल्या या लढतीत ओकुहाराने विजय मिळविला होता. आता या पराभवाचा बदला घेत सिंधूने ओकुहाराचा तीन गेममध्ये पराभव केला.