भारताचा ‘आर्मी एयर डिफेन्स दिन’: 10 जानेवारी
‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ या लष्कराच्या हवाई तुकडीने 10 जानेवारी 2019 रोजी आपला रौप्य वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्त नवी दिल्लीत एक सोहळा आयोजित करण्यात आला.


‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ ही भारतीय लष्कराची सर्वात नवी तुकडी आहे, जी लष्कराला हवाई सुविधा प्रदान करते. “आकाशे शत्रून जाही” हे याचे घोषवाक्य आहे. याची स्थापना सन 1939 मध्ये करण्यात आली.



नवी दिल्लीत CTDPची चौथी बैठक पार पडली
10 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्यापार विकास आणि संवर्धन परिषद (CTDP)’ याची चौथी बैठक पार पडली.

या बैठकीत निर्यात, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, सरकारच्या सर्व योजना आणि कार्यक्रमांचा पुरेपूर वापर करून व्यापाराला चालना देण्यासाठी शक्य मार्गांचा शोध घेण्यासाठी चर्चा झाली.

2022 सालापर्यंत भारताची कृषी निर्यात $60 अब्जपर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने भारत सरकारने यावेळी प्रथमच कृषी निर्यात धोरण तयार केले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारास सक्षम वातावरण प्रदान करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांशी सतत संवाद साधण्यासाठी जुलै 2015 मध्ये ‘व्यापार विकास आणि संवर्धन परिषद (CTDP)’ याची स्थापना करण्यात आली. 

भारताच्या निर्यातीला चालना देण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सक्रिय भागीदार बनविण्यासाठी एक कार्यचौकट तयार केले गेले.



मुंबईमध्ये ‘बँक पसरगड’ या इराणी बँकेची शाखा उघडण्यास परवानगी 
इराणच्या ‘पसरगड बँक’ (Bank Pasargad) या खासगी बँकेची शाखा मुंबईमध्ये उघडण्यास भारताने परवानगी दिली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये बँक शाखा उघडणार.

नुकताच इराणच्या चाबहार बंदरावरील कारभार भारताने सांभाळलेला आहे. इराणसह भारताचे द्वैपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी करार झाला होता. त्यामधूनच भारतात गुंतवणूक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.


भांडवली बाजाराच्या विकासासाठी SEBIची संशोधन सल्लागार समिती
आर्थिक क्षेत्रात संशोधन कार्य मजबूत करण्यासाठी आणि धोरण तयार करण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) ने डॉ. शंकर डे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संशोधन सल्लागार समिती’ (RAC) नेमली आहे. या समितीत प्रमुख अर्थतज्ञ आणि शेयर बाजारातल्या सदस्यांचा समावेश आहे.

भारतात भांडवली बाजाराच्या विकासासाठी आणि नियमनसाठी संबंधित संशोधनाची उद्दीष्टे, व्याप्ती आणि मार्गदर्शके निश्चित करणे, विशेषत: धोरण तयार करण्यासाठी संशोधनकार्य करणे; संशोधनासंबंधित माहितीचे आदानप्रदान करणे; बाह्य संशोधकांसह संशोधनासाठी सहकार्य करणे, अशी समितीची कार्ये असणार आहे.



‘एडवांस्ड मॉडेल सिंगल विंडो’च्या विकासाच्या संदर्भात भारत आणि जपान यांच्यात करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाकडून व्यापाराला चालना देण्यासाठी ‘‘एडवांस्ड मॉडेल सिंगल विंडो’’ याच्या विकासाच्या संदर्भात भारत आणि जपान यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली आहे.

या करारामुळे ‘एडवांस्ड मॉडेल सिंगल विंडो’ याच्या विकासासाठी दोनही देश एकमेकांना सहकार्य करतील आणि व्यवसायासाठी आवश्यक सुलभ प्रशासकीय प्रक्रियेची रचना करण्यासाठी कार्य करणार. याची रचना भारतात आणि भारताबाहेर लागू केल्या जाऊ शकणार्‍या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असेल



सागरी समस्यांच्या संदर्भात भारत आणि डेन्मार्क यांच्यात सामंजस्य करार 
केंद्रीय मंत्रिमंडळाने सागरी समस्यांच्या संदर्भात भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. जानेवारी 2019 मध्ये डेन्मार्कच्या आगामी भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार.

या करारामार्फत देशांच्या सागरी क्षेत्रांमधील शोधकार्यासाठी द्वैपक्षीय सहयोगासाठी मार्ग मोकळा होणार. तसेच दोन्ही प्रदेशांच्या सागरी क्षेत्रात सीमा सहयोग आणि गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तसेच जलवाहतूक सुलभ होण्याकरिता माहितीची देवाणघेवाण केली जाणार. 

शिवाय जहाज बांधकाम, सागरी प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात क्षेत्रात सहकार्य केले जाईल.