४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात उद्‌घाटन
इफ्फी २०१७ च्या उद्‌घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन राजकुमार राव आणि राधिका आपटे यांनी केले. देशभरातल्या तालवाद्यांचा ‘ड्रम्स ऑफ इंडिया’ आणि ‘उत्सव’ या भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


या महोत्सवात ८२ देशांचे १९५ चित्रपट दाखवण्यात येणार असून १० चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. १० आशियाई आणि आंतरराष्ट्रीय प्रिमिअर तसेच ६४ पेक्षा अधिक भारतीय प्रिमिअर या महोत्सवाचा भाग असतील.

यावर्षीच्या १५ सर्वोत्तम चित्रपटांमध्ये सुवर्ण आणि रौप्य मयूर पुरस्कारासाठी चुरस असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षकांचे नेतृत्व प्रसिद्ध दिग्दर्शक मुझफ्फर अली करणार असून ऑस्ट्रेलियाचे महोत्सव दिग्दर्शक मॅक्सिन विलियम्सन, इस्रायलचे अभिनेते-दिग्दर्शक झाही ग्राड, रशियन छायाचित्रकार व्लादिस्लाव ओपेलिएनटस, इंग्लंडचे प्रोडक्शन डिझायनर रॉजर ख्रिस्तियन हे अन्य ज्युरी सदस्य असतील.

प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा भारतात बनवलेला पहिला चित्रपट ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटाने उद्‌घाटनपर सत्राची आज सुरुवात झाली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे जीवन केंद्रस्थानी ठेवून, पाबेलो सिझर यांनी निर्मिलेला भारत-अर्जेंटिना यांची सहनिर्मिती असलेला ‘थिंकींग ऑफ हीम’ या चित्रपटाने यंदाच्या इफ्फीचा समारोप होईल.

इफ्फी २०१७ मध्ये अनेक गोष्टी प्रथमच होत असून चित्रपटांमधील सर्वाधिक लोकप्रिय हेरगिरीपट जेम्स बॉंडचा विशेष विभाग असेल. १९६२ ते २०१२ पर्यंत आघाडीच्या अभिनेत्यांनी रंगवलेल्या बॉण्डच्या व्यक्तिरेखांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. 

दिवंगत चित्रपट अभिनेते ओम पुरी, विनोद खन्ना, टॉम ऑल्टर, रिमा लागू, जयललिता, दिग्दर्शक अब्दुल माजिद, कुंदन शहा, दासारी नारायण राव आणि सिनेमेटोग्राफर रामानंद सेन गुप्ता यांच्या चित्रकृती श्रद्धांजली विभागात दाखवल्या जाणार आहेत.

ब्रिक्स विभागात ब्रिक्सअंतर्गत सात पारितोषिक विजेते चित्रपटही इफ्फी २०१७ मध्ये रसिकांना पाहता येतील. ॲसेसेबल इंडिया कॅम्पेन अंतर्गत, दृष्टिहिनांसाठी ध्वनी माध्यमातून चित्रपटाचा आनंद घेता येईल, असे दोन चित्रपट दाखवण्यात येतील. 



इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्‌घाटन
४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाचे चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते २१ नोव्हेंबर रोजी उद्‌घाटन झाले. 

इंडियन पॅनोरमा २०१७ अंतर्गत २६ कथापट आणि १६ कथाबाह्य चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला हा एक उत्कंठावर्धक विभाग आहे. इंडियन पॅनोरमामध्ये विविध भागातल्या बहुभाषिक कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांची सन्माननीय ज्युरींकडून विशेष निवड झाली आहे.

४८ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २८ तारखेपर्यंत रंगणार आहे



दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती. 

भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत असून या पदासाठी भारताने पुन्हा न्या. भंडारी यांना नामांकन जाहीर केले होते. न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते.

ICJ मध्ये असे प्रथमच झाले आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या खंडपीठावर कोणीही ब्रिटिश न्यायाधीश नसणार.

६९ वर्षीय भंडारी एप्रिल २०१२ मध्ये ICJ न्यायाधीश पदासाठी निवडून आले होते आणि त्यांचा वर्तमान कार्यकाळ फेब्रुवारी २०१८ पर्यंतचा आहे. त्यानंतर पुढे या निवडणुकीच्या आधारावर ते आणखी ९ वर्षांसाठी कार्यरत राहतील.


आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ही १९४५ साली स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान न्यायिक संस्था आहे आणि हेग (नेदरलँड) शहरात याचे खंडपीठ आहे. 

ICJ मध्ये १५ न्यायाधीश असतात आणि या पदाचा कार्यकाळ ९ वर्षांचा असतो. ICJ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या दोघांकडूनही बहुमत असणे आवश्यक असते. 

ICJ च्या १५ सदस्यीय खंडपीठाचा एक तृतियांश भाग ९ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक तीन वर्षात निवडण्यात येतो



‘IMBAX’ भारत-म्यानमार संयुक्त लष्करी सरावाला मेघालयमध्ये सुरुवात
२० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७ या काळात मेघालयच्या उमरोई गावात भारत आणि म्यानमार यांचा द्वैपक्षीय लष्करी सराव ‘IMBAX 2017’ आयोजित करण्यात आला आहे.

म्यानमारच्या सेनाला संयुक्त राष्ट्रसंघ शांती अभियानाचा भाग बनविण्यासाठी प्रशिक्षण प्रदान करणे हा सरावाचा हेतू आहे. संयुक्त राष्ट्रसंघ शांती अभियान अंतर्गत दोन्ही देशांमध्ये होत असलेला हा पहिलाच युद्धसराव आहे.


भारतीय तटरक्षक दलाचा सराव ‘सागर कवच’ ला सुरुवात
२१ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘सागर कवच’ या तटरक्षण सरावाला सुरुवात झालेली आहे. केरळ आणि लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणार्थ भारतीय तटरक्षक दलाने ‘सागर कवच’ हा तीन दिवसांचा तटीय सुरक्षा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तटीय सुरक्षा यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी आणि मानक क्रियान्वयन प्रक्रियांच्या प्रमाणीकरणासाठी हा एक अर्धवार्षिक कार्यक्रम आहे.

भारतीय तटरक्षकाच्या नेतृत्वात भारतीय नौदल, तटीय पोलीस, पोलीस विशेष शाखा, इंटेलिजन्स ब्यूरो, कस्टम्स, बंदरे विभाग, मत्स्यपालन विभाग, प्रकाशगृहांचे महानिदेशक आणि हलके जहाजे आणि मच्छिमार समुदाय या सगळ्यांचा सक्रिय सहभाग या सरावात आहे.



माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुंशी यांचे निधन
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुंशी यांचे निधन झाले आहे. ते ७२  वर्षांचे होते. ते गेल्या नऊ वर्षापासून कोमात होते.

दक्षिण कोलकाता लोकसभा क्षेत्रातून प्रियरंजन दासमुंशी यांनी पहिल्यांदाच वर्ष १९७१ मध्ये संसदेत प्रवेश केला. त्यांना १९८५ साली पहिल्यांदा राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद सोपवले गेले होते. 

२००४ साली संसदीय निवडणूक जिंकल्यानंतर २००८ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेव्हापासून कोमात होते.



अफगाणिस्तानने पहिल्यांदा अंडर-19 क्रिकेट आशिया चषक जिंकले
अफगाणिस्तानने क्रिकेट खेळातील ‘अंडर-19 आशिया चषक 2017’ जिंकला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला.

यासोबतच, अफगाणिस्तानने आपले पहिले ‘अंडर-19 आशिया चषक’ जिंकले.



चीनकडून नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी
चीनने ‘डाँगफेंग-41’ (डीएफ-41) या अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतल्याचे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 

या क्षेपणास्त्राचा पल्ला १२००० ते १५००० किलोमीटर असून एकावेळी अनेक अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही भागात डागण्याची त्याची क्षमता आहे. 

त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दहापट असल्याने अमेरिका व अन्य देशांच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देऊन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षपणास्त्र पुढील वर्षी चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

चीनच्या ताफ्यात यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असून अत्याधुनिक डाँगफेंग-४१ हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम तेथे १९९० च्या दशकापासून सुरू आहे. 

या क्षेपणास्त्राच्या २०१२ पासून सात चाचण्या झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात चीनच्या पश्चिमेकडील वाळवंटातून त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राने दिले आहे. 

तसेच हे क्षेपणास्त्र 2018 सालापर्यंत चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होईल, असे चीनच्या सकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.



भारतीय बनावटीचे पहिले विमान
देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या टीएसी 003 या विमानाची अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली असून तसे प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे यादव यांचे विमान निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वैमानिक अमोल यादव यांनी चारकोप येथील घराच्या गच्चीवर २०११ मध्ये विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात ते प्रदर्शित केले. यादव हे थ्रस्ट इंडिया या त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभारतील. 

भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने त्यांच्या कंपनीस सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १९ आसनी विमान बनविण्यासाठी जमीन देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले आहे