१२ राज्यांनी बिगर-दहशतवादसंबंधी मृत्युदंड शिक्षेच्या विरोधात मत दिले 
मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर गृह मंत्रालयाने १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून त्यांचे उत्तर मागितले होते. त्यावर १२ राज्यांनी मृत्युदंडाच्या शिक्षेच्या विरोधात मत दिले तर केवळ कर्नाटक आणि त्रिपुरा या दोन राज्यांनी हत्या आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात या प्रथेच्या पक्षात इच्छा दर्शवली आहे.


२०१५ साली न्या. ए. पी. शाह यांच्या अध्यक्षतेत भारतीय कायदा आयोगाने बिगर-दहशतवादसंबंधी प्रकरणासाठी मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची शिफारस केली होती. यावर मंत्रालयाने राज्य शासनांकडून टिप्पणी मागितली होती. 



सितांशू कार PIB चे नवे प्रमुख 
सितांशू कार यांची पत्र माहिती कार्यालय (PIB) चे पुढील प्रमुख म्हणून नेमणूक केली गेली आहे.

सितांशू कार सध्या आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभाग (NSD) चे महासंचालक आहेत. १ मे २०१८ पासून ते फ्रँक नरोन्हा यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदाचा कार्यभार सांभाळतील.

पत्र माहिती कार्यालय (Press Information Bureau -PIB) ही भारत सरकारची एक केंद्रीय वृत्त संस्था आहे. याची स्थापना १९१९ साली करण्यात आली.



बिद्या देवी भंडारी दुसऱ्यांदा नेपाळच्या राष्ट्रपती 
नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांची राष्ट्रपती पदाच्या दुसर्‍या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

बिद्या देवी भंडारी २०१५ साली नेपाळच्या प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या. त्या सन १९९४ आणि सन १९९९ च्या संसद निवडणुकीत देखील निवडून आल्या होत्या.

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. काठमांडू ही या देशाची राजधानी आहे आणि नेपाळी रुपया हे चलन आहे. 


ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन 
विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.

विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. 

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक आणि आई इझाबेल ऑक्सफर्डच्या पदवीधर होत्या.

हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. 

१९५९ साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यांनी १९६२ साली ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी ३० वर्षे गणिताचे अध्यापन केले.

वयाच्या अवघ्या २१ वर्षी जडलेल्या दुर्धर ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ नामक आजारामुळे त्यांचे संपूर्ण शरीर अधू असूनही त्यांनी जिद्दीने आपला प्रवास केला. हॉकिंग यांची अल्बर्ट आइनस्टाइन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याशी तुलना केली जाते.

विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. २००९ साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते. शिवाय त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी बहाल केली होती.

हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित ‘ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक खूप गाजले.



मॅक्सिकोमध्ये ‘जागतिक महासागर शिखर परिषद २०१८’ संपन्न 
७-९ मार्च २०१८ रोजी मॅक्सिकोमध्ये ‘जागतिक महासागर शिखर परिषद २०१८’ यशस्वीपणे पार पडली.

मॅक्सिकोच्या रिवेरा मेयमध्ये या परिषदेत जगातील समुद्र आणि समुद्री पर्यावरणाबाबत असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.


२०१२ सालापासून जागतिक महासागर शिखर परिषदेचे आयोजन ‘द इकॉनोमिस्ट इव्हेंट’ संस्थेतर्फे करण्यात येत आहे.