कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर 
साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. 


साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

तसेच आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

१९८० मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. 

कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या. 



नवी दिल्लीत प्रथम ‘हेली एक्सपो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय सिव्हिल हेलिकॉप्टर परिषद’ आयोजित
४ नोव्हेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत येथे देशातील प्रथम ‘हेली एक्सपो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय सिव्हिल हेलिकॉप्टर परिषद-२०१७’ आयोजित करण्यात आली आहे.

उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ‘पवन हंस मॅगजीन एविएशन टुडे’ चा पहला अंक देखील अनावरीत करण्यात आला.

PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या सहकार्याने नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या पवन हंस लिमिटेड या मिनी रत्न कंपनीकडून ‘एन्हांसिंग कनेक्टिविटी’ या विषयाखाली या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप जिंकला
भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग १३ वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे २००४ मध्ये असे घडले होते. तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे १३ वर्षांनी घडले आहे. 

भारतीय पुरुष हॉकी संघाने २००३ मध्ये क्वालालंपूर आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्या वेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते. 

जपानमध्ये ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करत विजेतेपद मिळविले.  या
पूर्वी केवळ १५ दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्‍यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.

भारतीय महिलांनी यापूर्वी २००४ मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. २००९ मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली. तसेच १९९९ मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.


भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम
पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे. 

२१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.

या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ‘मैत्री स्टेशन’ या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तसेच खंडावरील भारत सरकारच्या ‘भारती स्टेशन’या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणेकर यांची तर उपप्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



इजिप्तच्या शर्म-अल-शेख शहरात जागतिक युवा मंचची बैठक आयोजित
५ नोव्हेंबर २०१७ रोजी इजिप्तच्या शर्म-अल-शेख शहरात ‘जागतिक युवा मंच’ च्या बैठकीला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फतेह अल-सीसी यांच्या हस्ते केले गेले. या कार्यक्रमात १४ देशांचे विविध प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि आफ्रिका संघाचे प्रतिनिधी सहभागी झाली आहेत.

पाच दिवसांच्या या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठौड हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

संपूर्ण जगातील तरुणाईला मुख्य वैश्विक धोरण उद्देशांसह जोडणे हा जागतिक युवा मंचचा मुख्य उद्देश्य आहे. बैठकीत व्यापारांमधील तरुणाईची भूमिका, भविष्यातील नेत्यांच्या निर्माणासाठी नवीन पद्धती, आव्हाने, स्त्री-पुरुष समानता आणि महिला सशक्तिकरण या विषयांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे.

इजिप्त हा अधिकृतपणे इजिप्त अरब प्रजासत्ताक देश आहे. या देशाची राजधानी कैरो शहर आहे आणि देशाचे चलन इजिप्तियन पाउंड हे आहे