प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख, भुपेन हजारीका यांना भारतरत्न जाहीर
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका (मरणोत्तर) आणि नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.


देशाच्या राजकारणातील योगदानासाठी प्रणब मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे. सन 2012-2017 दरम्यान ते भारताचे 13वे राष्ट्रपती होते.

भुपेन हजारीका यांची एक पहाडी आवाजाचा गायक अशी ख्याती होती. रुदाली या चित्रपटातील ‘दिल हूम हूम करे’ हे त्यांचे गाणे होते. हजारीका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले आरएसएस कार्यकर्ते होते. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते. याआधी नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले.

देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नावांची शिफारस करत असतात. भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. 

सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय सन 1954 मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला. 

2 जानेवारी 1954 साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. 1955 साली कायद्यात काही बदल करून मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली.सशस्त्र दलांच्या तसेच पोलीस अधिकार्‍यांसाठी शौर्य पदके जाहीर
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलांसाठी एक अशोक चक्र, दोन किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र जाहीर केली आहेत.

अशोक चक्र – नाझीर अहमद वाणी
किर्ती चक्र – तुषार गौबा, सोवार विजय कुमार (मरणोत्तर)

याव्यतिरिक्त, 855 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तीन जणांना जाहीर झाले असून पोलीस शौर्य पदक 144 अधिकाऱ्यांना, अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक 74 अधिकाऱ्यांना आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 632 अधिकाऱ्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत.

किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (1952 सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.

अशोक चक्र (1952 सालापासून) हा देशातील सर्वोच्च शांतता वेळीचा शौर्य पुरस्कार असून शौर्याचे प्रदर्शन दाखविणार्‍या सैनिकाला या शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते.


नादारी व दिवाळखोरी कायद्याच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
25 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘नादारी व दिवाळखोरी संहिता (IBC)-2016’ याच्या घटनात्मक वैधतेस मान्यता दिली आहे.

न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि नवीन सिन्हा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. पीठाने कायद्याची संपूर्णपणे घटनात्मक वैधता राखली आहे.

नादारी आणि दिवाळखोरी संहिता-2016 मध्ये दुरूस्ती करणारा नवा कायदा देशात नुकताच लागू करण्यात आला आहे. बेईमान वा धोकादायक व्यक्तींकडून या कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग टाळण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) मार्फत चालवली जाते.

हा कायदा बँकांचे कर्ज बुडव्या कंपन्यांच्या प्रमोटर (कंपनी सुरू करणारा) कडून दिवाळखोर कंपन्यांसाठी बोली लावण्यावर बंदी आणते आणि हा कायदा व्यक्तीशी संबंधित आहे. हा कायदा कंपन्या तसेच व्यक्तींना लागू होतो आणि दिवाळखोरीसंबंधी बाबींचे निराकरण करण्यासाठी वेळबद्ध प्रक्रिया प्रदान करतो. 

परतफेड करण्याच्या बाबतीत, कर्जदाता कर्जदाराच्या मालमत्तेचा ताबा घेतील आणि 180 दिवसांच्या कालावधीत दिवाळखोरीचे निराकरण करण्यासाठी निर्णय घेतील. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कर्जदारांना संरक्षण प्रदान करते.ज्ञानपीठ विजेत्या लेखिका ‘कृष्णा सोबती’ कालवश:ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे 25 जानेवारी रोजी निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या.कृष्णा सोबती यांच्या वयाची फेब्रुवारीत 94 वर्षे पूर्ण होणार होती. गेला एक आठवडा त्या अतिदक्षता विभागात होत्या. सायंकाळी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वृद्धापकाळातही त्यांना समाजातील घडामोडींची जाणीव होती. कृष्णा सोबती या संवेदनशील व सजग लेखिका होत्या. साहित्यात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

‘छन्ना’ हे त्यांचे पुस्तक 11 जानेवारीला नवी दिल्ली जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित करण्यात आले होते. खरेतर हे पुस्तक म्हणजे त्यांची साठ वर्षांपूर्वी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. काही कारणास्तव ती प्रकाशित झाली नव्हती.

कृष्णा सोबती यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1925 रोजी झाला होता. ‘स्त्री ओळख व लैंगिकता’ यावर त्यांनी लेखन केले. ‘मित्रों मर्जानी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’ ही त्यांची आणखी पुस्तके आहेत.


तसेच त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, त्यांना पद्मभूषणही देऊ केले होते पण ते त्यांनी नाकारले. कवी अशोक वाजपेयी यांनी सांगितले, की त्यांनी साहित्यातून लोकशाहीच्या विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली. साहित्यात त्यांचे योगदान अजोड असून समता, न्याय यासाठी त्यांनी लढा दिला.अब्दुल्ला सुलतान अहमद शाह: मलेशियाचे भावी राजा
मलेशियाच्या राजघराण्याने सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांची देशाचे भावी राजा (राष्ट्र प्रमुख) म्हणून निवड केली आहे. सुलतान अब्दुल्ला यांची 16 वे “यांग दी परतुआन अगोंग’ (राजे) म्हणून 5 वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दिनांक 31 जानेवारी 2019 पासून सुरु होणार आहे.

सुलतान मोहम्मद व्ही. यांनी नुकतेच राजपदाचा त्याग केला होता. राजांनी पदत्याग केल्याची घटना मुस्लिम बहुल मलेशियाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडली.

मलेशिया हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. क्वाला लंपूर हे मलेशियाचे राजधानी शहर आहे आणि ‎मलेशियन रिंगिट (MYR) हे राष्ट्रीय चलन आहे. मलेशियामध्ये घटनात्मक राजेशाही आहे. राजांची निवड दर 5 वर्षांनी केली जाते. देशातील 9 राज्यांमधून राजाची निवड केली जात असते.