कार निर्यातीत मारूती सुझुकी प्रथमस्थानी
मारूती सुझुकी ही चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक कार निर्यात करणारी कंपनी ठरली आहे.


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मारूतीने ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकत बाजी मारली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात मारूती सुझुकीने 57,300 कार्सची निर्यात केली आहे. 

मागील वर्षी याच काळात मारूतीने 54,008 कार्सची निर्यात केली होती. मारूतीच्या निर्यातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 6 टक्के वाढ झालेली आहे.

आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मारूतीने चांगलीच आघाडी घेतली आहे. कार निर्यातीत ह्यूंदाई मोटर्स गेली काही वर्षे सातत्याने आघाडीवर होती. परंतु, चालू आर्थिक वर्षात ह्यूंदाईने 44,585 कार्सची निर्यात

केली आहे. 

मागील आर्थिक वर्षाच्या तूलनेत ही जवळपास 29.25 टक्क्यांची घसरण आहे. त्यामुळेच ह्यूंदाई मोटर्सची पिछेहाट होत ती फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स नंतर चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.



इस्त्रोकडून आणखी एक यशस्वी भरारी 
भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने 29 मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन संध्याकाळी 4.56 च्या सुमारास GSLV रॉकेटमधून GSAT-6A उपग्रह अवकाशात झेपावला.

2066 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान 10 वर्षआहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.

GSAT-6A या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी ही माहिती दिली.

उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.

GSAT-6A हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या GSAT-6 या उपग्रहाला मदत करणार आहे.

GSAT-6A मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.

GSAT-6A मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.

GSAT-6A च्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत विकास इंजिनचा वापर होऊ शकतो.


बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात आता ‘रामजी’चा समावेश होणार 
घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.

रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाहीभीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत. त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नावभीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव आंबेडकर यांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश करण्यासाठी 2017 मध्ये एक कँपेन चालवण्यात आले होते. त्यावेळी राम नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले होते.

महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लिहिताना भीमराव रामजी आंबेडकर असेच लिहिले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशातही ते तसेच घेतले जावे असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत.



शेखर कपूर – 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या केंद्रीय समितीचे प्रमुख 
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना यावर्षी होणार्‍या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (NFA) केंद्रीय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

शेखर कपूर या पुरस्कारांसाठी चित्रपटांचे मूल्यांकन करणार्‍या 11 पंचांच्या गटाचे अध्यक्ष होतील.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (NFA) हा भारतातला सर्वात मुख्य चित्रपट पुरस्कार समारंभ आहे. 1954 साली स्थापित NFA चे प्रशासन 1973 सालापासून भारत सरकारच्या ‘चित्रपट महोत्सव संचालनालय’ (Directorate of Film Festivals) कडून पाहिले जात आहे. हे पुरस्कार भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.



अजमेरमध्ये राजस्थानातील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन 
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते राजस्थानच्या अजमेरमधील रूपनगण गावातराज्यातले पहिले मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे.

113.57 कोटी रुपयांच्या या मेगा फूड पार्कमुळे अजमेर व शेजारी जिल्ह्यातील जवळपास 25000 शेतकर्‍यांना फायदा मिळणार.

भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मेगा फूड पार्क ही योजना “समूह” पध्दतीवर आधारित आहे. 

पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असतात. 



पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार 34 वर्षांनंतर पुन्हा उघडणार 
ओडिशा राज्य शासनाने पुरी येथील ‘श्री जगन्नाथ मंदिर’ प्रशासनाला 34 वर्षांनंतर मंदिराचे रत्न भंडार उघडण्यास परवानगी दिली आहे.

भारतीय पुरातत्त्वशास्त्रीय सर्वेक्षण (ASI) द्वारे आतल्या संरचनेचे सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षण करण्यासाठी हे दालन उघडण्यास परवानगी देण्यात आली. रत्न भंडारात देवी-देवतांचे अनमोल हिरे आणि आभूषणे ठेवले जातात. याला पूर्वी 1984 साली निरीक्षणासाठी उघडण्यात आले होते.

भारतीय पुरातत्त्वशास्त्रीय सर्वेक्षण (ASI) ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी पुरातत्त्वीय संशोधनासाठी आणि देशातील सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि सांभाळासाठी जबाबदार आहे. 1861 साली ब्रिटिश शासनाने याची स्थापना केली होती. याचे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम हे आहेत. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.