नीति आयोगाच्या आरोग्य विकास अहवालात केरळ, पंजाब अव्वलस्थानी
नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आरोग्य अहवाल सादर केला आहे.


नीति आयोगाने प्रसिद्ध केलेल्या राज्यांच्या आरोग्य विकास अहवालात केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये राज्यांना आरोग्य श्रेणीप्रमाणे गुण देण्यात आले आहेत.

तसेच ‘हेल्दी स्टेटस प्रोग्रेसिव्ह इंडिया’ असे या अहवालाचे नाव असून यात झारखंड, जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

तर झारखंड आणि छत्तीसगढ ही राज्ये आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. ही राज्ये सध्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आली आहेत. 

छोट्या राज्यांमध्ये मिझोराम हे पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर मणिपूर आणि गोव्याचा क्रमांक लागतो.
तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपने सर्वाधिक चांगले काम केले आहे.इंदिरा नुयींची आयसीसीच्या संचालकपदी निवड
पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडन्ट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून २०१७ रोजी घेण्यात आला तर जून २०१८ मध्ये त्या पदभार स्वीकारणार आहेत.
दोन वर्षांसाठी त्या या पदावर असतील. मात्र, त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

तसेच इंद्रा नुयी या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत.
‘फॉर्च्यून’ मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला आहे. 

ICC ने जून २०१७ मध्ये स्वतंत्र संचालकपदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव मान्य केला होता. ‘स्वतंत्र कार्यभार एका महिलेला देण्यात यावा’ अशी अट या प्रस्तावात होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. १९९० मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि १९८९ मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. 

ICC मध्ये १०५ सदस्य आहेत, त्यात १२ पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, ३७ सहयोगी सदस्य आणि ५६ संलग्न सदस्य आहेत. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


ओडिया साहित्यकार चंद्रशेखर रथ यांचे निधन
प्रसिद्ध ओडिया साहित्यकार चंद्रशेखर रथ यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते.

रथ यांनी ओडिशाच्या ओडिया भाषेतून कथा, कादंबरी आणि कविता अश्या अनेक साहीत्यांची रचना केली. त्यांचे यंत्रारुढ, असूर्य उपनिवेश व नवजातक या तीन कादंबरीसोबतच १६ लघुकथा संग्रह, ३ कवितासंग्रह आदी लिखाण प्रसिद्ध आहे. 

ते पद्मश्री ने सन्मानित होते. शिवाय त्यांना साहित्य अकादमी, शारला पुरस्कार, अतिबडी जगन्नाथ दास पुरस्कार व केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार यांनी गौरविण्यात आले होते.नवी दिल्लीत ‘स्वच्छ भारत सॅनिटेशन पार्क’ चे उद्घाटन
नवी दिल्लीत ‘स्वच्छ भारत सॅनिटेशन पार्क’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील CGO संकुल येथे हे उद्यान एंविरोनमेंट सॅनिटेशन इंस्टीट्यूट आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने केंद्रीय पर्यावरण व स्वच्छता मंत्रालयाने विकसित केले.

स्वच्छतेसंबंधी विविध सुरक्षित तांत्रिक पर्यायांविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उद्यानात शौचालयसंबंधी तंत्रज्ञान आणि घनकचरा व द्रवकचरा व्यवस्थापन तंत्र अश्या विविध उपाययोजनांचे पर्याय प्रदर्शित करण्यात आले आहे.भारत-जॉर्डन द्विपक्षीय संबंधांना बळकट करण्यास मान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन दौर्‍यात जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल-हुसेन यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करण्याचे मान्य केले आहे.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाईन सकट पश्चिम आशियातील तीन देशांच्या दौर्‍यावर आहेत. प्रथम त्यांनी जॉर्डनला भेट दिली आणि पुढे पॅलेस्टाईनकडे रवाना झालेत. एका भारतीय पंतप्रधानाचा गेल्या ३० वर्षांमधील जॉर्डनचा हा पहिलाच दौरा आहे.

जॉर्डन हा दक्षिण-पश्चिम आशियामधील अकाबा खाडीच्या दक्षिणेकडे स्थित एक आखाती देश आहे. भारत आणि जार्डन यांच्यात १९५० साली राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेत. अम्मान हे देशाचे राजधानी शहर आहे आणि दिनार हे चलन आहे